एड्स आणि HIV संदर्भातील 19 प्रश्न आणि त्यांची उत्तरं

फोटो स्रोत, Getty Images
HIV विषाणू आणि एड्ससंदर्भात वेगवेगळे समज आणि गैरसमज असतात. कधीकधी त्याबाबत पुरेशी शास्त्रोक्त माहिती उपलब्ध नसते. म्हणनूच HIV आणि एड्स संदर्भातल्या महत्त्वाच्या 19 प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न या बातमीत करण्यात आला आहे.
राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेनं दिलेल्या माहितीनुसार ही उत्तर देण्यात आली आहेत.
हा आजार 1980 च्या दशकात पसरायला सुरुवात झाली.
HIV ची लागण कशी होते, या विषाणूची लागण झालेल्या व्यक्तींबरोबर राहिल्याने काही धोका उद्भवतो का, या सगळ्या प्रश्नांवर अनेक माध्यमांद्वारे जनजागृती पसरत असली तरीसुद्धा आजही अनेक अंधश्रद्धा आणि गैरसमजुतींना समाजात खतपाणी मिळतं.
1. एचआयव्ही/एड्सचा आजार गंभीर का समजला जातो?
HIV ची लागण झाली तर व्यक्तीच्या उमेदीच्या काळामध्ये त्याच्यावर परिणाम होतो. अकाली मृत्यूमुळं संपूर्ण कुटुंब, समाज आणि देशाच्या सामाजिक आर्थिक स्थितीवर त्याचा परिणाम होत असतो.
दुसरं म्हणजे, या आजाराच्या सुरुवातीच्या काळात लक्षणं दिसत नसल्यामुळं सुरुवातीची काही वर्षं एचआयव्हीकडं दुर्लक्ष होतं. परिणामी लवकर निदान, उपचार आणि व्यवस्थापन करणं कठिण होतं. त्यामुळंच एचआयव्ही/एड्सला सायलेंट किलरही म्हटलं जातं.
एड्सला सामाजिक दृष्ट्या वाईट समजलं जातं. याचा संसर्ग असलेल्या व्यक्तींबरोबर भेदभावही केला जातो. त्यामुळं याला आळा घालण्याबरोबर काळजी घेणं किंवा सहकार्य करण्याचे प्रयत्नही कठिण ठरतात.
शिवाय, एचआयव्ही हा प्रामुख्यानं लैंगिक संबंधांतून पसरतो आणि ही अत्यंत खासगी बाब असल्यामुळं यावर चर्चा करणं हेदेखील अत्यंत कठिण बनतं.
2. टॅटू काढल्यामुळे किंवा बॉडी पिअर्सिंगमुळं HIVची लागण होऊ शकते का?
रक्ताच्या संपर्कात आलेली उपकरणं योग्य पद्धतीनं निर्जंतुक केली नाहीत किंवा तशीच इतर ग्राहकांसाठी वापरली तर एचआयव्हीच्या प्रसाराचा धोका असतो.
त्यामुळं जी उपकरणं शरिर किंवा त्वचेच्या आत प्रवेश करत असतात त्यांचा एकदाच वापर करायला हवा किंवा पुन्हा वापरापूर्वी त्यांचं व्यवस्थित निर्जंतुकीकरण करावं.
टॅटू किंवा बॉडी पिअर्सिंग सारख्या सेवा देणाऱ्यांना एचआयव्हीचा किंवा रक्तापासून होणारे इतर संसर्ग याचा प्रसार कसा होत असतो आणि ते रोखण्यासाठी कशी खबरदारी घ्यावी याचं प्रशिक्षण द्यायला हवं.
तुम्ही टॅटू किंवा बॉडी पिअर्सिंग करणार असाल, तर ती सेवा देणाऱ्याला एड्स किंवा हेपॅटायटिस बी सारखे रक्तातून होणारे इतर संसर्ग रोखण्यासाठी काय काळजी घेत आहे, याची विचारणा करा.
3. इंजेक्शनद्वारे औषध देण्यात एचआयव्हीचा धोका कसा असू शकतो?
