मोदी, भाजप आणि संघ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना सामावून घेण्याचा प्रयत्न करत आहेत का ?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, नामदेव काटकर
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात जर 400 च्या पार खासदारांचा आकडा गेला, तर मोदी संविधान बदलतील, असं विरोधकांकडून वारंवार म्हटलं जातं.
ही भीती फोल आहे आणि आमची संविधानावर अढळ श्रद्धा आहे, हे सांगण्यासाठी पंतप्रधान मोदी म्हणाले, “संविधान हे आमच्यासाठी गीता, बायबल, कुराण सर्वकाही आहे. संविधान कुणीच बदलू शकणार नाही. साक्षात बाबासाहेब जरी आले तरी आता संविधान बदललं जाऊ शकत नाही.”
सर्वच पक्षाचे नेते कमीअधिक फरकाने बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची घोषणा करताना दिसतातच. पण संविधानावरील आपली अढळ श्रद्धा दाखवण्यासाठी पंतप्रधान मोदींनी डॉ. आंबेडकरांच्या नावाचा आवर्जून उल्लेख केला.
एकेकाळी भाजप सरकारमध्ये मंत्री असलेल्या अरुण शौरींनी ‘वरशिपिंग फॉल्स गॉड्स’ नावाचा ग्रंथ लिहून बाबासाहेबांवर टीका केल्याची आठवण अजून ताजी आहे. त्यावेळी पक्षाने यासंबंधाने, त्यांच्यावर कुठलीही कारवाई केली नाही, हा इतिहास आहे.
आज त्याच पक्षाचे नेते बाबासाहेबांचे नाव घेताना दिसत आहे, हा फरक गेल्या काही वर्षांच्या राजकारणात प्रामुख्याने दिसत आहे.
नरेंद्र मोदी ज्या भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत आणि भारतीय जनता पक्ष ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मातृसंस्था मानतं, त्यांची विचारधारा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा एका रेषेत आणली जाऊ शकत नाही, असं अनेकदा राजकीय आणि सामाजिक विषयांचे अभ्यासक मांडणी करत असतात.
मात्र, गेल्या काही वर्षांपासून आंबेडकरांना ‘सामावून’ घेण्याचा प्रयत्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून कसोशीने होताना दिसतो. विद्यमान सरसंघचालक मोहन भागवत यांनी अनेकदा आंबेडकरांबद्दल गौरोद्गार काढत, संघाचे विचार आंबेडकरांच्या विचारांना मानणारेच असल्याचं नमूद केलंय.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोहोंची विचारधारा कुठल्या मुद्द्यावर कशी राहिली आहे, कुठल्या टप्प्यावर या दोन्हींमध्ये संवाद झाला होता का, अशा गोष्टींबद्दल या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.
‘समता’ आणि ‘समरसते’च्या ध्येयात भूमिकांची बीजं
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार आणि दृष्टिकोनात साम्य असल्याचा किंवा नसल्याचा वाद जेव्हा कधी होतो, तेव्हा सर्वप्रथम ‘समता’ आणि ‘समरसता’ हे दोन शब्द समोर उभे ठाकतात.
या दोन्ही संकल्पनांच्या अर्थातील बारीकसा फरक आपल्याला समजून घ्यावा लागेल. समता म्हणजे इंग्रजीत इक्वालिटी (Equality), तर समरसता म्हणजे इंग्रजीत हार्मनी (Harmony). हा बारीक फरक या संकल्पनांमागील आंबेडकर आणि संघाता दृष्टिकोन आणि भूमिका सांगतो.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
त्यामुळेच सामाजिक विषयांच्या अभ्यासक प्रतिमा परदेशी म्हणतात की, "बाबासाहेबांनी कायम समतेचा आग्रह धरला, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समरसतेचा आग्रह धरतो. संघ समरसतेची संकल्पना वर्चस्वाच्या उद्देशानं, तर बाबासाहेब समतेची संकल्पना मुक्तीच्या उद्देशानं वापरतात."
