ब्रिटिशांनी डेन्मार्ककडून 12.5 लाखांमध्ये विकत घेतली होती भारतातली 'ही' शहरं

डेन्मार्क

फोटो स्रोत, TRAVELIB PRIME / ALAMY STOCK PHOTO

    • Author, वकार मुस्तफा
    • Role, पत्रकार आणि संशोधक

तरंगमबाडी शहराच्या नावाच्या अर्थाचा विचार केल्यास, त्याचा फारच रोमँटिक म्हणता येईल, असा अर्थ आहे. तो म्हणजे 'गाणाऱ्या लाटांची धरती'.

पण 17 व्या शतकाच्या सुरुवातीला इथं आलेल्या डेन्मार्क-नॉर्वेच्या राज्यकर्ते, नागरिकांना हे नाव काहीसं कठीण वाटलं. त्यामुळं त्यांनी त्याला 'त्रांकेबार' असं म्हणायला सुरुवात केली.

डेन्मार्कचे राजा ख्रिश्चन चौथे यांच्या ताब्यात असताना हे दुहेरी राज्य होतं. 1814 मध्ये नॉर्वेच्या स्वातंत्र्याच्या घोषणेसह ते संपुष्टात आलं. त्यामुळं सोयीसाठी आपण या राज्याला डेन्मार्क आणि तेथील रहिवाशांना डॅनिश म्हणू.

डॅनिश लोक याठिकाणी खरं तर व्यापारासाठी आले होते. पण त्यांनी भारताच्या या एका भागावर जवळपास 200 हून अधिक वर्षे राज्य केलं. अगदी मुघलांशी युद्ध करायलाही त्यांनी मागं पुढं पाहिलं नाही. शक्तीचा विचार करता मुघल त्यावेळी जगात दुसऱ्या क्रमांकावर होते.

मसाल्याच्या फायदेशीर व्यापाराबाबत ऐकून ख्रिश्चन चौथे यांनी 1616 मध्ये सिलोन (1972 पासून श्रीलंकेत) आणि भारताबरोबर काळे मिरे आणि इलायचीच्या व्यापारासाठी डॅनिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली.

त्याकाळातील लोकांच्या मते, नादीर शाह एक उंच, काळे डोळे असलेला सुंदर व्यक्ती होता. पण शत्रूंसाठी तो तेवढाच क्रूर होता. मात्र, त्याचं अधिपत्य स्वीकार करणाऱ्यांसाठी तो मन मोठं करायचा.

डेन्मार्क

फोटो स्रोत, PICTURES FROM HISTORY

कंपनीची स्थापना तर झाली होती. पण कदाचित डॅनिश गुंतवणूकदारांवर कमी विश्वास असल्यामुळं ताफा किंवा यंत्रणा पाठवण्यासाठी पैसे जमा करायला सुमारे दोन वर्षे लागली.

1618 च्या अखेरीस डॅन ओ गेडे यांच्या नेतृत्वात पाठवलेल्या तुकडीचा पहिला ताफा सिलोनपर्यंत पोहोचायला दोन वर्षे लागली. रस्त्यात या ताफ्यातील अर्ध्याहून अधिक लोकांनी जीव गमावला होता.

सिलोनमध्ये सुरुवातीला आखलेल्या योजना यशस्वी ठरल्या नाहीत. पण दस्तऐवजांनुसार 10 मे 1620 ला एका तहाअंतर्गत बेटाच्या पूर्व किनाऱ्यावर त्रिंकोमालीमध्ये एक व्यापारी वसाहत स्थापन करण्यात आली.

डेन्मार्कची व्यापारी जहाजं 1620 मध्ये भारताच्या दक्षिण-पूर्वेला असलेल्या कोरोमंडल किनाऱ्यावर (सध्याचे तमिळनाडू) तरंगमबाडी इथं पोहोचली, असं चारुकेसी रामद्राई सांगतात.

