एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश पण 'या' 4 अडचणींचं काय?

फोटो स्रोत, facebook
एकनाथ खडसेंनी शरद पवार यांच्या उपस्थितीत 23 ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. जर मला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारांनी घेतलं नसतं तर माझं राजकीय करिअर संपुष्टात आलं असतं असं ते यावेळी म्हणाले.
एकनाथ खडसेंनी 21 तारखेला पत्रकार परिषद घेऊन सांगितले की ती परवा म्हणजेच 23 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज होऊन आपण पक्ष सोडत आहोत असं ते म्हणाले होते.
गेली अनेक वर्षे एकनाथ खडसे भाजपमध्ये नाराज होते. गेले अनेक दिवस ते भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याबाबत चर्चा होती. मात्र, खडसे यांनी नेहमीच या चर्चां म्हणजे अफवा असल्याचं सांगत त्या फेटाळून लावल्या. परंतु, आता एकनाथ खडसे यांनी आपले पत्ते खुले केले आहेत.
एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश निश्चित होण्याआधीच त्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत असल्याचं चित्र होतं. आता खडसे हे राष्ट्रवादीत जाणार आहेत हे निश्चित झालं आहे पण अनेक प्रश्न अद्यापही कायम आहेतच.
त्यांची पत्रकार परिषद होण्यापूर्वी बीबीसी मराठीने तज्ज्ञांशी बोलून त्यांच्यासमोर समस्या काय आहेत आणि प्रवेश झाल्यावरही त्या कशा भेडसावतील याबाबत विचारणा केली होती.
खडसे यांचं पक्षांतर ठरलेलं होतं, तर इतके दिवस ती गोष्ट फेटाळून का लावली जात होती? पक्षांतराबाबत खडसे यांना सतत तळ्यात-मळ्यात भूमिका का घ्यावी लागत होती? सगळं काही ठरलेलं असताना खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाला मुहूर्त का मिळत नव्हता? त्यांच्या राष्ट्रवादीच्या मार्गावर नेमका कुणाचा अडसर होता. त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशात विघ्न कुणी घालत होतं? हे प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
त्यामुळे आता एकनाथ खडसे आता राष्ट्रवादीत दाखल होणार असले तरी त्यांचं आजपर्यंतचं राजकारण पाहता त्यांच्यासमोर या 4 अडचणी निर्माण होऊ शकतात. या अडचणींचा सामना खडसे कशा पद्धतीने करतात, हे पाहणं अत्यंत औत्सुक्याचं ठरणार आहे. बीबीसीने तज्ज्ञांशी बोलून याबाबत अधिक माहिती मिळवली आहे.
1. राष्ट्रवादीतीलच काही बड्या नेत्यांचा विरोध?
खडसेंच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाबाबतच्या चर्चांवर बीबीसी मराठीने मंगळवारी (20 ऑक्टोबर) ज्येष्ठ पत्रकार आणि दिव्य मराठीचे संपादक जयप्रकाश पवार यांच्याशी चर्चा केली होती. ते म्हणाले, "गेल्या सहा महिन्यांपासून खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशी चर्चा सुरू आहे. पण, प्रवेशाला मुहूर्त मिळालेला नाही. याचं एक कारण म्हणजे खडसेंना पक्षात स्थान कसं द्यायचं हा मोठा प्रश्न आहे. राष्ट्रवादीत मोठे स्वयंभू नेते आहेत. त्यात खडसेंचा शांत न बसण्याचा स्वभाव सर्वांना माहीत आहे. मग त्यांना घेऊन गोंधळ का निर्माण करायचा?
"देवेंद्र फडणवीसांवर सातत्याने तोफ डागण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला खडसेंचा चांगला उपयोग होईल. मात्र, NCP कडून खडसेंच्या प्रवेशानंतर परिस्थिती काय होईल याची चाचपणी सुरू असावी. त्यामुळे खडसेंच्या प्रवेशाला अजून मुहूर्त मिळत नाही आणि इतक्या लवकर मिळण्याची स्थिती नाही," पवार सांगतात.

फोटो स्रोत, Twitter
गेल्या काही महिन्यांपासून सतत एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही बडा नेता खडसे प्रवेशाबाबतच्या चर्चांना अधिकृत दुजोरा देत नाही. याउलट राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून याबाबत सूचक वक्तव्य केली जात आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे उत्तर महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना खडसेंच्या प्रवेशाबाबत विचारलं असता त्यांनी थेट प्रतिक्रिया देणं टाळलं. प्रसारमाध्यमांशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले, "याबाबत मी बोलणं योग्य नाही. पण एकनाथ खडसे येणारच नाहीत असं नाही."
यासंदर्भात अधिक माहिती तुम्ही 'एकनाथ खडसे: राष्ट्रवादी काँग्रेसमधील माझ्या प्रवेशाबाबत फक्त माध्यमांमध्येच चर्चा' ही बातमी वाचून मिळवू शकता.
तसंच खडसेंनी आपल्या राजकीय कारकिर्दीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर सतत आरोप केलेत. अशा परिस्थितीत स्थानिक नेते मानतील? बरं, शरद पवारांनी मध्यस्ती केली तरी, स्थानिक समीकरणं जुळतील? हे प्रश्न अजूनही अनुत्तरीत असल्याने अद्याप खडसेंचा प्रवेशाला मुहूर्त मिळत नव्हता, असं राजकीय जाणकार म्हणतात.
2. स्थानिक राजकीय समीकरण
एकनाथ खडसे उत्तर महाराष्ट्रातील मोठं नेतृत्व आहे. गोपीनाथ मुंडेंनंतर राज्यातील ओबीसी समाजाचा एक राज्यव्यापी चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. जळगाव जिल्ह्यात लेवा-पाटील समाज मोठ्या संख्यने आहे. या जातीय समीकरणाचा खडसेंच्या प्रवेशाशी संबंध असू शकतो का?

