‘गुजरातचा विकास गुजराती माणसांनी केला, मोदी-शाहांचं काही कर्तृत्व नाही त्यात...’

मोदी-शाह

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, अनघा पाठक
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
    • Reporting from, गुजरात

“भगवान श्रीकृष्णांचा जन्म कुठे झाला? यूपीत. त्यांनी सोन्याची संपन्न व्दारका कुठे वसवली? गुजरातमध्ये. त्यामुळे गुजरातचा विकास तेव्हापासून होतोय. तो काय गुजरातला आणि गुजराती माणसाला नवा नाही.”

गुजरातमध्ये शिरल्या शिरल्या पहिलं उत्तर मिळालं ते हे. गुजरात निवडणुकीचे वारे जाणण्यासाठी पुढचे दहा दिवस इथे आम्ही फिरणार होतो आणि देशातल्या सर्वात श्रीमंत शहरांपैकी एक असणाऱ्या सुरतमध्ये एक पत्रकारांनी हे म्हटलं.

तेव्हा महाराष्ट्राची बॉर्डर क्रॉस करून फक्त तीन तास झाले असावेत-नसावेत.

गुजरातमध्ये इतर स्टोरी तर होणार होत्या, पण म्हटलं गुजरातचा विकास, गुजरातचा विकास असं म्हणत जे मॉडेल भाजपने विशेषतः नरेंद्र मोदींनी देशभरात दाखवून मतं मागितली, आणि मिळवलीही, त्याबद्दल गुजरातच्या माणसांना काय वाटतं ते जाणून घेऊया.

प्रश्न विचारायला सुरूवात केली, इथे पहिला धडा मिळाला... लोक बोलत तर भरभरून होती, पण कॅमेरा काढला किंवा तुमचं नाव लिहू का असं विचारलं की नाही म्हणायची, कचरायची.

एकदा तर स्पष्ट विचारलं एकांना, तुम्ही घाबरता का या सरकारच्या राज्यात? त्यांचं उत्तर फारच रंजक होतं. “घाबरत नाही. पण माझा व्यवसाय आहे, तेव्हा अनेकदा मला सरकारी अधिकाऱ्यांची मदत लागते, आणि स्पष्ट सांगतो ते मदत करतातही. अर्ध्या रात्रीही सुरतमध्ये व्यापार, व्यवसायाशी संबंधित अडचणी असतील तर त्या सुटतात. मग मी उगाच सरकारची नाराजी का ओढावून घेऊ. माझी कामं खोळंबतील, तेवढा वेळ नाही माझ्याकडे.”

या व्यक्तीची, आपण त्यांना केशव म्हणू, अंकलेश्वरमध्ये फॅक्टरी होती. त्यांचं स्पष्ट मत होतं, मोदी-शाहांनी काही गुजरातचा विकास केला नाही. मग गुजरातचा विकास झालाच नाही का? जे मॉडेल देशात वारंवार दाखवलं जातं ते खोटं आहे का?

गुजरात निवडणूक

फोटो स्रोत, Getty Images

केशव म्हणतात, “असंही नाही. देशातल्या इतर राज्यांपेक्षा गुजरात सधन आहे, इथे सोयीसुविधा चांगल्या आहेत. मोठे-मोठे प्रोजक्ट येत असतात. लोकांच्या हाताला रोजगार आहे. अहो नर्मदेचं पाणी कच्छपर्यंत नेऊन पोहचवलं आहे. त्यामुळे विकास आहे. पण हा सगळा फक्त भाजपने केला का? तर नाही. मुळात गुजराती माणसाच्या रक्तात धंदा आहे, आणि तो व्यवस्थित करण्यासाठी तो सगळं करवून घेईल. वेळ घालवणार नाही.”

‘गुजरातच्या माणसाने गुजरातचा विकास केला आहे.’ हे वाक्य या ना त्याप्रकारे संपूर्ण दौऱ्यात कानी पडलं.

गुजरातचे रस्ते

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

महाराष्ट्राची बॉर्डर क्रॉस केलीत ना, म्हणजे निदान आमच्या नाशिक, किंवा नंदुरबार जिल्ह्याला लागून असलेली की स्पष्ट फरक दिसतो, गुजरात साईडला चांगले रस्ते आणि समोर महाराष्ट्रात आलं की भलामोठा खड्डा.

