'या' मराठी व्यावसायिकांना महाराष्ट्र सोडून गुजरात का जवळचं वाटलं?

सुरत कापड व्यावसायिक
फोटो कॅप्शन, सुरतमधले कापड व्यावसायिक दिनेश कटारिया
    • Author, अनघा पाठक
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
    • Reporting from, सुरत

“बऱ्याच गोष्टी महाराष्ट्रात नव्हत्या, म्हणून तर इथे यावं लागलं ना,” सुरतमध्ये भेटलेले एक मराठी कापड व्यावसायिक सांगत होते.

महाराष्ट्रातून गुजरातमध्ये वेंदाता फॉक्सकॉन, टाटा एअरबस असे मोठे प्रोजेक्टस गेले आणि महाराष्ट्रात गदारोळ झाला. गुजरातमध्ये महाराष्ट्रातूनच नाही, देशभरातून लहान-मोठे प्रोजेक्ट येत असतात.

पण त्याचबरोबरीने शेकडो लहान-मोठे व्यावसायिकही गुजरातमध्ये दरवर्षी येतात आपला व्यवसाय वाढवण्यासाठी. त्यात मराठी व्यावसायिकही आलेच.

त्यातल्याच काहींना भेटून हे जाणण्याचा प्रयत्न केला की त्यांना महाराष्ट्रसोडून गुजरात का जवळचं वाटलं?

सुरतमध्येच भेटले दिनेश कटारिया. आडनावाने मराठी नसतील, तर स्वभावाने, गुणांनी पूर्ण मराठी. 30 वर्षांपूर्वी ते अहमदनगर सोडून व्यवसायासाठी गुजरातमध्ये स्थायिक झाले.

भेटल्यावर मराठीतच प्रश्न विचारला, 'काय कसं काय?' तर कोणीतरी मराठी बोलणारं भेटलं म्हणून आनंदित झाले.

तुम्हीही मराठी अस्खलित बोलता म्हटल्यावर उत्तर आलं, “प्रश्नच नाही. मी आतून-बाहेरून मराठी माणूस आहे. आजही शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय आमचा दिवस सुरू होत नाही. पहा दाढीही त्यांच्यासारखी ठेवलीये.”

सिंथेटिक कापडाचे धागे

कटारियांच्या कुटुंबाचा हातमाग, यंत्रमागाचा पिढीजात व्यवसाय अहमदनगरमध्ये होता. रंगीत साड्या, नऊवारी साड्या आणि इतर प्रकारचं कापड त्यांचा परिवार बनवायचा. त्यामुळे अनेक कामगारांना रोजगारही मिळायचा.

मग सगळं सोडून गुजरात का गाठलं असं विचारल्यावर म्हणाले, “खरं सांगायचं तर इकडे येऊ असा विचारच कधी केला नव्हता. पण कामगारांचा प्रॉब्लेम, ज्याप्रकारे विकास व्हायला हवा तसा न होणं, सुतगिरण्या बंद पडणं, त्याकाळी आम्ही मुंबईच्या सुतगिरण्यांना कच्चा माल पुरवायचो, पण जशा त्या बंद पडल्या, आमचाही धंदा बंद पडला. महाराष्ट्राच्या कापड व्यवसायाची घडीच बिघडत गेली.”

ते थोडं इतिहासात डोकावूनही आपले अनुभव सांगतात. “आज टेक्सटाईलमध्ये देशात लोक सुरतचं नाव घेतात. पण जेव्हा सुरतमध्ये काहीच नव्हतं, तेव्हा मुंबई या क्षेत्राची राणी होतं. मुळात कापड व्यवसायाची पायाभरणी या देशात महाराष्ट्रानेच केली.

सूतगिरणीची जी एक संकल्पना आहे ती महाराष्ट्राने डेव्हलप केलेली आहे. महाराष्ट्राच्या लोकांनी टेक्सटाईलला सुरुवातीला फार वाव दिला. पण नंतर या व्यवसायाकडे एवढं मोठं दुर्लक्ष झालं.”

याचमुळे महाराष्ट्रातले अनेक व्यापारी, यंत्रमाग मालक सुरतला येऊन स्थायिक झाले असं ते म्हणतात. आज सुरतमध्ये शेकडो मराठी व्यापारी आहेत, जे महाराष्ट्र सोडून इथे स्थायिक झालेले आहेत.

महाराष्ट्र-गुजरात
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

राजकीय इच्छाशक्तीचा अभाव हेही एक महत्त्वाचं कारण असल्याचं दिनेश सांगतात.

