हिटलरने दिलेल्या पाणबुडीने सुभाषचंद्र बोस जेव्हा जर्मनीहून जपानला पोहोचले...

फोटो स्रोत, PAN MACMILLAN
- Author, रेहान फजल
- Role, बीबीसी प्रतिनिधी
नेताजी सुभाषचंद्र बोस त्यांच्या आयुष्यात फक्त एकदाच जर्मन हुकुमशाह अॅडॉल्फ हिटलरला भेटले होते. ती तारीख होती 29 मे 1942
त्या दिवशी झालेल्या भेटीत जर्मनीचे परराष्ट्र मंत्री जोआखिम वॉन रिबेनट्रॉप, परराष्ट्र राज्यमंत्री विलहेल्म केपलर आणि दुभाष्याचं काम करणारे पॉल श्मिट हजर होते.
तसं तर हिटलरला भारताविषयी अजिबात कळवळा नव्हता, किंबहुना त्याचं भारताविषयी मतही चांगलं नव्हतं.
हिटलर त्याच्या 'माईन काम्फ' या आत्मचरित्रात लिहितो की, "भारत ब्रिटनच्या हातून गेला तर ती फक्त माझ्यासाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी दुर्दैवी गोष्ट असेल. एक जर्मन म्हणून मला असं वाटतं की, भारतावर ब्रिटिशांचंच राज्य असलं पाहिजे आणि मला ते बघायला आवडेल."
एवढंच नाही तर, भारत ज्या पद्धतीने आंदोलन करतोय त्या पद्धतीने ब्रिटिश कधीच भारताबाहेर जाणार नाहीत असं हिटलरला वाटायचं.
झेक-अमेरिकन इतिहासकार मिलान होनार त्यांच्या 'इंडिया इन अॅक्सिस स्ट्रॅटेजी' या पुस्तकात लिहितात, "दुसऱ्या महायुद्धादरम्यान हिटलरचा एक गोड गैरसमज होता की जर ब्रिटनशी तडजोड करण्याची वेळ आलीच तर तो भारताचा वापर सोव्हिएत युनियनविरुद्ध करता येईल."
होनार यांच्या मते, सुभाष बाबू जेव्हा हिटलरला भेटले तेव्हा ते खूप निराश झाले होते. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात जर्मनी मदत करेल ही आशा या भेटीनंतर मावळून गेली.
नेताजींची हिटलरशी भेट
या भेटीविषयी पॉल श्मिट यांनी बोस यांची भाची कृष्णा बोस यांना माहिती देताना सांगितलं होतं की, "सुभाषचंद्र बोस यांनी हुशारी दाखवत हिटलरच्या आदरातिथ्याबद्दल त्याचे आभार मानले होते."
त्यांच्या संभाषणात तीन महत्वाचे मुद्दे चर्चेला होते. यातलं पहिलं म्हणजे, या राष्ट्रांनी भारताच्या स्वातंत्र्याला जाहीर पाठिंबा द्यायला हवा. जपान आणि इटलीचा मुसोलिनी मे 1942 च्या दरम्यान भारताच्या स्वातंत्र्याला पाठिंबा द्यायला तयार झाले होते.

फोटो स्रोत, KLETT-COTTA
जर्मनीचे परराष्ट्र मंत्री जोआखिम वॉन रिबेनट्रॉप यांनी यासाठी हिटलरची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र हिटलरने तसं करायला नकार दिला.
त्यांच्या संभाषणाचा दुसरा विषय होता, हिटलरच्या 'माईन काम्फ' या पुस्तकातील भारताचा संदर्भ. सुभाष बाबूंच म्हणणं होतं की, हिटलरने हा जो संदर्भ दिलाय त्याचा वापर ब्रिटन जर्मनीविरुद्धच्या प्रचारात करत आहे आणि त्याचा चुकीचा अर्थ लावला जातोय.
त्यामुळे हिटलरने यावर लवकरात लवकर स्पष्टीकरण द्यावं अशी विनंती सुभाष बाबूंनी केली.
यावर हिटलरने कोणतंच स्पष्ट उत्तर दिलं नाही, उलटं तो गोलगोल फिरवून उत्तर देण्याचं टाळू लागला. पण यामुळे निदान अंदाज तरी आला की, सुभाषचंद्र बोस यांच्यात जगातल्या सर्वात मोठ्या हुकूमशाहासमोर हा मुद्दा मांडण्याची धमक आहे.