फोटो स्रोत, Getty Images
यावर बीबीसीशी बोलताना महाराष्ट्र टाईम्सचे नाशिकचे निवासी संपादक शैलेंद्र तनपुरे म्हणतात, "एकेकाळी लेवा-पाटील समाज एकमुखी एकनाथ खडसेंच्या पाठीशी उभा होता. आता असं चित्र नाही. लेवा-पाटील समाज विखुरला गेला आहे.
हा समाज आता मोठ्या संख्येने खडसेंच्या मागे नाही. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते या जातीय समीकरणांचा अंदाज घेत असण्याची शक्यता आहे. हे खडसेंच्या प्रवेशाला मुहूर्त न मिळण्याचं एक कारण आहे. याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले तर कुणाचा फायदा? इथं क्लिक करून अधिक वाचू शकता.
3. शिवसेनेत नाराजी
"एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यास महाविकास आघाडीत अडचणी निर्माण होतील. माझा खडसेंसोबत असलेला संघर्ष कायम राहणार आहे. माझे अधिकार अबाधित राहतील याची मला खात्री द्या अशी चर्चा काही दिवसांपूर्वीच मी आमचे पक्षश्रेष्ठी उद्धव ठाकरे यांच्याशी केली आहे," अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या एका स्थानिक आमदाराने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर बीबीसी मराठीशी बोलताना दिली होती. खडसे यांच्या पक्षप्रवेशापूर्वीच त्यांनी ही प्रतिक्रिया कळवली होती.

फोटो स्रोत, Getty Images
"महाविकास आघाडीने आधीच ठरवलेल्या बाबींमध्ये एकनाथ खडसेंनी ढवळाढवळ केली अथवा माझ्या अधिकारांमध्ये हस्तक्षेप केला तर संघर्ष अटळ आहे. या सर्व बाबी स्पष्ट न होताच त्यांचा प्रवेश झाला तर मी माझा निर्णय घेईन," असा इशाराही स्थानिक आमदाराने दिला होता. त्यामुळे येत्या काळात राजकीय ढवळाढवळ पाहायला मिळाली, तर आश्चर्य नाही.
उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ खडसे विरुद्ध शिवसेना हा जुना संघर्ष आहे. हा संघर्ष 2014 मध्ये टोकाला गेला. शिवसेनेसोबतची युती तोडण्याची घोषणा करण्यासाठी एकनाथ खडसेंनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत पुढाकार घेतला होता.
एकनाथ खडसे यांच्यावर शिवसेना का नाराज आहे, हे सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी तुम्ही बीबीसी मराठीने केलेली 'एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यावरून शिवसेनेमध्ये नाराजी का?' ही बातमी वाचू शकता.
4. मंत्रिपदावरून मतभेद
एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्यास, त्यांना नेमकी काय जबाबदारी मिळणार, याबाबतही तर्कवितर्क लढवले जात आहे.
खडसे यांना महत्त्वाचं मंत्रिपदसुद्धा मिळू शकतं, अशीही चर्चा आहे. याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विचारले असता त्यांनी हा दावा फेटाळून लावला. खडसे यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणतीही ऑफर दिली नसल्याची माहिती प्रवक्ते नवाब मलिक यांनी पूर्वी दिली होती.
या प्रतिक्रियांनंतर दोन-चार दिवसांतच खडसे राष्ट्रवादीत दाखल झाले. मग अशा प्रकारे खडसे यांचा पक्षप्रवेश लपवण्यामागे काय कारण असावं?

फोटो स्रोत, Getty Images
खडसे महाराष्ट्रातील राजकारणात एक मोठं नाव आहे. खडसेंची राजकीय कारकिर्द खूप मोठी आहे. संघटना आणि मंत्री म्हणून प्रशासकीय कामांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्याकडे आहे. उत्तर महाराष्ट्रात ओबीसी समाजाचा मोठा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळे त्यांना पक्षात योग्यरित्या सामावून घेणं राष्ट्रवादी काँग्रेससमोर एक मोठं आव्हान आहे.
खडसेंना संघटनेत जबाबदारी द्यावी का मंत्रिमंडळात स्थान द्यावं, याबाबत अजूनही निर्णय झालेला नाही. खडसेंबाबत विविध फॉर्म्युल्यावर पक्षातील नेत्यांमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या माहितीनुसार, खडसेंच्या संभाव्य प्रवेशाबाबत पक्षात चर्चा झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीसुद्धा जळगावातील नेत्यांसोबत खडसेंच्या बाबतीच चर्चा केली आहे.
खडसेंच्या प्रवेशापूर्वीच बीबीसी मराठीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरीष्ठ नेत्यांना याबाबत विचारलं होतं. त्यावेळी नाव न सांगण्याच्या अटीवर म्हणाले होते, "खडसेंचा प्रवेश निश्चित झाला. पण, प्रश्न आहे त्यांना पक्षात सामावून कसं घेणार याचा. खडसे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे त्यांना पक्षात स्थान कसं द्यायचं याबाबत विचार सुरू आहे."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








