सौदी अरेबिया : तेलाच्या जोरावर जगात महत्त्वाचा ठरलेला हा देश बनला कसा?

19 व्या शतकातील मदीना शहराचं दृश्य

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 19 व्या शतकातील मदीना शहराचं दृश्य
    • Author, अकील अब्बास जाफरी
    • Role, रिसर्चर आणि इतिहासकार, कराची

पश्चिम आशिया आणि आफ्रिका खंडांच्या सीमेवरील द्वीपकल्प म्हणजे अरेबिया. या द्वीपकल्पात कुवैत, ओमान, कतार, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती आणि येमेन आदी देश आहेत.

पण या सर्व देशात क्षेत्रफळाने सर्वांत मोठा देश कोणता असेल तर तो सौदी अरेबिया. मक्का आणि मदिनेच्या या देशाला मुस्लीम समाजात फार मोठं महत्त्व लाभलंय, कारण इस्लामचे प्रवर्तक मुहम्मद पैगंबर यांचा जन्म याच प्रदेशात झालाय.

तसं तर या देशाची स्थापना शाह अब्दुल अजीज बिन अब्दुल रहमान अल सौद यांनी केली आहे. त्यांचा जन्म 15 जानेवारी 1877 सालचा. अल सौदचे प्रमुख अमीर सौद बिन मोहम्मद बिन मकरन यांचा 1725 मध्ये मृत्यू झाल्यावर हा देश स्थापन करण्यासाठीचा संघर्ष सुरू झाला.

त्या काळी नजदमध्ये छोटी छोटी राज्य होती आणि या प्रत्येक राज्याचा एक शासक असायचा. अमीर सौद बिन मोहम्मद यांना चार मुलं होती. त्यांनी नजदमध्ये सौदी राज्य स्थापन करण्याचा चंग बांधला होता.

अमीर सौद बिन मोहम्मद यांच्या थोरल्या मुलाचं नाव मोहम्मद बिन सौद असं होतं. तो दिरियाहचा शासक बनला आणि त्याने शेख मोहम्मद बिन अब्दुल वहाबच्या मदतीने दिरियाहमध्ये आपली सत्ता आणखीन मजबूत करायला सुरुवात केली.

शेख मोहम्मद बिन अब्दुल वहाब म्हणजे नजदचे एक प्रसिद्ध विद्वान. मुस्लिमांच्या मान्यता सुधारण्याच्या प्रयत्नात त्यांनी स्वतःला वाहून घेतलं होतं.

19 व्या शतकातील मक्का शहरातून येणारी एक यात्रा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 19 व्या शतकातील मक्का शहरातून येणारी एक यात्रा

ऐतिहासिक संदर्भ चाळले तर असं लक्षात येतं की, 1745 मध्ये प्रिन्स मोहम्मद बिन सौद आणि शेख मोहम्मद अब्दुल वहाब यांच्यात एक ऐतिहासिक बैठक झाली होती.

या बैठकीत असं ठरलं की, जर मोहम्मद बिन सौद यांना नजद आणि हिजाझमध्ये आपली सत्ता प्रस्थापित करण्यात यश मिळालं तर ते त्या प्रदेशात शेख मोहम्मद बिन अब्दुल वहाब यांच्या मान्यता लागू करण्यात येतील.

पण 1765 मध्ये प्रिन्स मोहम्मद बिन सौद यांचा तर 1791 मध्ये शेख मोहम्मद बिन अब्दुल वहाब यांचा मृत्यू झाला. तोपर्यंत अरबी द्वीपकल्पावरील बऱ्याच ठिकाणी अल सौदची सत्ता प्रस्थापित झाली होती.

प्रिन्स मोहम्मद यांच्या मृत्यूनंतर इमाम अब्दुल अझीझ या प्रदेशाचे शासक बनले. पण 1803 मध्ये त्यांची हत्या करण्यात आली आणि त्यानंतर त्यांचा मुलगा सौद सत्तेवर आला. पण 1814 मध्ये त्याचा ही मृत्यू झाला.

रियाध राजधानी म्हणून उदयाला आली...

सौद यांचा मुलगा अब्दुल्ला मोठे विद्वान होते. पण त्यांच्या कारकीर्दीत राज्याचा मोठा हिस्सा दिरियाह ऑटोमन साम्राज्याच्या ताब्यात गेला.

इमाम अब्दुल्ला यांना कैद करून इस्तंबूलला नेण्यात आलं आणि त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली.

13 ऑक्टोबर, 1924 रोजी शाह अब्दुल अजीज यांनी मक्का काबीज केलं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 13 ऑक्टोबर, 1924 रोजी शाह अब्दुल अजीज यांनी मक्का काबीज केलं.

