PEP म्हणजे काय? त्यामुळे HIV संक्रमण कसं टाळता येईल?

PEP म्हणजे काय?

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, नीलेश धोत्रे
    • Role, बीबीसी मराठी
    • Reporting from, नवी दिल्ली

रवी कामानिमित्त नुकताच पुण्यात शिफ्ट झाला होता. डेटिंग अॅपवरून त्याची नीता नावाच्या मुलीशी ओळख झाली. नीतासुद्धा पुण्यात बाहेरूनच राहायला आली होती. ( दोघांची नावं बदलण्यात आली आहेत.)

ओळखीचं रुपांतर मैत्रीत आणि मैत्रीचं रुपातंर प्रेमात व्हायला फक्त 2 महिनेच लागले. नवखं शहर आणि एकएकटेच राहत असल्यामुळे त्यांच्यासाठी विश्व खुलं होतं.

एकेदिवशी दोघांनी ओव्हरनाईट भेटायचं ठरवलं. सहमतीने दोघं एकमेकांच्या जवळ आले. पण सेक्स करताना रवीचं कॉन्डम फाटलं.

व्हीडिओ कॅप्शन, HIV एड्स वर तुमच्या मनातल्या 10 प्रश्नांची उत्तरं | जागतिक एड्स दिन विशेष सोपी गोष्ट 741

आतापर्यंत रवीने कधीच विनाप्रोटेक्शन सेक्स केलेला नव्हता. पण पहिल्यांदाच त्याच्या बाबतीत असा अपघात घडला होता. नीतानेसुद्धा आतापर्यंत कधीच विना प्रोटेक्शन सेक्स केला नसल्याची हमी रवीला दिली.

पण तरीही रवीच्या डोक्यात सतत संशयाची आणि भीतीची पाल चुकचुकत राहीली ती HIVच्या संभाव्य धोक्याची.

डेटिंग अॅपच्या जमान्यात सर्व काही फास्ट घडत असताना एकमेकांची संपूर्ण पार्श्वभूमी तपासणं तसं कठीणच असतं. त्यातही समोरच्या व्यक्तीच्या सेक्शुअल लाईफ आणि आरोग्याबाबतची सखोल माहिती मिळणं तर दुरापास्तच.

याची कल्पना असल्यामुळे रवीने सकाळी सर्वांत पहिले फोन केला तो त्याच्या डॉक्टर मित्राला. घडलेला सर्व प्रकार सांगितला आणि मी आता लगेचच HIV टेस्ट करून पाहातो, असं रवीनं त्याच्या डॉक्टर मित्राला सांगितलं.

PEP म्हणजे काय?

फोटो स्रोत, Getty Images

त्यावर त्याला अडवत रवीच्या डॉक्टर मित्रानं रवीला PEP म्हणजेच Post-exposure Prophylaxisची ट्रिटमेंट घ्यायचा सल्ला दिला. आणि तात्काळ गोळ्या सुरू करायला सांगितल्या. रवीने पुढचे 28 दिवस न चुकता या गोळ्यांचा कोर्स केला आणि संभाव्य धोका टाळला.

आता तुम्हाला अनेक प्रश्न पडले असतील. त्या सर्वांची उत्तर आपण पाहू या...

त्या संदर्भात आम्ही ICMR – NARI चे माजी आरोग्य अधिकारी डॉ. ऋषिकेश अंधाळकर यांच्याशी चर्चा केली. गेले काही वर्षं ते HIV प्रसारण संदर्भातील संशोधनात काम करत होते.

सध्या ते लंडनमध्ये आहेत. क्वीन मेरी यूनिवर्सिटी ऑफ लंडन इथं ते वैश्विक सार्वजनिक आरोग्य आणि धोरण (Global Public Health and Policy) या विषयाच शिक्षण येथे घेत आहेत.

