काय आहे HPV व्हायरस : समज आणि गैरसमज

सेक्स व्हायरस HPV

फोटो स्रोत, SIPHOTOGRAPHY

    • Author, लॉरा इव्ह
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

UKमध्ये सध्या सेक्स व्हायरस HPVविषयी बरीच चर्चा सुरू आहे. या विषाणूबद्दल लोकांमध्ये कमालीचं अज्ञान आणि लज्जा असल्याचं एका सर्वेक्षणात समोर आलं आहे. जवळपास 80 टक्के लोकांना लैंगिक संक्रमणातून या विषाणूची बाधा झाली आहे.

गर्भाशयातील कँसरच्या तपासण्यांमध्ये UK सरकार HPV चाचणी बंधनकारक करण्याची मोहीम सुरू करत आहे.

यासंबंधीच्या सर्वेक्षणातल्या HPV बाधा झालेल्या निम्म्या महिलांना वाटतं की त्यांच्या जोडीदारानं त्यांना फसवलं आहे. मात्र हा विषाणू शरीरात अनेक वर्षं सुप्त स्वरुपात असू शकतो.

या बाबतच्या संकोचामुळे बऱ्याच महिला चाचणीला तयार होणार नाहीत, असं या मोहीमेच्या संयोजकांना वाटतं.

Jo's Cervical Cancer Trustनं गेल्या महिन्यातच जवळपास 2000 महिलांचं सर्वेक्षण केलं. या सर्वेक्षणात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या.

या विषाणूची बाधा झाल्याचं लक्षात येताच जवळपास निम्म्या महिलांनी लाजेमुळे लैंगिक संबंध ठेवणंच बंद केलं. जवळपास 35% महिलांना HPV म्हणजे काय हेच माहीत नव्हतं. तर 65% महिलांना वाटलं त्यांना या विषाणूची बाधा झालीय म्हणजे त्यांना कँसर आहे.

लॉरा फ्लार्टी

फोटो स्रोत, LAURA FLAHERTY

फोटो कॅप्शन, लॉरा फ्लार्टी

31 वर्षांच्या लॉरा फ्लार्टी यांना 2016मध्ये गर्भाशयाचा कँसर असल्याचं कळलं. त्या म्हणतात,"जेव्हा माझ्या रिपोर्टमध्ये मी HPV पॉझिटिव्ह असल्याचं पहिल्यांदा वाचलं तेव्हा मला त्याविषयी काहीच माहिती नव्हती. मी गुगल केलं. तेव्हा मला कळलं की हा लैंगिक संक्रमणातून झालेला संसर्ग आहे."

"त्यामुळे सहाजिकच माझ्या मनात विचार आला की माझ्या जोडीदारानं मला फसवलं. मला खूप किळस आली. मला हे माहीतच नव्हतं की हा विषाणू बरीच वर्ष तुमच्या शरिरात सुप्त स्वरुपात असू शकतो. त्यानंतर जेव्हा मला कळलं की लोकांमध्ये हा विषाणू किती मोठ्या प्रमाणात असतो, तेव्हा मला धक्काच बसला. मी ज्या ज्या लोकांशी बोलले त्यातल्या कुणालाच याविषयी माहिती नव्हती.

line

HPV बद्दलचे गैरसमज (संदर्भ - Jo's Cervical Cancer Trust)

गैरसमज 1 : लैंगिक संबंधातून या विषाणूची लागण होते.

सत्य : HPV हा सामान्यपणे लैंगिक संबंधातून संक्रमित होतो. मात्र जननेंद्रिय आणि तोंडाच्या भागातील त्वचेचा त्वचेशी स्पर्श झाल्यासही हा संसर्ग होऊ शकतो.

गैरसमज 2 : HPV म्हणजे तुमचे अनेकांशी संबंध आहेत.

सत्य : आपल्यापैकी 80% लोकांना आयुष्यात एकदातरी या विषाणूची बाधा होते. त्याची सहज लागण होते आणि तितक्याच सहज त्याचं संक्रमणही होतं. शिवाय तुम्ही कुठल्याही प्रकारचे लैंगिक संबंध पहिल्यांदा ठेवता त्यावर याचा संसर्ग ठरतो.

गैरसमज 3 : HPV म्हणजे मला कँसर आहे.

सत्य : HPVचे जवळपास 200 प्रकार आहेत. त्यातील जवळपास 40 प्रकार जननेंद्रियांजवळ दिसतात. त्यातील काहींमुळे चामखीळ सारखे प्रकार होऊ शकतात. पण ते गंभीर किंवा धोकादायक नसतात. जवळपास 13 गंभीर प्रकारात मोडतात. ज्यामुळे गर्भाशयाचा कँसर, जननेंद्रियांचा कँसर, तोंड किंवा घशाचा कँसर होऊ शकतो. पण ते दुर्मिळ आहेत.

HPV

फोटो स्रोत, Getty Images

गैरसमज 4 : HPVचा संसर्ग झाला असेल तर तो तुमच्या लक्षात येईल.

सत्य : HPVची कोणतीच लक्षणं नसतात आणि बरेचदा तुमची रोगप्रतिकारक क्षमताच हा संसर्ग दूर करते. गर्भाशयाची चाचणी केली तरच संसर्ग असल्याचं कळतं.

line

HPV चाचणीमुळे गर्भाशयाचा कँसर होण्याचा सर्वांत जास्त धोका असणाऱ्यांना त्याची माहिती मिळते. त्यामुळे पुढील उपचार लवकर मिळतील. हाच या मोहिमेचा उद्देश आहे. याचाच एक भाग म्हणून हे सर्वेक्षण करण्यात आलं.

ही मोहीम 2019 म्हणजे पुढच्या वर्षी इंग्लंडमध्ये तर 2020मध्ये स्कॉटलँडमध्ये राबवली जाईल.

2008मध्ये HPVवर लस आल्याने 12 ते 18 वर्षं वयाच्या मुलींमध्ये हा संसर्ग खूप कमी होताना दिसतोय. गेल्या वर्षी ही लस 16 ते 45 वर्षं वयाच्या LGBT समुदायातल्या लोकांनाही द्यायला सुरुवात झाली.

लवकरच इतरांनही ती देऊ, असं सरकारनं गेल्या जुलैमध्येच जाहीर केलं आहे. 18 वर्षांवरील व्यक्तींना ही लस दिली जात नाही. कारण या वयात येईपर्यंत संसर्ग झाला असण्याची शक्यता खूपच जास्त असते. संसर्ग झाल्यावर लस देऊन उपयोग नसतो.

या मोहीमेमुळे लोकांचे HPVबद्दलचे गैरसमज दूर होतील आणि गंभीर अशा गर्भाशयाच्या आजारावरही प्राथमिक अवस्थेतच योग्य उपचार मिळून आजार बरा होण्याचं प्रमाण वाढेल, असा विश्वास तज्ज्ञांना वाटतो.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)