पुढे पुढे तर आमच्यात जोक व्हायचे, जरा जरी रस्त्यात खड्डा आला की किंवा गाडी हलली की आम्ही म्हणायचो, “अरे, एकदम महाराष्ट्रात कसे आलो?”

विनोदाचा भाग सोडला, यात विनोद नाहीच खरं, सत्य परिस्थिती आहे. गुजरातमधले रस्ते चांगले आहेत. 2014 निवडणुकांच्या आधी जेव्हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे गुजरातच्या दौऱ्यावर गेले होते, तेव्हाही तिथले रस्ते पाहून भारावून गेले होते म्हणे. आता काही दिवसांपूर्वीच्या भाषणात हेही म्हणाले की, “मोदींनी आता फक्त गुजरात गुजरात करणं बंद करावं,” हा भाग वेगळा.

आमचा पहिला स्टॉप होता सुरत. या एका शहरात 128 फ्लायओव्हर आहेत. सुरतपासून भारत-पाकिस्तान सीमेलगतचं शेवटचं गाव ढोलावीरापर्यंत आम्ही जाऊन आलो, पण तुरळक अपवाद वगळता सगळे रस्ते चांगले.

सुरतला ज्या हॉटेलमध्ये थांबलो होतो, तिथे बाजूलाच जयप्रकाशभाईंची टपरी होती. सकाळी सकाळी त्यांना विचारलं, “तुमचे रस्ते एवढे चांगले आहेत. उत्तम रस्ते कोणत्याही प्रदेशाच्या प्रगतीचं प्रतिक असतात, मग तुम्हाला नाही वाटत की विकास झालाय?”

ते हसले आणि म्हणाले, “रस्ते चांगले आहेत हे तर खरंच, पण त्याच्याशी कोणत्या सरकारचा संबंध नाही. गुजराती माणसाला थांबणं परवडणार नाहीच.”

गुजरात रस्ते

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, एकट्या सुरत शहरात 128 फ्लायओव्हर आहेत

म्हणजे काय विचारल्यावर म्हणाले, “हे बघा, गुजरातमध्ये सुरत, कांडला, मुद्रा, पोरबंदर अशी महत्त्वाची बंदरं आहेत. सुरतमध्ये सिंथेटिक कापडाचा सगळ्यात मोठा व्यवसाय आहे. आमच्या प्रत्येक शहरात GIDC (जसं महाराष्ट्रात MIDC असतं तसं) आहे. देशभरातून ट्रक इथे भरभरून माल घेऊन येतात आणि इथून भरभरून माल घेऊन जातात. तुमच्या मुंबईला जोडणाऱ्या एक्सप्रेस-वेचं उदाहरण घ्या.

सतत धावता असतो. तुम्ही लोक गमतीत म्हणतात ना, का रे जरा थांबला तर करोडोंचं नुकसान होणार आहे का तुझं, गुजरातमध्ये एखाद्याचं होऊही शकतं पाच मिनिटं थांबला तर... थांबणं इथल्या माणसाला परवडत नाही, मग रस्ते चांगले हवेत. ती आमची गरज आहे आणि ते तर केशुभाई पटेलांच्या काळापासून चांगले होते की. तुम्हाला दिसले नाही एवढंच.”

गुजरातमध्ये फिरताना जाणवते ती व्यवसायाला समर्पित मानसिकता. देशातले मोठमोठे उद्योग इथे आहेत, आणि धंदा करावा तर गुजराती माणसानेच. संपूर्ण देशात आर्थिक क्षेत्रात त्यांचा दबदबा आहे, मग तो मुंबईचा शेअर बाजार असो वा अदानी-अंबानींचे उद्योगसमुह.

याच व्यावसायिक मानसिकतेमुळे इथला सामान्य माणूसही विकास करवून घेतो, त्यासाठी पैसा मोजतो, आवडलं नाही तर राजकारण्यांच्या तोंडावर जाऊन सांगतो.

