महात्मा गांधीः 'हिंदूंच्या रक्ताचे पाट वाहिले, तिथं गांधीजी शांततेसाठी अनवाणी फिरले'

नोआखाली

फोटो स्रोत, Bettmann/Getty Images

    • Author, अभिषेक रंजन सिंह
    • Role, बीबीसी हिंदीसाठी

देशाची स्वातंत्र्याची लढाई अगदी शेवटच्या टप्प्यात असताना भारतभर अनेक ठिकाणी हिंदू-मुस्लीम दंगली पेटल्या होत्या. यात प्रामुख्याने आठवते ती नौखालीची दंगल. भारत-पाकिस्तान फाळणीचा इतिहास नौखालीच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. सध्या बांगलादेशात असलेल्या चितगाव प्रांतातील या जिल्ह्यातला माझा प्रवास सुरू झाला कॉक्स बाजार भागातून.

हा कॉक्स बाजार हल्ली रोहिंग्या निर्वासितांमुळे जगभर चर्चेत आहे.

बस आधी फेनी सदरला थांबली. तिथून एका मिनी बसने आम्ही चौमुहानी स्टेशनला गेलो. काही आवश्यक बदल वगळता हे स्टेशन अजूनही तसंच आहे जसं जुन्या छायाचित्रांमध्ये दिसतं तसंच.

चौमुहानीहून नौखालीला जाणारी पॅसेंजर ट्रेन यायला अजून एक तास होता.

आजपासून सात दशकांपूर्वी, जेव्हा दिल्लीत सत्ता हस्तांतरणाच्या कवायती सुरू होत्या तेव्हा हिंदू-मुस्लीम दंगली पेटल्या असताना महात्मा गांधींनी 7 नोव्हेंबर 1946ला इथला दौरा केला होता.

नोआखाली

फोटो स्रोत, Abhishek Ranjan Singh/BBC

त्यावेळी महात्मा गांधी दिल्लीहून पंधराशे किलोमीटर दूर धार्मिक दंगलीच्या आगीत होरपळणाऱ्या पूर्व आणि पश्चिम बंगालमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या कामात गढून गेले होते.

चौमुहानी स्टेशनच्या बाहेर त्यांनी हिंदू आणि मुस्लिमांची एक सभाही घेतली होती.

नौखालीचे रहिवासी

महात्मा गांधींनी इथे सभा घेतली असली तरी त्यांची कोणतीच खूण स्टेशनवर दिसत नाही.

स्टेशनवर त्यांचा पुतळा नाही की कुठे त्यांच्याविषयी माहितीही नाही.

मात्र इथल्या तरुणांना आणि जुन्या-जाणत्या लोकांना गांधीजी नौखालीत आल्याचं माहीत आहे.

प्लॅटफॉर्मच्या बाकड्यावर एकत्र बसलेले शेख नजरुल अहमद आणि प्रमोद दास भुइया कमलपूर गावचे आहेत.

नजरूल सांगतात, "गांधी कमलपूर गावात आले होते. त्यावेळी दंगलीमध्ये गावातले अनेक ठार झाले होते."

प्रमोद दास भुइयांनाही सगळं आठवतं, "गांधींच्या येण्याने कमलपूरच्या गावकऱ्यांना खूप हिंमत मिळाली. ते दोन दिवस इथे होते. त्यांच्या बोलण्याचा परिणाम झाला आणि हिंसा कमी झाली. त्यामुळेच आमचं कुटुंब गाव सोडून गेलं नाही."

प्रशांतो मुजुमदार याच चौमुहानी स्टेशनवर असिस्टंट बुकिंग क्लार्क आहेत.

ते सांगतात, "नौखालीच्या तरुण पिढीला इतिहासात काय घडलं, याच्याशी देणंघणं नाही. त्यांचं अधिक लक्ष हे रोजगाराकडे आहे."

"एक-दोन घटना सोडल्या तर इथे हिंदूंना कुठलाच त्रास नाही."

