एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यावरून शिवसेनेमध्ये नाराजी का?

फोटो स्रोत, Eknathrao Khadse/facebook
- Author, दीपाली जगताप
- Role, बीबीसी मराठी
"एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यास महाविकास आघाडीत अडचणी निर्माण होतील. माझा खडसेंसोबत असलेला संघर्ष कायम राहणार आहे. माझे अधिकार अबाधित राहतील याची मला खात्री द्या अशी चर्चा काही दिवसांपूर्वीच मी आमचे पक्षश्रेष्ठी उद्धव ठाकरे यांच्याशी केली आहे," अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे स्थानिक आमदार यांनी नाव न जाहीर करण्याच्या अटीवर बीबीसी मराठीशी बोलताना दिली आहे.
"महाविकास आघाडीने आधीच ठरवलेल्या बाबींमध्ये एकनाथ खडसेंनी ढवळाढवळ केली अथवा माझ्या अधिकारांमध्ये हस्तक्षेप केला तर संघर्ष अटळ आहे. या सर्व बाबी स्पष्ट न होताच त्यांचा प्रवेश झाला तर मी माझा निर्णय घेईन," असा इशाराही स्थानिक आमदाराने दिला आहे.
उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ खडसे विरुद्ध शिवसेना हा जुना संघर्ष आहे. हा संघर्ष 2014 मध्ये टोकाला गेला. शिवसेनेसोबतची युती तोडण्याची घोषणा करण्यासाठी एकनाथ खडसेंनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत पुढाकार घेतला होता.
आता एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर आहेत अशी जोरदार चर्चा सुरू आहे. याला राष्ट्रवादी काँग्रेससोबतच शिवसेनेच्या स्थानिक आमदार आणि नेत्यांचाही विरोध आहे.
शिवसेनेच्या आणखी एका ज्येष्ठ नेत्याने आणि स्थानिक आमदाराने नाव न घेण्याच्या अटीवर बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले, "आमचे पाच आमदार आहेत. आमच्यापेक्षा जास्त राष्ट्रवादी काँग्रेसच्याच स्थानिक नेत्यांना अडचण आहे. आम्हाला तर कायम खडसेंनी त्रास दिला आहे. यापुढेही देतील हे आम्ही गृहीत धरले आहे. त्यामुळे आतापर्यंत नडलो तसेच पुढेही नडू."
"एकनाथ खडसेंची एवढीच ताकद असती तर त्यांच्या मुलीचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला असता का? त्यांची काही आता ताकद राहिलेली नाही. मग त्यांना मोठं करण्याचे काम का केले जात आहे?" असाही प्रश्न शिवसेनेच्या आमदाराकडून उपस्थित करण्यात आला.
खानदेशात राष्ट्रवादी काँग्रेसचा सध्या एकच आमदार आहे. साधारण 2009 पर्यंत जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे 11 पैकी 5 आमदार होते. पण कालांतराने ही संख्या घटत गेली. शिवसेनेने मात्र आपले पाच आमदार कायम राखण्यात यश मिळवलं.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांचे सहकारी पक्ष आहेत.

फोटो स्रोत, facebook
भाजपमध्ये चार दशकांहून अधिक काळ कार्यरत असलेले एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्यास दोन्ही सत्ताधारी पक्षांच्या संबंधावरही याचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आता भाजपमध्ये नाराज असलेले एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आता महाविकास आघाडीत एकत्र असल्याने खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यास शिवसेनेच्याही स्थानिक राजकारणावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यास शिवसेनेसोबत संबध बिघडणार? खडसेंना मंत्रिमंडळात जागा देण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत मतभेद आहेत का? एकनाथ खडसेंच्या पक्षांतराचे परिणाम महाविकास आघाडीत कसे होऊ शकतात? या सर्व प्रश्नांचा आढावा आपण या बातमीमध्ये घेणार आहोत.
शिवसेना आणि एकनाथ खडसे यांच्या संबंधात तणाव का?
सहा वर्षांपूर्वी म्हणजे 2014 सालच्या घटस्थापनेच्या काही दिवस आधी भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजप-शिवसेना युती तुटल्याची घोषणा केली होती. पत्रकार परिषदेत 25 वर्षांची भाजप आणि शिवसेनेची मैत्री संपुष्टात आल्याचे खडसेंनी जाहीर केले.
2014 विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप आणि शिवसेनेच्या घटस्फोटाचे कारण शिवसेनेच्या अवास्तव मागण्या असल्याचे सांगितले.
शिवसेना आणि एकनाथ खडसेंमधले अंतर यामुळे आणखी वाढत गेले. उत्तर महाराष्ट्रात भाजपचे प्रबळ नेते म्हणून एकनाथ खडसे यांची ओळख आहे. पण शिवसेना आणि भाजपची युती असूनही स्थानिक पातळीवर मात्र खडसे आणि सेनेच्या नेत्यांमध्ये उघड वैर आहे.

