नेताजी सुभाष चंद्र बोस आणि ऑस्ट्रियाच्या एमिलीची प्रेमकथा

नेताजी सुभाषचंद्र बोस एमिलीसह

फोटो स्रोत, NETAJI RESEARCH BUREAU

फोटो कॅप्शन, नेताजी सुभाषचंद्र बोस एमिलीसह
    • Author, प्रदीप कुमार
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

साल होतं 1934 चं. त्यावेळी सुभाषचंद्र बोस ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्नामध्ये राहत होते. एव्हाना लोक त्यांना 'काँग्रेस योद्धा' म्हणून ओळखू लागले होते.

सविनय कायदेभंगाच्या चळवळीमुळे तुरुंगात गेलेल्या सुभाष बाबूंची तब्येत ढासळू लागली होती. त्यामुळे फेब्रुवारी 1932 मध्ये ब्रिटिश सरकारने त्यांना उपचारासाठी युरोपला पाठवण्याचं मान्य केलं. मात्र, या उपचाराचा खर्च त्यांच्या कुटुंबीयांनाच उचलावा लागणार होता.

व्हिएन्ना येथे उपचार सुरू असतानाच त्यांनी युरोपमध्ये राहणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी एकत्र करण्याचा निर्णय घेतला. या वेळी एका युरोपियन प्रकाशकाने त्यांना 'द इंडियन स्ट्रगल' हे पुस्तक लिहिण्याचं काम सोपवलं. हे पुस्तक लिहिण्यासाठी त्यांना टायपिंगबरोबरच इंग्रजी जाणणाऱ्या सहकाऱ्याची गरज भासू लागली.

बोस यांचे मित्र डॉ. माथूर यांनी त्यांना दोन लोकांचा संदर्भ दिला. या दोघांबद्दल मिळालेल्या माहितीच्या आधारे बोस यांनी त्यातल्या त्यात चांगल्या उमेदवाराला बोलवून घेतलं. या मुलाखती दरम्यान त्यांना हा उमेदवार काही खास वाटला नाही, त्यामुळे त्यांनी दुसऱ्या उमेदवाराला बोलावलं.

ही दुसरी उमेदवार होती, 23 वर्षांची एमिली शेंकल. या सुंदर ऑस्ट्रियन तरुणीला बोस यांनी नोकरी दिली. जून 1934 पासून एमिली यांनी बोस बाबूंकडे नोकरी करायला सुरुवात केली.

1934 मध्ये सुभाषचंद्र बोस 37 वर्षांचे होते. एमिलीला भेटण्यापूर्वी त्यांचं चित्त फक्त देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यावर एकवटलं होतं. पण एमिलीने त्यांच्या आयुष्यात जे प्रेमाचं वादळ आणलं ज्याची कल्पना सुभाषचंद्र बोस यांना आलीच नाही.

सुभाष बाबूंच्या आयुष्यात आलं प्रेमाचं वादळ

सुभाषचंद्र बोस यांचे थोरले बंधू शरत चंद्र बोस यांचे नातू सुगत बोस यांनी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर 'हिज मॅजेस्टीज अपोनंट - सुभाषचंद्र बोस अँड इंडियाज स्ट्रगल अगेन्स्ट एम्पायर' हे पुस्तक लिहिलं आहे. त्यात त्यांनी लिहिलंय की, एमिलीला भेटल्यानंतर सुभाष यांच्या आयुष्यात नाट्यमय बदल झाला.

सुगत बोस यांच्या म्हणण्यानुसार, याआधी सुभाषचंद्र बोस यांना लग्नाच्या अनेक संधी चालून आल्या होत्या, पण त्यांनी त्यात रस दाखवला नाही. पण एमिलीच्या सौंदर्याची सुभाष बाबूंवर भुरळ पडली.

सुगत बोस यांनी एमिलीचा हवाला देत त्यांच्या पुस्तकात लिहिलंय की, "प्रेमाची सुरुवात सुभाषचंद्र बोस यांच्याकडून झाली. 1934 च्या मध्यापासून ते मार्च 1936 पर्यंत ऑस्ट्रिया आणि चेकोस्लोव्हाकियामधल्या आमच्या वास्तव्यादरम्यान आमचे संबंध आणखी फुलू लागले."

नेताजी सुभाषचंद्र बोस

फोटो स्रोत, NETAJI RESEARCH BUREAU

26 जानेवारी 1910 रोजी ऑस्ट्रियन कॅथलिक कुटुंबात जन्मलेल्या एमिलीच्या वडिलांना आपल्या मुलीने एका भारतीयासाठी काम करावं हे अजिबात मान्य नव्हतं. पण जेव्हा ते सुभाषचंद्र बोस यांना भेटले तेव्हा ते त्यांच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित झाले.

