एकनाथ खडसे काँग्रेसमध्ये जाण्याचा पर्याय खरंच स्वीकारतील?

एकनाख खडसे

फोटो स्रोत, Twitter

    • Author, सिद्धनाथ गानू
    • Role, बीबीसी मराठी

विधानपरिषद निवडणुकीतही भारतीय जनता पक्षाने तिकीट नाकारलेले पक्षातले ज्येष्ठ आणि बराच काळ नाराज असलेले नेते एकनाथ खडसे यांना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मार्गदर्शकाच्या भूमिकेत जाण्याचा सल्ला दिला. यावर एकनाथ खडसेंनी बीबीसी मराठीशी बोलताना भाजपमधली लोकशाही प्रक्रिया संपलेली आहे अशी टीका केली आहे.

तसंच चंद्रकांत पाटील यांनीच निवृत्त व्हावं असं खडसे म्हणालेत.

2016 मध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून राजीनामा असेल, विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारलं जाणं असेल, मुलगी रोहिणी खडसेंचा विधानसभा निवडणुकीतला पराभव असेल या सगळ्या गोष्टींसाठी एकनाथ खडसेंनी वारंवार भाजपच्या राज्य नेतृत्वाला जबाबदार धरलंय.

आताही ते पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील-देवेंद्र फडणवीस या जोडगोळीवर टीका करताना दिसतायत. पण अनेकांच्या मनातला मुख्य प्रश्न हा आहे की इतके वेळा पक्षाने आपल्यावर अन्याय केल्याचा आरोप करणारे खडसे पक्षाला सोडचिठ्ठी देणार का?

एकनाथ खडसे, देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन

खडसे भाजपला रामराम करणार का?

'खडसेंनी काँग्रेसचा विचार स्वीकारला तर त्यांचं पक्षात स्वागतच असेल' असं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी भाजपमध्ये सुरू असलेल्या या कलहाला नवं वळण दिलं होतं.

एकनाथ खडसेंना जेव्हा यासंदर्भात बीबीसी मराठीने विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की "मला कुठेही न्याय मिळत नाही आणि पक्षाने मला समाजसेवेत राहू दिलं नाही तर जो उचित सन्मान मला देईल, माझ्या कार्यकर्त्यांना सन्मान असेल त्याठिकाणी (जाण्याचा) मी विचार करू शकेन. आता काही मी इतका हार्ड अँड फास्ट राहिलेलो नाही."

एकनाथ खडसे गेला बराच काळ भाजपमध्ये नाराज आहेत. ते काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा अगदी शिवसेनेतही प्रवेश करतील अशा प्रकारच्या अनेक शक्यता विधानसभा निवडणुकीपासून वर्तवल्या जात आहेत.

पण मग खडसे अजूनही भाजपमध्येच का आहेत? खुद्द एकनाथ खडसे याबद्दल म्हणतात की "पक्षातून मला घालवण्याचे अनेकांचे प्रयत्न आहेत, पण त्यांच्यामुळे पक्ष सोडून जाणं मला योग्य वाटत नाही."

काँग्रेसने दिलेल्या प्रस्तावाचा एकनाथ खडसे गांभीर्याने विचार करतील का याबद्दल दै. तरुण भारतचे जळगाव आवृत्तीचे संपादक विशाल चड्डा म्हणतात, "जळगावमध्ये काँग्रेसचं अस्तित्व जवळपास नसल्यात जमा आहे. अशात खडसे काँग्रेसमध्ये जाऊन आपलं उरलं सुरलं अस्तित्व संपवतील याची शक्यता कमी वाटते."

एकनाथ खडसे, देवेंद्र फडणवीस

फोटो स्रोत, Getty Images

दै. पुण्यनगरीचे जळगाव आवृत्तीचे संपादक विकास भदाणे यांनाही खडसे काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता वाटत नाही. "मुळात काँग्रेसमध्ये इतके ज्येष्ठ नेते आहेत. अशात खडसे या पक्षात जातील का? ते काँग्रेसमध्ये काय करणार? काँग्रेसमध्ये ते मागच्या रांगेत उभे राहणार का?"

