‘भारत माता की जय’ या घोषणेचा जनक असलेला ‘तो’ मुस्लीम दिवाण

काही इतिहासकारांचे म्हणणे आहे की अझिमुल्लाह खान यांनीच भारत माता की जय ही मूळ घोषणा लिहिली. (सैनिकांच्या बंडाचे हाताने काढलेले चित्र)

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, काही इतिहासकारांचे म्हणणे आहे की अझिमुल्लाह खान यांनीच भारत माता की जय ही मूळ घोषणा लिहिली. (सैनिकांच्या बंडाचे हाताने काढलेले चित्र)
    • Author, अमिताभ भट्टसाली
    • Role, बीबीसी न्यूज बांगला
    • Reporting from, कोलकाता

भारतातले उजव्या विचारांचे राजकारणी आणि कार्यकर्ते सतत 'भारत माता की जय' ही घोषणा देत असतात. पण केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी केलेल्या एका दाव्यामुळे या घोषणेचं मूळ चर्चेत आलं आहे.

केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांच्या भाषणातून एक नवी गोष्ट सर्वसामान्यांपर्यत आली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने विजयन यांनी सोमवारी दिलेल्या भाषणाचं वृत्तांकन केलं आहे.

या भाषणात विजयन म्हणाले, ''संघ परिवाराचे नेते इथे आले होते आणि त्यांनी समोर बसलेल्या लोकांना 'भारत माता की जय' ही घोषणा देण्यास सांगितलं. या जयघोषाचा जनक कोण आहे हे त्यांना माहिती आहे का?

संघ परिवाराला याची माहिती आहे की नाही याची मला कल्पना नाही, मात्र या जयघोषाच्या जनकाचे नाव अझिमुल्लाह खान असे आहे.''

इतिहासानुसार अझिमुल्लाह खान हे 1857 च्या स्वातंत्र्ययुद्धातील प्रमुख व्यक्तींपैकी एक होते. या युद्धालाच सैनिकांचं बंड असंही म्हटलं जातं.

इतिहासकार आणि लेखक सैद उबैदुर रहमान यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, ''याबाबत कोणतीही शंका नाही की अझिमुल्लाह खान यांनीच 'मादर-ए-वतन हिंदुस्थान झिंदाबाद' हे घोषवाक्य सुरू केलं.''

इतिहासकारांच्या मते अझिमुल्लाह खान यांनी दिलेल्या जयघोषाचेच भाषांतर 'भारत माता की जय' असं करण्यात आलं.

मात्र इस्लामचे तज्ज्ञ असलेले मुहम्मद कमरुझ्झमान म्हणाले, ''मादर-ए-वतन हिंदुस्थान झिंदाबाद या जयघोषाचं अचूक भाषांतर मातृभूमी भारतवर्ष झिंदाबाद असं आहे.''

केरळचे मुख्यमंत्री विजयन पुढे म्हणाले की, अबिद हसन सफरानी हे मुत्सद्दी 'जय हिंद' या जयघोषाचे निर्माते होते आणि 'सारे जहाँ से अच्छा हिंदुस्थान हमारा' हे प्रसिद्ध देशभक्तीपर गीत मुहम्मद इक्बाल यांनी लिहिलं आहे.

अझिमुल्लाह खान कोण होते?

सैद उबैदुर रहमान यांच्या 'भारतीय मुसलमान स्वातंत्र्यसेनानी' या चरित्रात्मक विश्वकोशात अझिमुल्लाह खान यांच्यावर स्वतंत्र प्रकरण आहे.

त्यामध्ये लिहिललं आहे की ''अझिमुल्लाह खान हे 1857चा उठाव करणाऱ्या प्रमुख नेत्यांपैकी एक होते. असंख्य परकी भाषांवर त्यांचं प्रभुत्व होतं. यात इंग्लिश आणि फ्रेंच भाषेचादेखील समावेश आहे. इतर असंख्य स्वातंत्र्य सेनांनीना या भाषा येत नव्हत्या.''

