अमित शहा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरून असं काय म्हणाले, की ज्यावरुन होतोय वाद?

राजकीय वर्तुळातून अमित शहांवर जोरदार टीका होत आहे.

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, राजकीय वर्तुळातून अमित शहांवर जोरदार टीका होत आहे.

संसदेत संविधानावर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान बाबासाहेब आंबेडकरांबद्दल केलल्या एका वक्तव्यामुळे गृहमंत्री अमित शहा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.

संसदेतील भाषणादरम्यान बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोलताना आजकाल आंबेडकरांचं नाव घेण्याची फॅशन झाली असल्याचं वक्तव्य अमित शहा यांनी केलं.

त्यांनी म्हटलंय, 'ही आता फॅशन झाली आहे. आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर...एवढं नाव जर देवाचं घेतलं असतं तर तुम्हाला सात जन्मांसाठी स्वर्ग प्राप्त झाला असता."

अमित शहा यांच्या या वक्तव्यावर काँग्रेस पक्ष आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. राजकीय वर्तुळातून अमित शहांवर जोरदार टीका होत आहे.

या वक्तव्याचा विरोध करत एक्स या समाज माध्यमावर राहुल गांधी यांनी लिहिलं आहे की, "मनुस्मृतीवर विश्वास ठेवणाऱ्यांना आंबेडकरांचा त्रास हा होणारच."

अमित शाह यांनी बुधवारी (18 डिसेंबर) संध्याकाळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली.

अमित शाह म्हणाले की कालपासून (17 डिसेंबर) काँग्रेस पक्ष माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून सादर करतो आहे. हे निषेधार्ह आहे.

अमित शाह म्हणाले, "संसदेसारख्या देशातील लोकशाहीच्या सर्वोच्च व्यासपीठावर जेव्हा बोललं जातं तेव्हा ते वस्तुनिष्ठ असलं पाहिजे आणि सत्याला धरूनच असलं पाहिजे."

"कालपासून (17 डिसेंबर) काँग्रेस पक्ष ज्या प्रकारे वस्तुस्थितीचा विपर्यास करतो आहे, ती बाब अत्यंत निषेधार्ह आहे. मी या गोष्टीचा निषेध करतो."

ते पुढे म्हणाले, "आधी काँग्रेस पक्षानं नरेंद्र मोदींच्या वक्तव्यांचा देखील विपर्यास केला होता. निवडणुकीच्या वेळेस माझ्या वक्तव्यांना एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) च्या मदतीनं संपादित करून त्यात विपर्यास करून सादर करण्यात आलं होतं. मी अशा पक्षात आहे, जो पक्ष कधीही आंबेडकरांचा अपमान करू शकत नाही. आम्ही आंबेडकरांच्या विचारांचा प्रचार केला आहे."

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (18 डिसेंबर) या विरोधकांच्या टीकेला उत्तर देत एक्स अकाउंटवर एक पोस्ट केलीय. यात त्यांनी अमित शहा यांच्याबाजूने प्रतिक्रिया देताना काँग्रेसवर टीका केलीय. अमित शहा यांनी आंबेडकर यांचा अपमान करणाऱ्यांचा काळा इतिहास उघड केलाय, असं ते म्हणाले.

अमित शहा नक्की काय म्हणाले?

अमित शहा यांनी आपल्या भाषणात देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पहिल्या मंत्रीमंडळातून आंबेडकर यांनी दिलेल्या राजीनाम्याचा उल्लेख केला आहे.

भाषणादरम्यान काँग्रेसवर टीका करताना अमित शहा म्हणाले की, आता तुम्ही आंबेडकरांचं नाव शंभरपेक्षा जास्त वेळा घेतलं तरी आंबेडकरांबद्दल तुमच्या भावना काय आहेत हे ते स्पष्ट करतील.