शरिरात कोणतेही इंजेक्शन टोचल्यानंतर रक्त येतच असतं. म्हणजेच सुई आणि सिरींजचा रक्ताशी संपर्क येतो. एचआयव्हीची लागण झालेल्या व्यक्तीच्या शरिरातील रक्तात त्याचे विषाणू मोठ्या प्रमाणावर असतात.
अशा संक्रमित व्यक्तीसाठी वापरलेलं इंजेक्शन जर पुन्हा वापरले, तर या इंजेक्शनच्या सुईमध्ये आणि सिरींज सिलिंडरमध्ये काही प्रमाणात रक्त असतं.
त्यामुळं अशा सुई किंवा सिरींजच्या पुनर्वापरामुळं दुसऱ्या व्यक्तीला एचआयव्ही किंवा रक्ताशी संबंधित इतर आजारांचा संसंर्ग होण्याचा धोका असतो.
तसंच इतर वैद्यकीय उपकरणं निर्जंतुकीकरण केल्याशिवाय वापल्यानंही एचआयव्हीच्या प्रसाराचा धोका संभवतो.
रस्त्यावरील किंवा काही विक्रेते इंजेक्शनच्या वापरलेल्या सिरिंज पुन्हा पॅकिंग करून विक्री करण्याची शक्यता असते. त्यामुळं इंजेक्शनचा वापर करणाऱ्यांनी विश्वासार्ह व्यक्ती किंवा फार्मसी किंवा NACP शी संलग्न सामाजिक संस्थांच्या स्त्रोतांकडून मिळालेल्या सिरिंजचाच वापर करावा.
इंजेक्शनच्या सुईचा किंवा स्किन पिअर्सिंग अथवा इतर कारणांसाठी वापल्या जाणाऱ्या उपकरणांच्या पुनर्वापरामुळं एचआयव्ही किंवा रक्ताशी संबंधित इतर आजार पसरण्याचा धोका असतो, हे माहिती असणं गरजेचं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
4. अॅनल सेक्सद्वारे (गुदद्वाराद्वारे संभोग) एचआयव्हीची लागण होऊ शकते?
हो, अशा संभोगातून एचआयव्हीचा संसर्ग होऊ शकतो. एचआयव्हीची लागण झालेल्या व्यक्तीचे रक्त, वीर्य, प्री सेमिनल फ्लुईड (वीर्यापूर्वी तयार होणारे द्रव) किंवा योनिमार्गातील द्रव या सर्वामध्ये एचआयव्हीचे विषाणू असू शकतात.
त्यातही ज्या पार्टनरच्या शरिरात वीर्य प्रवेश करणार असेल त्याला एचआयव्ही संसर्गाचा धोका अधिक असतो. कारण गुदाशयाची त्वचा नाजूक असते आणि अशा संभोगादरम्यान ती किंवा पुरुषाचे जननेंद्रीय फाटण्याची शक्यता असते.
अशा संभोगादरम्यान हे विषाणू शरिरात प्रवेश करू शकतात. तसंच एचआयव्हीग्रस्त व्यक्तीच्या गुदद्वारात ज्या पार्टनरचे पेनिस (जननेंद्रीय) प्रवेश करत असते, त्यालाही संसर्गाचा मोठा धोका असतो. कारण, हे विषाणू पुरुषाच्या मुत्रमार्गातून (जनेनेंद्रीयाच्या टोकावर असलेल्या फटीतून), शरिरावरील ओरखडे किंवा अगदी फोडांच्या माध्यमातूनही प्रवेश करू शकतात.
असुरक्षित (कंडोमशिवाय) अॅनल सेक्स करणं हे अत्यंत धोकादायक समजलं जातं. अशा प्रकारे संभोग करणाऱ्यांनी लॅटेक्स कँडोमचा वापर करावा. बहुतांश वेळा कंडोम अत्यंत चांगला पर्याय ठरतो.
पण योनिमार्गातून केल्या जाणाऱ्या संभोगाच्या तुलनेत अॅनल सेक्समध्ये कंडोम फाटण्याची अधिक शक्यताही असते. त्यामुळ कंडोमचा वापर करूनही अॅनल सेक्स करणं धोकादायक ठरू शकतं.
त्यामुळं कंडोम फाटू नये किंवा त्याची शक्यता कमी व्हावी यासाठी, द्रव पदार्थांचा (वॉटर बेस्ड लुब्रिकंट) वंगणासारखा अतिरिक्त वापर करायला हवा.
