कमला हॅरिस : अमेरिकेच्या पहिला महिला उप-राष्ट्राध्यक्ष

कमला हॅरिस

फोटो स्रोत, Getty Images / ANGELA WEISS

अमेरिकेचे 46वे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि पहिला महिला उप-राष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांच्या शपथविधीचा म्हणजेच - इनॉग्युरेशनचा कार्यक्रम बुधवारी 20 जानेवारीला होणार आहे.

वॉशिंग्टन डी.सी. मधल्या कॅपिटल इमारतीच्या पायऱ्यांवर हा सोहळा होईल. अमेरिकेची संसद असणाऱ्या याच इमारतीवर काही दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रंप यांच्या समर्थकांनी हल्ला केला होता.

कमला हॅरिस या अमेरिकेच्या 49व्या उपराष्ट्राध्यक्ष असतील. पण त्या अमेरिकेच्या पहिला महिला उप-राष्ट्राध्यक्ष असतील. आणि सोबतच उप-राष्ट्राध्यक्षपद सांभाळणारी आशियाई वंशांची आणि आफ्रिकन - अमेरिकन वंशाची पहिली व्यक्ती म्हणूनही त्या इतिहास घडवतील.

"लोकशाही वाचवण्यासाठी संघर्ष करावा लागतो आणि यातच मजा असते. कारण आपल्या लोकांमध्ये भविष्य निर्माण करण्याची ताकद असते. अमेरिका नवीन दिवस पाहिल, हे तुम्ही जगाला दाखवून दिलं," अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष म्हणून पहिल्यांदा भाषण करताना कमला हॅरिस यांनी म्हटलं होतं.

55 वर्षांच्या कमला हॅरिस या सुरुवातीला खरंतर अध्यक्षपदाच्या शर्यतीत होत्या. पण नंतर त्यांनी या शर्यतीतून माघार घेत बायडन यांना पाठिंबा दिला. त्यानंतर जो बायडन यांनी कमला हॅरिस यांची रनिंग मेट म्हणून निवड केली होती.

कमला हॅरिस यांचं भारताशी नातं

कमलांचा जन्म कॅलिफोर्नियातल्या ओकलंडचा. त्यांचे आईवडील दोघेही स्थलांतरित. आईचा जन्म भारतातला आणि वडिलांचा जमैकातला.

कमला हॅरिस

फोटो स्रोत, Instagram / Kamala Harris

कमला लहान असतानाच त्यांचे पालक विभक्त झाले आणि त्यानंतर त्यांची आई श्यामला गोपालन हॅरिस यांनी कमला आणि माया या लेकींना वाढवलं. श्यामला या कॅन्सर संशोधक आणि नागरी हक्क कार्यकर्त्या होत्या. तर कमला यांचे वडील अर्थतज्ज्ञ आहेत.

आपल्या दोन्ही मुलींना त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीची जाणीव असेल याची काळजी श्यामला यांनी त्यांना वाढवताना घेतली.

कमला हॅरिस त्यांच्या 2018मध्ये प्रसिद्ध झालेल्या द ट्रुथ्स वी होल्ड (The Thruths We Hold) या आत्मचरित्रात लिहीतात, "आपण दोन कृष्णवर्णीय मुलींना वाढवतो आहोत याची माझ्या आईला पूर्ण जाणीव होती. तिने घर म्हणून स्वीकारलेल्या देशामध्ये माया आणि माझ्याकडे कृष्णवर्णीय म्हणून पाहिलं जाईल, हे तिला माहीत होतं. आणि आम्हा दोघींनाही कॉन्फिडंट कृष्णवर्णीय महिला म्हणून मोठं करण्याचा तिचा निर्धार होता."

मोठं होताना कमला यांचा कायमच त्यांच्या भारतीय मुळाशी संपर्क आला. आईसोबत त्या भारतातही येत. पण यासोबतच आईने आपल्याला आणि बहिणीला ओकलंडच्या कृष्णवर्णीय इतिहासाशीही जोडल्याचं कमला सांगतात.

आईच्या हातचा दहीभात, डाळ, इडली खाऊन मोठं झाल्याचं त्या सांगतात. त्यांच्या आत्मकथेत त्यांनी घरी भारतीय बिर्याणी बनवण्याबद्दलही लिहिलेलं आहे.

2014मध्ये कमला हॅरिस यांनी डग्लस एमहॉफ यांच्याशी लग्न केलं. त्यावेळी भारतीय परंपरेनुसार कमलांनी नवऱ्याच्या गळ्यात फुलांची वरमाला घातली तर डग्लस यांनी त्यांच्या ज्यू परंपरेनुसार काचेचा ग्लास पायाखाली फोडला.

शिक्षण आणि करियर

सिनेटर हॅरिस यांनी काही काळ कॅनडातही घालवलाय. श्यामला गोपालन हॅरिस यांनी कॅनडातल्या मॅकगिल युनिव्हर्सिटीमध्ये प्राध्यापिकेची नोकरी स्वीकारल्यानंतर माया आणि कमला या दोन्ही बहिणी पाच वर्षं माँट्रियालच्या शाळेत शिकत होत्या.