ते म्हणाले, "बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या पहिल्या मंत्रिमंडळाचा राजीनामा का दिला होता? अनुसूचित जाती-जमातींना मिळणाऱ्या वागणुकीबाबत आपण असमाधानी असल्याचं त्यावेळी त्यांनी अनेकदा सांगितलं होतं.

सरकारच्या परराष्ट्र धोरणाशी आणि कलम 370 बाबत देखील ते असहमत होते. त्यावेळी आंबेडकरांना जे आश्वासन देण्यात आलं होतं ते पूर्ण झाले नाही त्यामुळे त्यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता." असंही पुढं ते म्हणाले

"ज्यांचा विरोध करत होते त्यांचंच नाव केवळ मतांसाठी घेणं हे कितपत योग्य आहे?",असा प्रश्न त्यांनी काँग्रेसला केला

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर

दरम्यान अमित शहा यांच्या भाषणानंतर काँग्रेस नेत्यांनी त्यांच्यावर आंबेडकरांचा अपमान केल्याचा आरोप केला आहे.

काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी एक्स या समाजमाध्यमावर एका पोस्टद्वारे गृहमंत्री अमित शहांच्या या वक्तव्यावर हल्ला चढवला आहे.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

ते म्हणाले, "गृहमंत्री अमित शहा यांनी आज सभागृहात बाबासाहेबांचा अपमान केला आहे. असं बोलून त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं की भाजप आणि राष्ट्रीय सेवा संघ तिरंग्याच्या विरोधात होते."

"त्यांच्या पूर्वजांनी अशोक चक्राला देखील विरोध केलेला. संघ परिवारातील लोकांना पहिल्या दिवसापासून भारतीय संविधानाऐवजी मनुस्मृती लागू करायची होती." असंही पुढं ते म्हणाले.

आंबेडकर हे नेहमी मनुस्मृतीच्या विरोधात होते म्हणून त्यांचा इतका तिरस्कार केला जात आहे.

मोदी सरकारला इशारा देत त्यांनी म्हटलं आहे की, "मोदी सरकारमधील मंत्र्यांनी कान उघडे करून समजून घ्यावं की माझ्यासारख्या कोट्यवधी लोकांसाठी बाबासाहेब आंबेडकर हे देवापेक्षा कमी नाहीत.

ते दलित, आदिवासी, मागासवर्गीय, अल्पसंख्याक आणि गरिबांचे दैवत आहेत आणि नेहमी राहतील."

आंबेडकरांचा अपमान केल्याचा आरोप भाजपनं फेटाळला

परंतु या प्रकरणाच्या विरोधात अनेक काँग्रेस नेत्यांच्या समाज माध्यमांवर पोस्ट आल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी आंबेडकरांचा अपमान केल्याचा आरोप फेटाळून लावला आहे.

शिवाय काँग्रेसनं अमित शहांच्या भाषणाचा अर्धवट व्हिडीओ पोस्ट केल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. काँग्रेस ज्या भागावर आक्षेप घेत आहे तो भाग अपूर्ण असून लोकांनी संपूर्ण व्हिडिओ ऐकावा, असंही म्हटलं आहे.

अमित शहा यांच्या त्या भाषणाचा पूर्ण व्हिडीओ पोस्ट करत भारतीय जनता पक्षानं लिहिलं आहे की, "अमित शहा यांनी काँग्रेसला आरसा दाखवला आहे. आंबेडकरांबद्दल नेहरू काय म्हणाले होते?"

अमित शहा यांच्या भाषणाचा व्हिडीओ भारतीय जनता पक्षानं त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवर पोस्ट केलाय.

फोटो स्रोत, X/@BJP4India

फोटो कॅप्शन, अमित शहा यांच्या भाषणाचा व्हिडीओ भारतीय जनता पक्षानं त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवर पोस्ट केलाय.

भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनीही अमित शहा यांच्या भाषणाचा संपूर्ण व्हिडिओ शेअर करत काँग्रेसवरती टीका केली आहे.