तंजौर (सध्याचे तंजावर) मधील राज्यकर्त्यांना येथे असलेल्या व्यापाराच्या संधीमध्ये रस होता. त्यामुळं तहाची बोलणी झाली.

कंपनीला शेजारच्या गावांमधून करवसुली करण्याचा अधिकारही देण्यात आला. तसंच करांमध्ये अनेकप्रकारच्या सवलती देण्यात आल्या. मोबदल्यात कंपनीला दरवर्षी विजयादशमीच्या उत्सवात नायक यांना 2000 चक्रम (एक प्रकारचे चलन) द्यावे लागत होते.

शहराच नाव बदलून त्रांकेबार ठेवण्यात आलं. कंपनीचे पहिले गव्हर्नर गेडे यांनी स्थानिकांच्या मदतीनं एक किल्ला तयार केला. त्याचं नाव 'फर्ट (फोर्ट) डॅन्सबर्ग' ठेवण्यात आलं.

पण गेडे लवकरच परत गेले. काही पुस्तकांमध्ये गेडेंऐवजी त्यांच्यानंतर आलेले रोलाँ क्रेप पहिले गव्हर्नर होते, असा उल्लेख आहे. त्यामुळं गेडे फार कमी काळ राहिले असा अंदाज आहे.

क्रेप यांनी महिनाभरापूर्वी एका स्काऊटिंग फ्रेटरवर प्रवास केला होता. बंगालच्या खाडीत कराइकलच्या किनाऱ्यावर पोर्तुगालच्या जहाजांवर झालेल्या हल्ल्यात ते फ्रेटर बुडालं होतं.

डेन्मार्क

फोटो स्रोत, Getty Images

त्यातील क्रू मेंबरपैकी बहुतांश लोकांना एक तर ठार मारण्यात आलं होतं किंवा कैदी बनवण्यात आलं होतं. दोघांचे शीर समुद्र किनाऱ्यावर भाल्यावर लटकवण्यात आले होते. क्रेप 13 लोकांसह तरंगमबाडीपर्यंत पोहोचण्यात यशस्वी ठरले.

क्रेप हे 1636 पर्यंत गव्हर्नर पदावर होते. गव्हर्नर बनताच त्यांनी डेन्मार्कचं व्यापारी केंद्र असलेल्या त्रांकेबारमधून भारतात आणि इतर आशियाई देशांमध्ये व्यापाराचा विस्तार करण्याचे प्रयत्न सुरू केले होते. सुरुवातीला त्यांनी दक्षिणेकडे सिलोनपर्यंत सागरी किनारपट्टीवर व्यापाराचा विस्तार केला.

1625 पर्यंत तक, मसुलीपट्टनम (सध्याच्या आंध्रप्रदेशातील कृष्णा जिल्ह्यात) मध्ये एक कारखाना सुरू केला होता. हे या भागातील सर्वात महत्त्वाचं व्यापारी केंद्र होतं.

पिपली, सूरत, जावा आणि बालासोरमध्येही व्यापारी केंद्रांची स्थापना करण्यात आली होती. काही डच रिपोर्टनुसार पिपली कारखान्यानं पहिल्याच वर्षात चांगली कामगिरीही केली होती.

दुसरीकडं, 1627 पर्यंत डॅनिश कॉलनीकडं केवळ तीन जहाजं शिल्लक होती. संजय सुब्रमण्यम यांच्या मते, 1627 मध्ये बिघडलेल्या आर्थिक स्थितीमुळे कंपनीला त्रांकेबार आणि पुद्दुचेरीतील करांचा भरणाही करता आला नव्हता.

क्रेप यांच्यानंतर 1636 ते 1643 पर्यंत गव्हर्नर असलेल्या ब्रेंट पेसार्ट यांनी पैसे कमावण्यासाठी अनेक जोखीम असलेल्या योजना राबवण्याचा प्रयत्न केला. पण त्या योजना अपयशी ठरल्या. त्यामुळं आधीच कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या डेन्मार्कवरील कर्ज आणखी वाढलं.