''अझिमुल्लाह खान यांनी वरिष्ठ ब्रिटिश अधिकाऱ्यांशी चर्चा केली. ज्यावेळेस बहुतांश भारतीयांना असं वाटत होतं की ब्रिटिश सैन्य अपराजित आहे, त्यावेळेस ते तुर्कस्थान(तुर्की) आणि क्रिमिया येथे गेले, युरोपात गेले आणि त्यांनी पाहिले की ब्रिटिश सैन्याचा तिथे पराभव होतो आहे.''

''दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी ज्यांना दत्तक घेतले होते त्या नानासाहेबांचे अझिमुल्लाह दिवाण होते आणि नंतर ते त्यांचे पंतप्रधान झाले,'' असं सैद उबैदुर रहमान यांनी लिहिलं आहे.

मराठा साम्राज्याची धुरा पेशव्यांच्या हाती होती.

अझिमुल्लाह खान हे भारताच्या पहिल्या स्वातंत्र्ययुद्धाची आखणी करणाऱ्या महत्त्वाच्या व्यक्तींपैकी एक होते. (हाताने काढलेले प्रतिकात्मक चित्र)

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अझिमुल्लाह खान हे भारताच्या पहिल्या स्वातंत्र्ययुद्धाची आखणी करणाऱ्या महत्त्वाच्या व्यक्तींपैकी एक होते. (हाताने काढलेले प्रतिकात्मक चित्र)
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

हिंदू राष्ट्रवादाचे जनक मानल्या जाणाऱ्या विनायक दामोदर सावरकर यांनी त्यांच्या 'द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडेंस ऑफ 1857' (1857चे स्वातंत्र्यसमर) या पुस्तकात अझिमुल्लाह खान यांच्याबद्दल लिहिलं आहे.

''अझिमुल्लाह खान हे 1857 च्या स्वातंत्र्ययुद्धातील सर्वांत संस्मरणीय व्यक्तींपैकी एक होते. ज्या लोकांनी स्वातंत्र्युद्धाची कल्पना मांडली अशा लोकांमध्ये अझिमुल्लाह यांना विशेष स्थान दिले पाहिजे.''

बाजीराव पेशव्यांच्या (दुसऱ्या) मृत्युनंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने नानासाहेब, दत्तकपुत्र असल्याचं कारण देत त्यांची पेन्शन बंद केली होती.

असंख्य इतिहासकारांनी असे लिहिलं आहे की वारसहक्काच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी अझिमुल्लाह खान यांना नानासाहेब पेशव्यांनी इंग्लंडला पाठवलं होतं.

ते इंग्लंडमध्ये काही वर्षं राहिले होते. मात्र नानासाहेंबाती पेन्शन पुन्हा सुरू करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना यश मिळालं नाही. 1855 मध्ये ते भारतात परतले.

इंग्लिश, फ्रेंच यासह असंख्य परकी भाषांवर प्रभुत्व असले तरी अझिमुल्लाह खान यांचं बालपण अत्यंत गरिबीत गेले होते.

इतिहासकारांनी लिहिलं आहे की ते आणि त्यांच्या आईला 1837-38च्या भयंकर दुष्काळात कानपूरच्या ख्रिस्ती मिशनरीमध्ये आसरा मिळाला होता.

अझिमुल्लाह खान यांनी वेटर म्हणूनदेखील काम केलं होतं. काही काळ त्यांनी ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या घरात स्वयंपाक्याचं काम देखील केलं होतं. इतिहासकार म्हणतात, त्यांना इंग्लिश आणि फ्रेंच भाषा तिथेच शिकायला मिळाली.

इंग्लंड आणि युरोपचा दौरा करून भारतात परतल्यावर अझिमुल्लाह खान यांनी तुर्कस्थान (तुर्की) आणि क्रिमियाला भेट दिली होती. तेथून आल्यावर त्यांनी नानासाहेबांना बंड पुकारण्याचा सल्ला दिला होता.