प्रसिद्ध अभ्यासक रुद्रांशु मुखर्जी यांनी सुभाषचंद्र बोस आणि जवाहरलाल नेहरू यांच्या जीवनावर तुलनात्मक अभ्यास असलेलं 'नेहरू अँड बोस, पॅरलल लाइव्हज' नावाचं एक पुस्तक लिहिलं आहे.

सुभाष बाबूंनी लिहिलेलं प्रेमपत्र

पेंग्विन इंडियाने प्रकाशित केलेल्या या पुस्तकात 'टू वूमेन एंड टू बुक्स' हे एक प्रकरण आहे. यामध्ये बोस आणि नेहरूंच्या पत्नींची त्यांच्या आयुष्यातील भूमिका अधोरेखित करण्यात आली आहे.

मुखर्जी यांनी त्यात लिहिलंय की, "सुभाष आणि एमिली यांनी सुरुवातीपासूनच हे मान्य केलं होतं की, त्यांचं नातं खूप वेगळं आणि खूप कठीण असणार आहे. त्यांनी एकमेकांना जी पत्रं लिहिली आहेत, त्यात वापरलेल्या नावांवरून हे स्पष्ट होतं. एमिली त्यांना 'मिस्टर बोस' म्हणायच्या, तर बोस त्यांना 'मिस शेंकल' किंवा 'पर्ल शेंकेल' म्हणायचे."

आपली ओळख लपवून देशाच्या स्वातंत्र्यासाठी युरोपीय देशांची मदत घेत इकडे तिकडे पळत असताना आपल्या प्रेमसंबंधांबाबत अधिक सावध राहिलं पाहिजे हे सुभाष बाबूंना जाणवलं होतं. पण एमिलीबद्दल त्यांच्या मनात कोणत्या भावना होत्या हे त्या पत्रावरून समजू शकतं. याला आपण सुभाषचंद्र बोस यांनी लिहिलेलं प्रेमपत्र देखील म्हणू शकतो.

सुभाषचंद्र बोस यांनी लिहिलेलं पत्र

फोटो स्रोत, NETAJI RESEARCH BUREAU

सुरुवातीला सुभाषचंद्र बोस यांनी एमिली यांना जी पत्रं लिहिली होती त्या संग्रहात हे पत्र नव्हतं. एमिली यांनी स्वतः हे पत्र शरतचंद्र बोस यांचा मुलगा शिशिर कुमार बोस यांच्या पत्नी कृष्णा बोस यांना दिलं. 5 मार्च 1936 रोजी लिहिलेल्या या पत्राची सुरुवात होती की,

"माय डार्लिंग, जेव्हा वेळ येते तेव्हा हिम पर्वत देखील वितळतो. हीच भावना माझ्या आत आहे. मी तुझ्यावर किती प्रेम करतो हे लिहिण्यापासून मी स्वतःला रोखू शकत नाही. माय डार्लिंग, तू माझ्या हृदयाची राणी आहेस. पण तू माझ्यावर प्रेम करतेस का?"

यामध्ये बोस यांनी लिहिलंय की, "भविष्यात काय होईल हे मला माहीत नाही. मला माझं संपूर्ण आयुष्य तुरुंगात घालवावं लागू शकतं, मला गोळी लागू शकते किंवा मला फाशी दिली जाऊ शकते. मी तुम्हाला कधीही पाहू शकणार नाही, मी कदाचित पत्र लिहू शकणार नाही. पण माझ्यावर विश्वास ठेव, तू नेहमी माझ्या हृदयात, माझ्या विचारांमध्ये आणि माझ्या स्वप्नांमध्ये राहशील. जर आपण या आयुष्यात भेटलो नाही तर पुढच्या आयुष्यात मी नक्कीच तुझ्यासोबत असेन."

प्रेमाचं वचन

या पत्राच्या शेवटी सुभाषचंद्र बोस यांनी लिहिलंय की, "माझं तुझ्यावर, तुझ्या आत्म्यावर प्रेम आहे. तू पहिली स्त्री आहेस जिच्यावर मी प्रेम केलंय."

पत्राच्या शेवटी सुभाष बाबूंनी हे पत्र नष्ट करण्याची विनंतीही केली होती, पण एमिली यांनी हे पत्र जपून ठेवलं.

या पत्रावरून समजतं की सुभाषचंद्र बोस एमिली यांच्या प्रेमात आकंठ बुडून गेले होते. याबाबत सुभाषचंद्र बोस यांचे जवळचे मित्र आणि राजकीय सहकारी ए सी एन नांबियार यांनी सुगत बोस यांना सांगितलं होतं की, "सुभाष यांच्याकडे बऱ्याच कल्पना होत्या. भारताला स्वातंत्र्य मिळवून देणं या गोष्टीवर ते ठाम होते. त्यांचं मन कुठे भटकलं असेल तर ते याप्रसंगी. एमिलीवर ते खूप प्रेम करत होते."