पण त्यांचा भाऊ मशारी बिन सौद यांनी ऑटोमन साम्राज्याच्या ताब्यात गेलेलं राज्य पुन्हा मिळवलं. पण त्यांना जास्त काळासाठी राज्य सांभाळता आलं नाही. त्यांचं राज्य पुन्हा एकदा ऑटोमन साम्राज्याच्या ताब्यात गेलं.

यानंतर त्यांचा पुतण्या प्रिन्स तुर्की बिन अब्दुल्ला यांना रियाध मिळवण्यात यश आलं. तिथं त्यांनी 1824 ते 1835 पर्यंत राज्य केले. पुढची कैक दशकं अल सौदचं नशीब हेलकावे खाताना दिसलं.

जसं की राज्य गमावणं आणि पुन्हा मिळवणं असं सुरूच होतं. थोडक्यात अरेबियाच्या राज्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी ऑटोमन साम्राज्यापासून इजिप्त आणि अरब जमातींमध्ये सातत्याने युद्ध व्हायची. यात अल सौदच्या शासकांपैकी एक असलेले इमाम अब्दुल रहमान यांनी 1889 मध्ये बेअत (निष्ठेची शपथ) घेण्यात यश मिळवलं.

इमाम अब्दुल रहमान यांच्या मुलाची, शहजादा अब्दुल अजीझची गणना शूर योध्यांमध्ये व्हायची. त्यांनी 1900 मध्ये वडील ह्यात असतानाच आपलं गमावलेलं राज्य परत मिळवण्यासाठी आणि ते विस्तारण्यासाठी प्रयत्न केले.

त्यांनी 1902 मध्ये रियाध शहरावर ताबा मिळवून या शहराला अल सौदच्या राजधानीचा दर्जा दिला. त्यांनी आपली विजयी घोडदौड सुरू ठेवत अल-एहसाई, कुतैफ आणि नजदचे अनेक भाग काबीज केले.

मक्का आणि मदिनेवर ताबा

ऑटोमन साम्राज्याच्या शेवटच्या टप्प्यात हिजाजवर शरीफ मक्का हुसेनचं राज्य होतं. या हिजाज राज्यात मक्का आणि मदीनेचा समावेश होता. त्यांनी 5 जून 1916 रोजी तुर्कीविरुद्ध बंड घोषित केलं.

या युद्धात हुसेनला अरबस्तानातील अनेक जमातींचा आणि ब्रिटनचाही पाठिंबा होता. 7 जून 1916 साली शरीफ मक्का हुसेन यांनी हिजाज स्वतंत्र असल्याचं घोषित केलं.

सौदी अरब

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सौदी अरब

21 जूनला त्यांनी मक्केवर ताबा मिळवला आणि 29 ऑक्टोबरला स्वतः संपूर्ण अरबस्तानचा शासक असल्याचं घोषित केलं. सोबतच त्यांनी सर्व अरबांना तुर्कांविरुद्ध युद्ध घोषित करण्यास सांगितलं. 15 डिसेंबर 1916 मध्ये ब्रिटिशांनी हिजाजचा सम्राट म्हणून हुसेनच्या नावाला मान्यता दिली.

दरम्यानच्या काळात अमीर अब्दुल अझीझ बिन अब्दुल रहमान अल सौदने अरेबियाच्या पूर्व भागावर ताबा मिळवला. 26 डिसेंबर 1915 रोजी ब्रिटनशी मैत्रीचा करार केला. आणि 5 सप्टेंबर 1924 मध्ये हिजाज सुद्धा जिंकून घेतलं.

लोकांनी पण अमीर अब्दुल अझीझला पाठिंबा दिला. तर दुसरीकडे शरीफ मक्का शाह हुसेन पायउतार झाले आणि त्यांनी त्यांच्या मुलाला अलीला हिजाजचा बादशाह बनवलं. पण अमीर अब्दुल अझीझ यांचं प्रस्थ वाढतच चाललं होतं. त्यामुळे अलीला सुद्धा आपली गादी सोडावी लागली.

13 ऑक्टोबर 1924 रोजी शाह अब्दुल अझीझने मक्का आपल्या ताब्यात घेतली. याच काळात शाह अब्दुलची विजयी घोडदौड सुरूच होती.

पुढे 5 डिसेंबर 1925 मध्ये त्यांनी मदीनेचाही ताबा मिळवला. 19 नोव्हेंबर 1925 मध्ये शरीफ मक्का अली यांनी सत्ता सोडत असल्याचं सांगितलं.

आणि अशा पद्धतीने हिजाजवरही अल सौदचं राज्य प्रस्थापित झालं. 8 जानेवारी 1926 रोजी एक समारंभ पार पडला, यात अब्दुल अझीझ बिन अब्दुल रहमान अल सौद यांना हिजाजचा सम्राट घोषित करण्यात आलं. सोबतच नजद आणि हिजाजचे पूर्ण नियंत्रण स्वीकारल्याची घोषणा करण्यात आली.

