जहांगीर नावावरुन चिन्मय-नेहा मांडलेकरांचे ट्रोलिंग, काय आहे प्रकरण ?

फोटो स्रोत, https://www.instagram.com/nehachinmaymandlekar/
- Author, आशय येडगे
- Role, बीबीसी प्रतिनिधी
"शेक्सपियरने म्हटलं होतं की नावात काय आहे? पण तो आता भारतात आला असता तर त्याला सांगितलं असतं की बघ बाबा नावात काय काय आहे," असे उद्गार मांडलेकर कुटुंबीयांचे ट्रोलिंग झाल्याचे पाहून अॅड. असीम सरोदे यांनी काढले.
हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये काम करणारा अभिनेता चिन्मय मांडलेकर आणि त्याची पत्नी नेहा मांडलेकर यांना त्यांच्या मुलाच्या नावावरून ट्रोल करण्यात आल्यानंतर चिन्मय यांच्या पत्नी नेहा यांनी एक व्हीडिओ बनवून आपली बाजू मांडली आहे. त्यानंतर अभिनेता चिन्मय मांडलेकर यांनी एक पोस्ट करत म्हटले आहे की यापुढे मी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करणार नाही.
माझ्या मुलाचे नाव जहांगीर असूनही मी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करतो, आणि हे लोकांच्या रोषाचे कारण असेल तर मी महाराजांच्या भूमिका करणार नाही असे चिन्मय मांडलेकरने स्पष्ट केले.
मांडलेकर कुटुंबीयांना ट्रोल करताना काही जणांनी द्वेष पसरवणारे कमेंट्सदेखील केले आहेत.
"तुम्ही हिंदू असूनही मुस्लीम नाव कसं ठेवलं?", "हेच नाव ठेवायचं असेल तर तुम्ही अफगाणिस्तान, पाकिस्तानात निघून जा," या आणि अशा हजारो कमेंट्स आणि प्रश्नांनी या दोघांना वेढलं आहे.
जहांगीर या शब्दाचा अर्थ 'जगज्जेता' असा होतो त्यामुळे एखाद्या दाम्पत्याला त्यांच्या मुलाचं नाव जहांगीर असं ठेवावं वाटलं तर ते का कुणाला चुकीचं वाटावं? असा प्रश्न देखील नेहा मांडलेकरने सोशल मीडियावर विचारला आहे.
चिन्मय मांडलेकर यांच्या मुलाचे नाव जहांगीर आहे असं कळल्यावर त्यांना ट्रोल करण्यात आलं. नेहा यांनी व्हीडिओ बनवून त्यावर स्पष्टीकरण दिले आहे.
चिन्मय मांडलेकर यांना त्यांच्या मुलाच्या नावावरून ट्रोल केलं जाण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी दोन वर्षांपूर्वी जहांगीरच्या नावावरून त्यांच्यावर काही नेटकऱ्यांनी टीका केली होती. त्यावेळी नेहा मांडलेकर यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट करून या टीकाकारांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला होता.
आताही त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट करून जहांगीरचं नाव जहांगीर का ठेवलं याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. मुळात स्वतःच्या मुलाच्या नावाचं स्पष्टीकरण जगाला द्यावं लागणं, ते देत असताना स्वतःचा धर्म, जात पुन्हा पुन्हा सांगावी लागणं हा प्रकार दुर्दैवी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
जहांगीर नऊ वर्षांचा असल्यापासून त्याच्याबाबत टीका केली जातेय
12 जानेवारी 2023ला नेहा जोशी यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून याबाबत पहिल्यांदा लिहिलं होतं. एका कमेंटचा स्क्रिनशॉट टाकून त्यांनी ही पोस्ट लिहिली होती.
या कमेंटमध्ये चिन्मयवर त्याच्या मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यावरून टीका केलेली होती. त्यात कमेंट करणाऱ्याने असं लिहिलं होतं की 'मला तर चिन्मय मांडलेकरने पोराचं नाव जहांगीर ठेवलंय हेच खटकलं.' या कमेंटला समर्थन देणाऱ्या कमेंट्सही त्याखाली होत्या.
याचाच एक स्क्रिनशॉट शेअर करत नेहा यांनी इंस्टाग्रामवर लिहिलं की, 'प्रिय ट्रोलर्स, याचा आता कंटाळा आलाय. अजून किती काळ तुम्ही नऊ वर्षाच्या मुलाला लक्ष्य करणार आहात? प्रत्येकवेळी त्याच्या वडिलांचा नवा सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी हे का केलं जातं?
