कोण आहे जातीयवादी, कुठं आहे जातीवाद? - विशेष ब्लॉग

फोटो स्रोत, Getty Images
- Author, डॉ. आदिती नारायणी पासवान
- Role, बीबीसी हिंदीसाठी
जातीव्यवस्था, दलितांवरील अत्याचार हे आज देखील गंभीर मुद्दे आहेत. जाती व्यवस्थेविरुद्धचा संघर्ष जुना असून तो अजूनही सुरू आहे. एकीकडे आपला समाज प्रगतीपथावर असताना आजही जातीयवादाच्या विळख्यात आपण अडकलेले आहोत.
एप्रिल महिन्याला दलित इतिहास महिना (Dalit History Month) म्हटलं जातं, त्याच निमित्तानं केलेला हा उहापोह...
एप्रिल महिन्याला 'दलित इतिहास महिना' म्हणून साजरा केलं जातं. आपण आपल्या अस्तित्वाचा उत्सव साजरा करावा, याची आम्ही दरवर्षी या महिन्यात दलितांना आठवण करून देतो. हा उत्सव संघर्ष आणि आठवणी यांचं प्रतीक आहे.
हा महिना संपूर्ण वर्षभर जगभरातील दलितांना एकतेचं एक ज्वलंत उदाहरण म्हणून प्रेरणा देतो. मग ते कॅनडात राहणारे असोत की ऑस्ट्रेलिया, इंग्लंड असो की अमेरिका असो.
एप्रिल महिन्यात फक्त बाबासाहेब आंबेडकरांचाच जन्म झाला होता असं नाही. या महिन्यात जाती व्यवस्थेविरुद्ध संघर्ष करणाऱ्या अनेक नायकांचा देखील जन्म झाला होता. यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले आणि बाबू जगजीवन राम यांचादेखील समावेश आहे. 4 एप्रिलला झलकारी बाई या भारताच्या स्वांतत्र्यलढ्यातील एका शूर योद्धेचा बलिदान दिवस देखील असतो.
दलित समाजातील लोक अनेकदा जातीव्यवस्थेच्या अंधारात हरवून जातात. मुख्य धारेतील वाक्प्रचार आणि उत्सवांमध्ये त्यांचं नेहमीच विस्मरण केलं जातं. अखेर येणाऱ्या पिढ्यांच्या आठवणीतून त्यांना कायमचं पुसलं जातं.
एप्रिल महिना आपल्याला एक अशी खिडकी उपलब्ध करून देतो, ज्याच्या माध्यमातून आपण आपल्या पूर्वजांच्या समृद्ध वारशाची आठवण ठेवू शकू. दलित समाजाचं दमन करून त्यांची भीषण अवस्था करणाऱ्या जातीव्यवस्थेच्या विरोधात आमच्या या पूर्वजांनी संघर्ष केला आणि बलिदान दिलं. या महिन्यात आम्ही त्यांच्या योगदानाचा मान-सन्मान करतो.
दलित संघर्षाचा प्रदीर्घ इतिहास
1757 मध्ये प्लासीच्या युद्ध ज्यात मोगल बादशाहाला हरवण्यात आलं, ते असो की 1857 चं प्रसिद्ध बंड. झलकारी बाईपासून मंगू राम आणि ऊदा देवीपर्यंत यातील किती जणांबद्दल तुम्हाला माहिती आहे? आणि किती माहिती आहे?
इतिहासाची पानं अशा असंख्य अनेक संघर्षांनी भरलेली आहेत. स्वातंत्र्याच्या लढ्यापासून ते राष्ट्रनिर्माणापर्यत आमच्या भूमिकांकडं, योगदानाकडं दुर्लक्ष करण्यात आलं आहे किंवा त्यांना नष्ट करण्यात आलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
मात्र दलितांसाठी सर्वांत मोठा संघर्ष हा त्यांच्या रोजच्या जगण्याचा संघर्ष आहे. दलितांनी ही लढाई पाण्यासाठी, अस्पृश्यतेपासून सुटका करून घेण्यासाठी, केलेल्या कष्टाचा सन्मान मिळण्यासाठी, मंदिरात प्रवेश मिळवण्यासाठी लढली आहे. शतकानुशतके आमच्या परिस्थितीत कोणताच बदल झालेला नाही असा दावा मी करणार नाही.