फोटो स्रोत, Getty Images
सुभाषचंद्र बोसांना जपानला जाण्यासाठी हिटलरने पाणबुडीची व्यवस्था केली.
आता त्यांच्या चर्चेत तिसरा मुद्दा आला होता, तो म्हणजे नेताजींना जर्मनीतून पूर्व आशियापर्यंत पोहोचायचं कसं.
सुभाष बोस यांनी लवकरात लवकर जपानकडे प्रस्थान करावं आणि जपानची मदत घ्यावी यावर हिटलर सहमत होता. पण त्यासाठी त्यांनी हवाई मार्गाने जाऊ नये असं हिटलरचं म्हणणं होतं. कारण रस्त्यात त्यांची मित्र राष्ट्रांशी चकमक होण्याची शक्यता होती. आणि ते त्यांच्या भागात विमान उतरवायला लावू शकतात असं हिटलरचं मत पडलं.
त्यामुळे सुभाषचंद्र बोस यांनी पाणबुडीने जपानला जावं असा सल्ला हिटलरने दिला. त्यासाठी त्याने जर्मन पाणबुडीचीही व्यवस्था केली.
हिटलरने स्वतःहून बोस यांच्या प्रवासाचा मार्ग तयार केला. हिटलरच्या मते हा प्रवास सहा आठवड्यात संपायला हवा होता. पण खरं पाहता सुभाष बाबूंना जपानला पोहोचायला तीन महिने लागले.
पाणबुडीत जीव घुसमटवणारं वातावरण
जर्मनीतल्या कील बंदरातून 9 फेब्रुवारी 1943 रोजी एक पाणबुडी जपानच्या दिशेनं रवाना झाली. या पाणबुडीत नेताजी सुभाषचंद्र बोस, आणि आबिद हसन होते. त्या पाणबुडीतलं वातावरण जीव घुसमटवणारं होतं.
पाणबुडीच्या मध्यभागी बोस यांची राहायची व्यवस्था करण्यात आली होती. संपूर्ण पाणबुडीत चालण्याफिरण्याची अजिबात सोय नव्हती.

फोटो स्रोत, Getty Images
आबिद हसन त्यांच्या 'सोल्जर रिमेम्बर्स' या पुस्तकात लिहितात, "पाणबुडीच्या आत जाताच माझ्या लक्षात आलं होतं की, या संपूर्ण प्रवासात मला माझ्या बंकमध्ये एकतर झोपावं लागेल किंवा निमुळत्या रस्त्यात उभं राहावं लागेल. संपूर्ण पाणबुडीत बसण्यासाठी फक्त एकच जागा होती. त्या टेबलवर सहा लोक एकमेकांना खेटून बसू शकत होते. जेवण नेहमीच त्या टेबलवर दिलं जायचं. कधी कधी तर लोक त्यांच्या बंक मध्ये झोपून जेवायचे."
"पाणबुडी मध्ये शिरल्या शिरल्या डिझेलचा वास माझ्या नाकातोंडात जाऊन मला शिसारी आली. सगळ्या पाणबुडीत डिझेलचा वास भरला होता. एवढंच काय, तर आमच्या चादरींना सुद्धा डिझेलचा वास येत होता. पुढचे तीन महिने आपल्याला असं राहावं लागणार आहे हा विचार करूनच माझा उत्साह संपला."
नेताजी ज्या पाणबुडीवर होते ती U-180 पाणबुडी मे 1942 मध्ये जर्मन नौदलात सामील झाली होती. या पाणबुडीवर वर्नर मुसेनबर्ग कमांडर म्हणून तैनात होते. बरोबर एक वर्षानंतर म्हणजेच ऑगस्ट 1944 मध्ये मित्र राष्ट्रांनी पॅसिफिक महासागरात ही पाणबुडी बुडवली. त्यावर असणारे 56 नौसैनिक मारले गेले.
नेताजींसाठी खिचडीची व्यवस्था
प्रवासाच्या पहिल्याच दिवशी सुभाष बाबू काहीच खात नसल्याचं आबिद हसन यांच्या लक्षात आलं.
पाणबुडीतल्या नौसैनिकांसाठी जाड ब्रेड, कडक मांस, टिनच्या डब्यात ठेवलेल्या राबरासारख्या लागणाऱ्या भाज्या असं खाणं असायचं.

