अमेरिका निवडणूक 2020: कशी होते अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची निवड?

जो बायडन, डोनाल्ड ट्रंप

आज अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन विरुद्ध सध्याचे राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रंप अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत.

या निवडणुकीमध्ये अमेरिकेच्या इतिहासातल्या सर्वात जास्त मतदानाची नोंद होईल असा अंदाज बांधला जातोय. आतापर्यंत 9.9 कोटी मतदारांनी मतदान केलेलं आहे.

राष्ट्राध्यक्ष पदाची सूत्रं हाती मिळण्यासाठी एखाद्या उमेदवाराला फक्त सर्वाधिक मतं मिळून भागत नाही, तर ती मतं कोणत्या राज्यातून मिळालेली आहेत हे देखील इलेक्टोरल कॉलेज पद्धतीमुळे महत्त्वाचं ठरतं.

इलेक्ट्रोरल कॉलेज म्हणजे काय, बॅटलग्राऊंड स्टेट्स कोणती याबाबत अनेकांना शंका असतात.

या सगळ्याविषयी जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, तर सोप्या शब्दांत समजून घेऊयात - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची निवड कशी होते.

राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कधी आहे? उमेदवार कोण आहेत?

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठीची निवडणूक ही नेहमी नोव्हेंबर महिन्यातल्या पहिल्या सोमवारनंतरच्या मंगळवारी होते. यावर्षी ही निवडणूक आहे 3 नोव्हेंबरला.

डोनाल्ड ट्रंप, अमेरिका, भारत, नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, डोनाल्ड ट्रंप

भारतासकट इतर अनेक देशांमध्ये अनेक राजकीय पक्ष निवडणुकीच्या रिंगणात असतात. पण अमेरिकेच्या राजकारणात दोनच पक्षांचा दबदबा आहे. म्हणूनच राष्ट्राध्यक्ष हा नेहमीच या दोनपैकी एका पक्षाचा असतो.

रिपब्लिकन पक्ष हा अमेरिकन राजकारणातला पारंपरिक विचारसरणीचा पक्ष आहे आणि यावर्षी राष्ट्राध्यक्ष पदासाठीचे त्यांचे उमेदवार आहेत सध्या राष्ट्राध्यक्ष असणारे डोनाल्ड ट्रंप. आपल्याला आणखी 4 वर्षं सत्तेत राहता येईल, अशी आशा त्यांना आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश, रोनाल्ड रेगन, रिचर्ड निक्सन हे रिपब्लिकन पक्षाचे होते.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

अमेरिकेतला पुरोगामी विचारसरणीचा राजकीय पक्ष म्हणजे डेमोक्रॅटिक पक्ष. जॉन एफ. केनेडी, बिल क्लिंटन, बराक ओबामा हे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डेमोक्रॅटिक पक्षाचे होते. यावर्षी राष्ट्राध्यक्ष पदासाठीचे डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार आहेत जो बायडन. अत्यंत अनुभवी असणारे जो बायडन हे बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असतानाची 8 वर्षं उप-राष्ट्राध्यक्ष होते.

या दोन्ही उमेदवारांनी वयाची सत्तरी ओलांडलेली आहे. दुसरी टर्म मिळाली तर त्याच्या सुरुवातीला डोनाल्ड ट्रंप असतील 74 वर्षांचे तर 78 वर्षांचे जो बायडन जिंकले, तर तर अमेरिकेच्या इतिहासातले या वयात पहिल्यांदा राष्ट्राध्यक्ष होणारे पहिले व्यक्ती ठरतील.

राष्ट्राध्यक्षपदाचा विजेता कसा ठरतो?

देशभरातून सर्वांत जास्त मतं मिळवणारा उमेदवार विजेता ठरतोच, असं नाही. 2016साली हिलरी क्लिंटन यांच्याबाबत असंच घडलं होतं.

राष्ट्राध्यक्ष पदासाठीच्या उमेदवारांमध्ये जास्त चुरस असते ती इलेक्टोरल कॉलेज व्होट्स मिळवण्यासाठी. अमेरिकेतल्या प्रत्येक राज्याला तिथल्या लोकसंख्येनुसार काही 'इलेक्टोरल कॉलेज व्होट्स' देण्यात आलेली आहेत. अशी एकूण 538 इलेक्टोरल व्होट्स संपूर्ण अमेरिकेत मिळून आहेत. ज्या उमेदवाराला 270 पेक्षा जास्त इलेक्टोरल मतं मिळतात, तो जिंकतो.

म्हणजे जेव्हा एखादा अमेरिकन मतदार त्याच्या आवडत्या उमेदवाराला मत देतो तेव्हा ते राष्ट्रीय पातळीवरच्या स्पर्धेसाठी नसून राज्यपातळीसाठी असतं.

