'HIV आहे हे लक्षात येताच वरिष्ठांनी मला अर्ध्या तासात कामावरून काढलं'

HIV

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र
    • Author, अनघा पाठक
    • Role, बीबीसी मराठी

"मी गेल्या पंधरा वर्षांपासून लढतेय, एकटीच."

"मी HIVशी झगडतेय, मला हा आजार झालाय हे कोणाला कळू नये म्हणून झगडतेय, पण त्याहीपेक्षा जास्त मी स्वतःशीच झगडतेय. गेल्या कित्येक वर्षांत मी जिंकले नाहीये, म्हणूनच ही केस जिंकल्याचा आनंद शब्दात वर्णन करण्यापलिकडचा आहे," रजनी (ओळख लपवण्यासाठी नाव बदललेलं आहे) दीर्घ श्वास घेत अडखळत बोलतात.

35 वर्षांच्या रजनी माझ्याशी फोनवर बोलताना भावनिक झाल्या होत्या.

साहजिक आहे, त्यांना सवय आहे ती लोकांच्या कुत्सित नजरेची. पण सोमवारपासून त्यांना सतत येणाऱ्या माध्यम प्रतिनिधींच्या फोनची, लोकांच्या पाठिंब्याची त्यांना सवयच नाही, त्यामुळे त्या भारावून गेल्या आहेत.

त्या HIV ग्रस्त आहेत म्हणून त्यांच्या कंपनीने कामावरून त्यांना काढून टाकलं होतं. तीन वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर सोमवारी पुण्यातल्या लेबर कोर्टाने त्यांच्या बाजूने निकाल दिला आहे.

कोर्टाने त्यांना कामावर परत घेण्याचे आदेश दिले आहेत तसंच जेवढ्या महिन्यांसाठी त्या कामावर नव्हत्या त्या महिन्यांचा पगार देण्याचा आदेशही दिला आहे.

रजनी मुळच्या कोल्हापुरातल्या एका गावात राहाणाऱ्या. त्यांचं लग्न लहान वयातच झालं. त्या अवघ्या 22 वर्षांच्या असताना त्यांच्या पतीचं HIV-AIDS ने निधन झालं.

HIV

फोटो स्रोत, Getty Images

"2014 साली मला समजलं की माझ्या मिस्टरांना HIV-AIDS आहे. त्यांना वाचवण्याचे मी अथक प्रयत्न केले, पण ते वाचू शकले नाहीत. त्यांच्या औषध उपचारांसाठी मी कर्जही काढलं होतं. 2006 सली त्यांचं निधन झालं. माझ्या मिस्टरांचं निधन झाल्यानंतर अक्षरशः तिसऱ्या दिवशी माझ्या सासरच्यांनी सांगितलं की तू या घरात राहू शकत नाहीस. बाकी तू कुठेही जा," रजनी दीर्घ निश्वास सोडत उत्तरतात.

त्यांच्या माहेरच्या लोकांचीही त्यांना मदत झाली नसल्याचं त्या सांगतात. "मला सांभाळण्यासारखी त्यांची परिस्थिती नसावी कदाचित."

स्वतःचा खर्च भागवण्यासाठी त्या गावातच लहानमोठी कामं करायला लागल्या.

"अशाच एका कामाच्या संदर्भात मी 15 दिवसांसाठी पुण्याला आले होते. तेव्हा पहिल्यांदा मी मोकळा श्वास घेतला. गावात असताना असायचं तसं दडपण माझ्यावर नव्हतं. माझी तब्येत सुधारली, बोलणं सुधारलं, माझ्यात एक नवा आत्मविश्वास आला. मग माझ्या आईने सल्ला दिला की तू पुण्यातच राहा."

पुण्यात रजनी यांना लवकरच नोकरी मिळाली. काही दिवसांनी त्यांनी आपली HIV ची तपासणी करून घेतली तेव्हा त्यांना कळालं की त्याही HIV ग्रस्त आहेत. "माझं आयुष्य पुन्हा उद्धवस्त झालं होतं. मी पूर्णपणे खचले होते. मला कुठे जायला जागा नव्हती. पुण्यात माझं आयुष्य नव्याने सुरू करायची माझी स्वप्न धुळीला मिळाली होती."

