अमेरिका निवडणूक 2020 : डोनाल्ड ट्रंप 'या' पाच कारणांमुळे पुन्हा एकदा विजयी होऊ शकतात?

बायडन ट्रंप

फोटो स्रोत, Getty Images

अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत कोण जिंकणार, याचे अंदाज बांधले जात आहेत.

नुकत्याच झालेल्या जनमत चाचण्यांमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या शर्यतीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रंप यांच्यावर आघाडी घेतल्याचं चित्र आहे.

केवळ राष्ट्रीय पातळीवरच नाही, तर जिथे अगदी कडवी लढत पाहायला मिळते अशा राज्यांतही बायडन यांना आघाडी मिळत आहे.

विक्रमी निवडणूक निधी जमा केल्यामुळे डेमोक्रॅटिक पक्षाला आर्थिक आघाडीवरही फायदा झाला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातही ते माध्यमांमध्ये झळकत राहतील.

राजकीय विश्लेषकांच्या मते कदाचित ट्रंप यांना निवडणुकीत पराभव पत्करावा लागू शकतो.

नेट सिल्व्हरच्या Fivethirtyeight.com ब्लॉगमध्ये बायडन यांच्या विजयाची शक्यता 87 टक्के आहे, तर डिसिजन डेस्क एचक्यूच्या मते बायडन विजयी होण्याची शक्यता 83.5 टक्के आहे.

मात्र, गेल्यावेळेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतही हिलरी क्लिंटन याच विजयी होतील, असे अंदाज वर्तविण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात निकाल काय लागले हे आपण सगळ्यांनीच पाहिलं.

त्यामुळेच डोनाल्ड ट्रंप निकालाचे सर्व अंदाज पुन्हा एकदा चुकीचे ठरवणार का, असा प्रश्न उपस्थित होतोय. त्यांच्या विजयामुळे इतिहासाची पुनरावृत्ती होईल?

डोनाल्ड ट्रंप पुन्हा एकदा अमेरिरकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेऊ शकतात, असे संकेत देणारी पाच प्रमुख कारणं आहेत.

गेल्या निवडणुकीत झालेली प्रेसिडेन्शियल डिबेट

2016 साली एफबीआयचे तत्कालिन प्रमुख जेम्स कोमी यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या केवळ 11 दिवस आधी हिलरी क्लिंटन यांच्याविरोधात चौकशी सुरू करण्याबाबत वक्तव्य केलं होतं. परराष्ट्र मंत्री असताना हिलरी क्लिंटन यांनी आपला खासगी ईमेल सर्व्हर वापरला होता, हे या चौकशीचं कारण होतं.

यानंतर जवळपास आठवडाभर हे प्रकरण गाजत होतं. त्यामुळे डोनाल्ड ट्रंप यांच्या प्रचार मोहिमेत जीव आला.

आताच्या निवडणुकीतही जर दोन आठवडे आधी अशीच एखादी राजकीय घटना घडली, तर डोनाल्ड ट्रंप यांचा विजयाचा मार्ग पुन्हा सुकर होऊ शकतो.

अर्थात, आतापर्यंत तरी हा महिना ट्रंप यांच्यासाठी वाईट वार्ताच घेऊन आला आहे. आधी त्यांच्या टॅक्स रिटर्न्सची आकडेवारी समोर आली आणि नंतर कोव्हिड-19 मुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती व्हावं लागलं.

जो बायडन आपला मुलगा हंटरसोबत

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जो बायडन आपला मुलगा हंटरसोबत

'न्यूयॉर्क पोस्ट'नं एका लेखात एक रहस्यमय लॅपटॉप आणि एका ईमेलचा उल्लेख केला होता. कदाचित याचे धागेदोरे बायडन यांच्यापर्यंत पोहोचू शकतात. बायडन यांनी आपला मुलगा हंटरसाठी युक्रेनमधील एका गॅस कंपनीमध्ये लॉबिंग करण्याबाबत यात काही संदर्भ असू शकतात.

कॉन्झर्व्हेटिव्हज म्हणेजच परंपरावाद्यांनी हा मुद्दा मोठा करण्याचे प्रयत्न केले. पण हे आरोप संदिग्ध असल्यानं, त्यात स्पष्टता नसल्यानं मतदारांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता कमी आहे.