नौखालीतील गांधी आश्रम

आम्ही साठे आठ वाजता ट्रेनमध्ये बसलो आणि नऊला ट्रेन सोनाईमुरी रेल्वे स्टेशनवर पोहोचली. जायग बाजारमधील गांधी आश्रम इथून 20 किलोमीटर अंतरावर आहे.

नोआखाली

फोटो स्रोत, Abhishek Ranjan Singh/BBC

जवळपास अर्धा तासानंतर आम्ही गांधी आश्रमात पोहोचल्यावर शंकर विकास पॉल यांच्याशी भेट झाली. ते गांधी आश्रम ट्रस्टचे मुख्य प्रशासकीय अधिकारी आहेत.

पॉल सांगतात, "हा गांधी आश्रम 1946पूर्वी घोष विला नावाने ओळखला जाई. नौखालीतील दंगलीनंतर महात्मा गांधींनी चार महिन्यांपर्यंत नौखालीतील हिंसा प्रभावित गांवाचा दौरा केला आणि शांती समित्या स्थापन केल्या."

"7 नोहेंबरला गांधीजी सर्वांत आधी बेगमगंजच्या रामगंजमध्ये दाखल झाले. तिथे हिंदूच्या विरोधात मोठी दंगल उसळली होती."

बॅरिस्टर ज्याने दान केली आपली संपत्ती

आज जिथे गांधी आश्रम ट्रस्ट आहे ती जागा कधीकाळी नौखालीचे पहिले बॅरिस्टर हेमंत कुमार घोष यांची होती.

गांधी आश्रम ट्रस्टचे मुख्य प्रशासकीय अधिकारी शंकर विकास पॉल सांगतात, "मॅट्रिक झाल्यानंतर घोष बाबू ग्रॅज्युएशनसाठी कोलकत्याच्या प्रेसिडंसी कॉलेजात गेले. जितेंद्र मोहन सेनगुप्ता आणि डॉ. राजेंद्र प्रसाद त्यांचे चांगले मित्र होते."

"1910मध्ये लंडनहून कायद्याचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात स्वतःला झोकून दिलं. दरम्यानच्या काळात त्यांना अनेक वर्ष तुरुंगवास भोगावा लागला. काळ्या पाण्याची शिक्षाही झाली."

नोआखाली

फोटो स्रोत, Abhishek Ranjan Singh/BBC

"नौखालीमध्ये शांती स्थापनेच्या गांधीजींच्या प्रयत्नांमुळे प्रेरित होऊन त्यांनी आपली सगळी मालमत्ता 2,671 एकर जमीन गांधींच्या नावे केली. गांधीजींनी तिथे अंबिका कलिंग चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली आणि दंगल उसळलेल्या गावांमध्ये कल्याणकारी योजना सुरू केल्या," असं ते सांगतात.

गांधींच्या ट्रस्टची कहाणी

5 जून 1947 रोजी महात्मा गांधी यांनी चारू चौधरी यांच्या नावे अधिकारपत्र (पॉवर ऑफ अॅटोर्नी) बनवून सगळी मालमत्ता त्यांच्या नावे केली. चारू चौधरी गांधीवादी कार्यकर्ते होते. नौखालीच्या दंगलग्रस्तांसाठी त्यांनी खूप काम केलं होतं. गांधीजींच्या शांतता प्रस्थापित करण्याच्या मोहिमेची संपूर्ण जबाबदारीही त्यांच्यावरच होती.

1947साली पाकिस्तानची निर्मिती झाल्यानंतर त्यांना अनेकदा तुरुंगातही जावं लागलं. तत्कालीन पाकिस्तान सरकार त्यांना भारताचा हेर समजायचे. बांगलादेशची निर्मिती झाल्यानंतर 9 ऑक्टोबर 1975 रोजी कायदा मंत्रालयाने अंबिका कलिंग चॅरिटेबल ट्रस्टचं नाव बदलून गांधी आश्रम ट्रस्ट ठेवलं.