जिचा नवरा HIV-AIDSने मेला आहे अशी विधवा स्त्री रजनी होत्या. त्यांच्या घरी त्यांना कोणी स्वीकारायला तयार नव्हतं. "माझ्या घरच्यांनी माझ्याशी नातं तोडलं होतं. खरं सांगायचं तर माझं कोणीच नव्हतं," त्या सांगतात.

HIV

फोटो स्रोत, Getty Images

तुमच्या आयुष्यात असा असा एक क्षण येतो जेव्हा तुम्ही इतके जोरात आपटलेले असता की यापेक्षा काही वाईट होऊ शकत नाही असा विचार करून तुम्ही स्वतःला सावरायला लागता. रजनीच्या बाबतीतही असंच झालं.

"मलाच माझी काळजी घ्यावी लागेल हे मला कळालं. माझ्या असण्या-नसण्याने कोणाला फरक पडणार नाही, पण मला तर पडेल ना? मग मी ठरवलं माझी मी स्वतःच काळजी घ्यायची. मी स्वतःच्या खाण्यापिण्यावर, तब्येतीवर लक्ष द्यायला सुरुवात केली आणि औषधांसाठी पण National AIDS Research Institute मध्ये रजिस्टर केलं."

लवकरच रजनी यांना एका फार्मा कंपनीत नोकरी मिळाली. चांगलं काम केलं म्हणून त्यांना नोकरीत पर्मनंटही करण्यात आलं. त्यांनी जवळपास 10 वर्षं त्या कंपनीत काम केलं. पण जेव्हा कंपनीच्या उच्चपदस्थांना रजनी HIV ग्रस्त असल्याचं कळलं तेव्हा त्यांना कामावरून काढून टाकण्यात आलं, असा दावा रजनी करतात.

नक्की झालं काय?

माझ्याकडून जबरदस्ती राजीनामा घेण्यात आला असं त्या सांगतात.

"मी आजारी असल्याने काही महिने सुट्टीवर होते. जेव्हा कामावर परत आले तेव्हा मी मेडिक्लेमसाठी अर्ज सादर केला. मी ऐकलं होतं की कंपनी कामगारांच्या उपचाराचा खर्च देते. माझी आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती, मला पैशांची गरज होतीच. मला वाटलं या क्लेमचे पैसे मिळाले तर मला मदतच होईल. पण जेव्हा वरिष्ठांच्या लक्षात आलं की मला HIV आहे, त्यांनी मला कामावरून काढून टाकलं. मोजून 30 मिनिटात!

त्यांच्याकडून जबरदस्ती राजीनामा का घेतला हे विचारलं असता त्या म्हणाल्या, "मला वरिष्ठांनी सांगितलं की आपण एक फार्मा कंपनी आहोत आणि जर तू इथे काम केलंस तर इथे बनणारी औषधं दुषित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुला नोकरी सोडावीच लागेल.

"मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला की असं काही होणार नाही. मी स्वतःची खूप चांगली काळजी घेते, सगळे नियम पाळते, माझ्यामुळे कशालाही संसर्ग होणार नाही. पण कोणीही माझं ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतं. मी खूप विनवण्या केल्या की मला नोकरीवरून काढू नका, मला गरज आहे पण त्यांनी माझं ऐकलं नाही," रजनींच्या डोळ्यापुढे भूतकाळ फिरत असतो.

HIV

फोटो स्रोत, Getty Images

रजनी पुन्हा हतबल झाल्या होत्या. आयुष्यात पुन्हा पुन्हा बसणाऱ्या धक्क्यांनी खचल्या होत्या. पण तरीही त्यांनी नेटाने लढायचं ठरवलं. त्यांना अनेकांनी आर्थिक मदत देऊ केली पण त्यांनी ती नाकारली.

त्यांच्या एका मानलेल्या भावाच्या मदतीने त्यांनी शोधून काढलं की कोणतीही कंपनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना HIV ग्रस्त असल्याच्या कारणाने काढून टाकू शकत नाही. मग त्यांनी पुण्याच्या लेबर कोर्टात केस दाखल केली.

