हिटलरचं स्वस्तिक : जर्मनीत नाटकावरून रंगला वाद

हिटलर

फोटो स्रोत, Steffen Kugler/getty

फोटो कॅप्शन, मॅडम तुस्साद संग्रहालयातील हिटलरच्या पुतळ्याचे संग्रहित छायाचित्र

जर्मनीचा तत्कालीन हुकूमशहा अॅडॉल्फ हिटलरच्या आयुष्यावर आधारित उपहासात्मक नाटक 'माइन काम्फ'मुळं जर्मनीत वाद निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीतही या नाटकाचा प्रयोग जर्मनीत झाला.

20 एप्रिल रोजी हिटलरच्या जन्मदिनाचं निमित्त साधून 'माइन काम्फ' या नाटकाचा प्रयोग ठेवण्यात आला होता. हिटलरच्या नाझी पक्षाचं स्वस्तिक दंडावर लावण्यास तयार असलेल्या लोकांना मोफत तिकीट दिलं जाईल अशी घोषणा 'कॉन्स्टंट्झ' थिएटरनं केली होती.

जर्मनीमध्ये हिटलर किंवा नाझी पार्टीशी निगडित चिन्हं सार्वजनिकरीत्या धारण करण्यावर बंदी आहे. या नाटकामुळं नियमांची पायमल्ली होत आहे असा आरोप थिएटरवर करण्यात आला होता. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दाखला देऊन थिएटरनं हे आरोप फेटाळून लावले.

थिएटरचं हे वागणं अभिरुचीहीन आहे असं टीकाकारांनी म्हटलं होतं.

"जर तुम्हाला आमिष दाखवण्यात आलं तर भ्रष्ट होणं किती सोपं असतं, हे आम्ही या कृतीतून दाखवलं आहे," असं स्पष्टीकरण या थिएटरनं दिलं.

या नाटकाचं तिकिट 29 युरो (अंदाजे 2400 रुपये) इतकं होतं. जे लोक हे तिकीट विकत घेतील त्यांना 'स्टार ऑफ डेव्हिड' देण्यात येईल, अशी घोषणा देखील आयोजकांनी केली होती. नाझी सैनिकांच्या छळाला बळी गेलेल्या लोकांच्या स्मृतीप्रित्यर्थ हे स्टार ऑफ डेव्हिड देण्यात आले पण स्टार ऑफ डेव्हिडपेक्षा स्वस्तिकाचीच चर्चा अधिक झाली.

हिटलर

फोटो स्रोत, Keystone/getty

तब्बल 50 जणांनी स्वस्तिक दंडावर लावून घेण्याची तयारी दाखवली. कार्यक्रम संपल्यानंतर हे स्वस्तिक आम्हाला परत करावे लागतील असं थिएटरनं आधीच जाहीर केलं होतं.

"थिएटरला त्यांच्या अभिव्यक्तीचं पूर्ण स्वातंत्र्य आहे, पण या प्रकरणात थिएटर बेजबाबदारपणे वागलं हे कबूल केलं पाहिजे." असं वक्तव्य स्थानिक महापौर अॅंड्रेयास ऑसनर यांनी केलं.

"जर या थिएटरमध्ये अतिउजव्या विचारधारेचे लोक घुसले असते आणि त्यांनी गोंधळ घातला असता तर काय झालं असतं ही कल्पना देखील सहन होत नाही," असं महापौर म्हणाले.

हिटलर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सत्तेत येण्यापूर्वी हिटलरनं तुरुंगामध्ये माइन काम्फ या पुस्तकाचं लेखन केलं होतं.

सत्तेत येण्यापूर्वी हिटलरनं तुरुंगामध्ये माइन काम्फ या पुस्तकाचं लेखन केलं होतं. त्याच पुस्तकाचं शीर्षक ठेऊन जॉर्ज टबोरी या नाटककारानं 1987मध्ये एक उपहासात्मक नाटक लिहिलं होतं. या नाटकात हिटलरला एका धडपडणारा तरुण दाखवण्यात आलं आहे. एक कलाकार म्हणून आपली ओळख निर्माण करण्यासाठी हिटलरला व्हिएना शहरात काय काय करावं लागतं याचं चित्रण या नाटकात करण्यात आलं आहे.

टबोरी हे स्वतः ज्यू होते आणि त्यांच्या कुटुंबीयांचा मृत्यू हिटलरनं तयार केलेल्या छळछावणीत झाला होता.

दिग्दर्शकाने का केलं हे कृत्य?

या नाटकाला हिटलरचं स्वस्तिक घालून अनेक जण बसले होते. ही गोष्ट भीतीदायक आणि चिंताजनक आहे. हिटलरच्या विचारधारेचं समर्थन करणारे अनेक जण आहेत, असं थिएटरनं म्हटलं.

दिग्दर्शक

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन, दिग्दर्शक सेरदार सोमांचू

या विचारधारेच्या लोकांचा लोकशाहीच्या मार्गाने विरोध करण्यासाठीच आम्ही या लोकांना बोलवलं होतं असं या नाटकाचे दिग्दर्शक सेरदार सोमांचू यांनी म्हटलं.

थोडे पैसे वाचवण्यासाठी लोक हिटलरचं चिन्ह लावायलाही तयार होतात ही गोष्ट या प्रयोगातून दिसून आल्याचं आयोजकांनी म्हटलं.

याला खरंच कला म्हणावं का?

या नाटकाचा प्रयोग करून लोकांना दंडांना हिटलरचं चिन्ह लावायला सांगणं, ही राक्षसी वृत्ती आहे असं मिनिया जॉनेक यांचं म्हणणं आहे. मिनिया या ज्यू समाजाच्या स्थानिक नेत्या आहेत. या वृत्तीला पायबंद घालायला हवा असं त्यांनी म्हटलं.

आयोजकांनी प्रसिद्धीसाठी केलेला एक स्टंट या शब्दांत या प्रयोगाचं वर्णन, द जर्मन-इस्राइली सोसायटीनं केलं आहे.

हिटलर

फोटो स्रोत, Hulton Archive

या प्रयोगाविरोधात अनेक तक्रारी आल्याची कबुली सरकारी वकिलांनी दिली आहे. पण या प्रकरणाची पुढे चौकशी होणार नसल्याचे त्यांनी सांगितलं आहे.

घटनाबाह्य चिन्हांच्या सार्वजनिक प्रदर्शनाला जर्मनीत परवानगी नाही. पण कलेच्या सादरीकरणासाठी हे करता येऊ शकतं. प्रेक्षक देखील कला निर्मितीचा एक भाग असतात त्यामुळं आयोजकांनी कुठलेही नियम तोडले नसल्याचं वकिलांनी म्हटलं आहे.

हिटलरच्या विचारधारेचं समर्थन करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होण्याच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडली आहे. काही दिवसांपूर्वी हिटलरच्या विचारधारेचं समर्थन करणाऱ्या व्यक्तीनं शिवीगाळ करत दोन तरुणांवर हल्ला केला होता. ते प्रकरण ताजं असतानाचं या प्रयोगावरून वाद निर्माण झाला आहे.

हे वाचलं का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)