मुघलांविरोधात युद्धाची घोषणा

कॅथरीन वेलन यांच्या मते, 1642 मध्ये डॅनिश-नॉर्वे कॉलनीनं मुघल साम्राज्याच्या विरोधात युद्धाची घोषणा केली. त्यांनी बंगालची खाडी आणि व्यापारी जहाजांवर छापे मारण्यास सुरुवात केली.

काही महिन्यांतच त्यांनी मुघल बादशाहच्या एका जहाजावर ताबा मिळवला. त्यानंतर पैशासाठी जहाजावरील साहित्य त्रांकेबार मध्ये विक्री करण्यात आलं.

डेन्मार्क

फोटो स्रोत, FRÉDÉRIC SOLTAN/GETTY IMAGES

फोटो कॅप्शन, फोर्ट डॅन्सबर्ग, त्रांकेबार

पिपली आणि उडिसा (आताचे ओडिशा) जवळ आणखी दोन जहाजं जाळण्यात आली. त्यामुळं मुघल संतापले. पण त्यांना सैन्य वापरून त्यावर तोडगा काढता आला नाही. कारण मुघलांच्या हद्दीत एकही डॅनिश वस्ती नव्हती.

सागरी व्यापाराबाबत मुघलांचा दृष्टीकोन वेगळा होता. संपत्ती जमवण्याची इच्छा असली, तरी त्यांचं बहुतांश उत्पन्न हे भूमीवर आधारित असलेल्या स्त्रोतांतून होत होतं. सागरी व्यापार त्यांनी पूर्णपणे व्यापाऱ्यांच्या विविध गटांवर सोपवलेला होता, असं तपन रॉय चौधरी सांगतात.

सागरी सामर्थ्याबाबतच्या मर्यादा ओळखून मुघलांनी डेन्मार्कच्या आक्रमकतेचा सामना करण्यासाठी इतर पर्यायांचा शोध सुरू केला.

डेन्मार्कशी थेट चर्चा करण्याचे मुघलांचे प्रयत्न अपयशी ठरले. त्यानंतर त्यांनी डेन्मार्कचं आक्रमण थांबवण्यासाठी इतर युरोपियन साम्राज्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला.

या संपूर्ण असंतोषाचा परिणाम म्हणजे, 1645 आणि 1648 दरम्यान नायक यांच्या सैन्यानं त्रांकेबारवर दोन हल्ले केले, असं माइकल व्हीनर यांनी लिहिलं आहे.

1648 मध्ये ख्रिश्चन चौथे यांचा मृत्यू झाला आणि डॅनिश ईस्ट इंडिया कंपनी दिवाळखोरीत निघाली. दोन वर्षांनी त्यांचा मुलगा फ्रेडरिक तिसरा यानं कंपनी बंद केली. पण भारतातील वसाहतींना डेन्मार्कमधील या घटनाक्रमाची माहितीच नव्हती.

पीटर रासमुसेन यांच्या मते, कंपनी सोडून गेल्यामुळं आणि आजारांमुळं डॅनिश नागरिकांची संख्या घटू लागली तेव्हा, पोर्तुगीज आणि पोर्तुगीज-भारतीयांना नोकरी देण्यात आली. अगदी शेवटपर्यंत, 1655 पर्यंत एस्केल्ड अँडरसन कोनिग्सबाके हे त्रांकेबारमध्ये राहिलेले एकमेव डॅनिश नागरिक होते.

बंगालच्या खाडीत जहाजांवर ताबा मिळवल्यानंतर ठरलेली रक्कम दिली नसल्यामुळं नायक यांच्याकडून सातत्यानं घेराव घातला जात होता. पण तसं असलं तरी, कोनिग्सबाके यांनी किल्ल्यावरचा डॅनिश-नॉर्वेयन झेंडा खाली उतरू दिला नाही.