समाज सुधारणांमुळं आमच्या संस्कृतीमध्ये जी मूल्ये सामावली आहेत. बदल स्वीकारून त्या अनुरुप होण्याचं आमच्या धर्माचं जे स्वरूप आहे, आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे आमच्या संविधानात सामाजिक न्यायाचा जो पाया घडवण्यात आला आहे. या सर्व गोष्टींमुळे असा एकत्रित परिणाम साधला गेला आहे की आम्हाला योग्य स्थान मिळेल.
बदलांच्या पार्श्वभूमीवर जातीयवादावर चर्चा
आजच्या काळात जात ही आमच्या रोजच्या आयुष्यात बोलण्याचा एक भाग बनत चालली आहे. आपल्या आजूबाजूला जातीबद्दल होत असलेल्या चर्चेमुळं आज जातीवर आधारित चेतना आणि त्याबद्दलची संवेदनशीलता वाढली आहे.
इतकंच काय बॉलीवूडच्या चित्रपटांमधील पात्रांमध्ये देखील बदल होताना दिसत आहेत. लगान चित्रपटात 'कचरा' हे पात्र दाखवण्यात आलं होतं.
मात्र आज बॉलीवूडच्या चित्रपटात दलित पात्रांना अधिक लढवय्ये, बुद्धिमान आणि सक्षम माणूस म्हणून दाखवलं जातं आहे. 'चक्रव्यूह', 'मांझी द माऊंटन मॅन', 'सैराट', 'दहाड', 'जय भीम', 'कांतारा' आणि 'कटहल' सारखे चित्रपट या बदलाची उदाहरणं आहेत.

असं असतानादेखील मी सवर्ण-सधन वर्गाशी संबंधित अशा लोकांना तोंड देत असते, जे लोक या गोष्टींवर भर देत असतात की जातीयवाद आता मोठी सामाजिक समस्या राहिलेली नाही. कारण त्यांच्या दृष्टिकोनातून जातीपातींचा भेद नष्ट झाला आहे.
मात्र जेव्हा लग्न करण्याची वेळ येते तेव्हा हे लोक स्वजातीय जोडीदाराचा शोध घेऊ लागतात. इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये विवाहविषयक जाहिरातींच्या कॉलमची विभागणी जातीच्या आधारावर केलेली असते. लोक फक्त आपल्या जातीतील वर किंवा वधूचा शोध घेत असतात. ही तीच माणसं आहेत जे एरवी असं म्हणतात की ते जातीच्या आधारावर भेदभाव करत नाहीत.
अशी मूलभूत विसंगती मला विचार करायला भाग पाडते की जातीमुळं कोणत्याही प्रकारचा भेदभाव सहन करावा लागत नाही असा दावा लोकं इतक्या बेजबाबदारपणा कसा काय करतात. ते म्हणतात, त्यांनी त्यांच्या घराण्यातील कोणालाही कधीही जातीयवादी भेदभाव करताना पाहिलेलं नाही.
जातीयवादाबद्दल गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न
याशिवाय जात आणि त्याच्या ऐतिहासिक पायासंदर्भातदेखील नवनवीन कथा तयार केल्या जात आहेत. जातीची व्याख्या करण्यासाठी धर्मशास्त्रांपासून जाती शब्दाच्या उत्पत्तीचा इतिहास शोधला जातो आहे.
वर्ण आणि जात यामधील फरक दाखवण्यासाठी असंख्य पुस्तकं लिहिण्यात आली आहेत. व्हॉट्सअप विद्यापीठात 'जात' या शब्दाबद्दल विचित्र समज असणाऱ्या माहितीचा ढीग लागलेला आहे.