त्यावेळची सुभाष बाबूंची मन:स्थिती त्यांनी एमिलीला एप्रिल किंवा मे 1937 मध्ये पाठवलेल्या पत्रावरून स्पष्ट होते.

सुभाषबाबूंची पत्नी एमिली आणि मुलगी अनिता

फोटो स्रोत, NETAJI RESEARCH BUREAU

फोटो कॅप्शन, सुभाषबाबूंची पत्नी एमिली आणि मुलगी अनिता

त्यांनी लिहिलं होतं की, "गेल्या काही दिवसांपासून मी तुला पत्र लिहिण्याचा विचार करत होतो. पण तुझ्याबद्दलच्या भावना व्यक्त करणं माझ्यासाठी किती अवघड आहे हे तू समजू शकतेस. मला तुला एवढंच सांगायचं आहे की मी पूर्वी जसा होतो आता देखील तसाच आहे."

"असा एकही दिवस गेला नसेल, जेव्हा मला तुझी आठवण आली नसेल. तू नेहमीच माझ्या सोबत असतेस. मी इतर कोणाचाही विचार करू शकत नाही. मी गेल्या महिन्यांत किती दुःखी होतो, एकटा होतो हे तुला सांगू शकत नाही. फक्त एकच गोष्ट मला आनंदी ठेवू शकते, पण ते आता शक्य होईल असं वाटत नाही. तरीही मी रात्रंदिवस त्याचाच विचार करतो आणि मला योग्य मार्ग दिसावा यासाठी प्रार्थना करतो."

असं लग्न ज्याविषयी जग अनभिज्ञ होतं

या पत्रांमध्ये व्यक्त झालेल्या भावना पाहता, जेव्हा दोघेही पुढच्या वेळी भेटले तेव्हा सुभाषबाबू आणि एमिली यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. या लग्नाविषयी एमिली यांनी कृष्णा बोस यांना माहिती देताना सांगितलं होतं की, 26 डिसेंबर 1937 रोजी त्यांच्या 27 व्या वाढदिवसाचं निमित्त साधून त्यांनी ऑस्ट्रियातील बॅडगॅस्टाईन या दोघांच्या आवडत्या ठिकाणी लग्न केलं.

मात्र, दोघांनीही आपलं लग्न गुपित ठेवण्याचा निर्णय घेतला. कृष्णा बोस यांच्या म्हणण्यानुसार, एमिली यांनी लग्नाचा दिवस सांगण्याशिवाय दुसरी कोणतीही माहिती दिली नाही. मात्र सुभाष बाबूंची कन्या अनिता यांनी आपल्या आईच्या लग्नाविषयी सांगितलं होतं की, 'लग्नावेळी तिने भारतीय वधूप्रमाणे कपाळावर सिंदूर लावला होता.'

हे लग्न इतकं गुपित ठेवलं होतं की, बॅडगॅस्टाईन मधील त्यांच्या वास्तव्यादरम्यान त्यांचा पुतण्या अमिय बोस देखील त्यांना भेटायला आला होता. पण त्यावेळी एमिली या त्यांना त्यांच्या काकाच्या सहकारी वाटल्या होत्या.

महात्मा गांधी-सुभाषचंद्र बोस

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

हे लग्न गुप्त ठेवण्याच्या संभाव्य कारणांबद्दल रुद्रांशु मुखर्जी लिहितात की, सुभाषचंद्र बोस यांना त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर परिणाम होऊ द्यायचा नव्हता असं दिसतं. परदेशी स्त्री बरोबर लग्न केलंय असं समजताच त्यांच्या प्रतिमेवर परिणाम झाला असता.

रुद्रांशुची ही शंका 1938 मध्ये सुभाषचंद्र बोस यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्याच्या संदर्भातही पाहायला हवी. प्रख्यात इंग्रजी लेखक आणि शरत चंद्र बोस यांचे सचिव नीरद सी. चौधरी यांनी त्यांच्या 1989 साली लिहिलेल्या, 'दाय हँड ग्रेट अर्नाक: इंडिया 1921-1951' पुस्तकात म्हटलंय की, "हा त्यांच्या खासगी जीवनाचा एक भाग होता. पण जेव्हा मला माहिती मिळाली, तेव्हा मला धक्काच बसला."