जहांगीर रतनजी दादाभाई टाटा हे देशद्रोही नव्हते. या देशासाठी या महापुरुषाने जे काही मिळवलं, त्याचा अनेकांना लाभ झाला. आमच्या मुलाचं नाव आम्ही त्यांच्या नावावरून ठेवलेलं आहे आणि आम्हाला त्याचा खूप अभिमान आहे."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
Instagram पोस्ट समाप्त, 1
जहांगीरचा अर्थ जगजेत्ता असा होतो - नेहा मांडलेकर
दोन वर्षांपूर्वीच्या या पोस्टनंतर नेहा मांडलेकर यांनी सोशल मीडियावर याविषयी काही लिहिलं नव्हतं. पण आता अचानक पुन्हा एकदा चिन्मय मांडलेकरवर टीका केली जाऊ लागली आणि त्यांनी एक सविस्तर व्हिडिओ बनवून टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे.
यावेळी मात्र नेहा मांडलेकर यांनी त्यांची भूमिका सविस्तरपणे मांडली. या 8 मिनिटांच्या व्हिडिओत त्या म्हणाल्या की, "नमस्कार, माझं नाव नेहा जोशी मांडलेकर. माझी जात आधी सांगते, कारण सध्या ती सगळ्यात महत्त्वाची आहे. माहेरकडून मी देशस्थ ब्राह्मण आहे. सासरकडून मी द्वेष्टा कासार आहे. मी हिंदू आहे.
त्या मुलाखतीनंतर आम्हाला खूप ट्रोल केलं जातंय. पण आम्हाला जे ट्रोल केलं जातंय ते माझ्या पतीच्या कामावरून केलं जात नाहीये.
आमच्या मुलाच्या नावावरून आम्हाला ट्रोल केलं जातंय.
लोकांना त्यांच्या मुलाचं नाव घेऊन त्याची चर्वणं करण्याचा हक्क नाहीये. मला लोकांना एक आठवण घ्यायचीय की, त्या मुलाला एक आईसुद्धा आहे, जी कलाकार नाहीये. त्या आईला आणि तिच्या मुलांना त्यांचं खासगी आयुष्य खासगी ठेवण्याचा पूर्ण हक्क आहे.
हे सगळं त्याच्याविरोधात लिहिलं जातंय तो फक्त एक दहा-अकरा वर्षांचा एक लहान मुलगा आहे. तो का ट्रोल होतोय तर त्याचं नाव 'जहांगीर' असं आहे म्हणून. जहांगीर नाव आम्ही कधी ठेवलं? आता सगळंच सांगते, खरंतर स्वतंत्र भारताची नागरिक म्हणून मी कुणालाच स्पष्टीकरण द्यायला बांधील नाहीये पण मलाच असं वाटलं की, अज्ञानातलं हे ट्रोलिंग होत असेल तर माझी जबाबदारी आहे की हे अज्ञान दूर करावं.
तर माझ्या मुलाचं नाव जहांगीर आहे, जहांगीर हे एक पर्शियन नाव आहे. माझ्या मुलाचा जन्म 21 मार्च 2013ला झाला. 21 मार्चला जमशेदी नवरोज होता. आणि त्यादिवशी तो जन्मला म्हणून त्याचं नाव जहांगीर. आता हे नाव कुणावरून ठेवलं कसं ठेवलं हा मुद्दा नंतर येतो पण या नावाचा अर्थ खूप सुंदर आहे. जहांगीर म्हणजे जगज्जेता. जग जिंकलेला जहांगीर म्हणून हे नाव असं ठेवलं.
मला माहित नाही इतर लोक त्यांच्या मुलांची नावं कशी ठेवतात पण मी तरी माझ्या दोन्ही मुलांची नावं ही त्या नावांचा अर्थ फार गोड आहे म्हणून ठेवलेली आहेत. एवढंच काय तर भारतरत्न जेआरडी टाटा यांचं नावही जहांगीरच आहे. टाटा कुटुंब हे माझ्या आणि माझ्या नवऱ्यासाठी प्रेरणादायी आहे.