ही बाब स्पष्ट आहे की पोर्तुगीज भाषेतील 'कैस्टस' या शब्दापासून इंग्रजीतील 'कास्ट' या शब्दाची उत्पत्ती झाली आहे. या गोष्टीचा चातुर्यानं वापर करत सांगितलं जातं की जात ही एक पाश्चात्य संकल्पना आहे. या गोष्टीचा वापर इंग्रजांनी त्यांच्या साम्राज्यवादाची मूळं घट्ट करण्यासाठी केला होता.

फोटो स्रोत, Getty Images
तसं पाहता मी या शब्दाच्या उत्पत्तीसंदर्भात कोणताही प्रश्न उपस्थित करत नाही. त्याचबरोबर परकीयांनी या शब्दाचा गैरवापर केला याचंही मी खंडन करत नाही. दलितांच्या सद्यस्थितीमुळं मला सर्वाधिक वेदना होते. आज आपली ताकद दाखवण्यासाठी कोण दलितांवर बलात्कार करत आहे? आजच्या समाजात आम्ही कुठं उभं आहोत?
इतिहास बजावलेली भूमिका आम्हाला पुन्हा मिळवायची आहे. जेणेकरून भविष्यात आम्ही सन्मानानं जगू शकू.
असे असंख्य लोक आहेत ज्यांना खात्रीपूर्वक वाटतं की देशात कोणत्याही प्रकारचा जातीयवादी भेदभाव नाही. ते असं सांगायला देखील विसरत नाहीत की त्यांनी त्यांच्या वडीलधाऱ्यांना दलितांशी चांगलं वागताना पाहिलं आहे. मला मात्र माझ्या समाजानं पाण्यासारख्या मूलभूत गोष्टीसाठी शेकडो वर्ष केलेला संघर्ष अतिशय स्पष्टपणे आठवतो.
देशात आता जातीपातीचा भेदभाव होत नाही, अशा प्रकारचे त्यांनी अनेकवेळा केलेले दावे ऐकले की मनाला शिणवटा येतो. जेव्हा कोणी म्हणतं की त्यानं जातीयवाद पाहिला नाही, तेव्हा एक गोष्ट निश्चित होते की तो एखाद्या सवर्ण-समृद्ध कुटुंबात जन्मला असणार.
त्यांना इतरांचं दु:ख काय माहीत
अशावेळी हा प्रश्न निर्माण होतो की ज्या व्यक्तीनं जाती व्यवस्थेमुळं होणाऱ्या अत्याचाराचे चटके कधीच पाहिले नाहीत ती व्यक्ती आमच्या कित्येक पिढ्यांचं दु:ख कसं काय समजणार? जाती व्यवस्थेचं दु:ख सहन करावं लागलं नाही, हे दलितांना सांगू द्या. जे पीडित आणि शोषित आहेत, जरा त्यांना त्यांच्या तोंडानं सांगू द्या की त्यांची दु:ख संपली आहेत.
जर एखाद्या व्यक्तीला जातीव्यवस्थेचे अत्याचार सहन करावे लागले नसतील तर तो सुदैवी आहे. मात्र यामुळं जातीयवाद आहे हे सत्य बदलत नाही. समाजातील वास्तवाबद्दलचं इतकं अज्ञान पाहून वाईट वाटतं.
जातीयवादाच्या गोष्टी ऐकून आणि खासकरून दलित महिला म्हणून मी मला आलेले अनुभव मी जेव्हा सांगते तेव्हा लोकांच्या चेहऱ्यावर उमटलेले आश्चर्याचे भाव त्यांच्या अज्ञानाची प्रचिती देत असतात.

फोटो स्रोत, getty images
त्यांचं अज्ञान आमचा संघर्ष कमकुवत करत असतं. जेव्हा आम्ही आमचे अनुभव सांगत असतो, तेव्हा आम्ही हे सर्व आरक्षण मिळवण्यासाठी करत असल्याची जाणीव आम्हाला करून दिली जात असते.