अमेरिकेतल्या हार्वर्ड विद्यापीठात कमला यांनी 4 वर्षं शिक्षण घेतलं. आपल्या आयुष्यातली ही जडणघडणीची सर्वांत महत्त्वाची वर्षं असल्याचं त्या सांगतात.

कमला हॅरिस

फोटो स्रोत, Getty Images

हार्वडमधल्या शिक्षणानंतर कमला हॅरिस यांनी युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियामधून कायद्याची पदवी घेतली आणि अल्मेडा काऊंटीच्या डिस्ट्रीक्ट अॅटर्नी कार्यालयापासून करिअरला सुरुवात केली.

2003साली त्या सॅन फ्रान्सिस्कोच्या डिस्ट्रिक्ट अॅटर्नी झाल्याय. कॅलिफोर्नियाच्या अॅटर्नी जनरल म्हणून निवड होणाऱ्या त्या पहिल्या महिला आणि पहिला कृष्णवर्णीय व्यक्ती होत्या.

2017 साली त्यांची निवड कॅलिफोर्नियाच्या ज्युनियर युएस सिनेटर म्हणून झाली. अमेरिकेच्या सिनेटमध्ये त्यांनी महत्त्वाच्या चर्चांदरम्यान त्यांच्या संभाषण कौशल्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली.

व्हाईट हाऊसची शर्यत

गेल्या वर्षीच्या सुरुवातीला कमला हॅरिस यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदासाठीच्या उमेदवाराच्या शर्यतीत आपण असल्याचं जाहीर केलं. सुरुवातीला त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला पण त्या आपल्या मोहीमेला ठोस दिशा देऊ शकल्या नाहीत. शिवाय महत्त्वाच्या आरोग्य विषयक धोरणांबाबतच्या प्रश्नांची त्यांच्याकडे समाधानकारक उत्तरंही नव्हती.

उमेदवारीसाठीच्या वादविवाद म्हणजेच डिबेट्सदरम्यान कमलांनी त्यांच्यातली वकिलाची संभाषण कौशल्यं दाखवत अनेकदा जो बायडन यांच्यावरच प्रश्नांची सरबत्ती केली होती. पण आपल्या उमेदवारीच्या या सर्वोच्च शक्तीस्थळांचा फायदा त्यांना करून घेता आला नाही.

कमला हॅरिस

फोटो स्रोत, Getty Images

अखेर 2020 च्या सुरुवातीला त्यांनी अध्यक्षपदासाठीच्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवारीच्या शर्यतीतून माघार घेतली आणि माजी उपराष्ट्राध्यक्ष यांना पाठिंबा जाहीर केला.

"अमेरिकेचे पुढचे राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांना निवडून आणण्यासाठी माझ्याकडून शक्य असेल ते सगळं करीन," असं त्यांनी जाहीर केलं होतं.

वंशभेदाविषयीची भूमिका

अमेरिकेमध्ये सध्या वर्ण आणि वंशभेदाच्या विरोधात निदर्शनं सुरू आहेत. ब्लॅक लाईव्हज मॅटरच्या चळवळीने जोर धरलाय. पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या हिंसेच्या विरोधात आवाज उठवला जातोय. आणि यामध्ये हॅरिस यांनी पुढाकार घेतलाय. आफ्रिकन अमेरिकन राजकारणी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं.

अमेरिकेतल्या पोलिसी प्रथा बदलण्याची गरज त्यांनी टॉक शोमध्ये बोलताना व्यक्त केली. केंटुकी मधील 26 वर्षांच्या आफ्रिकन अमेरिकन तरुणीला, ब्रिओना टेलरला ठार करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी त्यांनी ट्विटरवरून केली होती. यंत्रणांमध्ये असणारा वर्णभेद मोडून काढणं गरजेचं असल्याचं त्यांनी अनेकदा म्हटलंय.

पोलीस खात्याला मिळत असलेला निधी कमी करून तो सामाजिक योजनांकडे वळवण्यात यावा अशी मागणी अमेरिकेतले पुरोगामी करत आहेत. पण जो बायडन यांचा या 'डिफंडिंग'ला विरोध आहे.

कमला हॅरिस यांच्या भारतीय वंशामुळे अमेरिकेतले भारतीयही त्यांच्याकडे आपल्यापैकीच एक म्हणून पाहतात. म्हणूनच कमला यांना देण्यात आलेल्या या उपराष्ट्राध्यक्ष पदाच्या संधीकडे अमेरिकेतल्या भारतीय आणि दक्षिण आशियायी लोकांना देण्यात आलेलं प्रतिनिधित्वं म्हणूनही पाहिलं जातंय.

आपली ओळख (Identity), आपलं मूळ यामुळे आपण वंचितांचं प्रतिनिधित्वं करण्यासाठी योग्य ठरत असल्याचं कमला हॅरिस यांनी अनेकदा म्हटलंय. आता जो बायडन यांनी त्यांची निवड 'रनिंग मेट' म्हणून केलेली आहे. कदाचित आता त्यांना हे सगळं व्हाईट हाऊसमधून करायची संधी मिळेल.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)