5. HIVपासून बचावासाठी लॅटेक्स कंडोम किती प्रभावी ठरतात?
योग्य पद्धतीनं आणि नियमितपणे वापर केल्यास लॅटेक्स कंडोम एचआयव्हीपासून बचाव करण्यात अत्यंत प्रभावी असल्याचं संशोधनातून समोर आलंय.
या संशोधनात एचआयव्हीचा संसर्ग होण्याचा प्रचंड धोका असलेल्या लोकांचा अभ्यास करण्यात आला. या लोकांचे एचआयव्हीची लागण झालेल्यांबरोबर लैंगिक संबंध होते.
त्यात ज्यांनी लॅटेक्स कंडोमचा योग्यप्रकारे आणि नियमित वापर केला, त्यांना वारंवार लैंगिक संबंध ठेवले तरी एचआयव्हीची लागण झाली नसल्याचं समोर आलं.
6. लैंगिक संबंधांद्वारे एचआयव्हीची लागण होणं कसं टाळू शकतो?
लैंगिक संबंधांपासून दूर राहून किंवा परस्पर विश्वासातून लागण नसलेल्या एकाच पार्टनरबरोबर लैंगिक संबंध ठेवून हे टाळता येतं.
त्याशिवाय सुरक्षित लैगिंक संबंधाच्या सवयीद्वारेही टाळता येतं.
सुरक्षित लैंगिक संबंध म्हणजे, कंडोमचा योग्य आणि नियमित वापर आणि नॉन पेनिट्रेटिव्ह सेक्स म्हणजे जननेंद्रियांचा प्रवेश न करता लैंगिक संबंध.

फोटो स्रोत, Getty Images
7. सेक्सदरम्यान माझा कंडोम फाटला होता, एचआयव्हीचा धोका वाटत आहे, काय करायला हवे?
या प्रकाराला 72 तासांपेक्षा जास्त वेळ उलटला नसेल तर तुम्ही काही औषधं घेऊ शकता. त्यामुळं तुमच्या पार्टनरला एचआयव्ही असला तरी, तुमचा संसर्गापासून बचाव होऊ शकतो.
त्यासाठी त्वरित तुमच्या डॉक्टरशी किंवा स्थानिक वैद्यकीय सेवेशी संपर्क साधा. पोस्ट-एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस किंवा PEP बद्दल चौकशी करा.
72 तास उलटून गेले असतील तर PEP तुमचे एचआयव्ही संसर्गापासून रक्षण करू शकणार नाही. अशा स्थितीत तुम्हाला एचआयव्हीची चाचणी करावी लागेल.
बहुतांश प्रकरणांत 6 आठवड्यांपर्यंत थांबावे लागते. कारण लैंगिक संबंधांनंतर एवढ्या काळानंतरच एचआयव्ही चाचणीत अचूक निदान होऊ शकते.
8. आईकडून गर्भातील बाळाला एचआयव्हीचा संसर्ग कसा होऊ शकतो?
एचआयव्हीग्रस्त गर्भवती महिलेच्या रक्ताद्वारे गर्भातील बाळाला संसर्ग होऊ शकतो. गर्भवती महिलेला नुकतीच एचआयव्हीची लागण झालेली असेल किंवा एड्सची अॅडव्हान्स स्टेज असेल तर बाळाला अधिक धोका असू शकतो.
जन्माच्या वेळी बाळ आईच्या जननेंद्रियातून जात असतं, तेव्हाही संसर्गाचा धोका असतो. तसंच आई बाळाला स्तनपान करतानाही संसर्ग होऊ शकतो.
9. स्तनपानातून एचआयव्हीचा संसर्ग होऊ शकतो का? त्यासाठी काय करावे?
हो. आईच्या दुधात हा विषाणू आढळला आहे, पण त्याचं प्रमाण कमी आहे. काही अभ्यासांतून समोर आलेल्या माहितीनुसार एचआयव्हीग्रस्त महिलेच्या पोटी जन्मलेल्या 10 ते 15% बाळांना स्तनपानाद्वारे एचआयव्हीची लागण होऊ शकते.