नोआखाली

फोटो स्रोत, Abhishek Ranjan Singh/BBC

जमीनदारी गेल्यानंतर 25 एकर जमीन ट्रस्टकडे राहिली आणि उरलेली जमीन भूमिहीन लोकांना वितरित करण्यात आली.

स्वदेश राय नौखालीतून निघणाऱ्या दैनिक गणतंत्रचे संपादक आहेत आणि गांधी ट्रस्टे अध्यक्षही.

ते सांगतात, "तत्कालीन पाकिस्तान सरकारच्या काळात आश्रमाची जमीन हडपण्याचा खूप प्रयत्न झाला. सत्र न्यायालय ते उच्च न्यायालयापर्यंत अनेक खटले चालले. सगळ्या खटल्यांचा निकाल गांधी आश्रम ट्रस्टच्या बाजूने लागला. चारू चौधरी यांचा मृत्यू 13 जून 1999 रोजी झाला. त्यांनी या आश्रमाच्या माध्यमातून आजन्म स्थानिकांची मदत केली."

1946ची दंगल

झरना धारा चौधरी गांधी आश्रम ट्रस्टच्या सचिव आहेत. त्या सांगतात, "1946च्या हिंदू-मुस्लीम दंगलीत त्यांच्या लक्ष्मीपूर गावात भीषण नरसंहार झाला होता. त्यांच्या कुटुंबातले अनेक जण मारले गेले. गावातील अनेक महिलांवर बलात्कार करण्यात आला."

नोआखाली

फोटो स्रोत, Abhishek Ranjan Singh/BBC

"विवाहित स्रियांचे बळजबरीने निकाह लावण्यात आला. हिंदू मंदिरांची नासधूस करण्यात आली."

गांधीजींच्या प्रयत्नांनंतर दंगल निवळली आणि त्यांचं कुटुंब पुन्हा नौखालीत परतलं.

त्या सांगतात गांधीजी नौखालीत गेले होते, त्यावेळी त्यांचं वय फक्त 9 वर्ष होतं. "गांधीजी आले होते, फक्त एवढंच आठवतं. त्यांच्यासोबत निर्मल कुमार बसू, सरोजिनी नायडू, सुशिला नायडूदेखील होते."

"गांधीजींनी चार महिने नौखालीतील गावांचा दौरा केला. जे. बी. कृपलानी, सुचेता कृपलानी, डॉ. राममनोहर लोहिया आणि सरोजिनी नायडू यांनीसुद्धा दंगलग्रस्त गावांत शांतता प्रस्थापनेसाठी प्रयत्न केले."

गांधीवादी सामाजिक कार्यकर्ता झरना चौधरी यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी 2013 साली भारत सरकारने पद्मभूषणने सन्मानित केलं.

सात दशकांपासून मंदिरात पूजा नाही

गांधी आश्रम ट्रस्टच्या बाहेर शिव आणि काली यांची दोन जुनी मंदिरं आहेत. घोष कुटुंबीयांनी ही सव्वाशे वर्ष जुनी मंदिरं बांधली होती. नौखाली दंगलीत मंदिरांची मोठी हानी झाली. त्यानंतर या दोन्ही मंदिरात कधीच पूजा झाली नाही.

नोआखाली

फोटो स्रोत, Bettmann/Getty Images

आज जायग बाजार मुस्लीम बहुल भाग आहे. मात्र 1956पूर्वी तिथे हिंदूंची संख्याही मोठी होती. सरकारी कागदपत्रांत लिहिलेल्या जमिनीपैकी निम्म्या जमिनीवर तर अतिक्रमण झालं आहे.

प्रमोद दास इथेच राहतात. ते सांगतात, "सत्तर वर्षांपासून मंदिरात पूजा झालेली नाही. मंदिरातला उंबरठा, दार सर्वच तोडण्यात आलं. शिवरात्री आणि दुर्गापूजेच्या दिवशीच इथे पूजा होते."