आरक्षण म्हणजे भीक नव्हे. त्याचबरोबर जुन्या वाईट वागणुकीसाठीचं हे प्रायश्चितदेखील नव्हे. हे त्या समानतेच्या दिशेनं जाण्यासाठीचा आमचा अधिकार आहे, ज्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संघर्ष केला होता. आणि त्यासाठी आम्ही अजूनही संघर्ष करत आहोत.
आज आमच्यावर परकीयांचं राज्य नाही. आज देशात कोणीही जातीव्यवस्थेवर विश्वास असल्याचं, जातपात पाळत असल्याचं म्हणत नाही.
मग हे सर्व कोण करतंय?
अशा परिस्थितीत माझ्या मनात प्रश्न निर्माण होतात की मग दलित मुलींवर बलात्कार करून त्यांना कोण जिवंत जाळतं आहे? नाल्याची, सांडपाण्याची साफसफाई करताना दलितांचा का मृत्यू होतो आहे?
आजदेखील घोड्यावर बसण्यासाठी गोळी का मारली जाते आहे? आजदेखील मिशा ठेवणाऱ्या दलितांची हत्या का होते आहे? आजदेखील शक्तीप्रदर्शन करण्यासाठी दलिताच्या शरीराचा का वापर केला जातो? हे अत्याचार कोण करतंय?
या उदाहरणांद्वारे मी स्वत:ला पीडित दाखवण्याचा प्रयत्न करत नाही. मात्र हे सर्व कोण करतं आहे हा प्रश्न आहे? अनेकदा असं ऐकण्यात येतं की अमूक तमूक दलित नेता सत्तेला चटावलेला आहे.
आम्हाला सत्तेच्या केंद्रस्थानी राहायचं आहे हे नक्कीच आहे. शेकडो वर्षे आम्हाला अंधारात ढकलण्यात आलं आहे. आता आम्हालाही सत्तेत भागीदारी हवी आहे.

फोटो स्रोत, Getty Images
आम्हाला असं नेटवर्क, असं इकोसिस्टम बनवायची आहे ज्यात अॅमेझॉनमध्ये काम करणाऱ्या, सिएटलमध्ये राहणाऱ्या लोकांपर्यत आमची ओळख देखील पोचेल. जेणेकरून आमचा बायोडाटा तिथपर्यत पोचू शकेल. केंब्रिजमध्ये राहणाऱ्यांशी आम्हालादेखील परिचय वाढवायचा आहे, जेणेकरून करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी ते आम्हाला मदत करू शकतील.
मात्र यापासून आम्हाला वंचित ठेवलं जातं आहे. आता हे सर्व आम्हाला हवं आहे आणि आमचा हा अधिकार ठामपणं मिळवण्याची जिद्द देखील बाळगून आहोत.
आपण सर्व जातीयवादी आहोत, ही बाब दलित इतिहास महिन्यात मान्य करूया. आपण सर्व कोणत्यातरी प्रकारे जातीयवादी वर्तवणूक करत असतो. जातीव्यवस्था आमच्या अंतरंगात खोलवर रुजलेली आहे.
एक व्यवस्था म्हणून जातीयवादाची मूळं समाजात घट्ट रुजलेली आहेत, हे वास्तव जर आम्ही स्वीकारणार नसू तर मग बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं सोशल मीडियावर पोस्ट लिहणं निरर्थक आहे.
सगळ्यांत आधी आम्हाला हे मान्य करावं लागेल की जातीव्यवस्था अस्तित्वात आहे. याचा स्वीकार करावा लागेल. या वास्तवाबद्दल संवेदनशीलता दाखवावी लागेल. त्यानंतरच आम्ही स्वत:ला जातीपातीच्या बंधनातून मुक्त करण्याबद्दल बोलू शकतो.
(लेखिका दिल्ली विद्यापीठात शिकवतात, हे त्यांचे वैयक्तिक विचार आहेत.)








