अमेरिका निवडणूक निकाल : ट्रंप की बायडन- कोण आहे आघाडीवर ?

- Author, व्हिज्युअल आणि डेटा जर्नलिझम टीम
- Role, बीबीसी न्यूज
डोनाल्ड ट्रंप व्हाईट हाऊसमध्ये आणखी 4 वर्षं राहणार की नाही याचा फैसला अमेरिकन मतदार आज घेतील. यासाठीच्या मतदानाचा दिवस अमेरिकेमध्ये उजाडलेला आहे.
डोनाल्ड ट्रंप यांना आव्हान आहे डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांचं. बराक ओबामांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या काळात उपराष्ट्राध्यक्ष असणारे बायडन हे 1970च्या दशकापासून अमेरिकेच्या राजकारणात आहेत.
निवडणुकीचा हा दिवस जसजसा जवळ येईल तसतशा सर्वेक्षण करणाऱ्या संस्था अमेरिकन नागरिकांची पसंती कोणत्या उमेदवाराला आहे यासाठीच्या पाहण्या करू लागतील.
या सर्वेक्षणांचं विश्लेषण बीबीसी पण करत आहे.

राष्ट्रीय सर्वेक्षणांमध्ये जो बायडन आघाडीवर
एखादा उमेदवार हा देश पातळीवर किती लोकप्रिय आहे हे नॅशनल पोल (National Poll) म्हणजेच राष्ट्रीय पाहणी वा सर्वेक्षणावरून समजतं. पण म्हणून हा निवडणुकीच्या निकालाचा अंदाज बांधण्याचा सर्वोत्तम मार्ग ठरत नाही.
उदाहरणार्थ- 2016 मध्ये या राष्ट्रीय पाहण्यांमध्ये हिलरी क्लिंटन आघाडीवर होत्या. डोनाल्ड ट्रंप यांच्यापेक्षा 30 लाख मतं जास्त मिळवत त्या या पाहणीत जिंकल्या होत्या. पण तरीही प्रत्यक्ष निवडणुकीत त्या पराभूत झाल्या.
कारण अमेरिकेमध्ये 'इलेक्टोरल कॉलेज' पद्धत वापरली जाते. म्हणूनच जास्ती मतं मिळाली म्हणजे तुम्ही निवडणूक जिंकला असा याचा अर्थ होत नाही.
ही बाब बाजूला ठेवली तर या राष्ट्रीय पाहण्यांमध्ये जो बायडन हे वर्षातला बहुतेक काळ डोनाल्ड ट्रंप यांच्यापेक्षा पुढे आहेत. गेले काही आठवडे ते 50% च्या आसपास आहेत आणि अनेकदा त्यांनी 10 पॉइंट्सची आघाडी घेतलेली आहे.
याउलट, 2016 मध्ये पाहण्यांचे निकाल इतके स्पष्ट नव्हते. ट्रंप आणि त्यांच्या तेव्हाच्या प्रतिस्पर्धी असणाऱ्या हिलरी क्लिंटन यांच्यामध्ये काहीच टक्क्यांचा फरक होता आणि निवडणुकीचा दिवस जसजसा जवळ येत गेला, तसं हे अंतर मोजक्या टक्क्यांवर आलं होतं.
निवडणुकीत कोणत्या राज्यांची भूमिका निर्णायक?
आपल्याला किती मतं मिळतात यापेक्षा ती मतं कुठून मिळतात याला अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत जास्त महत्त्वं असल्याचं हिलरी क्लिंटन यांच्या पराभवावरून लक्षात आलं.
बहुतेक राज्यांमधून नेहमीच एका ठराविक पद्धतीने मतदान होतं. म्हणजे प्रत्यक्षात मोजकीच काही राज्यं उरतात जिथे दोन्ही उमेदवारांमध्ये चुरशीची लढत असते आणि दोघांनाही तिथून जिंकायची संधी असते.
या राज्यांना 'बॅटलग्राऊंड स्टेट्स' (Battleground States) म्हणजेच चुरशीची लढत असणारी राज्यं म्हटलं जातं. निवडणुकीतला जय वा पराजय इथेच ठरतो.