पण आईच्या दुधात अशी अनेक पोषक तत्वं असतात ज्यामुळं बाळाचं आरोग्य सुदृढ राहतं. स्तनपानाचे बाळ आणि आई दोघांसाठीही असलेले फायदे सर्वश्रुत आहेत.
तसंच आता प्रभावी अशी ARV औषधंही उपलब्ध आहेत. त्यामुळं एचआयव्हीग्रस्त मातांनी बाळांना स्तनपान सुरू ठेवण्याची शिफारस सध्या केली जाते.
10. रक्ताच्या किंवा रक्तदानातून मिळालेल्या रक्ताच्या माध्यमातून होणारा HIV संसर्ग कसा रोखता येऊ शकतो?

फोटो स्रोत, Getty Images
रक्तदात्याची जबाबदारी : केवळ निरोगी व्यक्तीनेच रक्तदाता म्हणून नाव नोंदवावे. एचआयव्ही संसर्गाचा धोका असलेल्या किंवा एचआयव्ही तसंच TTI (ट्रान्सफ्यूजन ट्रान्समिटेड इन्फेक्शन्स - रक्तसंक्रमण करताना होणारे संसर्ग) ची लागण झालेल्या व्यक्तीनं रक्तदान करणं कायमस्वरुपी टाळायला हवं.
असा धोका असलेल्या व्यक्तीनं रक्तपेढी किंवा रक्तदान शिबिरात रक्तदान केलंच, तर त्यानं रक्तपेढीच्या कर्मचाऱ्यांना त्याची रक्ताची पिशवी 'कॉन्फिडेन्शियल युनिट एक्सक्लुजन' अंतर्गत वेगळी ठेवायला सांगावी. म्हणजे इतरांना त्यातून रक्तपुरवठा होणार नाही. अधिक तपशिलासाठी रक्तदात्यानं NACO/NBTC ची मार्गदर्शक तत्वं पाहावी.
रक्तपेढीची जबाबदारी : रक्तपेढीनं केवळ निरोगी लोकांची रक्तदानासाठी निवड करावी. रक्तदानातून मिळालेल्या सर्व युनिटची एचआयव्ही, एचबीव्ही, एचसीव्ही, मलेरिया आणि सिफिलिसीस अशा पाच TTI संदर्भात तपासणी करणं गरजेचं असतं. औषधासंबंधीच्या कायद्यात तशी तरतूद आहे.
रक्तपेढीनं या पाच संसर्गांसंदर्भात तपासणी केली असली तरी, विविध प्रकारचे संसर्ग असलेल्या व्यक्तीला ठरावीक काळामध्ये (विंडो पिरियड-संसर्गापासून निदानापर्यंतचा काळ) रक्तातून होणाऱ्या या विषाणू संसर्गाचा धोका काही प्रमाणात असतोच.
पण हा धोका कमी केला जाऊ शकतो. त्यासाठी निरोगी आणि स्वेच्छेने पुन्हा-पुन्हा रक्तदान करणाऱ्या दात्यांवर अधिक अवलंबून राहावे लागेल. NBTC सध्या अशा रक्ताच्या तपासणीसाठी ELISA, CLIA आणि NAT अशा उच्च तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. गरजेनुसार रक्तपेढीमध्ये सुरक्षित आणि चाचणी केलेल्या रक्ताचा पुरेसा पुरवठाही असणे गरजेचे आहे.
डॉक्टरची जबाबदारी : रक्त किंवा रक्तातील घटक हे गरज असेल तेव्हाच प्रिस्क्राईब करावे आणि अगदीच गरजेचे असेल तेव्हाच रक्त किंवा रक्तातील घटक रुग्णाला चढवावे. रक्त आणि रक्ताच्या घटकांच्या योग्य वापरासाठी ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचा वापर करावा. कागदपत्रांची पूर्तता करावी.
प्राप्तकर्त्याची जबाबदारी : रक्त किंवा रक्तातील घटक हे केवळ परवानाधारक रक्तपेढी किंवा रक्त संकलन केंद्रातीलच वापरावे. तसंच योग्य वैद्यकीय सल्ल्यानुसार आणि तज्ज्ञ डॉक्टरच्या देखरेखीखालीच रक्ताचे रुग्णाच्या शरिरात संक्रमण केले जावे.