पण या दोन्ही संकल्पनांमध्ये नेमकं अपेक्षित काय असतं, यावर प्रतिमा परदेशी सांगतात, समरसतेमध्ये तुम्ही आमच्यामध्ये समरस व्हा, हा मुख्य आशय आहे.
म्हणजे ‘आम्ही’ आणि ‘तुम्ही’ हा फरक तिथं कायम राहतोच. जिथं वर्चस्वशाली लोक आहेत, तिथं सामील होऊन आपलं अस्तित्व मिटवून टाकायचं. दुसरीकडे, समतेमध्ये तुम्हाला जगण्याचा, सन्मानाचा समान अधिकाराची आशा व्यक्त करण्यात येते.

फोटो स्रोत, Getty Images
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत सहानुभूती असलेले अभ्यासक किंवा विचारवंत ‘समरसता’ या संकल्पनेचा अर्थ आपल्या परीने समाजावून सांगताना दिसतात.
बीबीसीनं अखिल भारतीय समरसता गतीविधीच्या राष्ट्रीय कार्यमंडळाचे सदस्य असलेले प्रा. डॉ. रमेश पांडव यांच्याशी याबाबत बातचीत केली.
प्रा. डॉ. रमेश पांडव यांच्या मते, बाबासाहेबांची ‘समते’चा उद्देश आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा ‘समरसते’चा उद्देश एकसारखाच आहे.
‘समता आणू समरसतेतून...’ अशी संघाची घोषणाच आहे आणि त्यावर आधारित गीतंही आहेत. आम्हालाही समताच प्रस्थापित करायची आहे, मात्र ती समरसतेतून, हे समजून घ्या. ‘समता’ हे आमच्यासाठी गंतव्य स्थान, तर ‘समरसता’ हा तिथं पोहोचण्याचा मार्ग आहे, असं पांडव सांगतात.

फोटो स्रोत, Narendra Modi
समरसतेशिवाय सामाजिक समता प्रत्यक्षात साकारणार नाही, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही वाटत, असं प्रा. पांडव यांचं म्हणणं आहे. ते म्हणतात की, समरसतेशिवाय सामाजिक समता अशक्य, अशी आमची दुसरी घोषणाच आहे.
संघाच्या समरसतेची व्याख्या स्पष्ट करताना, प्रा. पांडव म्हणतात की, “संघाच्या मते, समरसता म्हणजे तथाकथित अनुसूचित जाती-जमातींवर प्रेम करून, त्यांचे सुख-दु:ख समजावून घेऊन, त्यांचं आरक्षण कायम ठेवून, त्यांच्या जीवनाशी समरस होऊन सगळा समाज शोषणमुक्त करणं."
आंबेडकर ज्या बुद्धांना सर्वोच्च मानतात, त्या बुद्धानेही हाच विचार मांडल्याचं सांगत प्रा. पांडव म्हणतात की, “तुझं दु:ख ते माझं दु:ख, तुझं सुख ते माझं सुख हे गौतम बुद्ध म्हणतात आणि हेच संघाच्या समरसतेत अपेक्षित आहे.”

याच मुद्द्यावर भारतातील ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांच्याशीही बीबीसीनं बातचित केली.
डॉ. रावसाहेब कसबे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दत्तोपंत ठेंगडी यांच्या नावाचा उल्लेख करतात. 1985 साली याच दत्तोपंत ठेंगडी यांनी सामाजिक समरसता मंचाची स्थापना केली. संघाच्या विचाविश्वात ‘समरसता’ हा शब्द आणि संकल्पना अधिक दृढ झाली, ती तेव्हापासूनच.
डॉ. रावसाहेब कसबे सांगतात की, “दत्तोपंत ठेंगडींनी सामाजिक सरसता मंचाची स्थापना करताना केलेल्या भाषणात म्हटलं होतं की, समरतेशिवाय समता नाही. खरंतर हे उलट हवं. समरसता म्हणजे एकजीव होणं आणि समता म्हणजे समान असणं. मग समतेशिवाय समरसता कशी होऊ शकते? म्हणजे दत्तोपंत ठेंगडी हे शीर्षासन करून उभे आहेत.”