'इलेक्टोरल कॉलेज' सिस्टीम काय आहे?
राष्ट्राध्यक्षाच्या निवडीसाठी अमेरिकेत वापरल्या जाणाऱ्या इलेक्टोरल कॉलेज सिस्टीममध्ये प्रत्येक राज्याला तिथल्या लोकसंख्येनुसार मतांचा एक ठराविक आकडा म्हणजेच इलेक्टोरल कॉलेज व्होट दिला जातो.
संपूर्ण देशात मिळून अशी एकूण 538 इलेक्टोरल कॉलेज व्होट्स आहेत. निवडणूक जिंकण्यासाठी उमेदवाराला किमान 270 इलेक्टोरल कॉलेज व्होट्स जिंकावी लागतात.
या वरच्या नकाशात दाखवल्याप्रमाणे चुरशीची लढत असणाऱ्या काही बॅटलग्राऊंड स्टेट्समध्ये इतरांपेक्षा जास्त इलेक्टोरल कॉलेज व्होट्स आहेत. म्हणूनच अनेकदा उमेदवार या राज्यांमध्ये प्रचार करण्यावर भर देतात.
बॅटलग्राऊंड स्टेट्समध्ये कोण आघाडीवर?
सध्याच्या घडीला या राज्यांमधल्या पाहण्यांमध्ये जो बायडन यांच्याबाजूने कल दिसतोय. पण अजूनही बराच मोठा टप्पा बाकी आहे आणि गोष्टी झपाट्याने बदलू शकतात. डोनाल्ड ट्रंप यांच्याबाबत तर हे झपाट्याने घडतं.
मिशिगन, पेन्सेल्व्हानिया आणि विस्कॉन्सिन या तीन औद्योगिक राज्यांमध्ये सध्या बायडन यांच्याकडे मोठी आघाडी असल्याचं जनमत चाचण्यांमध्ये दिसतंय. 2016मध्ये ट्रंप यांनी या राज्यांमध्ये 1 टक्क्यापेक्षा कमी मतांच्या फरकाने जिंकत निवडणुकीत विजय मिळवला होता.
पण ज्या चुरशीच्या राज्यांमध्ये ट्रंप यांनी 2016मध्ये मोठ्या फरकाने विजय मिळवला होता, त्या राज्यांची चिंता सध्या ट्रंप यांच्या कॅम्पेनला असेल. आयोवा, ओहायो आणि टेक्सास या तीन राज्यांमधून ट्रंप 8 ते 10 टक्क्यांच्या फरकाने तेव्हा जिंकले होते. पण आता मात्र त्यांची पकड केवळ टेक्सासवरच राहिल्याचं पाहण्यांमधून दिसतंय.
यामुळेच ही निवडणूक ट्रंप जिंकण्याची शक्यता कमी असल्याचं काही राजकीय विश्लेषकांना वाटतंय. FiveThirtyEight या राजकीय विश्लेषण करणाऱ्या वेबसाईटनुसार ही निवडणूक जिंकण्यासाठीची 'पसंती' बायडन यांना आहे. तर बायडन डोनाल्ड ट्रंप यांचा पराभव करण्याची शक्यता असल्याचं द इकॉनॉमिस्ट ने म्हटलंय.

पहिल्या डिबेटमध्ये कोण जिंकलं ते पाहण्यांमध्ये दिसतं का?

