हिजाब घालणं इस्लाममध्ये अनिवार्य नाही- कर्नाटक उच्च न्यायलय, 10 मुद्द्यांत समजून घ्या हे प्रकरण

फोटो स्रोत, Getty Images
इस्लामिक धार्मिक प्रथांप्रमाणे हिजाब परिधान करणं हे आवश्यक नसल्याचं मत कर्नाटक उच्च न्यायालयानं व्यक्त केलं आहे.
विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये हिजाब घालण्यासाठी परवानगी देण्याबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर कर्नाटक उच्च न्यायालयाने आज (15 मार्च) निकाल जाहीर केला. या वादावरून निर्माण झालेला तणाव लक्षात घेत बंगळुरूमध्ये सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे.
15 ते 21 मार्च या काळात मंगलोरमध्ये मेळावे, आंदोलनं, निदर्शनं अशा सगळ्यावर बंदी घालण्यात आली आहे. तर उडुपीमधली शाळा - कॉलेजेस आज बंद राहणार आहेत.
या प्रकरणातील पुढील निर्देश येईपर्यंत विद्यार्थ्यांनी कोणताही धार्मिक पेहराव परिधान करू नये असा आदेश यापूर्वी कोर्टाने दिला होता.
या प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या कर्नाटक उच्च न्यायालयातल्या मुख्य न्यायाधीश रितू राज अवस्थी यांनी तीन सदस्यीय खंडपीठात एका मुस्लीम महिला न्यायाधीशांना सदस्य बनवलं आहे.
या खंडपीठाचे अध्यक्ष स्वत: मुख्य न्यायाधीश आहेत. खंडपीठाचे दुसरे सदस्य न्यायमूर्ती कृष्णा दीक्षित आहेत. कृष्णा दीक्षित यांनी या प्रकरणी तीन दिवस युक्तिवाद ऐकल्यानंतर हे प्रकरण खंडपीठाकडे सोपवलं कारण या प्रकरणात राज्यघटनेचा कायदा आणि वैयक्तिक कायदा अशा दोन्ही गोष्टींचा संदर्भ आहे.
कर्नाटकमध्ये हिजाब परिधान करण्यावरून सुरू झालेल्या वादाने हिंसक वळण घेतलं. नेमकं हे प्रकरण काय आहे आणि आतापर्यंत काय घडलंय हे पटकन पाहूया 10 मुद्द्यांमध्ये.
1. नेमकं काय घडलं आहे?
कर्नाटकातल्या अनेक कॉलेजांमध्ये दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. तर मंड्या जिल्ह्यामध्ये कॉलेजचे विद्यार्थी एका हिजाब घातलेल्या विद्यार्थिनीला विरोध करण्यासाठी जय श्रीरामच्या घोषणा देत असल्याचा व्हीडिओ व्हायरल झाला. या मुलीने अल्लाहू अकबर म्हणत या विद्यार्थ्यांना उत्तर दिलं.
अधिक वाचा - हिजाब घातलेल्या मुलीविरोधात जमावाच्या 'जय श्रीराम'च्या घोषणा, मुलीचं प्रत्युत्तर-'अल्लाहू अकबर'
हिजाब परिधान केलेल्या मुस्कान नावाच्या ज्या विद्यार्थिनीला त्रास देण्यात आला तिने NDTV शी बोलताना सांगितलं, "मला असुरक्षित वाटत नाहीये. सकाळपासून आतापर्यंत पोलीस आणि प्रत्येकाने येऊन ते आमच्या सोबत असल्याचं सांगितलं आहे. शिक्षणाला आमचं प्राधान्य आहे. कापडाच्या एका तुकड्यासाठी ते आमच्या शिक्षणात मोडता घालत आहेत."

2. सुरुवात कशामुळे झाली?
कर्नाटक शिक्षण कायदा, 1983च्या कलम 133(2) चा दाखला देत सरकारने म्हटलं, "सर्वांनी एकाच प्रकारचे कपडे घालणं बंधनकारक आहे."

फोटो स्रोत, ANI
कर्नाटक शिक्षण कायद्यानुसार शैक्षणिक संस्था आणि शालेय विकास आणि नियमन समितीला विद्यार्थ्यांचे गणवेश ठरवण्याचा अधिकार असल्याचं कर्नाटकच्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री बी. सी. नागेश यांनी म्हटलंय.