फोटो स्रोत, PAn
सुभाषचंद्र बोस यांची भाची कृष्णा बोस त्यांच्या हल्लीच प्रकाशित झालेल्या 'नेताजी, सुभाष चंद्र बोसेस लाइफ़, पॉलिटिक्स एंड स्ट्रगल' या पुस्तकात लिहितात, "आबिदने मला सांगितलं की, नेताजी पाणबुडीतून प्रवास करणार आहेत ही गोष्ट त्यांनी लपवून ठेवली होती. जर मला आधीच माहीत असतं तर मी माझ्यासोबत खाण्याच्या काही गोष्टी, मसाले घेतले असते.
आबिद जेव्हा पाणबुडीच्या गोदामात पोहोचले तेव्हा त्यांना तिथं तांदूळ आणि डाळीने भरलेला एक थैला सापडला. सोबतच तिथं अंड्याची पावडर असलेला एक डब्बा सापडला."
"पुढेच काही दिवस आबिदने नेताजींसाठी अंड्याच्या पावडरीचं ऑम्लेट बनवायला सुरुवात केली. त्यानंतर नेताजींसाठी दालखिचडी बनवली, जी त्यांना खूप आवडली. पण त्यांनी एकट्यानेच खिचडी न खाता जर्मन ऑफिसर्सना बोलावून खिचडी द्यायला सुरुवात केली."

फोटो स्रोत, PAN MACMILLAN
त्या पुढे लिहितात, "आबिदला या गोष्टीचं टेन्शन होतं की, जर्मन सैनिकांनी खिचडी खायला सुरुवात केली तर तांदूळ आणि डाळ लवकरच संपून जाईल. पण नेताजींना हे सांगायचं कसं म्हणून त्याची हिंमत होत नव्हती. म्हणून त्यांनी जर्मन सैनिकांनाच खिचडी खाऊ नका म्हणून सांगितलं जेणेकरून बरेच दिवस ते धान्य पुरवठी येईल."
दिवसा समुद्राच्या तळाशी, तर रात्री समुद्राच्या पृष्ठभागावर
जर्मनीच्या कील बंदरातून पाणबुड्यांचा एक गट रवाना झाला होता ज्यात बोसांची पाणबुडी सुद्धा होती. कीलपासून काही अंतरापर्यंतच्या समुद्रीभागावर जर्मन नौदलाचं पूर्ण नियंत्रण होतं.
त्यामुळे जर्मन यू-बोटच्या ताफ्याला पाण्याच्या पृष्ठभागावरून प्रवास करायला काहीच अडचण नव्हती. त्यानंतर हा ताफा डेन्मार्कच्या समुद्र किनाऱ्यावरून स्वीडनला पोहोचला. कारण स्वीडन या युद्धात तटस्थ होता, त्यामुळे थोडी सावधानता बाळगण्याची गरज होती.
नॉर्वेच्या दक्षिणेकडील किनाऱ्याजवळ यू-बोट्सचा ताफा दोन गटात विभागला गेला.