"काही वर्षांपूर्वी एका सरकारी टीमने इथला सर्वे केला होता. मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी त्यांनी सरकारकडे 12 लाख टका (बांग्लादेशी चलन) इतका निधी मागितला होता. मात्र अजून काम सुरू झालेलं नाही."

नोआखाली

फोटो स्रोत, Abhishek Ranjan Singh/BBC

का बेचिराख झालं नौखाली?

मोहम्मद अली जिन्ना पाकिस्तानच्या निर्मितीसाठी काहीही करायला तयार झाले होते. याबाबत दिल्लीत मसुदे तयार करण्याचं काम सुरू होतं. 16 ऑगस्ट 1946 रोजी जिन्ना यांनी 'डायरेक्ट अॅक्शन'चा नारा दिला.

दिल्ली विद्यापीठात इतिहासाचे प्राध्यापक असलेले दिवाकर कुमार सिंह सांगतात, "त्यांच्या या आदेशानंतर संयुक्त बंगालमध्ये दंगली सुरू झाल्या. मुस्लीमबहुल नौखाली जिल्ह्यात हिंदूंच्या रक्ताचे पाट वाहू लागले."

नोआखाली

फोटो स्रोत, Abhishek Ranjan Singh/BBC

"दहा-पंधरा दिवस जगाला या रक्तपाताची बातमी कळलीच नाही. काही दिवसानंतर दंगलीची बातमी पसरली. त्याचा परिणाम म्हणून कोलकाता आणि बिहारमध्येसुद्धा दंगली भडकल्या."

"वर्तमानपत्रांमध्ये एकीकडे जळत असेल्या नौखालीचं चित्र होतं तर दुसरीकडे बिहारमध्ये मारल्या गेलेल्या लोकांच्या कहाण्या. 'लीग जिंदाबाद, पाकिस्तान जिंदाबाद, लड के लेंगे पाकिस्तान, मार के लेंगे पाकिस्तान,' अशी घोषणा मुस्लीम लीगने दिली होती," असं ते सांगतात.

नौखालीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच दंगली भडकल्या. एका महिन्यात मोठ्या संख्येने लोक मारले गेले. बेगमगंजपासून सुरू झालेला हा हिंसाचार नौखाली जिल्ह्यातल्या इतर गावांतही पसरला.

सुनियोजित दंगल

गांधी मेमोरिल इन्स्टिट्युटचे प्राध्यापक देवाशीष चौधरी सांगतात, "शहागंज बाजारमध्ये हल्लेखोरांनी स्थानिक हिंदू नेते आणि जमीनदार सुरेंद्र कुमार बोस यांची निर्घृण हत्या केली."

नोआखाली

फोटो स्रोत, Abhishek Ranjan Singh/BBC

"जेव्हा निशस्त्र, लाचार हिंदू मारले जात होते तेव्हा करपाडा गावात नौखाली बार असोसिएशनचे अध्यक्ष आणि जमीनदार राजेंद्र लाल रॉय यांनी आपले मुलं आणि भावांसोबत मिळून स्थानिक हिंदूंना एकत्र आणायला सुरुवात केली. त्यांनी स्थापन केलेल्या रक्षा दलाच्या लोकांनी हिंदूंना भारतात पाठवायला सुरुवात केली. एका आठवड्यात त्यांनी हजारो हिंदू लोकांना सुरक्षित पाठवलं. मात्र 23 ऑक्टोबर 1946 रोजी काही दंगलखोरांनी त्यांची हत्या केली," असं ते सांगतात.

देवाशीष चौधरी यांच्या मते नव्या पिढीतील अनेकांना नौखालीतल्या हिंसाचाराची माहिती नाही.

गांधी आश्रम ट्रस्टच्या गौरी मुजुमदार नौखालीच्या खिलपाडा गावच्या आहेत.

त्या सांगतात, "नौखाली मुस्लीमबहुल असलं तरी त्यावेळी जमीनदारांमध्ये हिंदूंची संख्या जास्त होती. ही एक सुनियोजित दंगल होती. हिंदूंना पिटाळून लावून त्यांची संपत्ती हस्तगत करणं हाच दंगलींचा हेतू होता."