समरसता निर्माण होण्याची पूर्वअट सामाजिक, राजकीय आणि आर्थिक समता असल्याचं डॉ. रावसाहेब कसबे अधोरेखित करतात.
‘बाबासाहेब आणि संघाचं ध्येय एक नव्हतं’
समता आणि समरसता या दोन्ही संकल्पनांमध्ये तफावत आहे, त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या भूमिकांमध्ये तफावत आहे, अशी मांडणी डॉ. उमेश बगाडे करतात.
डॉ. उमेश बगाडे हे इतिहास संशोधक आणि विचारवंत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील इतिहास आणि प्राचीन भारतीय संस्कृती विभागाचे ते प्रमुख होते.
डॉ. बगाडे हे बाबासाहेबांची समतेची संकल्पना अधिक सखोलपणे सांगू पाहतात. ते म्हणतात की, “जन्माने आलेली विषमता (जात, धर्म इत्यादी), वारशातून आलेली विषमता (संपत्ती, ज्ञान इत्यादी) आणि कर्तृत्वामुळे आलेली विषमता अशा तीन भागात बाबासाहेब हे विषमतेला पाहत होते. यातल्या कर्तृत्वामुळे आलेल्या विषमतेपेक्षा पहिल्या दोन म्हणजेच जन्माने आणि वारशाने आलेल्या विषमतेबाबत त्यांचं स्पष्ट मत होतं की, यांचा अंत व्हायला हवा. त्यासाठीच त्यांचे सर्व प्रयत्न झालेले दिसतात. त्याचवेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक राहिलेले माधव सदाशिव गोळवलकर हे या पहिल्या दोन्ही विषमतांना ‘नैसर्गिक’ म्हणतात.”

फोटो स्रोत, ANI
बाबासाहेब ‘समता’ या मूल्य किंवा संकल्पनेकडे या पातळीवर आणि या दृष्टीने पाहत असताना, या विषमतेत समरस होण्यास ते कसे तयार असू शकले असते? त्यामुळे समता आणि समरसता, पर्यायानं बाबासाहेब आणि संघ यांचे ध्येय एक होते, असं म्हणता येणार नाही, असं डॉ. उमेश बगाडे म्हणतात.
बाबासाहेबांनी ‘वैतागून’ हिंदू धर्म सोडला?
हिंदू धर्म आणि जातीय उतरंड या मुद्द्यावरही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भूमिका विरोधी असल्याचं अभ्यासकांना वाटतं. अर्थात, संघाशी संबंधित विचारवंत मात्र बाबासाहेबांच्या हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्म स्वीकारण्याच्या निर्णयाला वेगळ्या पद्धतीने पाहतात.
13 ऑक्टोबर 1935 रोजी नाशिकमधील येवला इथं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं की, हिंदू म्हणून जन्माला आलो, परंतु हिंदू म्हणून मरणार नाही.
तत्पूर्वी, दोन मोठी आंदोलनं बाबासाहेबांनी केली होती. पहिलं म्हणजे 1927 सालचं महाडच्या चवदार तळ्याचं आंदोलन आणि दुसरं 1930 सालचं नाशिकमधीलच काळाराम मंदिर प्रवेशाचं आंदोलन.

येवल्यातील हिंदू धर्माबाबतचं त्यांचं विधान हे या दोन मोठ्या आणि क्रांतिकारी आंदोलनांनंतर झालेलं आहे. हे अनेक अर्थांनी महत्त्वाचं आहे. त्याचा संदर्भ आपल्याला पुढे लागेलच.
तत्पूर्वी, आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं येवल्यातील बाबासाहेबांच्या विधानावर, तसंच महाड आणि काळाराम मंदिराच्या आंदोलनांवर काय म्हणणं आहे, पाहूया.
याचं कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं ध्येयही ‘हिंदू संघटन’ असल्याचं मांडणी करतं. अशावेळी येवल्यातील बाबासाहेबांचं विधान या मांडणीला विरोधाभासी असणारं आहे.