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याशी आम्ही त्यांच्या वक्तव्यासंदर्भात संपर्क करण्याचा प्रयत्न केला. त्यांची प्रतिक्रीया मिळाल्यावर ती इथे समाविष्ट केली जाईल.

खडसे आता लढाईत एकटे पडलेत का?

गेल्या वर्षी गोपीनाथ गडावर पंकजा मुंडेंच्या नेतृत्वात झालेल्या कार्यक्रमात एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांसमोर आपली खंत बोलून दाखवली होती.

आता विधानपरिषदेवर पंकजा यांचे निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या रमेश कराड यांना उमेदवारी देणं हा पंकजा मुंडेंची नाराजी काही प्रमाणात का होईना दूर करण्याचा प्रयत्न आहे असं सांगितलं जातंय.

नाराज नेत्यांच्या लढाईत एकनाथ खडसे आता एकटे पडलेत का?

विकास भदाणे म्हणतात, "खडसे जननेते असले तरी स्थानिक पातळीवर दुसरं नेतृत्वही उभं राहिलं आहे. गिरीश महाजनांच्या रुपाने भाजपने खडसेंना शह दिलेला आहे. खडसे ज्या लोकांना निवडून आणायचे असे अनेक लोक भाजप सोडून गेले. खडसेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतरही अनेक आमदार त्यांच्यापाठीमागे उभं राहिल्याचं चित्र नव्हतं."

विशाल चड्डाही या विचाराचं समर्थन करतात, "जळगावात जर दुसरं नेतृत्व नसतं तर भाजपमध्ये खडसेंना महत्त्व मिळालं असतं. परळी आणि आसपासच्या भागात पंकजा मुंडे आणि मुंडे परिवाराला मानणारा मोठा मतदारवर्ग आहे. पंकजा यांची नाराजी पक्षाचं नुकसान करू शकते."

पण खडसेंना हे मान्य नाही. कराडांची उमेदवारी पंकजांची नाराजी दूर करण्यासाठी नाही तर पंकजांना सक्रीय राजकारणातून दूर ठेवणारी असल्याचं त्यांना वाटतं.

एकनाथ खडसे, देवेंद्र फडणवीस

फोटो स्रोत, Getty Images

मुळात भाजपचा खडसेंबद्दलचा सूर इतका आक्रमक का झाला? विशाल चड्डांच्या मते, "खडसे कुटुंबीयांना आतापर्यंत अनेक पदं दिली गेली आहेत. रक्षा खडसे, रोहिणी खडसे, एकनाथ खडसे. खडसेंचा कोटा आता पूर्ण झालाय हेच भाजपला यातून सुचवायचं असावं. दरवेळी नाराजी व्यक्त केल्यानंतर पक्षाकडून काहीतरी मिळू शकेल हा समज भाजपला मोडायचा असावा."

विकास भदाणेही याच मुद्द्यावर बोट ठेवतात, "एका घरात इतकी पदं का ही टीका खडसेंवर अनेकांनी केली आहे. दरवेळी अन्याय झाल्याची भावना झाल्यावर खडसे भाजपवर टीका करतात. भाजपने त्यांनी आता निवृत्त व्हावं हाच संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे."

एकनाथ खडसेंनी बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत आपण पक्षनेतृत्वाला भेटून आपली तक्रार मांडणार असल्याचं सांगितलंय.

नाथाभाऊचा भरवसा धरू नका असं मी गोपीनाथ गडावर बोललो होतो. आजही मी तेच सांगेन असंही ते म्हणालेत. त्यामुळे येत्या काळात ते खरोखर पक्षाला अलविदा करून दुसरा झेंडा खांद्यावर घेतात की पक्षाच्या विद्यमान नेतृत्वापुढे नमतं घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)