"याच कारणामुळे नौखालीत जमीनदारांना लक्ष्य करण्यात आलं. दंगलीवेळी एन. जी. रे नौखालीचे कलेक्टर होते. कदाचित त्यांना दंगलीची कुणकुण लागली होती. त्यामुळे तीनच दिवस आधी ते आपल्या संपूर्ण कुटुंबीयांसोबत नौखालीतून ढाक्यात गेले होते," अशी माहिती त्यांनी दिली.

गांधींची नौखाली यात्रा

7 नोव्हेंबर 1946 रोजी महात्मा गांधी नौखालीत दाखल झाले. हिंसाचारग्रस्त लोकांना कोणताच मार्ग दिसत नव्हता. एकत्र राहणारे आता एकमेकांकडे संशयाने बघू लागले होते.

नोआखाली

फोटो स्रोत, National Library, Kolkata

नौखालीत येताच गांधीजींनी हिंसाचारग्रस्त गावात पदयात्रा काढली. गांधीजी चार महिने या जिल्ह्यात अनवाणी फिरले. 'नौखाली एक स्मशानभूमी आहे जिथे हजारो निष्पापांच्या समाधी आहेत. अशा ठिकाणी चप्पल घालणं मृत आत्म्यांचा अपमान होईल,' असं ते म्हणत होते.

गांधी आश्रम ट्रस्टचे ग्रंथपाल असीम बक्शी सांगतात, "महात्मा गांधी सर्वाधिक दिवस म्हणजे सहा दिवस चांदपूर पोलीस स्टेशनच्या गावात थांबले. ते ज्या गावात जायचे तिथल्या एखाद्या मुस्लीम कुटुंबातच राहायचे."

"गावांचा दौरा करताना ते स्थानिक मुस्लिमांना सोबत घेऊन जायचे. नंतर मुस्लीम स्वेच्छेने गांधीजींच्या या पदयात्रेत सामील होत गेले. हिंसाचारामुळे बेघर झालेल्यांच्या पुनर्वसनात स्थानिक मुस्लिमांनी मदत करायला सुरुवात केली. महात्मा गांधी यांच्या चार महिन्यांच्या दौऱ्याचा परिणाम नौखाली आणि आसपासच्या जिल्ह्यात दिसू लागला. ज्या हिंदू मंदिरांची नासधूस झाली त्या मंदिरांचा जिर्णोद्धार मुस्लिमांच्या मदतीनं सुरू झाला," असं ते सांगतात.

"गांधींव्यतिरिक्त कृपलानी दांपत्य आणि राममनोहर लोहिया अशा नेत्यांनी नौखालीतील गावांमध्ये दौरे करून मुस्लीम आणि हिंदूंमध्ये शांतता प्रस्थापित केली," ते सांगतात.

स्वातंत्र्याची पहाट

दिल्लीत भारताच्या स्वातंत्र्याचा उत्सव सुरू होता. अनेक नेतेमंडळी या उत्सवात सामील झाले होते. मात्र त्यात एक नाव नव्हतं - महात्मा गांधी.

त्यांच्या प्रयत्नांनी नौखालीत हिंसाचार थांबला होता. मात्र कोलकत्यात अनेक ठिकाणी तणाव कायम होता.

नोआखाली

फोटो स्रोत, National Library, Kolkata

15 ऑगस्टला ते हिंसाचारग्रस्त भागात हिंदू-मुस्लिमांमध्ये सद्भावनेसाठी प्रयत्न करत होते.

गांधीजींनी विश्वास दाखवल्याने पीडितांनाही आशा वाटली. गांधीजी दिवसभर लोकांना भेटले. आपल्या जुन्या मित्रांना पत्रं लिहिली आणि बिगर काँग्रेसी नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या.

हीच त्यांची शेवटची कोलकाता यात्रा ठरली.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)