3. ठिणगी कुठे पडली?
उडुपी आणि चिकमंगळुर शहरांतल्या कॉलेजांमध्ये काही विद्यार्थिनींनी वर्गात हिजाब परिधान करायला सुरुवात केली आणि जानेवारीमध्ये या वादाला सुरुवात झाली.
28 डिसेंबर 2021 ला पहिली घटना उडुपीमध्ये नोंदवली गेली. त्यानंतर 3 सरकारी कॉलेजेस आणि 2 खासगी संस्था अशा एकूण पाच शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थिनींना हिजाब घालून प्रवेश करण्यास मनाई केली आहे.

4. कोर्टाने काय म्हटलं?
उडुपी कॉलेज आणि त्यानंतर कुंदापूर खासगी महाविद्यालयातल्या काही विद्यार्थ्यांनी हे प्रकरण उच्च न्यायालयाकडे नेलं. याविषयीची प्राथमिक सुनावणी गेल्या आठवड्यात झाली. मंगळवारी पहिल्यांदाच याविषयीची व्यवस्थित सुनावणी सुरू झाली.

फोटो स्रोत, ANI
कोर्टाचं कामकाज सुरू झाल्यानंतर एका वकीलाने सुनावणी तहकूब करण्याची मागणी केली. पण जस्टिस दीक्षित यांनी आपली भूमिका सगळ्या वकिलांसमोर स्पष्ट केली.
ते म्हणाले, "आपण आपल्या सगळ्या भावना कोर्टाबाहेर ठेवूयात. आपल्यासाठी आपली घटना हीच आपली भगवत गीता आहे. मी पद स्वीकारताना जी शपथ घेतली त्यानुसार मी वागणार आहे. विद्यार्थ्यांनी वर्गाबाहेर असणं ही चांगली परिस्थिती नाही."
"मी सकाळी उठून सोशल मीडिया अॅप पाहतो तेव्हा मला 'या कोर्टाने हे सांगितलं' असं सांगणारे शेकडो मेसेजेस अनेक अनोळखी नंबरवरून आलेले असतात," जस्टिस दीक्षित म्हणाले.

5. मग सरकारने काय केलं?
हिंसक घटनांनंतर कर्नाटक सरकारनं बुधवारपासून तीन दिवस राज्यातील शाळ आणि कॉलेज बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. कोर्टात सध्या या मुद्द्यावर सुनावणी सुरू आहे. ती मंगळवारी पूर्ण होऊ न शकल्याने बुधवारी पूर्ण केली जाईल.
"या सगळ्या किरकोळ घटना आहे. परिस्थितनी नियंत्रणाखाली आहे," कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे ADGP प्रताप रेड्डी यांनी बीबीसीला सांगितलं.

6. कायदा काय सांगतो?
2018 मध्ये शेजारी राज्य असलेल्या केरळमध्ये दोन मुस्लिम शालेय विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या खटल्यात निर्णय देताना कोर्टानं शिक्षण संस्थेचे अधिकार कायम असल्याचं म्हटलं होतं.

या शाळेनं त्यांना हिजाब आणि फुल बाह्यांचे शर्ट परिधान करण्यास परवानगी नाकारली होती.
स्वातंत्र्याचा अर्थ म्हणजे वैयक्तिक हित हे सार्वजनिक हितापेक्षा मोठे नसावं असा असल्याचं न्यायमूर्ती ए मुहम्मद मुश्ताक यांनी म्हटलं होतं.
तर हिजाबवर बंदी घालणाऱ्या कर्नाटक सरकारच्या आदेशामध्ये कोर्टाच्या एका निर्णयाचा उल्लेख करण्यात आल्याचं विद्यार्थ्यांची बाजू मांडणाऱ्या देवदत्त कामत यांनी कोर्टाला सांगितलं.
"हिजाब परिधान करणं ही पवित्र कुराणात सांगितलेली एक महत्त्वाची प्रथा आहे. आपल्या निवडीप्रमाणे वस्त्र परिधान करण्याचा हक्क हे घटनेच्या कलम 19(1) (a) मध्ये नमूद असून त्यावर फक्त कलम 19 (6) नुसार मर्यादा घालता येऊ शकतात. आणि जस्टिस पुट्टस्वामींच्या प्रकरणानुसार आपल्या आवडीचे कपडे घालण्याचा हक्क हा राईट टू प्रायव्हसीही आहे," असं कामत यांनी म्हटलं.