फोटो स्रोत, PAN MACMILLAN
इथूनचं सुभाषचंद्र बोस यांच्या पाणबुडीचा एकट्याने प्रवास सुरु झाला. कृष्णा बोस लिहितात, "दिवसा ही पाणबुडी समुद्राच्या तळाखाली असायची आणि रात्री समुद्रावर यायची. ही पाणबुडी बॅटरीवर चालणारी असल्याने रात्री समुद्रावर यावं लागायचं. जशी पहाट व्हायला सुरुवात व्हायची पाणबुडी पुन्हा समुद्राच्या तळाशी जायची."
रात्री पाणबुडी वर यायची तेव्हा तिचे कॅप्टन वर्नर मुसेनबर्ग नेताजी आणि आबिद हसन यांना पाणबुडीच्या छतावर येऊन फ्रेश व्हायला सांगायचे.
पाणबुडी जेव्हा ग्रीनलँडजवळून गेली तेव्हा नेताजी आणि आबिदला वाटलं की, ते उत्तरी ध्रुवाच्या सफरीवर निघालेत. मित्र राष्ट्रांच्या विमानांची नजर त्यांच्यावर पडू नये म्हणून त्यांना एवढ्या लांबून वळसा घालून जावं लागत होतं.
देशापासून दूर राहणं बोस यांच्यासाठी दुःखदायक होतं
फ्रान्सच्या किनाऱ्यावर आल्यावर एका यू टँकरने पाणबुडीच्या पुढच्या प्रवासासाठी डिझेल भरलं.

फोटो स्रोत, PAN MACMILLAN
बर्लिनमधील फ्री इंडिया सेंटरमध्ये जाण्यासाठी नेताजींनी यू टँकरच्या चालकांना काही महत्त्वाची कागदपत्र दिली. या पाणबुडीसोबत सफरीवर निघाल्याच्या दुसऱ्याच दिवशी आबिद हसन स्वतःला शिव्या देऊ लागले.
कारण एवढ्या मोकळ्या वेळात काय करायचं? निदान सोबत वाचायला पुस्तक आणायला हवी होती असं त्यांना वाटलं. अचानक सुभाष बाबूंनी त्यांना विचारलं, "हसन, तू तुझा टाइपरायटर आणला आहेस ना?
हसन यांनी टाइपरायटर आणलाय असं सांगताच, त्याक्षणी जे काम सुरू झालं ते पुढचे तीन महिने सुरूच होतं.
याच दरम्यान त्यांनी त्यांच्या 'द इंडियन स्ट्रगल' नावाच्या पुस्तकाच्या नवीन आवृत्तीसाठी काही बदल केले. पाणबुडीत चालणं फिरणं तसं अवघडचं होतं. दिवसाचा प्रकाश मिळेल अशीही काही शक्यता नव्हती. असं वाटायचं पाणबुडीवर कायमच रात्र आहे. कारण तिथं सकाळ संध्याकाळ लाईट सुरू असायची.
कृष्णा बोस लिहितात, "ही समुद्र सफर सुरू झाल्यावर नेताजींनी, जपान सरकार आणि अधिकाऱ्यांशी काय बोलायचं याचं नियोजन सुरू केलं."
ते आबिद हसन यांना म्हणाले की, तू जपानचे पंतप्रधान हिदेकी तोजो यांची भूमिका कर आणि मला माझ्या योजनेविषयी थोडे अवघड प्रश्न विचार.
त्या पुढे लिहितात, "रात्रीची पाणबुडी वर यायची तेव्हा त्यांना त्या कामातून सुट्टी मिळायची. नेताजी तेव्हा बोलण्याच्या मूडमध्ये असायचे. असंच एकदा आबिद यांनी नेताजींना त्यांच्या आयुष्यातील सर्वात कटू अनुभव कोणता आहे? असं विचारलं. तेव्हा नेताजी म्हणाले, "आपल्याच देशापासून दूर राहणं."
नेताजींच्या पाणबुडीने ब्रिटिश तेलवाहू जहाजाला समाधी दिली
सुभाषचंद्र बोस यांचे या यात्रेदरम्यानचे बरेचसे फोटो उपलब्ध आहेत. यातल्या काही फोटोत ते आबिद यांच्याशी बोलताना दिसतायत, तर काही फोटोत सिगार ओढताना दिसतायत. जेव्हा ते युरोप मध्ये राहायचे तेव्हा काहीकाळ सिगारेट देखील ओढायचे. पण दक्षिण आशियात आल्यावर सिगारेट पिण्याची त्यांची सवय वाढली होती.
मद्यपानाविषयी सुद्धा त्यांना काही हरकत नव्हती. युरोपमध्ये राहिल्यामुळे त्यांना तिथल्या संस्कृतीची सवय झाली होती. तिथं जेवणासोबत वाईन घेतली जाते.