जहाजांमधील साहित्याची विक्री करून मिळणाऱ्या उत्तपन्नातून त्यांनी शहराच्या चोहोबाजुनं एक भिंत बांधली आणि नायक यांच्याशी एक करार केला.

अखेर, मे 1669 मध्ये कॅप्टन स्वार्ट अॅडेलेयर यांना या वसाहतीची जबाबदारी सांभाळण्यासाठी याठिकाणी पाठवण्यात आलं.

डॅनिश ईस्ट इंडिया कंपनीचा दुसरा जन्म

डेन्मार्क-नॉर्वे आणि त्रांकेबार यांच्यात पुन्हा एकदा नव्या डॅनिश ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून व्यापार सुरू झाला. अनेक नवीन व्यापारी चौक्यांची स्थापना करण्यात आली.

त्यात 1696 मध्ये मालाबार किनाऱ्यावरील ओडवे टोरे आणि 1698 मध्ये बंगालच्या चंद्रनगरच्या दक्षिण-पूर्वेला डेन्मार्कस नागौर यांचं प्रशासन त्रांकेबारकडं होतं.

नायक यांच्याशी असलेला करार वाढवण्यात आला. त्यानंतर शेजारच्या तीन गावांचा समावेश करून त्रांकेबारचा विस्तार करण्यास परवानगी देण्यात आली.

पोर्तुगिजांनी 1696 मध्ये केरळमध्ये वर्कलाजवळ एका वसाहतीची स्थापना केली.

इतिहासकार पद्मनाभ मेनन यांनी 'हिस्ट्री ऑफ केरल' मध्ये 18व्या शतकाच्या सुरुवातीचे ब्रिटिश लष्करी अधिकारी अॅलेक्झांडर हॅमिल्टन यांच्या दाखल्यानं याबाबत लिहिलंय.

1672 मध्ये ख्रिश्चन पाचवे यांनी मुघलांना पत्र लिहून बंगालमध्ये डॅनिशांना झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी विनंती केली. त्यात 1640 मध्ये सेंट जॅकबमधील जहाजाचाही समावेश होता. पण ही भरपाई कधीच मिळाली नाही.

पोर्तुगिजांनी नैतिक आणि भौतिक कुमक वापरून बंगालमध्ये स्वतः बंगाली व्यापाऱ्यांवर हल्ले केले. त्यात त्यांनी मोठी जहाजं उडवली तरी किंवा त्यावर ताबा मिळवत ती त्रांकेबारला नेली.

17व्या शतकातील अखेरच्या वर्षांमध्ये बंगालचे गव्हर्नर मोहम्मद अजमादी यांच्याबरोबर करार करण्यात त्यांना यश आलं. त्यानंतर दोन्ही बाजूंनी ताब्यात घेतलेली जहाजं त्यांच्या मागण्यांसाठी सोडण्यात आली. पोर्तुगिजांनी राजकुमारांना 15,000 रुपये आणि चार तोफा भेट दिल्या.

9 जून 1706 रोजी राजा फ्रेडरिक चौथे यांनी हेनरिक प्लॉस्चौ आणि बार्थोलोमियस झिगेनबुलग या दोन मिशनरींना भारतात पाठवल्या. ते भारतातील पहिले प्रोटेस्टंट मिशनरी होते.

त्यापूर्वी पादरींनी धर्मांतराचा प्रयत्न केला नव्हता. तसंच भारतीयांना युरोपातील चर्चमध्ये प्रवेश करण्यास परवानगीही नव्हती.

खालच्या जातीच्या लोकांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला. पण उच्च जातीय हिंदुंनी तो स्वीकारला नाही.

जर्मन मिशनरी झिगेनबुलग त्रांकेबारच्या व्यापाराचं नुकसान करत असल्याचं स्थानिक गव्हर्नर, जॉन सिगिस्मंड हसियस यांच्या लक्षात आलं. त्यामुळं त्यांना चार महिन्यांसाठी तुरुंगात पाठवण्यात आलं.