7. भाजपचं काय म्हणणं आहे?
भाजपचे राज्य विभाग प्रमुख आणि दक्षिण कन्नडमधले खासदार नलिन कुमार कातील म्हणाले, "राज्यात भाजप सरकार आहे, इथे हिजाब किंवा इतर अशा कोणत्याही प्रकारांना वाव नाही.

फोटो स्रोत, Getty Images
शाळा या माँ सरस्वतीचं देऊळ आहेत. सगळ्यांनी तिथे नियमांचं पालन करायलाच हवं. तिथे धर्म आणणं योग्य नाही. विद्यार्थ्यांना शिक्षणाची गरज आहे. आम्ही (शिक्षण व्यवस्थेचं) तालिबानीकरण होऊ देणार नाही."

8. विरोधकांचं काय म्हणणं आहे?
AIMIMचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी अल्लाहू अकबर म्हणणाऱ्या मुलीचा व्हीडिओ ट्वीट करत या मुलीला सॅल्यूट केलाय. राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाडांनी म्हटलंय की 'या तथाकथित भक्तांमुळे भारताचा पाकिस्तान होईल.'
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
या विद्यार्थ्यांकडून त्यांचं भविष्य हिरावून घेतलं जात असल्याचं काँग्रेस नेते राहुल गांधींनी म्हटलंय. "हिजाब त्यांच्या शिक्षणाच्या मार्गात आणून आपण भारताच्या लेकींकडून त्यांचं भविष्य हिरावून घेतोय. माँ सरस्वती सर्वांना विद्या देते. ती भेदभाव करत नाही," असं राहुल गांधींनी एका ट्वीटमध्ये म्हटलंय.

9. महाराष्ट्रात काय घडलं होतं?
महाराष्ट्रातल्या अकोल्यात हिंदू असूनही एका तरुणीने बुरखा घातल्याचा संशय आल्याने जमावाने प्रियकरासह त्याच्या मित्राला बेदम मारहाण केल्याची घटना घडली होती. हे तरुण आणि तरुणी हिंदू समाजाचे होते. जमावाने भर रस्त्यात या मुलीला बुरखा उतरवायला भाग पाडलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
या घटनेचा व्हीडिओ व्हायरल झाला होता. त्यात संतप्त जमावाने तुम्ही धर्माची बदनामी करता, असं म्हणत त्यातील तरुणाला लाथाबुक्क्यानी मारहाण केल्याचं स्पष्ट दिसत होतं.
मारहाणीचा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर अकोला शहरातील उरळ पोलिसांनी याची दखल घेत मारहाण करणाऱ्या 2 तरुणांना अटक केली होती.

10. जगभरातून काय प्रतिक्रिया?
जगभरातल्या मुस्लीम महिला अनेक प्रकारचे हेडस्कार्फ बांधतात. त्यातला एक प्रकार आहे हिजाब. तसं तर 'हिजाब'चा शब्दशः अर्थ हा कुठलीही गोष्ट झाकणे किंवा त्यावर पांघरूण घालणे, असा आहे. पण आता हिजाब म्हटलं की लगेच मुस्लीम स्त्रिया डोक्यावरून घेतात तो स्कार्फ डोळ्यांसमोर येतो.
हिजाब वेगवेगळ्या रंगात आणि अनेक स्टाईल्समध्ये येतो. पाश्चात्त्य देशांमध्ये जे हिजाब सर्वाधिक दिसतात ते डोकं आणि गळा पूर्णपणे झाकतात, पण चेहरा स्पष्टपणे दिसतो.
हिजाबाबत तुम्ही इथं अधिक वाचू शकता - कर्नाटक : हिजाब म्हणजे काय? मुस्लिम महिला तो का घालतात?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
हिजाब घालून शिक्षणासाठी जाणाऱ्या मुलींना रोखण्याचे प्रकार भयंकर आहेत. कमी किंवा जास्त कपड्यांवरून महिलांचं अमानविकरण सुरू आहे. भारतीय नेत्यांनी मुस्लिम महिलांचं हे खच्चिकरण रोखावं, असं नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या मलाला युसूफझाईनं म्हटलंय.

हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