1. PEP म्हणजे काय?

PEP म्हणजेच Post-exposure Prophylaxis. साधारण HIV बाधित रुग्णाला जी औषधं दिली जातात त्याच्याच कॉम्बिनेशन मधून हे औषध तयार करण्यात आलं आहे. गोळ्यांच्या स्वरूपात हे औषध असते.

HIV बाधित व्यक्तीशी लैंगिक संबध आला किंवा लैंगिक संबंधात आलेली व्यक्ती HIV बाधित असल्याचा संशय असेल तर किंवा गुद्दद्वाराद्वारे किंवा मुखाद्वारे कोणतेही प्रोटेकशन न वापरता सेक्स केला गेला तर.

किंवा व्यवसायिक धोका म्हणजे आरोग्य कर्मचारी जे HIV संबंधित काम करीत आहेत ज्यांना HIV होण्याचा धोका असणाऱ्यांना PEP ची ट्रीटमेंट दिली जाते. परंतु PEP ट्रीटमेंटची सुरुवात पहिल्या 72 तासांमध्ये सुरू करणं अत्यंत गरजेचं असतं.

पहिल्या 24 तासांमध्ये त्याची सुरूवात केली तर कायम उत्तमच. कारण HIV संक्रमणाशी चुकून धोकादायक आलेल्या संबंधानंतर किंवा घटनेनंतरचा प्रत्येक तास हा संक्रमण रोखण्यासाठी कारवायांच्या उपाययोजनांसाठी महत्वाचा असतो.

2. PEP कुठल्या परिस्थितीत घ्यावी?

  • HIV बाधित किंवा एचआयव्ही संक्रमित असल्याचा संशय असलेल्या व्यक्तीशी लैंगिक संपर्क आला तर.
  • एचआयव्हीबाधित रक्ताशी संबंध आला तर. असं रक्त अंगावर, हातावर कुठे सांडलं तर.
  • चुकून कुठल्याही बेवारस सुईला हात लागला आणि त्यामुळे टोचलं गेलं असेल तर.
  • अशी कुठलीही क्रिया ज्यातून एखाद्याला HIV संक्रमाणाचा धोका वाटतो.
  • एका पेक्षा जास्त सेक्शुअल पार्टनर असताना सेक्स करताना कॉन्डम फाटलं असेल तर.
  • अंमलीपदार्थांचं सेवन करणाऱ्या व्यक्ती एकाच नीडलचा वापर करत असतील तर.
PEP म्हणजे काय?

फोटो स्रोत, Getty Images

3. PEP कुणी घ्यावी?

  • पीईपी कुणीही घेऊ शकतं. ओरल, अॅनल आणि व्हजायनल सेक्स करणारी कुणीही व्यक्ती या उपचार पद्धतीचा अवलंब करू शकते.
  • लैंगिक हिंसा किंवा बलात्कार झालेल्या व्यक्तीला हे उपचार दिले जाऊ शकतात.
  • भिन्नलिंगी आणि LGBTQ समुदायातील कुणीही व्यक्ती हे उपचार घेऊ शकते.
  • अशी कोणतीही व्यक्ती ज्याची कृती किंवा त्यासोबत घडलेली घटना यामुळे HIV संक्रमण होऊ शकतं.

4. PEP कधी घ्यावी? / PEP ट्रेंटमेन्ट किती दिवस घ्यावी?

पीईपी उपचाराचा साधारण 28 दिवस किंवा एक महिन्याचा कोर्स आहे. महत्त्वाचं म्हणजे या कालावधीमध्ये गोळ्या खाण्यात कुठलाही खंड पडता कामा नये.

सलग 28 दिवस ही गोळी घेणं गरजेचं आहे. एखादा दिवस गोळी घेणं चुकलं तर पुढच्या 24 तासांमध्ये ती लगेच घेणं गरजेचं आहे. पण सलग 48 तास PEPची गोळी घेणं चुकलं तर मात्र ही उपचार पद्धती परिणामकारक राहत नाही. अशावेळी ती न पुढे कायम न केलेली बरी.

PEP म्हणजे काय?