“कोणत्याही सिस्टीमला विकसित करायचं असेल तर त्याला फार मोठी राजकीय इच्छाशक्ती लागते. राजकीय लोकांचं पाठबळ जर नसेल तर त्याचं नुकसान आपल्या सगळया लोकांना भोगावं लागतं.”

“तात्विक राजकारण कधीही कोणत्याही इंडस्ट्रीसाठी घातक आणि घातकच ठरतं. स्थानिक गुंडांचा कामात हस्तक्षेप असतो. त्यांना वाटतं की या माणसाला अडवलं तर मला पैसे मिळतील, माझी वट वाढेल, असे लोक उगाच अडचणी निर्माण करतात. पण त्या अडवण्यामुळे तो व्यावसायिक पर्यायी रस्ते शोधायला लागतो. जर त्याच्या हातात नवा रस्ता लागला, तर तो लगेच तिकडे निघून जातो कारण तो एक व्यापारी आहे. त्याला भांडण नाही, व्यवसाय करायचा आहे आणि महाराष्ट्रात हेच झालं,” ते म्हणतात.

आज दिनेश यांना सुरतमध्ये व्यवसाय सुरू करून 30 वर्षं झाली. त्याआधी त्यांनी अहमदनगर आणि नंतर मालेगावमध्ये जम बसवण्याचा बराच प्रयत्न केला ते होऊ शकलं नाही असं ते सांगतात.

मुंबई आणि महाराष्ट्राचं महत्त्व कमी करुन गुजरातचं महत्व वाढवलं जातं आहे, अशा प्रकारचा सूर महाराष्ट्रात कानी पडतोय. लोकसभा, विधानसभेपासून प्रचाराच्या सभेपासून सगळीकडे तो मुद्दा येतो. त्याचं राजकीय स्वरुप प्रामुख्यानं शिवसेना विरुद्ध भाजपा असं राहिलं.

पण मुंबईचं, किंवा महाराष्ट्रातचं तिथल्याच लोकांनी, विशेषतः राजकारण्यांनी केलं असा इथल्या स्थानिक व्यापाऱ्यांचा स्वर आहे.

सुरतमध्ये कापड उद्योगात असलेले दुसरे मराठी व्यापारी बाळकृष्ण पाटील (त्यांच्या विनंतीवरून नाव बदललं आहे) म्हणतात, “गुजरातमध्ये व्यवसाय करताना सरकार संपूर्ण सहकार्य करेल ही खात्री असते, महाराष्ट्रत मदत कमी आणि खोळंबाच जास्त असतो. कोणता माणूस यांच्या मर्जीखातर स्वतःचं नुकसान करून घेईल?”

कापड
फोटो कॅप्शन, सुरत कापड उद्योगाचं देशातलं एक प्रमुख केंद्र आहे

ज्याला पाटील ‘सहकार्य’ म्हणतात, त्यालाच काही लोक ‘रेवडीही’ म्हणतात.

गुजरातच्या अर्थनीतिची समीक्षा करणा-या प्राध्यापक हेमंतकुमार शाह यांनी बीबीसी मराठीच्या मयुरेश कोण्णूर यांच्याशी बोलताना म्हटलं, “गुजरातचं 2015 आणि 2020 चं औद्योगिक धोरण पाहा किंवा अगदी महिन्याभरापूर्वी जाहीर झालेली लॉजिस्टिक्स पॉलिसी पाहा. तुम्हाला समजेल की कितीतरी पट अधिक सबसिडी, म्हणजेच 'रेवडी', उद्योजकांना वाटली जाते आहे.”

पण त्यात काय चुकींचं आहे असा प्रश्न हे व्यावसायिक विचारतात.

“तुम्ही कामगारांच्या भल्यासाठी कामगार कायदे आणता, त्यांच्यासाठी नवीन योजना आणता. त्यात चुकीचं काहीच नाही, तसं व्हायला हवंच, पण मग व्यावसायिकांना आणि व्यापाऱ्यांना काही सोयीसुविधा, सबसिडी मिळाल्या तर चुकलं काय,” पाटील विचारतात.

मुद्दा फक्त सबसिडीपुरताच मर्यादित नाहीये. गुजरातमध्ये कोणताही व्यवसाय सुरू करायचा असेल तर एक क्लस्टर आधीच अस्तित्वात असतं. लागणाऱ्या सगळ्या गोष्टी, दळणवळणाच्या सुविधा सगळं जागेवर मिळतं म्हणून लोक इथे येतात असंही काहींचं म्हणणं आहे.