आता सुचवणारे असंही सुचवतात की जर जगजेत्ता या अर्थाचं नाव ठेवायचं असेल तर मग तुम्ही पृथ्वीराज का नाही ठेवलं? तुम्ही विक्रमादित्य का नाही ठेवलं? याही नावांचे अर्थ असे होतात. तर तो हक्क आम्हाला पालक म्हणून असावा नाही? बरं दुःख काय आहे की आपण शतकानुशतकं मुस्लिम बांधवांबरोबर राहतो.
अगदी आपल्या आयुष्यातलं बघाल तर आपले सुपरस्टारदेखील मुसलमान आहेत, आपले क्रिकेटरदेखील मुसलमान आहे. या सुपरस्टार्सच्या चित्रपटांना आपणच कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय मिळवून देतो. ते चालतं आणि माझ्या मुलाचं नाव सलतंय?
म्हणजे माझ्या नवऱ्याने बिबट्या कराटेचं पात्र साकारलं की लगेच लोक म्हणाले की, 'अरे बापरे रोल फारच सिरीयस घेतला मुलाचं मुस्लीम नाव ठेवलं.' खरंतर हे पात्र साकारायच्या आठ वर्षे आधी हे नाव ठेवलेलं होतं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
Instagram पोस्ट समाप्त, 2
मुलाचं नाव जहांगीर ठेवून आम्ही चूक नाही केली, तो हक्क आम्हाला आहे.
हो पण मला हे एक कळलं की महाराजांवर, महाराजांच्या शिकवणींवर कितीही श्रद्धा असली, महाराजांवर कितीही प्रेम असलं, आमच्या घरात महाराजांच्या कितीही तस्विरी असल्या, रोजच्या बोलण्यात महाराजांचे कितीही दाखले आम्ही आमच्या मुलांना देत असलो तरी या देशात त्या अपुऱ्या आहेत. कारण या देशात त्यांचं नाव हक्काने घेण्याचे अधिकार आता सगळ्यांकडे नाहीत. आमच्याकडे ते नाहीत.
आमच्याकडे त्यांचं नाव घेण्याचा, महाराजांचं पात्र स्क्रीनवर साकारण्याचा हक्क नाही तर यासाठी मी उभ्या महाराष्ट्राची माफी मागते की आम्ही आमच्या मुलाचं नाव जहांगीर असतानासुद्धा स्क्रीनवर महाराजांची भूमिका साकारण्याचं धाडस केलं, आम्हाला क्षमा करा, आमची चूक झाली. आम्हाला असं वाटलेलं की महाराज हे एका नटापेक्षा त्याच्या नावापेक्षा खूप मोठे आहेत. त्यांचं नाव, त्यांचं काम, त्यांचं चरित्र खूप मोठं आहे. आम्ही चुकलो आम्हाला हे लोकांपर्यंत पोहोचवता नाही आलं.
आज सकाळीच एका सद्गृहस्थांचं मला मेसेज आला की, हा देश सोडून तुम्ही अफगाणिस्तान आणि पाकिस्तानात जाऊन रहा. ते वाचून वाईट वाटलं. या देशातल्या एका व्यक्तीला मला माझ्या मुलाच्या नावावरून हा देश सोडून जा असा सल्ला मला द्यावासा वाटला याचं मला वाईट वाटतंय. याची मला खंत आहे.
परत कुणी मला असला सल्ला देऊ नये म्हणून हा व्हिडिओ. मी भारतीय आहे, माझा नवरा भारतीय आहे, माझी दोन्ही मुलं भारतीय आहेत. जेआरडी टाटा भारतीय होते आणि आम्ही आमच्या भारतात आमच्या मुलाचं नाव काय ठेवायचं हा निर्णय घेतलेला आहे. तो निर्णय घेण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे. या व्हिडिओनंतर ट्रोलिंग थांबणार आहे का? अजिबात नाही. ट्रोलिंग थांबणार आहे का? तर अर्थात दुपटीने वाढेल पण आता माझ्याकडून मी माझं काम केलं मी माझी भूमिका स्पष्ट केली."
भारतात नाव ठेवण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे पण नावं ठेवण्याचा नाही
या संपूर्ण प्रकरणाबाबत बोलताना वकील असीम सरोदे म्हणाले की, "एकीकडे आपण विश्वगुरू होण्याच्या, विश्व नागरिक होण्याच्या गप्पा मारतो, आता विश्वात्मके देवो असंही आपण म्हणतो पण आपण मुळीच वैश्विक वगैरे काही नाहीओत. आपण अत्यंत गावठी आणि मागास विचारांचे लोक आहोत हेच या ट्रोलिंगवरून दिसतं.
