Hitler: ज्यूंची छळछावणी उभारणाऱ्या नाझी अधिकाऱ्यांचं थडगं फोडलं

हायड्रिखचं थडगं इथं होतं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, हायड्रिखचं थडगं इथं होतं.

हिटलरच्या अतिशय जवळच्या मानल्या जाणाऱ्या नाझी अधिकाऱ्याचं थडगं कुणीतरी उघडल्याचं आढळून आलं आहे.

राइनहार्ट हायड्रिख हा SS या संघटनेतील अधिकारी होता. 1942 साली चेकोस्लोव्हाकियाच्या समर्थकांनी राइनहार्ट हायड्रिखची हत्या केली होती.

सेंट्रल बर्लिनमधील 'Invalids' दफनभूमीमधील हायड्रिखचं थडगं फोडलं असल्याची माहिती इथल्या एका कर्मचाऱ्यानं दिली. या थडग्यामधून त्याचे कोणतेही अवशेष काढून नेण्यात आले नाहीत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

नाझी जर्मनीमध्ये ज्यूंचं शिरकाण करण्यामध्ये हायड्रिख आघाडीवर होता. किंबहुना ज्यूंसाठी उभारण्यात आलेल्या छळछावण्यांच्या 'नियोजना'त त्याची भूमिका महत्त्वाची होती. जानेवारी 1942 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या वान्झे परिषदेचं अध्यक्षपद राइनहार्ट हायड्रिखनं भूषवलं होतं. याच परिषदेत हिटलरच्या ज्यूंच्या संहाराचा 'अंतिम मसुदा' निश्चित करण्यात आला होता.

हायड्रिखचं टोपणनावचं "the Butcher" म्हणजेच खाटीक असं होतं. हेन्रिच हिमलरच्या नेतृत्वाखालील SS मध्ये हायड्रिख 'राईश मेन सिक्युरिटी ऑफिस'चं नेतृत्व करत होता.

मे 1942 पर्यंत तो बोहेमिया आणि मोराव्हियामध्ये जर्मन सैन्याचं नेतृत्व करत होता. ब्रिटिशांनी प्रशिक्षित केलेल्या चेक बंडखोरांनी त्याच्या लिमोझिनवर हल्ला केला आणि त्यात तो जखमी झाल्या. उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.

हायड्रिखच्या मृत्यूनं बिथलेल्या नाझींनी लिडित्स हे चेक रिपब्लिकमधलं अख्खं गावच उद्ध्वस्त केलं. या गावातील सर्व पुरुष आणि तरुण मुलांना ठार करण्यात आलं, तर महिला आणि लहान मुलांना छळछावण्यांमध्ये नेण्यात आलं.

अशा या हायड्रिखचं थडगं नेमकं कोणी फोडलं, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. जर्मनीतील कायद्यामध्ये कोणाच्याही थडग्याशी छेडछाड करणं हा गुन्हा समजला जातो.

हायड्रिख

फोटो स्रोत, Getty Images

दुसरं महायुद्ध संपल्यानंतर मित्र राष्ट्रांनी एक आदेश जाहीर केला होता. प्रमुख नाझी नेत्यांच्या थडग्यांवर कोणत्याही पद्धतीच्या खुणा करण्यात येऊ नयेत, असं त्यात नमूद केलं होतं. नाझींबद्दल सहानुभूती बाळगणाऱ्या व्यक्तींकडून या थडग्यांचं दैवतीकरण होऊ नये, यासाठी ही खबरदारी घेण्यात आली होती.

ज्या कोणी राइनहार्ट हायड्रिखचं थडगं फोडलं आहे, त्याला ते कोणाचं थडगं आहे याची कल्पना होती, असा पोलिसांचा अंदाज आहे.

बर्लिनमधील निकोलाय दफनभूमीमध्ये 2000 साली असाच प्रकार घडला होता. डाव्या विचारांच्या एका गटानं होर्स्ट वेसेल या नाझी अधिकाऱ्याचं थडगं उघडलं होतं. 1930 साली वेसेल याचा खून करण्यात आला होता. त्यानंतर त्याला शहीद असा दर्जा देण्यात आला आणि नाझी राष्ट्रगीताचा सन्मान देऊन त्याचं दफन केलं गेलं.

या गटानं आपण वेसेलची कवटी स्प्री नदीत फेकून दिल्याचा दावा केला होता, मात्र पोलिसांनी हा दावा फेटाळून लावला. फोडलं गेलेलं थडगं हे वेसेलच्या वडिलांचं होतं आणि त्यातून काहीही हलविण्यात आलं नाही, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)