एचआयव्हीतून जगभरातला चौथा पेशंट पूर्णपणे बरा झाला

व्हायरस

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, जेम्स गॅलाघर
    • Role, आरोग्य प्रतिनिधी

ऐंशीच्या दशकापासून एचआयव्हीग्रस्त असणारी व्यक्ती एचआयव्हीतून पूर्णपणे बरी झाली असल्याचा दावा डॉक्टरांनी केला आहे. अशी जगातली ही चौथीच केस आहे.

या व्यक्तीला ब्लड कॅन्सर झाला होता, त्यावर उपचार म्हणून दुसऱ्या दात्याच्या बोन मॅरो देण्यात आला. हा दाता नैसर्गिकरित्या या व्हायरसला प्रतिबंध करू शकत होता.

या 66 वर्षांच्या माणसाने (ज्याला आपली ओळख जाहीर करायची नाही) एचआयव्हीची औषधं घेणं पूर्णपणे बंद केलेलं आहे.

त्यांनी म्हटलं की हा व्हायरस त्यांच्या शरीरात आता कुठेच सापडत नाही याबद्दल ते 'अत्यंत आभारी' आहेत.

या व्यक्तीला आता 'सिटी ऑफ होप' या टोपणनावाने ओळखलं जातं. हे नाव त्यांना ते ज्या हॉस्पिटलमध्ये होते त्यावरून दिलेलं आहे. हे हॉस्पिटल ड्युरांट, कॅलिफोर्नियात आहे.

या व्यक्तीचे अनेक मित्र एचआयव्हीमुळे मरण पावले. हा तो काळ होता जेव्हा अँटीरिट्रोव्हल औषधांमुळे एचआयव्हीग्रस्त पेशंटला बऱ्यापैकी सामान्य आयुष्य जगणं आणि दीर्घआयुष्य जगणं शक्य होत नव्हतं.

'हा दिवस येईल हे वाटलं नव्हतं'

ह्युमन इमिनोडिफिशिएन्सी सिंड्रोम व्हायरस (HIV) मानवी शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीवर हल्ला करतो. यामुळे एड्स हा आजार होतो. यात शरीराला कोणताही संसर्ग झाला तरी तो शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीला नीट परतावून लावता येत नाही.

HIV व्हायरस

फोटो स्रोत, Getty Images

एका पत्रकाव्दारे या व्यक्तीने म्हटलं, "1988 साली मला एचआयव्ही झाल्याचं निदान झालं. त्यावेळी मला वाटलं होतं की मला मृत्युदंडाची शिक्षा झालीये. त्यावेळी सगळ्यांना असंच वाटायचं. मला कधीच वाटलं नाही की माझ्या आयुष्यात असा दिवस येईल की मी एचआयव्हीपासून पूर्णपणे मुक्त होईन."

पण त्यांना एचआयव्हीसाठी नाही तर वयाच्या 63 व्या वर्षी ब्लड कॅन्सर झाल्याबद्दल ट्रीटमेंट दिली गेली. त्यांच्या डॉक्टरांना वाटलं की त्यांना बोनमॅरो ट्रान्सप्लांटची गरज आहे. अगदी योगायोगाने ज्या दात्याचा बोनमॅरो त्यांना दिला गेला त्या दात्याचं शरीर नैसर्गिकरित्याच एचआयव्ही प्रतिरोधक होतं.

ह्युमन इमिनोडिफिशिएन्सी सिंड्रोम व्हायरस एका सुक्ष्म दरवाज्याने आपल्या शरीरातल्या पांढऱ्या पेशींमध्ये घुसतो. या दरवाजाचं नाव CCR5.

पण काही लोकांमध्ये CCR5 चे म्युटेशन आहेत. हे म्युटेशन एचआयव्हीला आपल्या शरीरात घुसण्याचा दरवाजा बंद करतं

'…तरीही एचआयव्ही पूर्ण बरं होणं दुर्मिळच'

'सिटी ऑफ होप' पेशंटला बोनमॅरो ट्रान्सप्लांट झाल्यावर निगराणी खाली ठेवलं गेलं. त्यांच्या शरीरात एचआयव्ही सापडला नाही.

आता 17 महिने झालेत तरी त्यांच्या शरीरात एचआयव्हीचा ट्रेस सापडला नाही.

"त्यांच्या शरीरात एचआयव्हीचा मागमूस नाही. ते गेल्या 30 वर्षांपासून जी औषधं घेत आहेत ती त्यांना आता घेण्याची गरज नाही हे त्यांना सांगताना आम्हाला मनापासून आनंद झाला," सिटी ऑफ होप हॉस्पिटलमधल्या डॉ जेना डिक्टर यांनी म्हटलं.

एचआयव्हीतून पूर्णपणे बरा झालेला पहिला पेशंट टीमोथी रे ब्राऊन ठरले. ही घटना 2011 साली घडली. या पेशंटला बर्लिन पेशंट असं म्हटलं गेलं.

आता गेल्या तीन वर्षांत अशा प्रकारच्या तीन केसेस सापडल्या आहेत.

पण 'सिटी ऑफ होप' पेशंट सगळ्यात वयस्कर पेशंट आहे. ते सर्वाधिक काळ एचआयव्हीग्रस्त होते.

पण बोनमॅरो ट्रान्सप्लांट हा हुकमी उपचार नाहीये. कारण जगात सध्या 3 कोटी 80 लाख लोक एचआयव्हीग्रस्त आहेत.

डॉ डिक्टर म्हणतात, "ही फार गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. याचे बरेच साईड इफेक्ट असू शकतात. त्यामुळे हा उपचार सगळ्यांसाठी नाही."

पण सध्या संशोधक CCR5 प्रोटीन जे दार उघडतं ज्यामुळे हा व्हायरस पांढऱ्या पेशींमध्ये शिरतो त्यावर काम करत आहेत. जीन थेरेपीव्दारे हे दार बंद करता येऊ शकतं का हा प्रयत्न सुरू आहे.

कॅनडातल्या मॉन्ट्रिअलमध्ये झालेल्या एड्स 2022 कॉन्फरन्स झाली होती. त्यावेळी झालेल्या चर्चेबद्दल बोलताना आंतरराष्ट्रीय एड्स सोसायटीच्या अध्यक्ष म्हणाल्या की, 'एड्सवरचं औषधं अजूनही गुलबकावलीचं फुलच आहे. काही घटना घडल्यात ज्यात लोक एचआयव्हीतून पूर्णपणे मुक्त झाले आहेत. त्यामुळे इतर लोकांना आशा मिळते आणि संशोधकांना प्रेरणा."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)