युरोपातून परतल्यावर वृत्तपत्रांच्या माध्यमातून स्वातंत्र्याची मागणी करताना अझिमुल्लाह खान यांनी पयाम-ए-आझादी हे वृत्तपत्र देखील सुरू केलं होतं. ते उर्दू, मराठी आणि हिंदी या भाषांमध्ये प्रकाशित होत असे.

युरोपातून परतताना त्यांनी एक प्रिटिंग प्रेस देखील आणली होती आणि त्यावरच या वृत्तपत्राची छपाई होत होती.

उर्दू पत्रकारितेच्या इतिहासाचे संशोधक असलेले असद फैसल फारुकी यांनी म्हटलं आहे की, अझिमुल्लाह खान यांनी त्यांच्या वृत्तपत्राद्वारे बंड आणि स्वातंत्र्याच्या मुद्द्याचा प्रचार करण्यास सुरूवात केली होती.

''त्यांनी वृत्तपत्राच्या माध्यमातून सातत्याने मुसलमान, हिंदू आणि शिख समाजातील लोकांना प्रेरणा देण्याचं काम केलं. गंगा-यमुना संस्कृतीचा उल्लेख अझिमुल्लाह यांच्या लिखाणामधून नेहमीच व्हायचा,'' असं फारुकी सांगतात.

बंड अपयशी ठरल्यानंतर हत्तीवर बसून कानपूर सोडताना नाना साहेब. (हाताने काढलेले प्रतिकात्मक चित्र)

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, बंड अपयशी ठरल्यानंतर हत्तीवर बसून कानपूर सोडताना नाना साहेब. (हाताने काढलेले प्रतिकात्मक चित्र)

फारुकी एका गीताचा उल्लेख करतात. ज्यातील शेवटच्या दोन ओळींमध्ये अझिमुल्लाह खान यांनी कसं सर्व धर्माच्या लोकांना स्वातंत्र्यासाठी लढण्याची प्रेरणा दिली याचं वर्णन केलं आहे. त्या ओळी म्हणजे,

''हिंदू, मुस्लिम, शीख हमारा, भाई भाई प्यारा, यह आझादी का झंडा, इसे सलाम हमारा''...म्हणजेच हिंदू, मुसलमान, शिख सर्वच बंधू आणि भगिनी आहेत. आम्ही या स्वातंत्र्याच्या झेंड्याला नमन करतो.

त्याच काळात त्यांनी 'मादर-ए-वतन' ही घोषणा त्यांच्या वृत्तपत्रात लिहिली होती, असं इतिहासकार आणि लेख सैद उबैदुर रहमान सांगतात.

''ही घोषणा त्यांनीच लिहिली होती याबद्दल कोणताही वाद नाही. मात्र या जयघोषाकडे स्वतंत्रपणे पाहता कामा नये. अझिमुल्लाह खान त्यांच्या वृत्तपत्रातून नियमितपणे अशा प्रकारच्या घोषणांचं लिखाण करायचे ज्यात ब्रिटिशांविरुद्ध बंड पुकारून स्वातंत्र्यासाठी युद्ध पुकारण्याचा उल्लेख असायचा'', असं रहमान म्हणतात.

मात्र काही लोकांचं म्हणणं आहे की 'मादर-ए-वतन हिंदुस्थान झिंदाबाद' ही घोषणा अझिमुल्लाह खान यांनीच पहिल्यांदा वापरली याचा कोणताही कागदोपत्री पुरावा उपलब्ध नाही.

1857च्या स्वातंत्र्ययुद्धाची आखणी करणाऱ्या महत्त्वाच्या लोकांपैकी अझिमुल्लाह खान हे एक होते.

1857 चं बंड ब्रिटिशांनी मोडून काढल्यानंतर अझिमुल्लाह खान खूप काळ जगले नाहीत. नेपाळच्या तराई भागात 1859 मध्ये त्यांचा मृत्यू झाला.