झिगेनबुलग यांनी त्रांकेबारच्या स्थानिकांची भाषा शिकण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला. पोर्तुगीज आणि तमिळ भाषा शिकण्यासाठी शिक्षक नियुक्त केले. तसंच संस्कृतचे ग्रंथ खरेदी केले.

पहिला तमिळ शब्दकोष, तमिळ-जर्मन शब्दकोष लिहणे आणि संस्कृतच्या पुस्तकांच्या अनुवादाशिवाय त्यांनी बायबलच्या काही भागाचाही तमिळ भाषेत अनुवाद केला.

डेन्मार्क

फोटो स्रोत, SOTHEBY'S

नंतर युरोपातून निधी मिळवून त्यांनी एक प्रिंटींग प्रेस सुरू केली आणि तमिळ बायबल आणि पुस्तकं छापली. अशाप्रकारे त्रांकेबारच्या राजांचा विरोध असूनही वसाहतीच्या बाहेर मिशिनरीचा प्रसार सुरू झाला.

1729 मध्ये डॅनिश-नार्वेयन राजानं डॅनिश ईस्ट इंडिया कंपनीला पैसे उधार देण्यास भाग पाडलं. कर्ज फेडण्यात अपयश आल्यानं आणि भारतीय व्यापारामध्ये सातत्य राहिलं नसल्यानं, तीही कंपनी बंद पडली.

एशियाटिक कंपनीचे चार्टर

12 एप्रिल 1732 मध्ये ख्रिश्चन सहावे यांनी भारत आणि चीनबरोबर आशियाई व्यापारावर 40 वर्षांच्या एकाधिकारासह नवीन एशियाटिक कंपनीच्या करारावर सह्या केल्या.

यापूर्वीच्या दोन्ही कंपन्या व्यवसायात सातत्य नसल्यानं अपयशी ठरल्या होत्या. पण यावेळी आयोजकांचा इरादा 'भविष्यात आशियाई व्यापार त्यांच्या भागात अधिक चांगल्याप्रकारे टिकवणं', हा होता.

18व्या शतकाच्या तिसऱ्या दशकात डेन्मार्कमध्ये चीन आणि भारतीय व्यापारात स्थैर्य आलं. कोरोमंडल किनारपट्टी आणि बंगालमध्ये सुती कापडाचं वर्चस्व होतं.

काळ्या मिऱ्यांचं बहुतांश उत्पन्न दक्षिण पूर्व आशियातील पश्चिम भागात होत होतं. त्यात सर्वाधिक महत्त्वाचं (इंडोनेशियात) सुमात्रा आणि (भारतीय राज्य केरळमध्ये) मालाबार होतं.

डॅनिश कंपनी आधी केवळ व्यापाऱ्यांकडून याची खरेदी करत होती. नंतर, कंपनीनं स्वतः मिरे खरेदी करण्यासाठी मालाबारला एक ताफा पाठवला होता.

भारत

फोटो स्रोत, PRINT COLLECTOR

अजय कमलाकरन यांच्या मते, 1752 मध्ये पोर्तुगिजांनी शहरात काळ्या मिऱ्याचं गोदाम सुरू करण्यासाठी कालिकतच्या झमोरीनबरोबर करार केला.

सीमा शुल्काबरोबरच (कस्टम ड्यूटी) डॅनिश झमोरीनच्या भागांवर हल्ला झाल्यास, त्यांना शस्त्र आणि सैनिकी मदत पुरवण्याचंही मान्य केलं. कालिकतची वसाहत सुमारे चार दशकं अस्तित्वात होती.

मसाले आणि ब्राऊन शुगर केरळपासून कोपेनहेगनपर्यंत पोहोचली होती. केरळचे मसाले डॅनिश आणि नॉर्वेयन पदार्थांमध्ये चव वाढवतात आणि केरळची ब्राऊन शुगर डॅनिश पेस्ट्रीची चव वाढवत होती.