अजून बरंच काही समोर येणं आहे, असं डोनाल्ड ट्रंप यांनी म्हटलं होतं.

'न्यूयॉर्क पोस्ट'मधला लेख ही जर सुरूवात असेल, तर बायडन यांच्यावर उपराष्ट्रपती असताना घोटाळा केल्याचा आरोप करणं आणि त्याचे पुरावे देणं ही मोठी गोष्ट ठरू शकते.

सर्व्हे चुकीचे ठरू शकतात?

जो बायडन हे डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून निवडले गेल्यापासून सर्वच सर्व्हेत ते ट्रंप यांच्या तुलनेत आघाडीवर असल्याचं दाखवत आहेत.

ज्या राज्यांमध्ये अतिशय कडवी लढत होते, अशा राज्यांमध्येही बायडन यांचीच आघाडी असल्याचं सर्व्हे सांगत आहेत.

पण 2016 च्या निवडणुकीत राष्ट्रीय स्तरावरील आघाडी फारशी उपयोगी ठरली नाही आणि राज्य स्तरावर करण्यात आलेले सर्व्हेही चुकीचे ठरले होते.

बायडन ट्रंप

फोटो स्रोत, Getty Images

राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदार नेमके कोण असतील याचा अंदाज लावणं एक आव्हान असतं. गेल्यावेळेस सगळे सर्व्हे याचा अंदाज लावण्यात असफल ठरले होते.

डोनाल्ड ट्रंप यांना श्वेतवर्णीय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर मतं दिली होती. त्याचा अंदाज कोणत्याही सर्व्हेत व्यक्त करण्यात आला नव्हता.

सध्या बायडन यांची जी आघाडी आहे, ती त्यांना 2016 सारख्या परिस्थितीपासून वाचवेल, असा अंदाज न्यूयॉर्क टाइम्सनं व्यक्त केला आहे.

मात्र, 2020 मध्ये सर्व्हे करणाऱ्यांसमोर काही नवीन अडचणी आहेत.

उदाहरणार्थ- अमेरिकेत पहिल्यांदाच पोस्टल मतदान घेण्याबाबत विचार सुरू आहे. पण रिपब्लिकन पक्षाचे नेते या प्रकारच्या मतदानावर प्रश्न उपस्थित करत आहेत.

ट्रंप

फोटो स्रोत, Reuters

यामध्ये गैरव्यवहार होऊ शकतो, अशी भीती ते व्यक्त करत आहेत. मात्र, डेमोक्रॅट्स याला मतदारांना दडपण्याचा प्रयत्न म्हणत आहेत.

मतदारांनी आपले फॉर्म चुकीचे भरले किंवा प्रक्रियेचं पूर्ण पालन केलं नाही किंवा पत्र पोहोचण्यात उशीर झाला तर वैध मतंही बाद होऊ शकतात.

दुसरीकडे मतदान केंद्र कमी असल्यामुळे आणि कर्मचारीही कमी असल्यानं प्रत्यक्ष मतदान घेणं अवघड जाऊ शकतं. त्यामुळे सर्व्हेमध्ये ज्यांना संभाव्य मतदार म्हणून गृहीत धरलं जात आहे, असे अनेक जण मतदान न करण्याचीही शक्यता आहे.

डिबेटनंतरची प्रतिमा

दोन आठवड्यांपूर्वी डोनाल्ड ट्रंप आणि जो बायडन यांच्यात प्रेसिडेन्शियल डिबेट झाली. या डिबेटनंतर ट्रंप यांच्यासाठी परिस्थिती अजूनच नकारात्मक बनली.

ट्रंप यांचा आक्रमक आणि बेफिकिर आविर्भाव उपनगरातील महिलांना फारसा पसंत पडला नाही. या भागातील महिलांची मतं निवडणुकीत महत्त्वाची समजली जातात.

लोक

फोटो स्रोत, Getty Images

या दरम्यान बायडन यांनी त्यांचं वय जास्त असल्यामुळे जे प्रश्न उपस्थित केले जात होते, त्याचंही खंडन केलं.