बंड करणारे सैनिक दिल्ली ताब्यात घेताना... (हाताने काढलेले प्रतिकात्मक चित्र)

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, बंड करणारे सैनिक दिल्ली ताब्यात घेताना... (हाताने काढलेले प्रतिकात्मक चित्र)

ब्रिटिश सैन्य त्यांच्या मागावर असतानाच ते आजारी पडले. इतिहासकारांच्या मते अझिमुल्लाह खान यांचा पाठलाग ब्रिटिश सैन्य करत असल्यामुळे त्या गडबडीत त्यांच्यावर व्यवस्थित उपचार झाले नसावे.

'मादर-ए-वतन' शिवाय इतर असंख्य क्रांतिकारी घोषणा आहेत ज्या मुसलमान नेत्यांनी सुरू केल्या आहेत, असं इतिहासकार आणि लेख सैद उबैदूर रहमान सांगतात.

त्यांच्याच शब्दात, ''इन्कलाब झिंदाबाद ही घोषणा मौलाना हसरत मोहानी यांनी सुरू केली होती. ते कम्युनिस्ट पार्टीच्या संस्थापकांपैकी एक होते. तर युसुफ मेहेर अली या स्वातंत्र सैनिकाने 'भारत छोडो' ही घोषणा सुरू केली होती."

रहमान यांच्या शब्दात सांगायचे तर, ''1857चं पहिलं स्वातंत्रयुद्ध असो की 1910 ते 1947च्या काळातील स्वातंत्र्य चळवळ असो, सर्व काळ हिंदू-मुसलमान-शिख खांद्याला खांदा लावून लढले होते.''

''किती मुसलमान राष्ट्रीय कॉंग्रेसच्या अध्यक्षपदावर होते? कोणाला याबद्दल काही महिती आहे का? प्रत्येकजण एकाच व्यक्तीबद्दल बोलतो ते म्हणजे अबुल कलाम आझाद. मात्र राष्ट्रीय कॉंग्रेसच्या अध्यक्षपदावर आठ मुसलमान व्यक्ती होत्या याबद्दल किती लोकांना माहिती आहे?''

भारतमाता ही संकल्पना कशी पुढे आली

हिंदुत्ववादी संघटनांकडून राजकीय पातळीवर भारत माता या घोषणेचा देशभक्तीपर घोषणा म्हणून उल्लेख केला जातो. मात्र या घोषणेचा उल्लेख 1866च्या पूर्वी सापडत नाही.

हिंदुत्वाच्या राजकारणाच्या अभ्यासक असलेल्या स्निगधेंदू भट्टाचार्य यांच्या मते, ''1866 मध्ये बंगालमध्ये भारत माता ही संकल्पना भुदेव मुखोपाध्याय यांनी लिहिलेल्या कृष्णवैपयना वेदव्यास या नवव्या पुराण पुस्तकातून समोर आली.''

''त्याच्या पुढील वर्षीच द्विजेंद्रनाथ टागोर यांनी हिंदू मेळ्याच्या उद्घाटन प्रसंगी त्यांचे 'मालिन मुखचंद्र, मा भारत तोमारी' हे गीत सादर केलं.''

''बिपिन चंद्र पाल यांनी लिहिलेल्या या गीताचा वापर 1873 मध्ये किरणचंद्र बंद्योपाध्याय यांच्या 'भारत माता' या नाटकात करण्यात आला होता. 'भारत मातर जय' याचा नेमका घोषणा म्हणून त्या काळात बंगालमध्ये वापर झाला की नाही याबद्दल स्पष्टता नाही. पण बंकिमचंद्र यांच्या वंदे मातरमला लोकप्रियता मिळाली.''

