गुजरात निवडणूक : सुरत भारतातलं प्रचंड श्रीमंत शहर का बनलं? इथल्या हिरे उद्योगाचा इतिहास

हिऱ्याची पारख करताना व्यापारी
    • Author, अनघा पाठक
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
    • Reporting from, सुरत, गुजरात

सुरत, भारताची डायमंड कॅपिटल... तसं पाहिलं तर भारताचीच नाही तर जगाची डायमंड कॅपिटल. कारण असं म्हणतात की जगात जर 10 हिरे बनत असतील तर त्यातल्या 9 हिऱ्यांना पैलू पाडण्याचं काम सुरतमध्ये होतं.

सुरतमध्ये हिऱ्यांच्या खाणीही नाहीत आणि सुरतमध्ये दागिने बनवण्याचा-विकण्याचा मोठा व्यवसायही नाही.

पण कित्येक लाख कोटी रुपयांचा हा व्यवसाय चालतो ते पैलू न पाडलेले हिरे (ज्यांना रॉ स्टोन्स असंही म्हणतात) जगभरातून ठोक भावाने आणणं आणि त्यांना पैलू पाडून, पॉलिश करून, त्यांची कट क्लॅरिटी ठरवून बाहेर विकणं यावर.

सुरतमधल्या एका भल्यामोठ्या कंपनीच्या (16 हजार कोटी टर्नओव्हर असणाऱ्या) एका अधिकाऱ्यांनी मला सांगितलं की “आम्ही आफ्रिकेतून किंवा इतर खाणीतून रॉ स्टोन विकत घेतो, तेव्हा ते सांगतील ती किंमत देतो, आणि हिऱ्यावरची संपूर्ण प्रक्रिया झाली की पुन्हा जागतिक बाजारपेठेत विकतो. तेव्हा आम्ही सांगू ती किंमत असते.”

या शहरात कमीत कमी 100 तरी अशा महाकाय कंपन्या असतील. लहान-मोठे व्यापारी तर सोडूनच द्या.

एखाद्या लहानशा देशाचा जीडीपी असेल इतका पैसा सुरतमध्ये हिऱ्यांच्या व्यापारात खेळतो.

इथे दोन स्थानिक डायमंड मार्कट्सही आहेत. तिथे गेलं की आश्चर्य वाटल्यावाचून राहात नाही. अगदी रस्त्यावर बसून, लहानशा टपरीतून हिऱ्यांचे व्यापार चालत असतात.

इथे बसणारे सगळे व्यापारी आणि ब्रोकर. बाकी सगळी प्रक्रिया मोठ्या कंपन्यांसारखीच, की बुवा रॉ स्टोन विकत घ्यायचे, स्थानिक कारागिरांकडून त्यावर काम करून घ्यायचं आणि मग पुन्हा बाहेर विकायचे. पण हे हिरे सहसा देशांतर्गत बाजारात विकले जातात. फरक इतकाच की यांचा आवका लहान आहे.

स्थानिक बाजारात येणारे हिरे अगदी 0.01 कॅरेट इतके लहान असतात. सुरतेत दोन स्थानिक बाजार आहेत. वरछा आणि महिधरपुरा. आम्ही वराछा बाजारात गेलो होतो.

हा स्थानिक बाजार म्हणजे खरंच गमतीशीर आहे. लहान लहान पेढ्या असतात. ती जागा असते भलत्याच्याच मालकीची आणि त्यात 40-50 व्यापाऱ्यांना टेबलं विकली असतात. बघायला तर गावाकडे कोर्टाच्या बाहेर कागदपत्रं लिहून देणारे असतात ना तसेच दिसतात हे, पण एकेकाच्या खणात कोट्यवधी रूपयांचा माल असतो.

एकाने आग्रहाने त्याच्याकडचे हिरे दाखवले, पण खरं सांगायचं तर हातात घेण्याची हिंमत झाली नाही. इतके लहान लहान हिरे, एखादा चुकून पडला असता खाली तर जन्मात सापडला नसता. निदान मला तरी. कोण हौस करणार.

आता हिऱ्यांचाच बाजार म्हटला की तिथल्या धुळीलाही किंमत येणार. बाजार सुरू होतो त्याच्या थोडं अलीकडे रस्त्यावरची कुटुंब दिसतात. फुटपाथवरच राहातात आणि प्रत्येकाकडे बारीक बारीक जाळीच्या मोठ्या चाळण्या असतात.