अधिकाऱ्यांनी काळे मिरे, दालचिनी, ऊस, कॉफी आणि कापूस यांच्या शेतीसाठी अंदमान आणि निकोबार बेटांवर वसाहत तयार करण्याचा निर्णय घेतला. त्या निर्णयानंतर डिसेंबर 1755 मध्ये डॅनिश-नार्वेयन अंदमान बेटांवर पोहोचले.

1 जानेवारी 1756 ला निकोबार बेटांना फ्रेडरीक सुरने (फ्रेडरिक बेटे) नावानं डॅनिश-नार्वेयन संपत्ती असल्याचं जाहीर केलं.

मलेरियाच्या प्रकोपामुळं वारंवार इथून जावं लागल्यानंतर 1848 मध्ये त्यांनी कायमचं ते बेट सोडलं. या घटनेमुळं ऑस्ट्रिया आणि ब्रिटनसह इतरांनी या बेटांवर ताबा मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले.

निकोबार बेटं भारताचा भाग असण्यामागचं कारण म्हणजे, डॅनिश लोकांनी आधी तिथं वसाहत तयार केली आणि नंतर 1869 मध्ये ती इंग्रजांना विकली.

हैदर अलीसह त्यांच्या शत्रू राज्यालाही दिली शस्त्रे

युरोपात काळे मिरे पुरवण्याच्या मोबदल्यात डॅनिश त्रावणकोरला (दक्षिण-पश्चिम भारतातील हे जुनं साम्राज्य आता केरळचा भाग आहे) लोखंड आणि तांब्याचा पुरवठा करायचे.

केके कसोमन यांच्या मते, 'त्रावणकोरबरोबर संबंध असूनही डॅनिशांनी आर्कोटच्या नवाबांना त्रावणकोरच्या विरोधात कारवायांसाठी शस्त्रं उपलब्ध करून दिली.'

डॅनिशांनी नवाबांना शस्त्रांचा पुरवठा केला होता. तरी एशियाटिक कंपनीला त्यांच्या शत्रू म्हणजे म्हैसूरच्या हैदर अली यांना शस्त्र विक्री करण्यापासून ते रोखू शकले नाहीत. कारण त्यांच्या हल्ल्यामुळं आधीच त्यांनी नवाबांना शस्त्र पुरवठा केला होता. (त्रावणकोरलाही फाळणीत मिळाला वाटा)

टीपू सुल्तानचा संभाव्य हल्ला रोखण्यासाठी ब्रिटिशांच्या मदतीची गरज असल्याचं त्रावणकोरला जाणवलं. त्यामुळं इंग्रजांची नाराजी नको म्हणून त्यांनी डॅनिशांना दूरच ठेवलं.

डेन्मार्क

फोटो स्रोत, FRANCIS HAYMAN/NATIONAL PORTRAIT GALLERY, LONDON

डॅनिशांनी कन्याकुमारीच्या जवळ कोलाचलमध्येही एक संघटना स्थापन केली. कोलाचलमध्ये 1755 पासून 1824 पर्यंत डॅनिशांचं अस्तित्व राहिलं.

पश्चिम बंगालमध्ये डेन्मार्क आणि कलमकारी

पश्चिम बंगालच्या सेरामपूरमध्ये डॅनिशांचा प्रभाव होता. सेरामपूरलाच श्रीरामपूर नावानंही ओळखलं जातं.

हुगळी नदीच्या पश्चिम किनाऱ्यावर असलेलं हे शहर 1755 पासून 1845 पर्यंत फ्रेडरिक्स नागोर नावाने डॅनिश भारताचा भाग होतं.

डॅनिश प्रथम 1755 मध्ये सेरामपूरला पोहोचले आणि चंद्रनगरमध्ये फ्रेंचांच्या मदतीनं त्यांनी बंगालचे नवाब अली वर्दी खान यांना 1,50,000 रुपयांपेक्षा अधिकचा मोबदला देऊन 60 बिघे (जमीन मोजण्याचे एक एकक) जमीन मिळवली.