डॉ. रमेश पांडव म्हणतात की, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं ‘हिंदू संघटन’ हे उपकरण निवडलं आणि ‘परम वैभव’ हे ध्येय ठरवलंय. आता महाडच्या चवदार तळ्याच्या सभेत बाबासाहेब म्हणतात की, ही सभा हिंदू संघटन करण्यासाठी बोलावण्यात आलीय.”
तसंच, प्रा. पांडव पुढे सांगतात की, “1925 साली डॉ. केशव बळीराम हेडगेवारांनी संघाची स्थापना केली. नाव ठरवायला 1927 उजाडलं. इकडे डॉ. हेडगेवारांनी हिंदू समाजसुधारणा करण्यास सुरुवात केली आणि तिकडे त्याचवेळी बाबासाहेबांनी हिंदू संघटनाचं वक्तव्य केलं होतं. हा निव्वळ योगायोग नव्हता.
“बाबासाहेबांनी 1935 सालापर्यंत त्यांच्या पद्धतीने महाडच्या चवदार तलावाचा सत्याग्रह केला, तसा काळाराम मंदिराचा सत्याग्रहही केला. यातून हिंदुत्वावर त्यांनी अधिकार सांगितला. एवढं सगळं करूनही 1935 सालापर्यंत बाबासाहेबांना असे अनुभव आले की, हिंदू समाजातील पुढाऱ्यांना आपलं कार्य कळत नाही. म्हणून येवल्यात घोषणा केली की, हिंदू म्हणून जन्मलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही.”

फोटो स्रोत, Getty Images
बाबासाहेबांना हिंदू धर्माअंतर्गत अपेक्षित असलेले बदल होत नव्हते, म्हणून वैतागून गेले आणि मग पुढे ते धर्मांतरापर्यंत पोहोचले, असंही प्रा. डॉ. रमेश पांडव म्हणतात.
पण डॉ. रावसाहेब कसबेंच्या मते, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला कधीच आपुलकी दाखवली नाही. तसा कुठलाच संदर्भ सापडत नाही. ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय नागपूरमध्ये होतं, तिथेच बाबासाहेबांनी धम्मदीक्षेचा कार्यक्रम घेत लाखोंच्या संख्येतील अनुयायांसह धर्मांतर केलं.
‘धर्मांतर नव्हे, जातीअंत बाबासाहेबांचं अंतिम ध्येय होतं’
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 1935 साली हिंदू धर्म सोडण्याची घोषणा केली आणि 1956 साली हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्म स्वीकारला.
डॉ. पांडव म्हणतात तसं, बाबासाहेबांनी ‘वैतागून’ हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्म स्वीकारला की, त्यामागे काही ठोस कारण होतं, मांडणी होती, याबाबत डॉ. उमेश बगाडे यांना विचारलं असता, त्यांनी धर्मांतराचं मूळ कारण आणि पर्यायानं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हिंदू धर्मातला अपुरेपणा स्पष्ट करतात.
‘फिलॉसॉफी ऑफ हिंदूइझम’ हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक त्यांच्या हिंदू धर्माविषयक मांडणी आणि अंतिमत: धर्मांतराचा निर्णय समजून घेण्यासाठी महत्त्वाचं ठरतं. डॉ. बगाडे हे याच पुस्तकाचा दाखला देतात आणि त्यातील मांडणी विशद करून सांगतात.
डॉ. बगाडे म्हणतात की, बाबासाहेब हिंदू धर्माचं विश्लेषण दोन प्रकारे करू पाहत होते. एक म्हणजे उपयुक्तता (Utility) आणि न्याय (Justice). न्यायाच्या संकल्पनेत त्यांना स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे मूल्य अपेक्षित होते.

फोटो स्रोत, VIJAY SURWADE
धर्मांतरापूर्वीपर्यंत बाबासाहेबांनी केलेली आंदोलनं, त्यांना आलेले अनुभव आणि केलेली भाषणं पाहता, त्यांना उपयुक्तता आणि न्याय या त्यांच्या दोन्ही कसोट्यांवर हिंदू धर्म तगू शकला नाही. म्हणूनच ते ‘रिडल्स इन हिंदूइझम’मध्ये हिंदू धर्मातल्या सामाजिक रचनेवर टीकात्मक लेखन करतात.