त्यामुळे नावाचे अर्थ आणि त्या अर्थानुसार जगणं हा भाग दूरच राहतो आणि त्या नावाला ते मुस्लिम नाव आहे, ते ख्रिश्चन नाव आहे असं करून आपण प्रत्येक नावाला धर्मांमध्ये विभागून दिलेलं आहे.
त्याचा त्रास मलाही झाला. खरंतर संस्कृतमध्ये असीम हा शब्द वापरला जातो, हिंदीतही 'भगवान की असीम कृपा होगी' असं म्हणतात पण याची काहीही कल्पना नसलेल्या लोकांना असं वाटतं की असीम हे नाव मुस्लिमच आहे. त्यामुळे मग त्या नावाच्या माणसाचा द्वेष करणं, त्याला तुझ्या आईचे कुणासोबत काही संबंध होते का असं विचारणं, त्याच्या कुटुंबीयांना त्रास देणं असे प्रकार केले जातात."

फोटो स्रोत, Asim Sarode/facebook
सरोदे पुढे म्हणाले की, "चिन्मय आणि त्याच्या बायकोला आलेला अनुभव विदारक आहे. भारतात प्रत्येकाला नाव ठेवण्याचं स्वातंत्र्य आहे पण नावं ठेवण्याचं स्वातंत्र्य मुळीच नाही. सध्या भारतात प्रत्येक गोष्टीत धार्मिक विद्वेष शोधायचा प्रयत्न केला जातो.
"सध्या भारतात एक अशी झुंड तयार झालीय जी तुम्हाला तुमचा धर्म, तुमची जात सांगायला बाध्य करत आहे. नेहा मांडलेकर यांनीही त्यांच्या व्हिडिओत सुरुवातीला त्यांची जात सांगितली कारण त्यांना त्यांच्या मुलाच्या म्हणजेच जहांगीरच्या भविष्याची काळजी असावी.
"शेक्सपियरने म्हटलं होतं की नावात काय आहे? पण तो आता भारतात आला असता तर त्याला सांगितलं असतं की बघ बाबा नावात काय काय आहे," अॅड. सरोद उद्विग्नतेनी म्हणतात.
2005पर्यंत एवढं ध्रुवीकरण झालं नव्हतं
भारतीय संस्कृतीत विशेषतः मुस्लिमेतर भारतीय कुटुंबांमध्ये बऱ्याच पर्शियन, उर्दू मूळ असणाऱ्या नावांचा वापर केला जातो. उत्तर भारतात संत कबीरांना सर्वमान्यता मिळालीय त्यामुळे 'कबीर' हे नावं धर्माचं कुंपण ओलांडून सगळीकडे जाऊ शकलं.
अशाच एका कबीरचे वडील असणारे ज्येष्ठ संपादक प्रशांत पवार म्हणतात की, "माझ्या मुलाचा म्हणजेच कबीरचा जन्म 2005 मध्ये झाला. त्यावेळी मला मुलगा झाला तर त्याचं नाव कबीर ठेवायचं हे आम्ही आधीच ठरवलं होतं. संत कबीरांची मांडणी आणि मौखिक परंपरेतून आलेल्या त्यांच्या विचारांचा प्रभाव माझ्यावर होता. त्यामुळे त्यावेळी कबीर हे नाव निवडताना आमच्या मनात काहीच शंका नव्हती.
अर्थात हे नाव ठेवल्यानंतर आम्हाला लोक प्रश्न विचारतील असं वाटलं होतं पण सुदैवाने त्यावेळी तसं काही घडलं नाही. माझं सासर उत्तर प्रदेशातील आहे पण तिथेही कबीर पोहोचलेच होते म्हणून फारसा विरोध झाला नाही.
2005 पर्यंत एवढं ध्रुवीकरण झालं नव्हतं. बॉलीवूडमध्येही अनेक नायकांचं नाव कबीर ठेवलं गेलं त्यामुळे कबीर या नावावरून कधी त्रास झाला नाही. साहिल, समर, सलील ही अशी नावं मुस्लिमेतर कुटुंबामध्ये वापरली गेलीयेत."