गटारात हिरे शोधताना

फोटो स्रोत, MANISH PANWALA

जरा चौकशी केलं तर कळलं की हे लोक हिरे बाजारात रोज रात्री सफाई करतात, तिथली धूळ-कचरा गोळा करतात आणि रात्रभर चाळत बसतात. यांची नजर शोधत असते चुकून खाली पडलेला एखादा हिरा. आणि त्यांना सापडतातही ते.

असे हिरे शोधणं हेच इथल्या पाचशे लोकांच्या रोजगाराचं साधन आहे. मातीत आणि गटारात रोज हिरे मिळणं शक्य नसलं तरी चिकाटीने आणि विश्वासाने ही मंडळी प्रयत्न करत राहतात.

ही कुटुंब नाही म्हटलं तरी महिन्याचे तीस हजार कमवतात अशी माहिती मला इथले स्थानिक पत्रकार रूपेश सोनावणे यांनी दिली.

जवळपास साडेसहा लाख लोक सुरतमध्ये हिरे व्यापारावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या अवलंबून आहेत.

सुरतमधल्या हिरे व्यापाराचा इतिहास

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

जिथे रस्त्यावरच्या धुळीत, कचऱ्यात आणि नाल्यांमध्ये हिरे सापडतात ते शहर श्रीमंत नसणार तर काय? या शहराच्या संपन्नतेच्या खुणा मला जागोजागी दिसतात.

अतिउंच इमारती नसल्या तरी भव्य इमारती, मोठ्या मोठ्या हिऱ्यांच्या कंपन्या, सतत धावणारी बाजारपेठ, जगात असतील नसतील त्या सगळ्या ब्रँडची मोठमोठी शोरूम्स.

सुरत अगदी रात्री 12 वाजताही धावत असतं. अर्थात जागंही उशीरा होतं म्हणा. सकाळी अकराआधी इकडे फारसं काही उघडत नाही. सुरत हिऱ्यांबरोबरच कपडा व्यवसायाचं भारतातलं सर्वांत मोठं केंद्र आहे. त्यामुळे या एका शहरात पैशाची उलाढाल प्रचंड.

वेगात कोणताही अडथळा नको म्हणून बांधलेले फ्लायओव्हर्स. हे शहर आता भुलभुलैय्या झालंय कारण एक नाही दोन नाही तब्बल 128 फ्लायओव्हर्स या शहरात आहेत असं मला रूपेशने सांगितलं. पण सूरत एवढं श्रीमंत कसं झालं? इथे एवढा मोठा हिऱ्याचा व्यवसाय कसा बहरला?

थोडं इतिहासात डोकावलं तर लक्षात येईल. स्वराज्यबांधणीसाठी निधी हवा होता म्हणून शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट केली. मुळात लूट त्या शहराची होणार जे आधीपासून श्रीमंत आहे.

त्यामुळे शिवाजी महाराजांच्या काळापासून सुरत श्रीमंत होतंच. मुघलांच्या काळात इथे जरीचा व्यवसाय बहरला होता. उंची वस्त्रांवर सोने-चांदीच्या तारा लावून जरीकाम करणं हा इथला मोठा व्यवसाय होता. त्याबरोबर हिरे-माणकांचाही व्यवसाय चालायचा पण त्याचं स्वरूप फारच लहान होतं.

सतराव्या शतकात भारतात आलेला मौल्यवान खड्यांचा व्यापारी ज्याँ बॅप्टिस्ट टॅव्हर्नियर याने तेव्हाच्या सुरतचं वर्णन लिहून ठेवलं आहे.

तो म्हणतो की, ‘युरोपियन व्यापाऱ्यांना भारतात येण्यासाठी महत्त्वाचं ठिकाण म्हणजे सुरत’.

सुरत बंदर

फोटो स्रोत, PICASA

फोटो कॅप्शन, मुघलांच्या काळात सुरत एक महत्त्वाचं बंदर होतं

सुरतपासून काही किलोमीटर लांब असलेल्या बंदरावरून मसाले, भारतीय हिरे, कापूस आणि रेशीम यांची ने-आण व्हायची.

विसावं शतक सुरू झालं तेव्हा दक्षिण आफ्रिकेत असणाऱ्या गांडाभाई मावजीवनवाला आणि रंगीलादास मावजीवनवाला या दोन भावांनी हिऱ्यांना पैलू पाडण्याचं काम सुरतेत आणलं. इथूनच सुरतच्या हिरे व्यवसायाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.

हिऱ्यांना पैलू पाडणं, आणि ते घासून पॉलिश करण्याचं काम पारंपारिकरित्या सौराष्ट्रातले कारागीर करत होते. पाटीदार समुदायाचं या कामावर प्रभुत्व होतं, आजही आहे.