ते म्हणाले, "काँग्रेसची विश्वासार्हता आता शून्यावर आली आहे. त्यामुळे आता त्यांना संभ्रम पसरवण्याचं राजकारण करावं लागत आहे.

गृहमंत्री अमित शहा यांच्या संपूर्ण वक्तव्यामुळे बाबासाहेब आंबेडकर आणि दलित समाजाविषयी काँग्रेसचा द्वेष उघड झाला आहे. तुम्ही पूर्ण भाषण ऐका."

अमित शहा यांचं विधान अक्षम्य- काँग्रेस

राज्यघटनेचा स्वीकार करण्याच्या घटनेला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त लोकसभेत संविधानावरील चर्चे दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण केले.

त्यांनी आपल्या संपूर्ण भाषणात जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि काँग्रेसच्या प्रदीर्घ राजवटीवर हल्लाबोल केला.

सुमारे 1 तास 50 मिनिटांच्या भाषणात पंतप्रधान मोदींनी काँग्रेसचं नाव न घेता एका घराणेशाहीच्या 55 वर्षांच्या राजवटीवर जोरदार टीका केली.

त्याआधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सावरकरांचं नाव घेत त्यांच्या संविधानाविषयीच्या विचारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं.

यावेळी पहिल्यांदाच संसदेत आलेल्या काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी वढेरा यांनी देखील सरकारला चांगलंच घेरलं होतं.

काँग्रेस नेत्या आणि वायनाडच्या खासदार प्रियंका गांधी

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, वायनाडच्या खासदार प्रियंका गांधी
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

प्रियंका गांधींनी म्हटलं की, "पंतप्रधान नवीन काहीच बोलले नाहीत. मला असं वाटलं की मी दशकांनंतर शाळेत गणिताच्या सलग दुसऱ्या तासाला बसले आहे.

मला वाटलं पंतप्रधान नवीन काही तरी बोलतील. चांगलं बोलतील. परंतु त्यांनी त्यांचे पोकळ 11 संकल्प सांगितले. भ्रष्टाचारावर बोलत असाल तर अदानींवर चर्चा करा." असंही पुढं त्या म्हणाल्या.

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव म्हणाले की, "हे भाषण खूप लांबलचक होतं. जुमल्यांवरून कोणाला ओळखलं जातं हे पत्रकारांपेक्षा अधिक चांगलं कुणाला ठाऊक असेल?

आज आम्हाला 11 जुमल्यांचा संकल्प ऐकायला मिळाला."

उत्तर प्रदेशातील नगीना लोकसभा मतदार संघातील खासदार चंद्रशेखर यांनीही अमित शहा यांचं हे वक्तव्य आंबेडकरांच्या संघर्षाचा अपमान करणारं असल्याचं म्हटलं आहे.

त्यांनी म्हटलंय, " गृहमंत्री अमित शहांचं हे विधान परम पूज्य बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक योगदानाचा आणि सामाजिक न्यायासाठी केलेल्या संघर्षाचा अपमान आहे.

डॉ. भीमराव आंबेडकर यांचं नाव घेणं ही 'फॅशन'नाही. कोट्यावधी शोषितांना न्याय आणि अधिकार देणाऱ्या समता, स्वातंत्र्य आणि सामाजिक परिवर्तनाच्या त्या क्रांतीचं ते एक प्रतीक आहे."

अशा प्रकारच्या विधानातून असंवेदनशीलताच नव्हे तर सामाजिक ऐक्य आणि लोकशाही मूल्यांचा अनादर देखील दिसून येत असल्याचं खासदार चंद्रशेखर यांनी पुढे म्हटलं आहे.

अमित शहा यांचं विधान अक्षम्य असल्याचं सांगत आंबेडकरांवर विश्वास ठेवणारे या अपमानाचा बदला नक्कीच घेतील,असंही ते म्हणाले.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.