ही केवळ एक व्यापारी चौकी होती. डॅनिशांना इथं डॅन्सबर्गप्रमाणं छावणी तयार करण्याची परवानगी नव्हती.

सुमित्रा दास यांच्या मते, विल्यम कॅरी, जोशुआ मार्शमॅन आणि विल्यम वार्ड या तीन बाप्टिस्ट मिशनरींच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांद्वारे या शहरात बंगाली प्रकाशन सुरू झालं. गोस्वामीसारखे बंगाली एजंट या काळात भरभराटीस आले.

डॅनिश आश्रयामध्ये निर्यात करण्यासाठी कपड्याचं उत्पादन केलं जात होतं.

डेन्मार्क

फोटो स्रोत, EDWARD DUNCAN

स्थानिक चित्रकार आणि रेशम निर्मिती करणारे तसंच साधे आणि रंगीत सुती कपडे तयार करणारे, स्कार्फ आणि शॉल तयार करणारे त्यांच्याशी संलग्न होते. हाताने रंगकाम केलेल्या कपड्यांना (कलमकारी) तेव्हा मोठ्या प्रमाणावर मागणी होती.

1772 पासून 1808 पर्यंत डॅनिश-नार्वेयन व्यापारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली.

डॅनिशांनी त्रांकेबारला आणखी बळ दिलं आणि 1777 पर्यंत त्यावर पूर्णपणे नियंत्रण मिळवलं. पण तेव्हा तिथं 300 पेक्षा जास्त डॅनिश नव्हते. डॅनिश इतिहासकार याला 'फ्लोरोसेंट ट्रेडचा काळ' म्हणतात.

भारतात मसाले आणि कपड्यांचा व्यवसाय फायदेशीर होता. पण कदाचित सर्वाधिक कमाई चीनच्या चहाची ब्रिटनमध्ये तस्करी करून होत होती. चीनचा व्यापार वसाहतींवर आधारित नसला तरी त्यांना एकमेकांत मिसळण्यात आलं होतं.

डेन्मार्कच्या जहाजांद्वारे मनी लाँडरिंग

ब्रिटन, फ्रान्स आणि हॉलंड यांच्यातील युद्धामुळं डेन्मार्क आणि नॉर्वेसारख्या तटस्थ देशांमार्गे व्यापार होऊ लागला. व्यापारी जहाजांवर युद्धाचा परिणाम नको म्हणून तसं केलं जात होतं.

भारतात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या विस्तारामुळं विशेषतः 1757 मध्ये प्लासीच्या युद्धातील विजयानंतर कंपनीच्या अनेक कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या खर्चावर बरीच वैयक्तिक संपत्ती जमवली.

कंपनी आणि ब्रिटिश सरकारनं ही संपत्ती ब्रिटिश जहाजांद्वारे परत ब्रिटनला जाऊ नये म्हणून अनेक प्रयत्न केले.

डेन्मार्क

फोटो स्रोत, HULTON ARCHIVE

त्याचा परिणाम म्हणजे, फ्रेंच, डच आणि डॅनिश नॉर्वेयन जहाजांद्वारे मोठ्या प्रमाणावर मनी लाँडरिंग करण्यात आलं. त्यामुळं 1770 च्या दशकादरम्यान डॅनिश-नार्वेयन व्यापारात खूप गुंतवणूक करण्यात आली. पण व्यापाराचं मूल्य प्रचंड अस्थिर होतं.

पीटर रेवेन रासमुसन यांच्या मते, भारतात डॅनिश-नार्वेयन यांचं अस्तित्व हे युरोपातील मुख्य शक्तींसाठी फारसं महत्त्वाचं नव्हतं. कारण त्यापासून त्यांना लष्करी किंवा व्यापारी असा कोणताही धोका नव्हता.