दिनेश म्हणतात, “सुरत एक नावाला सेंटर आहे पण सुरतच्या अवतीभोवतीचे पॉकेट्स ते सगळे टेक्सटाईलशी संबंधित आहेत. माझ्या यंत्रातली सुई खराब झाली तर रात्री 2 ला मला ती उपलब्ध आहे. सुरत जॉबवर्क डेव्हलपमेंटचं केंद्र आहे.

इथे प्रत्येक माणसाच्या हाताला काम आहे. माणसाची कमाई कधी होते, जेव्हा सगळ्या बाजूंनी काम मिळतं आणि घरातले सगळे काम करतात. इथे कामगारांच्या बायकांच्या हातालाही काम आहे, त्यामुळे कमाई आहे. महाराष्ट्रात कधी असा विकास करण्यासाठी प्रयत्नच झाले नाहीत.”

कापड उद्योग

फोटो स्रोत, Getty Images

आज सुरतमध्ये कापड उद्योगात जवळपास 15 लाख लोक काम करतात. देशभरातून इथे मजूर, कामगार, व्यावसायिक आलेले आहेत.

इथे दररोज 4 कोटी मीटर सिथेंटिक कापड बनतं असं म्हणतात. सिंथेटिक कापड म्हणजे मानवनिर्मित धाग्यांपासून बनलेलं कापड, यात कापूस वापरला जात नाही. कदाचित त्यामुळे देशभरातल्या हातमाग विणकरांचा किंवा नैसर्गिक कापड बनवणाऱ्यांचा सुरतवर रोष असतो. सुरतने आपल्या व्यवसायावर गदा आणली असं त्यांना वाटतं, पण यावर सुरतचं काय म्हणणं आहे?

हा प्रश्न ऐकल्यावर दक्षिण सुरत चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आशिष गुजराथी हलकसं स्मित देतात.

“तुम्ही हॅण्डलुमची एक साडी खरेदी करायला गेलात तरी तिची किंमत किमान 20 हजार असते. तुम्हाला चांगल्यातली हवी असेल तर 50 हजारापासून सुरू होते. या साड्या किंवा हे कपडे फक्त श्रीमंत वर्ग वापरू शकतो.”

आशिष गुजराथी
फोटो कॅप्शन, आशिष गुजराथी

“सुरतने काय केलं तर चांगले कपडे, फॅशन मध्यमवर्गीय आणि निम्न मध्यमवर्गीयांच्या आवाक्यात आणून ठेवले. पूर्वी लग्नकार्यात एखादी साडी घेतली जात असेल तर आता या वर्गातले लोक दहा साड्या घेऊ शकतात. आमची एक साडी तुम्हाला रिटेल काऊंटरला दीडशे रूपयाला मिळेल. राहाता राहिला हॅण्डलुमचा प्रश्न तर त्यांच्यासाठी जिओ टॅगिंग, सरकारी योजना, निर्यातीला प्रोत्साहन अशा सुविधा आहेतच की.”

साड्यांच्या घटत्या मागणींचं आव्हान

साडीचे मुख्य उत्पादन असलेल्या सुरतमध्ये आता एक नवीन आव्हान तयार झालंय. साड्यांच्याच घटत्या मागणीचं. त्यामुळे इथल्या उत्पन्नावर मोठा परिणाम होतोय.

इथल्या लक्ष्मीपती मिल्सचे मालक संजय सरावगी बीबीसी मराठीशी बोलताना म्हणतात, “आजवर सुरतचं सगळं लक्ष डोमेस्टिक मार्केट, म्हणजे देशांतर्गत बाजारात होतं. इथलं कोअर प्रोडक्ट म्हणजे साडी. पण गेल्या काही वर्षांत त्याची मागणी घसरतेय.

आधुनिकीकरण होतंय, नव्या मुलींना साडी नेसून वावरताना कंफर्टेबल वाटत नाही त्यात ऑफिसला जाणाऱ्या बायका साडी टाळतात. त्यामुळे आता आम्हाला नव्या गोष्टींकडे लक्ष केंद्रीत करायचं आहे.”

संजय सरावगी
फोटो कॅप्शन, संजय सरावगी

या नव्या गोष्टी काय तर टेक्निकल टेक्सटाईल. म्हणजे अंगावर घातले जाणारे कपडे सोडून इतर सर्व ठिकाणी वापरलं जाणारं कापड. म्हणजे पॅराशूटपासून सोफ्याच्या कव्हरपर्यंत.

या टेक्निकल टेक्सटाईलसाठी सुरतला आता सरकारी बूस्ट हवाय. तो मिळाला तर चीनलाही आपण मागे टाकू शकतो असा त्यांना विश्वास आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)