अमेरिकेतल्या प्रत्येक राज्याला देण्यात आलेली इलेक्टोरल व्होट्स

एखाद्या राज्यातून ज्या उमेदवाराला सर्वाधिक मतं मिळतात त्याच्या खात्यामध्ये त्या राज्यासाठीची इलेक्टोरल व्होट्स जमा होतात. अमेरिकेतली दोन राज्य वगळता इतर सर्व राज्यांमध्ये हा नियम आहे.

बहुतेक सगळ्या राज्यांमधल्या मतदारांचा कल हा दोनपैकी एका पक्षाकडे जास्त आहे. म्हणूनच मग उमेदवार अशा राज्यांवर आपलं लक्ष केंद्रित करतात, जिथे जिंकण्याची संधी दोन्ही उमेदवारांना असते. या राज्यांना 'बॅटलग्राऊंड स्टेट्स' म्हटलं जातं. अशी राज्यं जिथे चुरशीची लढत आहे.

याच राज्यांना 'स्विंग स्टेट्स' (Swing States) असंही म्हटलं जातं, कारण या राज्यांमधले मतदार रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक अशा दोन्ही पक्षांमध्ये विभागले गेल्याने या राज्यांचा कल कोणत्याही उमेदवाराकडे जाण्याची शक्यता असते. फ्लोरिडा आणि ओहायो ही दोन राज्य 'स्विंग स्टेट्स' असल्याचं मानलं जातं. ऍरिझोना आणि टेक्सास ही राज्यं खरंतर रिपब्लिकन पक्षाकडे झुकणारी होती. पण सध्या या राज्यांमधून डेमोक्रॅटिक पक्षाला मिळणारं समर्थन वाढल्याने 2020च्या निवडणुकीत या राज्यांनाही बॅटलग्राऊंड स्टेट मानलं जातंय.

मतदान कोण आणि कसं करू शकतं?

जर तुम्ही अमेरिकेचे नागरिक असाल आणि तुमचं वय 18 वर्षांपेक्षा जास्त असेल तर तुम्ही राष्ट्राध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीसाठी मतदान करायला पात्र ठरता.

पण अनेक राज्यांमध्ये मत देण्यापूर्वी मतदारांना स्वतःची ओळख सिद्ध करण्यासाठीची कागदपत्रं दाखवावी लागतात. तसा कायदा तिथे करण्यात आलाय.

जो बायडेन

फोटो स्रोत, Getty

फोटो कॅप्शन, जो बायडन नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रेटिक पक्षाचे अधिकृत उमेदवार असणार आहेत.

मतदानात घोटाळा होऊ नये असं म्हणत यापैकी बहुतेक कायदे हे रिपब्लिकन राजकारण्यांनी अंमलात आणले आहेत. पण हे मतदारांची मुस्कटदाबी करण्याचे मार्ग असल्याचा डेमोक्रॅट्सचा आरोप आहे. कारण कोणतंही ओळखपत्रं वा ड्रायव्हिंग लायसन्स नसणाऱ्या गरीब वा अल्पसंख्याक मतदारांना अनेकदा या नियमांमुळे मतदान करता येत नाही.

तुरुंगातले कैद्यांच्या मतदानाबाबतही विविध राज्यांत वेगवेगळे नियम आहेत. बहुतेक राज्यांमधल्या कैद्यांना तुरुंगात असताना मतदान करता येत नाही. पण तुरुंगातली शिक्षा संपवून बाहेर आल्यानंतर त्यांना त्यांचा मतदानाचा हक्क परत मिळतो.

बहुतेक लोक निवडणुकीच्या दिवशी मतदान केंद्रावर जाऊन मतदान करतात. पण गेल्या काही वर्षांमध्ये मतदानाच्या इतर पर्यायी पद्धतीही अस्तित्त्वात आल्या आहेत. 2016 च्या निवडणुकीत मतदान करणाऱ्या एकूण मतदारांपैकी 21% जणांनी अशा पर्यायी पद्धतींचा वापर केला होता.

यावर्षी कोरोना व्हायरसच्या साथीमुळे मतदान कसं करायचं, हा एक वादाचा मुद्दा आहे. पोस्टल बॅलेट्स म्हणजे पोस्टाने मतं पाठवण्याच्या पर्यायाचा जास्त वापर यावेळी करण्यात यावा, असं काही राजकारण्यांचं म्हणणं हे. पण यामुळे मतदार घोटाळा - व्होटर फ्रॉड होऊ शकतो, असं राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांचं म्हणणं आहे. पण असं होऊ शकतं, याविषयीचे पुरेसे पुरावे उपलब्ध नाहीत.