डॉ. बगाडे म्हणतात, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या एकूण सामाजिक चळवळींचा अंतिम हेतू हा काही धर्मांतर करणं हा नव्हता, तर जातीअंत हा होता आणि तो हिंदू धर्मात शक्य नाही, हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी इतर धर्मांची चाचपणी सुरुवात केली. हे आपल्याला ठामपणे यामुळेही म्हणता येतं की, जेव्हा त्यांनी हिंदू धर्म सोडून इतर धर्मांची चाचपणी सुरू केली, तेव्हा सुरुवातीला शीख धर्माचा अभ्यास करण्यास तुकडी पाठवली.
“पंजाबमध्येही बाबासाहेबांचे मंगुराम नामक सहकारी होते. तिथल्या अभ्यासात असं लक्षात आलं की, शीख धर्मीयांमध्येही व्यवहारात जातपात पाळली जातेच आहे, म्हणून त्या धर्मासही त्यांनी नकार दिला. असाच अभ्यास करत त्यांनी अखेरीस बौद्ध धर्म निवडला. हे आपण यासाठी समजून घेतलं पाहिजे की, हिंदू धर्मातल्या जातींबाबत त्यांचा मुख्य आक्षेप होता आणि त्यांचा अंतिम हेतू जातीअंताचा होता आणि तो हिंदू धर्मात साध्य झाला नसता.”
एकूणच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मांडणीतून बाबासाहेबांना हिंदू धर्मावर रोष नव्हता, असं सांगितलं जात असलं, तरी डॉ. रावसाहेब कसबे आणि डॉ. उमेश बगाडे यांच्यासारख्या ज्येष्ठ अभ्यासकांच्या मते, तसा रोष होताच म्हणून ते धर्मांतरापर्यंत पोहोचले.
याचाच दुसरा अर्थ असा की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीत मुलभूत तफावत होती, या दोहोंच्या अंतिम उद्दिष्टच वेगळे होते.
बाबासाहेबांनी संघाच्या शाखेला भेट दिली होती का?
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेला भेट दिली होती, असा एक दावा कायम संघ स्वयंसेवकांकडून केला जातो.
डॉ. रमेश पांडव यांनी बीबीसीशी बोलतानाही या दाव्याचा उल्लेख केला. ते म्हणाले की, 12 मे 1939 मध्ये पुण्यातील कॅम्पमध्ये संघ शिक्षा वर्ग भरलं होतं. तिथं बाबासाहेबांनी उन्हाळी प्रशिक्षण वर्गाला भेट दिली. माजी खासदार बाळासाहेब साळुंखेंच्या ‘आमचं सायेब’ या पुस्तकात उल्लेख आहे.

या पुस्तकात पान क्रमांक 25 वर उल्लेख आहे की, ‘पुणे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व डॉ. हेडगेवार, संस्थापक रा. स्व. सं. यांची भाऊसाहेब गडकरी यांचे बंगल्यावर मुलाखत झाली. मग भाऊसाहेब अभ्यंकर यांनी श्री. बाळासाहेब साळुंके यांचेसह भावे स्कूलमध्ये भरलेले स्वयंसेवक उन्हाळी शिबिरास भेटीसाठी नेले. लष्करी शिस्त व संघटनेवर बाबासाहेबांचे भाषण झाले.’
मात्र, यासंबंधी अधिकचा तपशील या पुस्तकात किंवा इतरत्र सापडत नाही.
डॉ. रावसाहेब कसबे यांना बीबीसीनं याबाबत विचारलं असता, ते म्हणाले, “बाबासाहेब आंबेडकरांचं समग्र लेखन मी वाचलेलं आहे. त्यांच्या कुठल्याही ग्रंथामध्ये असा उल्लेख नाही की, बाबासाहेब आंबेडकरांनी संघाच्या शाखेला भेट दिली. हा प्रचार धादांत खोटा आहे.”
गांधींनी एकदा भेट दिली होती, हे खरं आहे. पण आंबेडकरांनी कधीच भेट दिली नाही, असंही डॉ. कसबे सांगतात.
(बीबीसी मराठीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