आजही सुरतमध्ये मुख्यत्वे पाटीदारच हिऱ्यांच्या कामात आढळतात. हिऱ्यांना पैलू पाडण्याचं काम करणारे कारागिरांची मुळं आजही सौराष्ट्रात आहेत.

सुरतचा दुसरा मोठा व्यवसाय – कापड व्यवसाय. या देशभरातले लोक येऊन काम करत असले तरी हिऱ्यांच्या कामात मात्र अजूनही ठराविक लोकच आढळतात.

1900 मावजीवनवाला भावंडांनी हिऱ्याचं काम सुरतेत सुरू केलं असलं तरी त्याला खऱ्या अर्थाने इंडस्ट्रीचं स्वरूप यायला 60 चं दशक उजाडावं लागलं.

आम्ही भेट दिली त्या एसआरके एक्सपोर्ट या हिऱ्यांच्या कंपनीचे मालक गोविंद ढोलकिया यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं,

“दुसऱ्या महायुद्धाचाही सुरतेतल्या हिरे उद्योगाला फायदा झाला. 1940 च्या आधी कच्च्या हिऱ्यांना पैलू पाडण्याचं, पॉलिश करण्याचं काम तेव्हाच्या बर्मामधल्या (आताचा म्यानमार) रंगूनमध्ये व्हायचं. पण दुसऱ्या महायुद्धात जपानने म्यानमारवर आक्रमण केलं त्यामुळे तिथे हिरे व्यवसायात काम करणारे जे भारतीय कारागीर होते ते सौराष्ट्रात परत आले. इथे आल्यावर त्यांनी गाठलं सुरत.”

अल्पावधीतच हिऱ्यांना पैलू पाडण्याचं काम रंगून ऐवजी सुरतमध्ये व्हायला लागलं. आज पैलू पाडलेले हिरे भारताच्या मुख्य निर्यातीपैकी एक निर्यात आहेत.

हिरा

फोटो स्रोत, Getty Images

प्रयोगशाळेतला हिरा आव्हान की संधी ?

सुरतमध्ये हिऱ्यांना पैलू पाडण्याचं काम होतंच, पण आता हिरेही बनतात. आता तुम्ही म्हणाल की भारतात तर हिऱ्यांच्या खाणी नाहीत, मग?

सुरतच्या प्रयोगशाळांमध्ये हिरे तयार होत आहेत. लॅब-ग्रोन डायमंड असं त्यांना म्हणतात. हा व्यवसाय सुरतमध्ये प्रचंड वेगाने वाढतोय. पण यामुळे सुरतच्या हिरे बाजारात अस्वस्थता पसरली आहे.

प्रयोगशाळेत तयार झालेले हिरे सुरतसाठी आव्हान घेऊन येणार की संधी हे अजून इथल्या लोकांना कळलं नाहीये, त्यामुळे हिरे व्यापारात असलेले कारागीर, मध्यस्थ, व्यापारी सगळ्यांच्या मनात एक अनिश्चितता आहे.

त्याकडे येऊच, पण आधी हे समजून घेऊ की प्रयोगशाळेत हिरा कसा तयार होतो ते.

प्रयोगशाळेत तयार होणाऱ्या हिऱ्यात निसर्गात सापडणाऱ्या हिऱ्यात असणारे सगळे तत्त्वं आहेत.

निसर्गात तयार होणारे हिरे पृथ्वीच्या पोटात प्रचंड उष्णता आणि दाबामुळे तयार होतात. हे हिरे तयार व्हायला कोट्यवधी वर्षं लागतात.

प्रयोगशाळेत इतका वेळ नक्कीच लागत नाही, पण तापमान आणि दाब निर्माण करून कार्बनपासून हिरा तयार केला जातो.

प्रयोगशाळेत हिरा हाय प्रेशर टेम्परेचर सिस्टीमने बनतो. हिऱ्याच्या एका चपट्या तुकड्याला, यात शुद्ध ग्रॅफाईट कार्बन असतो, दुसऱ्या एका तुकड्यासोबत 1500 तापमानवर प्रचंड दाबाखाली दाबलं जातं.

हिरा तयार करण्याची आणखी एक पद्धत म्हणजे केमिकल व्हेपर डिपोझिशन. या पद्धतीत सीड (शुद्ध कार्बन) एका गॅस चेंबरमध्ये ठेवलं जातं. 800 डिग्रीवर हळूहळू शिजवलं जातं आणि मग हिऱ्याचे अणू तयार होतात.

यात महत्त्वाची गोष्ट अशी की लॅबग्रोन हिऱ्यांची किंमत निसर्गात सापडणाऱ्या हिऱ्यापेक्षा जवळपास निम्म्याने कमी आहे.