"मी म्हटलं आता बास. दरवेळी मी माझ्या आयुष्यात काही चांगलं करायला गेले की काहीतरी वाईट व्हायचंच. मी ठरवलं की मी ही केस शेवटपर्यंत लढणार. मला माहीत नव्हतं पुढे काय होईल. कधी कधी तर वाटायचं की हे सगळं सोडून पळून जावं. पण तरी मी लढत राहिले.

सोमवारी, 3 डिसेंबरला, कोर्टाने रजनीच्या बाजूने निकाल दिला. निकालपत्रात म्हटलं होतं की, "HIV ग्रस्त असल्याच्या कारणावरून कोणत्याही कर्मचाऱ्याला कामावरून काढता येणार नाही. जर कोणालाही नोकरीवरून काढायचं असेल तर ते कायद्याच्या कक्षेत असावं लागतं. आणि हे कायद्याच्या कक्षेत नाही."

मला माझा चेहरा आता लपवायचा नाहीये

कोर्टाचा निकाल आल्यानंतर रजनींना सतत फोन येत आहेत. माध्यमांना त्यांची प्रतिक्रिया हवी आहे. लोक त्यांच्या लढ्याचं कौतुक करत आहेत. पण ज्या कंपनीने त्यांना तीन वर्षापूर्वी हाकललं त्या कंपनीत त्यांना परत जावसं वाटतं का त्यांना?

"कोर्टाचा निकाल आला तेव्हा काही क्षण वाटलं की नको जायला परत. पण मग वाटलं परत न जाण्यासाठी तर एवढा संघर्ष केला नव्हता मी. त्यामुळे मी परत जाणार आणि काम करणार. आयुष्यभर मी HIV ग्रस्त आहे ही गोष्ट लपवत आले आहे. पण आता हे सत्य बाहेर आलंय.

HIV

फोटो स्रोत, Getty Images

"निदान माझ्या कंपनीत काम करणाऱ्या सगळ्यांना तरी माझ्याविषयी माहीत आहे. एका दडपणातून सुटल्यासारखं वाटतंय मला. आणि आता मला कशाचं काही वाटतं नाही. लोकांना माझ्याविषयी कळो न कळो त्याने मला काही फरक पडत नाही.

खरं सांगू, मीडियाने जेव्हा माझ्या प्रतिक्रिया मागितल्या तेव्हा मी चेहरा झाकून कॅमऱ्यासमोर गेले. आता असं वाटतंय की उगाच चेहरा झाकला. यापुढे कदाचित मी चेहरा झाकणार नाही आणि सर्वांसमोर जशी आहे तशी येईन. कोण काय विचार करतंय याने आता मला फरक पडत नाही.

HIV ग्रस्त महिलांच्या वाटेला जास्त त्रास

HIVग्रस्त महिलांच्या वाटेला जास्त भोग असतात असं रजनींना वाटतं. "मी जेव्हा माझी औषध घ्यायला जाते तेव्हा तिथलेच लोक विचित्र नजरेने माझ्याकडे बघतात. जवळपास सगळ्याच बायकांना हा रोग त्यांच्या नवऱ्याकडून होतो, पण गुन्हेगार बाईलाच ठरवलं जातं.

नवरा मेला की बाईला तिच्या सासरचे अक्षरशः घराबाहेर काढतात. माहेरचेही पाठिंबा देत नाहीत. माझ्याही बाबतीत हेच झालं. अशावेळेस बायकांना कुठे जायला जागा नसते."

पुन्हा लग्न नाही

रजनी इतक्या वर्षांपासून एकट्या राहात आहेत त्यामुळे त्यांना अनेकदा दुसरं लग्न करण्याचा सल्ला दिला जातो.

"आजकाल दोन HIV ग्रस्त असलेल्या व्यक्ती एकमेकांशी लग्न करतात. तसं मी करावं असंही अनेकांनी सांगितलं. पण मी मुळीच दुसरं लग्न करणार नाही. माझ्या पतीच्या आजारपणात मला जो त्रास झाला ते मी विसरू शकणार नाही. पुन्हा त्या अनुभवातून मी जाऊ शकत नाही. मी माझ्या एकटेपणात खूश आहे."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)