11. HIV चा विंडो पिरियड (संसर्गापासून निदानापर्यंतचा काळ) किती असतो?
एचआयव्हीच्या तपासणीत मानवी शरिरातील प्रतिपिंडांची (अँटिबॉडीज) उपस्थिती आढळते. संसर्गानंतर शरिरातील रक्तात आढळून येईल एवढी संख्या तयार होण्यासाठी जवळपास 6 ते 12 आठवडे (काही प्रकरणांत 6 आठवड्यांपर्यंत) लागू शकतात.
यालाच विंडो पिरियड म्हणतात. या काळात रक्ताच्या चाचणीत एचआयव्हीची लागण झालेली आढळून येत नाही, पण या व्यक्तीपासून इतरांना संसर्ग होण्याचा धोका असतो.
12. गालावर किस केल्याने एचआयव्ही होऊ शकतो का?
एचआयव्हीचा संसर्ग एवढ्या सहजपणे होत नाही. त्यामुळं गालावर किस करणं हे अगदीच सुरक्षित आहे.
दुसऱ्या व्यक्तीला लागण झालेली असली तरी, तुमची जखम नसलेली त्वचा हा विषाणूसाठी सर्वांत मोठा अडथळा आहे. कोरडे चुंबन, मिठी मारणे किंवा हातमिळवणे अशा सहज सामाजिक वर्तनातून संसर्ग पसरत नाही.
13. ओपन माऊथ किसिंगमुळे एचआयव्हीची लागण होऊ शकते का?

फोटो स्रोत, Getty Images
ओपन माऊथ किसिंगद्वारे एचआयव्हीचा संसर्ग होण्याची शक्यता अत्यंत कमी असते. पण दीर्घकाळ अशाप्रकारचे चुंबन घेताना ओठ किंवा तोंडाला इजा होऊ शकते.
त्यातून जखम झाल्यास हा विषाणू तोंडातील जखमा, फोड याद्वारे संसर्ग असलेल्या पार्टनरकडून दुसऱ्या पार्टनरच्या शरिरात प्रवेश करू शकतो.
या शक्यतेमुळे संसर्ग असलेल्या लोकांबरोबर ओपन माऊथ किसींग करू नये अशी शिफारस CDC करते.
14. एकमेकांबरोबर कप, भांडी शेअर केल्याने किंवा हात मिळवल्याने एचआयव्ही किंवा एड्स होऊ शकतो का?
एचआयव्हीचे विषाणू प्रामुख्यानं शरिरातील द्रव पदार्थात आढळतात. त्यामुळं एखाद्याशी हात मिळवणे किंवा मिठी मारणे किंवा एकच टॉयलेट, टॉवेल यांचा वापर यातून याचा संसर्ग पसरत नाही.
लाळेमध्ये एचआयव्हीचे विषाणू आढळत असले तरी, एकमेकांचे कप किंवा भांडी वापरल्याने एचआयव्हीचा संसर्ग झाल्याचं समोर आलेलं नाही.
14. मच्छर आणि किटकांच्या चावण्यामुळे एचआयव्हीचा संसर्ग पसरू शकतो का?
नाही. किटक एचआयव्हीचा प्रसार करू शकत नाहीत. हे विषाणू किटकांच्या शरिरात जगू शकत नसल्याचं संशोधनातून समोर आलं आहे.
तसंच एचआयव्हीचे विषाणू मच्छरांच्या लाळेमध्ये जगू शकत नाही किंवा त्यांचे पुनरुत्पादन होऊ शकत नाही. एचआयव्हीचा विषाणू हा अत्यंत नाजूक असून तो मानवी शरिराबाहेर जगू शकत नाही.
16. एचआयव्ही आणि लैंगिक संबंधांतून पसरणारे इतर संसर्ग याचा एकमेकांशी संबंध आहे का?
हो. लैंगिक संबंधांद्वारे परसणारे संसर्ग (STI-Sexually Transmitted Infection) मुळं, त्या व्यक्तीला किंवा त्याच्यामुळं एचआयव्हीचा संसर्ग होण्याची शक्यता पाच ते आठ पटींनी वाढते.