याच मुद्द्यावरून सुरतमध्ये अस्वस्थता आहे. हिऱ्याची कमी किंमत सुरतच्या व्यवसायात असलेल्यांना मिळणारा पैसा कमी करेल का अशी भीती लोकांच्या मनात आहे. या व्यवसायातल्या लोकांना भेटल्यानंतर ही भीती जाणवते.

भावेश टांक सुरतमधल्या हिरे कारागिरांच्या संघटनेचे उपाध्यक्ष आहेत.

ते म्हणतात, “लॅब-ग्रोन डायमंड जेव्हा सुरतमध्ये बनायला सुरुवात झाली तेव्हापासून, म्हणजे गेल्या दोन-तीन वर्षांपासून कारागिरांच्या व्यवसायात वाढ झाली आहे हे आम्हाला मान्य आहे. पण ही वाढ अशीच होत राहाणार का? की येत्या काही वर्षांत आमच्या सगळ्यांच्या नोकऱ्या जाणार, हे आम्हाला समजत नाहीये.”

भावेश टांक
फोटो कॅप्शन, भावेश टांक

“नैसर्गिक हिरा म्हणजे खरा हिरा आहे. प्रयोगशाळेत जे बनतात ते रोबोटने बनवलेले आहेत. पण समजा तुम्हाला 10 लाखाचा हिरा 5 लाखांना मिळाला तर तुम्ही 5 लाखांचा हिरा घ्याल ना. पण त्या 10 लाखांच्या हिऱ्यावर ज्यांनी काम केलंय त्यांचा रोजगार तर जाईल, कारण 10 लाखाच्या हिऱ्याला मागणी नसेल,” ते पुढे म्हणतात.

त्यांना अशीही भीती आहे की सुरतची हिरे बाजार म्हणून जगात जी ओळख आहे ती पुसली जाईल. पण सगळ्यांनाच हे मान्य नाही, उलट लॅब-ग्रोन डायमंड म्हणजे सुरतचं पुढचं पाऊल असावं असं इथे अनेकांना वाटतं.

रजनीभाईंचा पारंपरिक व्यवसाय नैसर्गिक हिऱ्यांचा होता. पण जेव्हा त्यांना लॅब-ग्रोन डायमंडबद्दल कळलं तेव्हा त्यांनी आपला जुना व्यवसाय बंद करून आपलं सर्व लक्ष फक्त प्रयोगशाळेत बनवलेल्या हिऱ्यांवर केंद्रित केलं.

आता त्यांच्या प्रयोगशाळेत हिरे बनतात, त्यांचं कटिंग पॉलिशिंग होते आणि दागिनेही बनतात. ते म्हणतात,

“एक गोष्ट लक्षात घ्या की निसर्गात सापडणारा हिरा, आणि प्रयोग शाळेत बनलेला हिरा यात काही म्हणजे काहीच फरक नाहीये. दोन हिरे शेजारी शेजारी ठेवले तर जाणकार माणसालाही त्यातला फरक ओळखणं मुश्कील आहे. हा, एक महत्त्वाचा फरक म्हणजे दोन्हींची किंमत. प्रयोग शाळेत बनलेल्या हिऱ्यांची किंमत निसर्गात सापडलेल्या हिऱ्याच्या तुलनेत निम्म्याने कमी आहे.”

लॅब-ग्रोन हिऱ्याच्या अस्सलपणाबद्दल शंका घेणाऱ्या लोकांना ते एक प्रश्न विचारतात,

“एक सांगा ज्या महिलेला नैसर्गिकरित्या दिवस जाऊन बाळ झालंय, आणि ज्या महिलेला टेस्ट ट्यूब बेबी तंत्राव्दारे बाळ झालंय, दोघींच्या आईपणात काही कमतरता असेल का? दोघींची बाळं मानवच असतील, त्यांना तशाच भावभावना, इच्छा, आकांक्षा, हाड-मांस, रक्त असेल ना. फरक इतकाच असेल की एक बाळ नैसर्गिकरित्या जन्माला आलं असेल आणि एक विज्ञानाच्या मदतीने.”

रजनीभाई

रोजगार कमी होतील का? असा प्रश्न विचारल्यावर ते म्हणतात, “कसे होतील? जो माणूस पूर्वी एक हिरा घेऊ शकत होता तो आता दोन घेऊ शकेल. म्हणजे उलट मागणी वाढेल.

दुसरं म्हणजे हिरे कोणत्या आफ्रिकेच्या खाणीतून येणार नाहीत तर स्वतःचं प्रोडक्शन असेल, इथलेच कारागीर त्यांचं कटिंग,पॉलिशिंग करतील, याच देशात ते विकले जातील आणि समजा उरले तर बाहेर एक्सपोर्टही करता येतील. रोजगार उलट वाढतील.”