फोटो स्रोत, Getty Images

5. PEP मुळे HIVचा धोका कसा टाळता येतो?

मानवी शररात घुसलेल्या HIVच्या विषाणूला प्राथमिक अवस्थेत असताना PEP पुढे त्याच संक्रमण वाढण्यास मज्जाव करते.

6. PEPचे काही दुष्परिणाम आहेत का?

पीईपीची ट्रिटमेंट घेताना त्याचे काही थोड्याप्रमाणात दुष्परिणामही जाणू शकतात ,परंतु PEP ट्रीटमेंटचा जीवघेणा असा धोका नाही. साधारणतः थकवा, डायरिया, बैचेनी किंवा मळमळ, पोटात दुखणे, डोकं दुखणे, गॅस होणे असे दुष्परिणाम दिसू शकतात.

काही व्यक्तींना अपवादात्मक स्थितीत ( Depression ) नैराश्याची भावनासुद्धा देऊ शकते. काही व्यक्तींना खूप तहानसुद्धा लागू शकते.

7. PEP हाच सर्वोत्तम पर्याय आहे का?

एखाद्या व्यक्तीचे सतत अशा प्रकारच्या संक्रमीत व्यक्तींशी लैंगिक संबंध येत असतील किंवा त्यांचे एका पेक्षा जास्त सेक्शुअल पार्टनर असतील तर मात्र PEP हा योग्य पर्याय नाही. अशा व्यक्तींनी PrEP ही उपचार पद्धती अवलंबन योग्य असतं. PEP ही अगदी अटीतटीच्या वेळी घेण्याची उपचार पद्धती आहे. PEP मुळे HIV संक्रमणापासून 100 टक्के बचाव होईलच असं अजिबात नाही.

एखाद्या व्यक्तीबाबत अशा प्रकारची कुठलीही उच्च धोकादायक (हाय रिस्क) घटना घडली तर त्या व्यक्तीचा पुढचा प्रत्येक तास महत्त्वाचा असतो.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे पीईपीचा वापर किंवा त्याची ट्रिटमेंट घेण्याची वेळच येऊ न देणं गरजेचं आहे. कॉन्डमचा वापर करणे, तसंच एकापेक्षा जास्त सेक्शुअल पार्टनर नसणे, एकाच नीडलचा एकापेक्षा जास्त लोकांनी वापर टाळणे केव्हाही श्रेयस्कर ठरेल.

PEP म्हणजे काय?

फोटो स्रोत, Getty Images

8. PEP ट्रिटमेंटनंतर लैंगिक आरोग्यात काही फरक पडतो का?

या ट्रिटमेंटनंतर लैंगिक आरोग्यात फारसा काही फरक पडत नाही.

HIV AIDS ची जगात पुन्हा लाट येऊ शकते का? ऐका गोष्ट दुनियेची पॉडकास्ट

ऑडिओ कॅप्शन, HIV AIDS ची जगात पुन्हा लाट येऊ शकते का? ऐका गोष्ट दुनियेची पॉडकास्ट

9. LGBTQ समुदायातील लोकांसाठी PEP किती महत्त्वाचं?

गे, ट्रान्सजेंडर किंवा LGBTQ समुदायामध्ये बरेचदा unprotected sex होतो, अशा लोकांसाठी PrEP ट्रिटमेंट महत्त्वाची आहे.

तसंच या समुदायामध्ये एकापेक्षा जास्त सेक्शुअल पार्टनर असण्याची शक्यता जास्त असते. अशावेळी PEP पेक्षा PrEPची ट्रिटमेंट आधीपासूनच घेणं योग्य ठरतं.

11. PEPचे उपचार कुठे उपलब्ध आहेत? कोणत्या डॉक्टरकडे जायचं?

सरकारी दवाखान्यांमध्ये हे उपचार उपलब्ध आहेत. सरकारी रुग्णालयांमध्ये याचे उपचार मोफत आहेत. तसंच खासगी रुग्णालयांमध्येसुद्धा हे उपचार घेता येऊ शकतात.