फोटो स्रोत, Getty Images
डोनाल्ड ट्रंप आणि जो बायडन यांच्यातला डिबेटचा पहिला कार्यक्रम 29 सप्टेंबरला पार पडला.
यामध्ये जो बायडन यांची कामगिरी चांगली होती असं अनेक जाणकारांचं मत पडलं. बीबीसीच्या अँथनी झर्कर यांचंही हेच मत आहे.
पण पाहण्यांमध्ये याविषयी काय आढळतं?
आमच्याकडच्या सगळ्या पाहण्यांमध्ये जो बायडन आघाडीवर दिसत आहेत. पण या आघाडीचं प्रमाण प्रत्येक पाहणीत वेगवेगळं आहे.
NBC न्यूज - वॉल स्ट्रीट जर्नलने या डिबेटनंतर केलेल्या पाहणीमध्ये जो बायडन 53% तर त्यांचे प्रतिस्पर्धी 39%वर आहे. दोन आठवड्यांपूर्वी करण्यात आलेल्या पाहणीपेक्षा या दोन उमेदवारांमधलं अंतर 6 टक्क्यांनी वाढलेलं आहे.
तर न्यूयॉर्क टाईम्स आणि सिएना कॉलेजने केलेल्या 2 बॅटलग्राऊंड स्टेट्सच्या पाहण्यांमध्ये बायडन हे पेन्सेलव्हेनियामधून 7 पॉइंट्सनी पुढे आहेत तर फ्लोरिडामधून 5 पॉइंट्सनी पुढे आहेत. राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांच्यासाठी ही काळजीची गोष्ट असेल.
एकूणच राष्ट्राध्यक्षांची डिबेटमधली कामगिरी त्यांना पिछाडी भरून काढण्यासाठी फायद्याची ठरलेली दिसत नाही.
ट्रंप आणि बायडन यांच्यातला वादविवादाचा दुसरा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता.
तर अंतिम डिबेट 22 ऑक्टोबरला पार पडलं. कोव्हिड-19ची साथ, अमेरिकन कुटुंब, अमेरिकेतील वंशवाद, हवामान बदल, राष्ट्रीय सुरक्षा, नेतृत्व या विषयांवर या अंतिम डिबेटमध्ये चर्चा झाली. कोरोना व्हायरसची साथ, चीन आणि इराण या मुद्द्यांवरून ट्रंप आणि बायडन यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. या अंतिम डिबेटविषयी वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
कोरोना व्हायरसचा ट्रंप यांच्या पाठिंब्यावर परिणाम झाला का?
पहिल्या डिबेटविषयीची चर्चा सुरू असतानाच पुढच्या दोनच दिवसांत डोनाल्ड ट्रंप यांनी स्वतःच ट्विटरवरून ते आणि फर्स्ट लेडी कोव्हिड पॉझिटिव्ह असल्याचं जाहीर केलं.
या वर्षाच्या सुरुवातीपासूनच अमेरिकेमध्ये कोरोना व्हायरसच्या बातम्या झळकत आहेत. मधला काही काळ जॉर्ज फ्लॉईड प्रकरण आणि जस्टिस रुथ बेडर गिन्सबर्ग यांच्या निधनावर बातम्या केंद्रित झाल्या होत्या.
पण ट्रंप आणि व्हाईट हाऊसमधले अनेक जण कोव्हिड पॉझिटिव्ह झाल्याने लक्ष पुन्हा एकदा ट्रंप प्रशासनाने कोव्हिडच्या साथीला दिलेल्या प्रतिसादाकडे वेधलं गेलं. अमेरिकेत आतापर्यंत कोव्हिडमुळे 2 लाखांपेक्षा जास्त बळी गेलेले आहेत.

ABC न्यूज / Ipsos पाहणीनुसार फक्त 35% अमेरिकन्सनी ट्रंप प्रशासनाने ज्याप्रकारे परिस्थिती हाताळली, त्याला दुजोरा दिलाय. रिपब्लिकन पक्षाचे समर्थक असणाऱ्यांपैकी 76% जणांचं हे मत आहे.
तर 'ट्रंप यांनी स्वतःला या विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून पुरेशी खबरदारी घेतली नाही,' असं 72% जणांचं मत आहे.
तर ट्रंप यांनी सोशल डिस्टंन्सिंग पाळलं असतं, मास्क वापरला असता तर त्यांना हा संसर्ग मुळातच टाळता आला असता असं मत याहू न्यूज - यूगव्ह पोल यांनी केलेल्या सर्व्हेमध्ये अर्ध्यापेक्षा जास्त जणांनी नोंदवलं आहे.
या पाहण्यांवर विश्वास ठेवावा का?
2016मध्ये या पाहण्या चुकीच्या ठरल्या होत्या असं म्हणून हे सगळं फेटाळून लावणं सोपं आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रंप नेमकं हेच करतात. पण असं करणं पूर्णपणे योग्य नाही.
बहुतेक राष्ट्रीय सर्वेक्षणांमध्ये हिलरी क्लिंटन या काही टक्क्यांनी पुढे होत्या हे खरं असलं तरी ही सर्वेक्षणं चुकीची होती असं म्हणता येणार नाही. कारण हिलरी यांना त्यांच्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा म्हणजेच ट्रंप यांच्यापेक्षा तीस लाख मतं जास्त मिळाली होती.
या सर्वेक्षण चाचण्या घेणाऱ्यांना काही अडचणी आल्या होत्या, हे खरं आहे. म्हणजे काही महत्त्वाच्या राज्यांमधून ट्रंप यांना मिळू शकणारा फायदा हा या लढतीच्या शेवटच्या टप्प्यांपर्यंत लक्षात आला नव्हता. पण आता ही चूक बहुतके सर्वेक्षण कंपन्यांनी सुधारलेली आहे.
पण यावर्षी कोरोना व्हायरसच्या जागतिक साथीमुळे नेहमीपेक्षा जास्त अनिश्चितता आहे. याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर तर होतोच आहे पण लोक नोव्हेंबरमध्ये कशाप्रकारे मतदान करतील यावरही याचा परिणाम होणार आहे.
म्हणूनच निवडणुकीला बराच इतका काळ असताना, या सगळ्या जनमत चाचण्यांकडे काहीशा साशंकतेनेच पहायला हवं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)