तीन वेळा खासदार राहिलेल्या आणि शरतचंद्र बोस यांचा मुलगा शिशिर कुमार बोस यांच्या पत्नी कृष्णा बोस यांनी 'अ ट्रू लव्ह स्टोरी - एमिली अँड सुभाष' या पुस्तकात सुभाष बाबू आणि एमिली यांच्यातील प्रेमसंबंधांचे तपशीलवार वर्णन केलेले आहे.

सुभाषचंद्र बोस एमिलीला 'वाघिण' म्हणायचे. मात्र, बुद्धीच्या बाबतीत एमिली सुभाष बाबूंच्या जवळपासही नव्हती. आणि सुभाष बाबू वेळोवेळी याचे दाखलेही द्यायचे.

सुभाष आणि एमिली यांच्या प्रेमाचं प्रतीक

कृष्णा बोस यांच्या म्हणण्यानुसार, "सुभाष बाबूंना वाटायचं की एमिलीने तत्कालीन भारतीय वृत्तपत्र आणि मासिकांसाठी व्हिएन्ना येथून अहवाल लिहायला सुरुवात करावी. सुभाष बाबूंच्या सांगण्यावरून एमिलीने 'द हिंदू' आणि 'मॉडर्न रिव्ह्यू'साठी काही लेख लिहिले होते. पण त्या बातम्यांचं विश्लेषण करणं तिच्यासाठी अवघड होतं. सुभाष बाबू तिला अनेक वेळा सांगत की, तुझा लेख चांगला नव्हता म्हणून तो प्रकाशित झाला नाही."

त्याची झलक दुसऱ्या ठिकाणी देखील पाहायला मिळते. 12 ऑगस्ट 1937 साली लिहिलेल्या पत्रात सुभाष बाबू एमिलीला म्हणतात, "मी भारताविषयी माहिती देणारी काही पुस्तकं मागवली आहेत, पण ही पुस्तकं तुला देण्यात काही अर्थ आहे असं मला वाटत नाही. तुझ्याकडे जी पुस्तकं आहेत ती ही तू वाचलेली नाहीस."

सुभाषचंद्र बोस

फोटो स्रोत, Getty Images

"जोपर्यंत तुम्ही गंभीर होत नाही तोपर्यंत तुम्हाला वाचनात रस येणार नाही. तुझ्याकडे अनेक विषयांवरची पुस्तकं जमा झाली आहेत, पण तू त्यातलं पान देखील पलटून पाहिलं नसणार हे मला माहिती आहे."

एवढं असूनही सुभाषचंद्र बोस आणि एमिली यांचं एकमेकांवर अपार प्रेम होतं. 1934 ते 1945 हा काळ पाहता ते केवळ 12 वर्ष एकत्र होते आणि त्यातही ते तीन वर्षांपेक्षा कमी काळ एकत्र राहू शकले.

फक्त तीन वर्षे सोबत राहिले

त्यांच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून 29 नोव्हेंबर 1942 रोजी एका मुलीचा जन्म झाला, तिचं नाव अनिता ठेवण्यात आलं. इटालियन क्रांतिकारी नेते गॅरीबाल्डी यांच्या ब्राझीलमध्ये जन्मलेल्या पत्नी अनिता गॅरीबाल्डी यांच्या नावावरून हे नाव ठेवण्यात आलं होतं.

अनिताने आपल्या पतीसोबत अनेक युद्धांमध्ये सहभाग घेतला होता आणि एक शूर सेनानी म्हणून त्यांची ओळख होती.

डिसेंबर 1942 मध्ये सुभाष बाबू आपल्या मुलीला पाहण्यासाठी व्हिएन्नात पोहोचले. त्यानंतर त्यांनी त्यांचे भाऊ शरतचंद्र बोस यांना बंगाली भाषेत लिहिलेल्या पत्रात आपल्या पत्नी आणि मुलीची माहिती दिली. यानंतर, सुभाष बाबू मोहिमेवर निघून गेले आणि परत कधीच एमिली आणि अनिताकडे परत आले नाहीत.

सुभाषचंद्र बोस

फोटो स्रोत, Getty Images

पण एमिलीने 1996 पर्यंत सुभाषचंद्र बोस यांच्या आठवणींत दिवस काढले. एका छोट्या टेलीग्राफ हाऊसमध्ये काम करून त्यांनी आपली मुलगी अनिता बोसला वाढवलं. ते एमिली आणि सुभाष बाबूंच्या प्रेमाचं एकमेव प्रतीक होतं. त्या पुढे जर्मनीच्या प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ बनल्या.

या खडतर प्रवासात त्यांनी सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबाकडून कोणतीही मदत घेण्यास नकार दिला. एवढंच नाही तर सुभाषचंद्र बोस यांनी आपल्या नातेसंबंधाची माहिती कधीच जगजाहीर होऊ दिली नाही, एमिलीने देखील ही मर्यादा कायम पाळली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)