फोटो स्रोत, PAN MACMILLAN
18 एप्रिल 1943 रोजी सुभाषचंद्र बोस यांच्या पाणबुडीने 8000 टन ब्रिटिश तेलवाहक कॉर्बिस पाणबुडीला टॉरपॅडोनं उडवलं होतं.
यावर आबिद हसन लिहितात, "कधीच न विसरता येण्यासारखा हा क्षण होता. असं वाटत होतं संपूर्ण समुद्राला आग लागलीय. त्या जळणाऱ्या जहाजात काही भारतीय आणि मलेशियन लोकही होते. एका लाईफ बोटवर गोऱ्या लोकांना चढवण्यात येत होतं, मात्र गहू वर्णीय लोकांना त्यांच्या नशिबावर सोडून दिलं होतं."
नेताजींच्या पाणबुडीचा कमांडर असलेल्या मुसेनबर्गने आपल्या पेरिस्कोपमधून त्या ब्रिटिश जहाजाची अवस्था पाहिली आणि पुन्हा एकदा टॉरपीडो डागण्याची सूचना दिली.
पाणबुडीला टॉरपॅडोनं डागण्यासाठी तयार केलं जातं असतानाच फायर करण्याऐवजी एका नौसैनिकाच्या चुकीमुळे पाणबुडी समुद्राच्या पृष्ठभागावर आली.
पाणबुडीला पाहताच ब्रिटिश जहाजाने त्याच्यावर हल्ला केला. पण मुसेनबर्गने पटकन टाय डाऊनचे आदेश दिले.
पाणबुडी समुद्राच्या तळापर्यंत पोहोचली, पण पाण्यात जाण्याच्या आधी जहाजाची रेलिंग पाणबुडीच्या ब्रिजवर आदळली आणि थोडं नुकसान झालं.
आबिद हसन लिहितात, "अशा या परिस्थितीत भीतीने मी घामाघूम झालो होतो. पण नेताजी शांतपणे आपलं भाषण डिक्टेट करत होते. जेव्हा धोका टळला तेव्हा मुसेनबर्गने सगळ्यांना एकत्र करून नेताजींच उदाहरण दिलं. तो म्हणाला की, धोक्याच्या काळात कशाप्रकारे शांत राहायला हवं याचा आदर्श भारतीय पाहुण्याने आपल्यापुढं ठेवला आहे."
सुभाष बाबू जपानी पाणबुडीवर पोहोचले
एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात सुभाष बाबूंच्या पाणबुडीने केप ऑफ गुड होपला वळसा घातला आणि ते हिंदी महासागरात दाखल झाले. याच दरम्यान म्हणजे 20 एप्रिल 1943 ला I-29 ही जपानी पाणबुडी पेनांगहून निघाली होती. या पाणबुडीचे कॅप्टन मासाओ ताराओका होते.
पाणबुडीच्या क्रूने तिथून निघण्यापूर्वी भारतीय खाद्यपदार्थ खरेदी केले याचं स्थानिक भारतीयांना आश्चर्य वाटलं.

फोटो स्रोत, PENGUIN INDIA
मादागास्करच्या समुद्री पट्ट्यात दुसऱ्या महायुद्धाचा प्रभाव तितकासा जाणवतं नव्हता. त्यामुळे इथूनच नेताजींनी जपानी पाणबुडीत चढावं असं ठरलं. त्यामुळे या दोन्ही पाणबुड्या काही काळासाठी एकत्र प्रवास करत होत्या.
सौगत बोस त्यांच्या 'हिज मॅजेस्टीज ओपोनेंट' या पुस्तकात लिहितात, "27 एप्रिलच्या दुपारी एक जर्मन ऑफिसर आणि एक सिग्नलमन जपानी पाणबुडीकडे पोहत गेले. 28 एप्रिलला सकाळी सकाळी नेताजी आणि आबिद हसन यांना यु - 180 मधून खाली उतरवून रबरी बोटीत बसवण्यात आलं. या रबरी नावेतून ते आय-29 या जपानी पाणबुडी पर्यंत पोहोचले. दुसऱ्या महायुद्धात प्रवाशांना एका पाणबुडीतून दुसऱ्या पाणबुडीपर्यंत नेण्याची ही पहिलीच वेळ होती.
समुद्र खवळला होता त्यामुळे पाणबुडीवर चढताना नेताजी आणि आबिद पूर्णपणे भिजले होते."
नेताजींसाठी केबिन रिकामी केली
या संपूर्ण प्रवासात जर्मन नौसैनिकांनी नेताजी आणि आबिदची खूप काळजी घेतली. पण जपानी पाणबुडीवर चढल्यानंतर बोस आणि आबिद यांना आपल्या घरी पोहोचल्यासारखंच वाटलं.
सौगत बोस लिहितात, "जपानी पाणबुडी जर्मन पाणबुडीपेक्षा मोठी होती आणि या पाणबुडीवर असणाऱ्या कमांडरने आपली केबिन नेताजींना दिली होती."
जपानी स्वयंपाक्याने पेनांगमध्ये विकत घेतलेल्या भारतीय मसाल्यापासून जे जेवण तयार केलं होतं ते नेताजींना आवडलं.