फोटो स्रोत, Getty Images
युतीच्या उमेदवारांना संपूर्ण जिल्ह्यात मदत करू पण खडसेंच्या मुक्ताईनगर मतदारसंघात मदत करणार नाही, अशी उघड भूमिका यापूर्वी शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी घेतली आहे.
उत्तर महाराष्ट्रातील शिवसेनेचे स्थानिक नेतृत्व आणि खडसे एकमेकांचे कायम विरोधक राहिले आहेत. शिवसेनेचे जळगावचे नेते माजी आमदार सुरेश जैन हे एकनाथ खडसे यांचे कट्टर विरोधक समजले जातात.
शिवसेना आणि भाजप दोन्ही हिंदुत्ववादी पक्ष आहेत. एकनाथ खडसे साधारण चार दशकांपासून भाजपमध्ये सक्रीय आहेत. एक लोकनेता आणि भाजपचा बहुजन चेहरा अशी खडसेंची ओळख आहे.
उत्तर महाराष्ट्रात युतीच्या काळातही एकनाथ खडसेंनी शिवसेनेला सहकार्य केले नाही, अशी तिथल्या स्थानिक नेत्यांची भावना आहे.
जळगावमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही शिवसेना आणि एकनाथ खडसे आमने-सामने राहिले आहेत. जिल्हा परिषदेत शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजप आणि काँग्रेस एकत्र सत्तेत आहेत. तर जळगाव महानगरपालिकेत भाजपची सत्ता असून शिवसेना विरोधकाच्या भूमिकेत आहे.
2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून एकनाथ खडसे यांची सून रक्षा खडसे यांनी निवडणूक लढवली. त्यावेळी युती असूनही शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी मुक्ताईनगरमध्ये प्रचारासाठी मदत करणार नसल्याची जाहीर भूमिका घेतली होती.
जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनीही भाजपला अनेकदा उघड आव्हान दिले आहे. शिवसेनेला मदत करण्याची वेळ येते तेव्हा एकनाथ खडसे फारकत घेतात असा आरोपही त्यांनी केला होता.

फोटो स्रोत, Twitter
खडसेंच्या प्रवेशावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत मतभेद?
एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशा बातम्या सातत्याने येत आहेत. एकनाथ खडसे यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्याशी जवळचे संबंध आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उत्तर महाराष्ट्रातील नेत्यांची बैठक नुकतीच पार पडली. जळगावचे आमदार अनिल पाटील, माजी आमदार गुलाबराव देवकर, माजी आमदार सतीश पाटील हे बैठकीला उपस्थित होते.
पण उत्तर महाराष्ट्रातील स्थानिक शिवसेनेच्या आमदारांमध्ये खडसेंच्या प्रवेशावरून अस्वस्थता आहे. यामुळे स्थानिक पातळीवर शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा नवा संघर्ष उभा राहू शकतो.
"आतापर्यंत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांसोबत काम करत होतो. आमच्यात कधीही टोकाचा संघर्ष नव्हता. पण एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्यास संघर्ष अटळ आहे," अशी प्रतिक्रिया एका शिवसेनेच्या आमदाराने बीबीसी मराठीशी बोलताना दिली.
जळगाव पुण्यनगरीचे संपादक विकास भदाणे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले, "जळगावमध्ये शिवसेना आणि खडसे यांच्यात कायम वाद होतात. 2014 मध्ये शिवसेना आणि भाजपने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंनी खडसेंचा मतदारसंघ मुक्ताईनगरमध्ये प्रचारसभा घेतली होती."
"खडसेंचे विरोधक समजले जाणारे शिवसेनेचे माजी आमदार सुरेश जैन हे पक्षातले ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचेही मत शिवसेना पक्षश्रेष्ठी विचारात घेऊ शकते," असंही विकास भदाणे सांगतात.
एका बाजूला सत्ता टिकवण्याचे आव्हान आणि दुसऱ्या बाजूला स्थानिक नेत्यांची नाराजी वेळीच दूर करण्याचे आव्हान अशा दोन्ही पातळ्यांवर शिवसेनेला संघटनात्मक काम करावे लागणार आहे.

फोटो स्रोत, Getty Images
ज्येष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले,"शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही प्रादेशिक पक्ष आहेत. त्यामुळे दोन्ही पक्ष वर्चस्वाच्या लढाईत समोरासमोर येत राहणार. राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येक ठिकाणी काहीतरी मिळवताना दिसत आहे.
"खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केला तर त्यानिमित्त ही स्थानिक खदखद बाहेर पडतानाही दिसू शकते. महाविकास आघाडीतले तिन्ही पक्ष सत्ता स्थापनेसाठी एकत्र आलेत. पण हे तीन पक्ष एकत्र येणं राज्यात विविध ठिकाणी स्थानिक राजकारणाला धरून नाही. तेव्हा स्थानिक नाराजी बाहेर येण्याची ही सुरुवात असू शकते."
महाविकास आघाडीत हे दोन्ही पक्ष एकत्र असले तरी पक्षांनी स्वतंत्र वाढीचा मार्ग मोकळा ठेवला आहे. पारनेरमध्ये जेव्हा नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला असला तरी खडसेंच्या बाबतीत असे काही होण्याची शक्यता कमी आहे.
"एकनाथ खडसेंसारखा बडा नेता जर राष्ट्रवादीत प्रवेश करत असेल तर ते शिवसेनेचे ऐकतील असे वाटत नाही." असे मत मृणालिनी नानिवडेकर यांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचा हा संघटनात्मक निर्णय असला तरी त्याचा फटका महाविकास आघाडीला इतर ठिकाणीही बसू शकतो. सहकारी पक्षाला डावलून असे प्रवेश होऊ लागले तर महाविकास आघाडीसाठी घातक ठरण्याची शक्यताही नाकारता येत नाही. कारण यामुळे स्थानिक अस्वस्थता वाढू शकते.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