पहिल्या डिबेटदरम्यान आपली प्रतीमा बदलण्याची मिळालेली एक संधी डोनाल्ड ट्रंप यांनी गमावली.

त्यांनी दुसऱ्या डिबेटला नकार दिला होता. कारण ती समोरासमोर नाही, तर व्हर्चुअल पद्धतीनं होणार होती. आता त्यांना येत्या गुरूवारी अजून एक संधी मिळू शकते.

जर डोनाल्ड ट्रंप यावेळी शांत राहिले, राष्ट्राध्यक्षांप्रमाणे त्यांनी वर्तन केलं आणि त्याचवेळी बायडन यांनी एखादी चूक केली तर ट्रंप यांचं पारडं जड होऊ शकतं.

महत्त्वाच्या राज्यातली परिस्थिती

सर्व्हेमध्ये बायडन आघाडीवर दिसत असले तरी अनेक राज्यं अशी आहेत, जिथे ट्रंप बाजी मारू शकतात. अशावेळी इलेक्टोरल कॉलेजियम त्यांच्या बाजूने झुकू शकतं.

गेल्यावेळी डोनाल्ड ट्रंप पॉप्युलर मतांमध्ये पिछाडीवर होते, मात्र इलेक्टोरल कॉलेजमध्ये त्यांनी बाजी मारली होती.

अमेरिकेत जेव्हा लोक राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदान करतात, तेव्हा ते प्रत्यक्षात अधिकाऱ्यांच्या एका समूहाला मत देत असतात, ज्यातून इलेक्टोरल कॉलेजियम बनतं.

बायडन-ट्रंप

हे लोक इलेक्टर्स असतात आणि त्यांचं काम राष्ट्राध्यक्ष आणि उप-राष्ट्राध्यक्षांची निवड करणं हे असतं. प्रत्येक राज्यातली इलेक्टर्सची संख्या ही त्या राज्यातल्या लोकसंख्येवर अवलंबून असते.

डोनाल्ड ट्रंप यांना मिशिगन आणि विस्कॉन्सिनसारख्या राज्यात विजय मिळाला होता. यावेळी ही राज्यं आवाक्याबाहेरची दिसत आहेत.

जर पेन्सिल्व्हेनिया आणि फ्लोरिडासारख्या ठिकाणच्या कृष्णवर्णीय मतदारांनी जर ट्रंप यांच्या पारड्यात मतं टाकली तर ट्रंप यावेळी विजयी होऊ शकतात.

ट्रंप आणि बायडन यांना प्रत्येकी 269 इलेक्टोरल कॉलेजियमची मतं मिळण्याचीही शक्यता आहे.

दोघांनाही समसमान मतं मिळाली तर प्रतिनिधीगृहात राज्याचे प्रतिनिधी अध्यक्षांची निवड करतात. अशापरिस्थितीत बहुमत ट्रंप यांना मिळू शकतं.

जो बायडन यांनी आतापर्यंत तरी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं प्रचार केला आहे.

एरव्ही जो बायडन हे अव्यावहारिक टिप्पणी करण्याबद्दल प्रसिद्ध आहेत, मात्र यावेळी ते अशा कोणत्याही वादात अडकले नाहीयेत.

पण आता बायडन यांची प्रचारमोहीम अजून वेग घेईल. अशावेळेस चुकीची, वादग्रस्त वक्तव्यं करण्याची शक्यता वाढते. त्याचा बायडन यांना फटका बसू शकतो.

बायडन यांना पसंत करणाऱ्यांमध्ये उपनगरीय उदारमतवादी, असंतुष्ट रिपब्लिकन, डेमोक्रॅट श्रमिक वर्ग आणि जातीय अल्पसंख्यांकांचा समावेश आहे. या सगळ्यांचे हितसंबंध एकमेकांपेक्षा भिन्न आहेत. त्यामुळे बायडन यांची एक चूक या मतदारांना नाराज करू शकते.

बायडन यांच्या वाढत्या वयामुळे प्रचार मोहिमेदरम्यानचा थकवा त्यांना झेपेल का, अशी शंकाही उपस्थित केली जातीये. म्हणूनच बायडन यांचं अधिक वय ट्रंप यांच्या पथ्यावर पडू शकतं, असं म्हटलं जातंय.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)