एवढं तेल सापडलं की तज्ज्ञमंडळी सुद्धा भांबावले..

20 मे 1927 रोजी ब्रिटनने अब्दुल अझीझ बिन सौदच्या अखत्यारीत असलेल्या सर्व प्रदेशांवर त्यांची राजवट मान्य केली. यात नजद आणि हिजाजचा सुद्धा समावेश होता.

पुढे 23 सप्टेंबर 1932 मध्ये शाह अब्दुल अझीझ बिन सौद यांनी हिजाज आणि नजद प्रदेशाचं नाव बदलून 'अल-मुमलीकत-अल-अरेबिया-अल-सौदिया' (सौदी अरेबिया) असं ठेवलं.

शाह अब्दुल अझीझ

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, शाह अब्दुल अझीझ

शाह अब्दुल अझीझ बिन अब्दुल रहमान अल सौद यांनी नव्याने स्थापन केलेल्या राज्याला इस्लामिक स्वरूपात पुढं आणायचा प्रयत्न केला. याच दरम्यान सौदीमध्ये तेलाचे साठे शोधण्यात यश आलं. हे तेल काढण्यासाठी 1933 मध्ये कॅलिफोर्निया पेट्रोलियम कंपनीसोबत करार करण्यात आला.

सुरुवातीच्या काळात तेलाचे साठे शोधण्यात यश येत नव्हतं. कंपनी 1933 ते 1938 अशी पाच वर्षे तेल मिळेल या आशेवर तग धरून होती, पण तेल मिळेना म्हटल्यावर त्यांनी निघायचं ठरवलं.

आणि इतक्यात एका विहिरीला पाझर फुटला आणि त्यातून तेल बाहेर येऊ लागलं. या तेलाचा लोंढा एवढा मोठा होता की तज्ज्ञमंडळी ते दृश्य पाहूनच भांबावले.

लाईन
लाईन

ही घटना सौदी अरेबिया किंवा कॅलिफोर्निया कंपनीसाठी नव्हे तर संपूर्ण अरब द्वीपकल्पासाठी चमत्कारिक गोष्ट होती. इथूनच नवं ऐतिहासिक पर्व सुरू झालं होतं. तेलाचा शोध लागल्यानंतर सौदी अरेबियाला आर्थिक स्थैर्य प्राप्त झालं.

9 नोव्हेंबर 1953 मध्ये सौदीचे शासक शाह अब्दुल अझीझ बिन अब्दुल रहमान अल सौद यांचं निधन झालं.

जन्नत अल-बकीचा विध्वंस

अब्दुल अझीझ सौदीचे शासक बनल्यानंतर त्यांनी सौदीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. पण त्यांनी जे धार्मिक बदल केले त्यामुळे मात्र इस्लामिक जगतात अशांतता माजली.

त्यांनी त्यांच्या राज्यात शेख मोहम्मद बिन अब्दुल वहाब यांच्या मान्यता लागू केल्या. सोबतच बिदअत म्हणजे इस्लाममध्ये ज्या गोष्टी नंतर जोडल्या गेल्या त्या रद्द करून टाकल्या. त्यांच्या शासनकाळात मदिना मध्ये असलेल्या जन्नत-उल-बकी या दफनभूमीची तोडफोड करण्यात आली.

या ठिकाणाला बकी हे नाव पडलं कारण त्या भागात मोठ्या प्रमाणावर जंगली झाडं होती. तसेच दफनभूमीच्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणावर काटेरी झुडुपं आढळून आली. त्या झाडांच्या नावावरून या भागाला बकी हे नाव पडलं.

इस्लामच्या पैगंबरांच्या काळापासून या दफनभूमीत मुस्लिमांना दफन केलं जातं होतं. या दफनभूमीत हजरत उस्मान बिन माझून या पहिल्या साहाबींना (प्रेषित-ए-इस्लामचे साथीदार) दफन करण्यात आलं होतं. त्यानंतर इथं हजारो लोकांचा दफनविधी करण्यात आला होता.

21 एप्रिल 1926 मध्ये शाह अब्दुल अझीझ बिन अब्दुल रहमान अल सौद यांनी जन्नत-अल-बकीमधील सर्व घुमट पाडण्याचे आदेश दिले. त्यांच्या या कृतीमुळे इस्लामिक जगतात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.

या विध्वंसाने संपूर्ण दफनभूमी एका सपाट मैदानात बदलून गेली. पण मक्का आणि मदिनेच्या तीर्थयात्रेसाठी जे लोक जातात ते आजही जन्नत-अल-बकीला भेट देऊन येतात.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)