राष्ट्राध्यक्ष कोण हे ठरवण्यापुरतीच ही निवडणूक असते का?

ही निवडणूक फक्त राष्ट्राध्यक्ष निवडण्यापुरतीच मर्यादित नसते. ट्रंप विरुद्ध बायडन या मुकाबल्याकडे सगळ्यांचं लक्ष असलं तरी याच निवडणुकीद्वारे मतदार काँग्रेसच्या नवीन सदस्यांची निवड करतील. अमेरिकन सरकारमधल्या कायदे लिहिणाऱ्या आणि मंजूर करणाऱ्या गटाला 'काँग्रेस' म्हटलं जातं. यामध्ये हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज आणि सिनेट अशी दोन सदनं असतात.

यापैकी हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज किंवा 'हाऊस'च्या सदस्यांचा कार्यकाळ 2 वर्षांचा असतो. तर सिनेटच्या सदस्यांचा म्हणजेच सिनेटर्सचा कार्यकाळ 6 वर्षांचा असतो. सिनेटर्सची विभागणी 3 गटांमध्ये होते आणि दर दोन वर्षांनी सिनेटच्या एक तृतीयांश जागांची निवडणूक होते.

अमेरिकन सिनेट

सध्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्जवर डेमोक्रॅट्सचं वर्चस्व आहे आणि ते कायम ठेवत सिनेटवरही वर्चस्वं मिळवण्याचं त्यांचं उद्दिष्टं असेल.

जर त्यांना दोन्ही सदनात बहुमत मिळालं आणि ट्रंप राष्ट्राध्यक्ष पदी पुन्हा निवडणूक आले तर डेमोक्रॅट्सना ट्रंप यांच्या योजना थांबवता येतील किंवा त्या पुढे ढकलता येतील.

यावर्षी हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्जमधल्या सर्वच्या सर्व 435 जागांसाठी निवडणूक होणार आहे. तर सिनेटच्याही 33 जागांची निवडणूक होणार आहे.

आपल्याला निकाल कधी समजेल?

प्रत्येक मत मोजलं जाऊन प्रक्रिया पूर्ण व्हायला अनेक दिवस लागतात. पण बहुतेकदा विजेता कोण आहे हे मतदानाच्या दुसऱ्या दिवशीच्या सकाळपर्यंत स्पष्ट होतं.

2016 मध्ये डोनाल्ड ट्रंप यांनी न्यूयॉर्कमध्ये पहाटे 3 वाजता स्टेजवर येत समर्थकांसमोर विजयानंतरचं भाषण दिलं होतं.

पण यावर्षी पोस्टल बॅलट म्हणजेच पोस्टाद्वारे पाठवण्यात येणाऱ्या मतपत्रिकांचं प्रमाण प्रचंड वाढलेलं असल्याने निकाल स्पष्ट होण्यासाठी अनेक दिवस आणि कदाचित काही आठवडेही लागू शकणार असल्याची शक्यता अधिकारी व्यक्त करत आहेत.

2000सालीही निकाल काही तासांमध्ये स्पष्ट झाले नव्हते. महिन्याभराने सुप्रीम कोर्टाने याविषयीचा निकाल दिल्यानंतर विजेता कोण यावर शिक्कामोर्तब झालं होतं. ही लढत होती रिपब्लिकन पक्षाचे जॉर्ज बुश आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे अल गोअर यांच्यामध्ये. यामध्ये सुप्रीम कोर्टाने जॉर्ज बुश यांना विजयी घोषित केलं होतं.

विजेता पदभार कधी स्वीकारतो?

जो बायडन निवडणूक जिंकले तरी ते लगेच डोनाल्ड ट्रंप यांची जागा घेणार नाहीत. नवीन नेत्याला त्याच्या कॅबिनेटमधल्या मंत्र्यांची नेमणूक करण्यासाठी आणि आखणी करण्यासाठी काही काळ दिला जातो.

अमेरिकन व्हाईट हाऊस

20 जानेवारीला नवीन राष्ट्राध्यक्षांचा एका दिमाखदार सोहळ्यात शपथविधी होतो. याला इनॉग्युरेशन (Inauguration) म्हटलं जातं. वॉशिंग्टन डीसीमधल्या कॅपिटॉल बिल्डिंगच्या पायऱ्यांवर हा सोहळा होतो.

हा सोहळा पार पडल्यानंतर नवीन राष्ट्राध्यक्ष व्हाईट हाऊसमध्ये जातात आणि त्यांचा 4 वर्षांचा कार्यकाळ सुरू होतो.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 2

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)