फोटो स्रोत, PAN MACMILLAN
आबिद हसन लिहितात, "आम्हाला दिवसातून चार वेळा जेवण दिलं जायचं. एकदा तर नेताजींनी जपानी कमांडरला विचारलं की, आता आम्हाला पुन्हा जेवावं लागणार का?"
जर्मन पाणबुडीला या प्रवासा दरम्यान दोनदा शत्रूच्या जहाजांचा सामना करावा लागला.
असं घडलं कारण, जर्मन पाणबुडीच्या कमांडरला आदेश देण्यात आले होते की, वाटेत शत्रूचं जहाज दिसल्यास त्यांच्यावर हल्ला चढवावा.
पण तेच जपानी पाणबुड्यांना आदेश देण्यात आले होते की, शत्रूच्या जहाजांवर हल्ले करत बसण्यापेक्षा कोणत्याही परिस्थितीत सुभाषचंद्र बोस यांना सुखरूपपणे सुमात्रा इथं घेऊन यावं.
आबिद हसन लिहितात, "या संपूर्ण प्रवासात भाषेची अडचण सोडल्यास आम्हाला कोणतीही अडचण आली नाही. नेताजी आणि मला जर्मन भाषा समजायची. पण जपानी भाषा आमच्या डोक्यावरून जायची. आणि पाणबुडीवर कोणता दुभाषीही नव्हता."
सुभाषचंद्र बोस यांनी रेडिओच्या माध्यमातून भारतीयांना संबोधित केलं
जपानी पाणबुडी आय -29, 13 मे 1943 रोजी सुमात्राच्या उत्तर किनार्याजवळील सबांग इथं पोहोचली. पाणबुडीतून उतरण्यापूर्वी सुभाष बाबूंनी सर्व क्रू मेंबर्ससोबत एक फोटो काढला.
या फोटोवर ऑटोग्राफ देत त्यांनी लिहिलं की, "या पाणबुडीवर प्रवास करणं एक सुखद अनुभव होता. मला आशा आहे की हा प्रवास आमच्या विजयात आणि शांततेच्या लढ्यात मैलाचा दगड ठरेल."
सबांगमधील नेताजींचे जुने मित्र कर्नल यामामोटो यांनी त्यांचं स्वागत केलं.
तिथं दोन दिवस विश्रांती घेऊन पुढं नेताजी विमानाने टोकियोला गेले.
तिथं नेताजींच्या राहण्याची व्यवस्था राजवाड्यासमोरील सर्वात प्रसिद्ध इंपिरियल हॉटेलमध्ये करण्यात आली. त्या हॉटेलमध्ये त्यांनी मात्सुदा या जपानी नावाने चेक इन केलं. त्यांनी झियाउद्दीन, माझोटा आणि मात्सुदा ही जी काही टोपणनावं धारण केली होती ती काही दिवसांतचं मागे पडली.
कारण त्यानंतरच्या काही दिवसांतच भारतीय जनतेने रेडिओवर त्यांचा आवाज ऐकला, "पूर्व आशियातील मी सुभाषचंद्र बोस माझ्या देशवासियांना संबोधित करतो."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