STI मुळं गुप्तांगातून अल्सर किंवा स्त्राव होत असतो. STI मुळं संसर्ग होण्याचा किंवा पसरण्याचा धोका अधिक वाढतो.
लैंगिक संबंधांद्वारे पसरणाऱ्या संसर्गांमुळं त्वचेची जळजळ किंवा फोडांसारखा त्रास झाल्यास, एचआयव्हीच्या विषाणूला लैंगिक संबंधांदरम्यान शरिरात प्रवेश करणं अधिक सोपं ठरतं.
STI मुळं जखमा किंवा फोड असं काही झालेलं नसेल तरीदेखील अशा संसर्गामुळं गुप्तांगाच्या भागात रोगप्रतिकारक प्रतिक्रिया होते आणि त्यातून सहजपणे एचआयव्हीच्या विषाणूचा प्रसार होऊ शकतो.
17. STI बाबत लवकर आणि पूर्ण उपचार का गरजेचे आहेत?

फोटो स्रोत, Getty Images
STI ची लागण असलेल्या रुग्णाला किंवा त्याच्यामुळं एचआयव्ही संसर्ग होण्याचा धोका अधिक (5 ते 8 पट) असतो.
STI चे लवकर निदान आणि उपचार यामुळं तो संसर्ग लवकर बरा होतो.
शिवाय अशा व्यक्तीकडून पार्टनरला एचआयव्हीचा संसर्ग होण्याचा धोकाही कमी होतो.
त्याशिवाय यामुळं वंध्यत्व आणि एक्टोपिक प्रेग्नंसीसारख्या समस्यादेखील STI मुळं उद्भवण्याची शक्यता असते.
18. लैंगिक संबंधांतून पसरणारे संसर्ग (STI) कोणते आहेत? पुरुष आणि महिलांमध्ये त्याची लक्षणं कोणती आहेत?
एसटीआय म्हणजे सेक्श्युअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन्स आणि आरटीआय म्हणजे रिप्रोडक्टीव्ह ट्रॅक्ट इन्फेक्शन्स म्हणजे दोन व्यक्तींच्या लैंगिक संबंधांतून पसरणारे किंवा जननेंद्रियाच्या भागात असलेले कोणतेही संसर्ग असतात.
पुरुषांमध्ये आढळणारी लक्षणे
जननेंद्रियातून स्त्राव किंवा पू निघणे, लिंगावर फोड, पुरळ येणे. जननेंद्रियाच्या भागात सूज येणे, लघवी करताना वेदना किंवा जळजळ होणे, जननेंद्रियाच्या आजुबाजुला खाज येणे, अशी लक्षणं असू शकतात.
महिलांमध्ये आढळणारी लक्षणे
ओटीपोटात खालच्या भागात वेदना, योनीतून दुर्गंधीयुक्त स्त्राव, जननेंद्रियाच्या जवळ फोड, गाठ येणे, लैंगिक संबंधांदरम्यान वेदना किंवा जळजळ, जननेंद्रियाच्या जवळच्या भागात खाज सुटणे, सूज, पुरळ येणे.
महिलांना संसर्गाची अधिक शक्यता असते. कंडोमचा नियमित आणि योग्य वापर करणे हा संसर्ग टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.
औषधी पूर्ण घेणे आणि डॉक्टरांनी सांगितल्यानंतरच औषध बंद करणे सर्वाधिक महत्त्वाचे आहे. आपल्या पार्टनरच्यादेखील सर्व चाचणी करून घ्याव्यात.
19. एचआयव्ही/एड्ससाठी उपचार उपलब्ध आहेत का?
़यावर उपचार उपलब्ध नाहीत. मात्र एआरटी ( ART- Anti Retroviral Treatment)ही प्रभावी औषधं उपलब्ध आहेत. त्यामुळं एचआयव्हीची लागण झालेल्या व्यक्तीचे आयुर्मान वाढू शकते आणि जीवनशैलीचा दर्जादेखील उंचावू शकतो.
रुग्णाला ART सुरू केल्यानंतर आयुष्यभर ही औषधं आणि उपचार घ्यावे लागतात. संपूर्ण भारतात ART केंद्रांमध्ये ही औषधं मोफत उलब्ध आहेत.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)