पण योग्य डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच ही ट्रिटमेंट घ्यावी. ही ट्रिटमेंट सुरू करण्याआधी डॉक्टर पेशंटची रिस्क असेंसमेंट करतात. त्यानंतर उपचार सुरू करतात.

12. या उपचारांचा खर्च किती?

PEP म्हणजे काय?

फोटो स्रोत, Getty Images

PEPच्या औषधांचा खर्च साधारण 1000 ते 1500 रुपये आहे. पण हे उपचार डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घेणं महत्त्वाचं आहे.

13. उपचार घेणाऱ्यांची माहिती गोपनीय राहते का?

उपचार घेणाऱ्याची गोपनियता सरकारी आणि खासगी अशा दोन्ही रुग्णालयांमध्ये पाळली जाते.

14. PEP किती इफेक्टिव्ह आहे?

पीईपी 100 टक्के इफेक्टिव्ह नाही. पहिले 72 तास खूप महत्वाचे, पहिल्या 72 तासात जेवढ्या लवकर ही ट्रिटमेंट सुरू होईल तेवढी ती महत्त्वाची आहे. पुन्हा एकदा लक्षात घ्या पहिले 24 तास अत्यंत महत्त्वाचे आहेत. तसंच 28 दिवसांच्या ट्रिटमेंटनंतर पुढचे 6 महिने महत्त्वाचे असतात. पुढच्या 6 महिन्यांनतर HIV टेस्ट करून घेणं गरजेचं असतं. तसंच DC4 काउंट तपासणंही महत्त्वाचं असतं.

या टेस्टमधूनच पुढे उपचार किती प्रभावी ठरले आहेत हे लक्षात येऊ शकतं.

15. महिला, पुरुष आणि LGBTQ यासर्व घटकांसाठी उपचार समान असतात की वेगवेगळे?

महिला, पुरूष आणि LGBTQ या सर्व घटकांसाठी हे उपचार समान असतात.

PEP म्हणजे काय?

फोटो स्रोत, Getty Images

16. दरवेळी unprotected sex नंतर PEP उपचार घ्यावेत का/घेऊ शकतो का?

डॉक्टर असा सल्ला नक्क्कीच देत नाहीत (किंवा डॉक्टर हे कधीच रेकमेंड करत नाहीत). लक्षात घ्या हे उपचार अचानक चुकून घडलेल्या अपघातासाठी आहेत.

सतत unprotected sex करणाऱ्यांनी किंवा सतत एकाच सुईने आमली पदार्थांचं सेवन करणाऱ्यांनी PrEP या गोळीचा चा आधार घ्यावा.

तसंच कंडोम व तत्सम इतर प्रतिबंधात्मक उपायात यांचा वापर सतत करणं महत्त्वाचं आहे. तसंच एकापेक्षा जास्त सेक्शुअल पार्टनर टाळावेत, एकाच सुई ने आमली पदार्थांचं सेवन टाळावं.

17. PrEP म्हणजे काय?

PrEP म्हणजेच प्री-एक्स्पोजर प्रॉफिलायसिस (Pre-Exposure Prophylaxis) नामक एक टॅबलेट. ही गोळी रोजच्या रोज अथवा सेक्स होण्यापूर्वी काही काळ आधी घेतल्यास HIV चा संसर्ग टाळता येऊ शकतो.

प्रेप औषध घ्यायला सुरुवात करण्याआधी, तुम्ही आधीच HIV बाधित तर नाही ना, याची खात्री करून घेणे आवश्यक आहे.

जर तुम्ही एका ठराविक प्रमाणात घेत असाल आणि समजा एखाद्या HIVबाधित व्यक्तीबरोबर कंडम न वापरता सेक्स केला, तर तुम्हाला HIV होण्यापासून रोखण्यात हे औषध 100 टक्के प्रभावी ठरतं.

PrEP विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)