तसं असलं तरी, ब्रिटिशांच्या नौदलाशी शक्ती वाढली होती, आणि 19 व्या शतकात डॅनिश होल्डिंग्जवर नियंत्रण आणि मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी ते कारण ठरलं.

1799 मध्ये ब्रिटननं डेन्मार्कला काही देशांबरोबर व्यापार करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. ज्यांच्याबरोबर ब्रिटनचं युद्ध सुरू होतं, असे ते देश होते.

त्याकाळी, डेन्मार्क हिंद महासागरात फ्रेंच आणि विलंडेझी संपत्तीद्वारे वसाहतीतील उत्पादनं आणून आणि केपेनहेगनद्वारे युरोपातील बाजारपेठेत पाठवून मोठा नफा कमावू शकत होते.

डॅनिशांचं पतन आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला वसाहतीची विक्री

नेपोलियनबरोबर युद्धादरम्यान, 1801 मध्ये आणि नंतर 1807 मध्ये ब्रिटननं कोपेनहेगनवर हल्ला केला.

शेवटच्या हल्ल्याचा परिणाम म्हणजे, (संपूर्ण डॅनो-नॉर्वेयन भागावर ताबा मिळवला होता ते युद्ध) डेन्मार्क (बोनापार्टचा ताबा नसलेल्या पश्चिम युरोपिय देशांपैकी एक) नं हेलिगोलँड बेट (डची ऑफ होल्स्टीन गॉटटॉर्पचा भाग) ब्रिटनला दिला.

7 फेब्रुवारी 1815 च्या लंडन गॅझेटनुसार, अँग्लो-डॅनिश शत्रुत्वाची बातमी भारतापर्यंत पोहोचली तेव्हा, इंग्रजांनी लगेचच 28 जानेवारी, 1808 ला हुगळीत असलेल्या सात डॅनिश व्यापारी जहाजांवर ताबा घेतला.

त्रांकेबार, बालासोर आणि सेरामपूर या अखेरच्या वसाहती 1845 मध्ये डेन्मार्कच्या राजांनी 12.5 लाखांत ब्रिटनला विकल्या.

हस्तांतरणाची ही प्रक्रिया फ्रेडरिक नागोरमध्ये 11 ऑक्टोबर आणि त्रांकेबारमध्ये 7 नोव्हेंबरला झाली.

ब्रिटिश भारतात आल्यानंतर त्रांकेबारनं त्यांचे व्यापाराचे विशेषाधिकार गमावले आणि त्याचं महत्त्वंही वेगानं कमी झालं, असं 'अ लिटिल पीस ऑफ डेन्मार्क इन इंडिया' मध्ये क्रिस्टियान ग्रोनसेथ यांनी लिहिलंय.

24,000 लोकसंख्या असलेलं हे शहर आता अधिकृतरित्या तमिळ आहे. पण डॅनिश सस्कृतीचे अवशेष आजही इथं अनेकठिकाणी आढळून येतात.

शहराचे मुख्य प्रवेशद्वार लँडपोर्टन (टाऊन गेट) आहे. ते डॅनिश त्रांकेबारच्या चहुबाजुने असलेल्या भिंतीचा एक भाग आहे. पांढल्या रंगावर डेन्मार्कची शाही मुद्रा आहे.

त्या काळातील रस्त्यांचे अवशेष हे किंग स्ट्रिटसारख्या नावासह अजूनही कायम आहेत. त्रांकेबारमधील शिक्षण पद्धती ही पूर्णपणे डॅनिशांचा वारसा दर्शवते. बहुतांश शाळांचे व्यवस्थापन कॅथलिक सेंट थेरेसा कॉनव्हेंट आणि तमिळ इव्हेंजेलिकल लूथरन चर्चद्वारे चालवलं जातं.

कुणाला सोपं वाटू द्या किंवा कठिण वाटू द्या, पण मच्छिमारांच्या या गावाचं नाव आता पुन्हा 'तरंगमबाडी'च आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)