''1860 पूर्वी बंगाल किंवा भारताच्या इतर भागात 'भारत माता' या घोषणेचा वापर झाल्याचे कोठेही आढळून येत नाही. त्यामुळे जर अझिमुल्लाह खान यांनी मादर-ए-वतन हिंदूस्थान झिंदाबाद या घोषणेचा वापर केला असेल तर या देशभक्तीपर घोषणेचे तेच जनक आहेत'', असं स्निगधेंदू भट्टाचार्य म्हणतात.

भारतमाता

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, भारतमाता (फाईल फोटो)

अबनिंद्रनाथ टागोर यांनी 1905 मध्ये पहिले भारत मातेचं चित्र तयार केलं. स्निगधेंदू भट्टाचार्य पुढे सांगतात, ''भारत माता की जय आणि मादर-ए-वतन हिंदुस्थान या दोन्ही घोषणा एकच आहेत. मात्र हिंदुत्वाच्या दृष्टीकोनातून त्या वेगवेगळ्या आहेत.''

''19व्या शतकाच्या उत्तरार्धात बंगालमध्ये भारतीय राष्ट्रवाद, हिंदू राष्ट्रवाद आणि बंगाली राष्ट्रवादाचा जन्म झाला. त्यानंतर लवकरच भारतीय राष्ट्रवाद, हिंदू राष्ट्रवाद आणि प्रांतिक राष्ट्रवादाचा उदय होत सर्वत्र प्रसार झाला.''

''ज्याप्रमाणे अवन टागोर यांच्या भारत माताचं मूळनाव बंगमाता होतं त्याचप्रमाणे बंकिम चंद्र चॅटर्जी यांचं बंदेमातरम ही 'बंगमाता'ची वंदना आहे.''

''राष्ट्रीय कॉंग्रेसने इतर सर्व राष्ट्रीय प्रवृत्तींना भारतीय राष्ट्रवादामध्ये संमेलित करून घेण्याचे प्रयत्न केले. भारतीय राष्ट्रवाद्यांकडून भारत आणि हिंदुस्थान या दोन्हींचा वापर करण्यात येतो कारण या देशात सर्व वंश, धर्म, भाषा आणि संस्कृतीचा समावेश आहे.''

''मात्र हिंदू राष्ट्रवाद्यांकडून हिंदुस्थान तितक्याशा प्रभावीपणे वापरला जात नाही. कारण त्यांच्या संबोधनात उर्दू किंवा फारसी भाषेला स्थान नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी मादर-ए-वतन हिंदुस्थान आणि भारतमाता या दोन्ही गोष्टी एकच नाहीत. मादर-ए-वतन हिंदुस्थान या घोषणेवर हिंदुत्ववाद्यांकडून आक्षेप घेतला जातो. मुसलमान भारत माता म्हणू इच्छित नाही असा तर्क त्यामागे दिला जातो,'' असं भट्टाचार्य सांगतात.

ईस्लामचे तज्ज्ञ असलेले मुहम्मद कमरुझमान म्हणतात हादिसमध्ये देशावर मातृभूमी म्हणून प्रेम करावं असं म्हटलं आहे.

कमरुझमान यांची राजकीय ओळख देखील आहे. ते ऑल बंगाल मायनॉरिटी युथ फेडरेशनचे प्रमुखदेखील आहेत. मात्र त्यांचं शिक्षण पूर्वीच्या आलियाह मदरशात झालं असून ते आता कोलकात्यातील आलियाह विद्यापीठ म्हणून ओळखलं जातं.

ते सांगतात, ''हदीसमध्ये हुबुल वतनचा उल्लेख आहे. वतन म्हणजे मातृभूमी आणि हुबुल म्हणजे प्रेम. म्हणजेच मातृभूमीसाठीचे प्रेम हा या धर्माचा एक भाग आहे.''

मात्र ते हेदेखील स्पष्ट करतात की 'भारत माता की जय' ही घोषणा आता राजकीय हेतूने वापरली जाते.

तज्ज्ञांचं म्हणणं आहे की मुसलमानांचा या घोषणेला विरोध आहे कारण हिंदुत्ववादी या घोषणेचा वापर राजकारणासाठी करतात.