एका अंदाजानुसार येत्या पाच वर्षांत भारत लॅब-ग्रोन हिऱ्यांची सर्वांत मोठी बाजारपेठ असणार आहे.

सरकारही याला प्रोत्साहन देण्याच्या प्रयत्नात आहे. 2019 साली केंद्र सरकारने यावरचा जीएसटी 12 टक्क्यांवरून 5 टक्क्यांवर आणला होता.

कोव्हिड जेव्हा पहिल्यांदा आला, त्या 2020 साली भारताची लॅब-ग्रोन हिऱ्यांची निर्यात 60 टक्क्यांनी वाढली होती तर नैसर्गिक हिऱ्यांची निर्यात 41 टक्क्यांनी घटली होती.

नैसर्गिक हिऱ्याचे पर्यावरणावर परिणाम

अमेरिकेच्या डायमंड प्रोड्युसर असोसिएशनने बीबीसी फ्युचरच्या हॅरियट कॉन्स्टेबल यांच्याशी बोलताना म्हटलं होतं की,

“खाणीतून हिरा काढताना ग्रीन हाऊस वायूंचं उत्सर्जन तीनपट जास्त होतं. कारण हिरा काढताना पारंपारिक उर्जास्रोतांचा, म्हणजे पेट्रोल, किंवा डिझेल यांचा वापर जास्त होतो.

तर दुसरीकडे प्रयोगशाळेत हिरे तयार करताना वीजेचा वापर होतो ज्यात प्रदूषणाची शक्यता कमी असते. खाणीतून एक कॅरेट हिरे काढताना 75 किलो कार्बन डायऑक्साईड हवेत मिसळला जातो.

हिऱ्याची पारख करताना व्यापारी
फोटो कॅप्शन, खाणीतून हिरा काढताना ग्रीन हाऊस वायूंचं उत्सर्जन तीनपट जास्त होतं

हिरा चमकवणाऱ्या कारागिरांचं भवितव्य अंधारात

असं म्हणतात की प्रत्येक चकाकणाऱ्या गोष्टीची एक बाजू अंधारात असते. तसंच काहीसं सुरतचंही आहे. इथल्या हिरे व्यवसायाची चर्चा जगभरात आहे, त्यातून प्रचंड प्रमाणात पैशांची उलाढालही होते पण या व्यवसायाचा कणा असलेले, ज्यांच्या कामामुळे सुरतला ही ओळख मिळाली त्यांचं भवितव्य अंधारात आहे.

सुरतचे हिऱ्यांना पैलू पाडणारे, घासणारे कारागीर कठीण आयुष्य जगतात. यातल्या काही कारागिरांना आम्ही भेटलो.

“अहो ओझी वाहाणाऱ्या गाढवांना तरी काही ठराविक तास असतात कामाचे, पण आमचं तसं काही नाही,” कांतीलाल डांगोदरा म्हणतात.

पूर्वी हिरे घासण्याचं, पैलू पाडण्याचं काम घराघरांमधून व्हायचं. आता लहान-मोठ्या शेकडो कंपन्या सुरतमध्ये आहेत.

या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना कोणत्याही सोयी, सुविधा आणि कामगार कायद्यांचं संरक्षण नाही, असं या कारागिरांचं म्हणणं आहे.

भावेश टांक म्हणतात, “मला माझ्या मालकाने कंपनीतून काढून टाकलं, का विचाराल तर माझी पत्नी गरोदर होती आणि तिला दवाखान्यात घेऊन जाण्याच्या नादात माझ्या चार-पाच सुट्ट्या झाल्या. आता बोला.”

भावेश आता आपली केस कोर्टात लढत आहेत.

या कामगारांना रत्न कारागीर असंही म्हणतात. यांचं म्हणणं आहे की हिरे घासण्याचं आणि पैलू पाडण्याचं काम करणाऱ्या कारागिरांना आठवडी सुटी, पीएफ, आरोग्य विमा अशा सुविधा मिळाल्या पाहिजेत.

हेच रत्न कारागीर सुरतमधला यंदाच्या निवडणुकीचा निकाल फिरवू शकतात. गेल्या वर्षी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सुरतमधून आपने 27 जागा जिंकल्या होत्या.

पक्षाच्या या यशात हिरे कारागिरांचा मोठा हात होता. सरकारने आपल्या मागण्या मान्य केल्या नाही तर मतपेटीतून उत्तर देऊ असं कारागीर म्हणतात.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)