सुरतमध्येच भेटले दिनेश कटारिया. आडनावाने मराठी नसतील, तर स्वभावाने, गुणांनी पूर्ण मराठी. 30 वर्षांपूर्वी ते अहमदनगर सोडून व्यवसायासाठी गुजरातमध्ये स्थायिक झाले.

भेटल्यावर मराठीतच प्रश्न विचारला, काय कसं काय? तर कोणीतरी मराठी बोलणारं भेटलं म्हणून आनंदित झाले.

तुम्हीही मराठी अस्खलित बोलता म्हटल्यावर उत्तर आलं, “प्रश्नच नाही. मी आतून-बाहेरून मराठी माणूस आहे. आजही शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय आमचा दिवस सुरू होत नाही. पहा दाढीही त्यांच्यासारखी ठेवलीये.”

कपडा उद्योग

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सुरत भारतातल्या कापड उद्योगाचं मोठं केंद्र आहे

मराठी माती, मराठी संस्कृतीबद्दल इतकं प्रेम आहे मग इथे कशाला स्थायिक झालात असं विचारल्यावर म्हणाले, “कारण इथे व्यवसाय करणाऱ्याच्या पायात कोणी खोडा घालत नाही म्हणून. आम्ही प्रयत्न केला होता, आधी अहमदनगरमध्ये, मग काहीकाळ मालेगावमध्ये, पण स्थानिक राजकारण, गुंडगिरी यामुळे प्रगतीच होत नाही.”

गुजरातमध्ये भ्रष्टाचार नाही का, विचारल्यावर म्हणाले, “असं अजिबात नाही, इथेही पैसै द्यावे लागतात टेबलाखालून, पण एकदा ते दिले की मला खात्री असते, मोजून आठव्या दिवशी माझ्याकडे आवश्यक त्या सरकारी परवानग्या आलेल्या असतील, माझी फाईल पुढे गेली असेल. आपल्या महाराष्ट्रात पैसे देऊन कामं होत नाहीत हो. आणि याविरोधात कोणी आवाज उठवला तर राजकारण्यांनी पाळलेले स्थानिक गुंड येऊन काम बंद पाडतात.”

त्यांचं एकच म्हणणं होतं, इथे डोक्याला शांतता आहे. काम सोडून दुसऱ्या गोष्टींकडे लक्ष द्यावं लागत नाही.

त्यांनाही हाच प्रश्न विचारला, की गुजरातमध्ये भाजपच्या काळात विकास झालाय का?

त्यांनीही तेच उत्तर दिलं, “इथे 30 वर्षांपूर्वी सोयीसुविधा होत्या म्हणून सगळा बाडबिस्तारा बांधून इथे आलो आणि व्यवसाय सुरू केला. तेव्हा भाजप सत्तेत नव्हता, त्यावरून जे समजायचं ते समजून घ्या.”

धर्मेश अमीन सुरतमधले बीबीसीचे सहकारी पत्रकार. त्यांनीही असंच काहीसं सांगितलं, “सुरतच्या टेक्स्टाईल पार्कचं उद्घाटन 60 च्या दशकात मोरारजी देसाईंनी केलं, हिऱ्याचा व्यवसाय सौराष्ट्रातल्या कारागिरांनी मोठा केला. गुजरातमध्ये जी प्रगती होतेय की 60 आणि 70 दशकांपासून होतेय. त्याला कारणीभूत फक्त आणि फक्त गुजराती माणूस आहे. हा आता तुम्ही म्हणाल मोदी-शाह पण गुजराती आहेत की, पण ते सोडून असे कित्येक लोक आहेत ज्यांनी गुजरातला जगाच्या नकाशावर नेलंय.”

‘दारावरची पाटी बदलली फक्त’

सुरत नंतर पुढचा थांबा होता बडोदा. तसं शांत शहर. इथेही अनेक लोक भेटले, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, व्यावसायिक. पण एक संभाषण लक्षात राहिलं. एक मध्यमवर्गीय मुस्लीम व्यक्ती. त्यांना विचारलं, गेल्या काही काळात गुजरातमध्ये अल्पसंख्यांक लोकांवर हल्ले होण्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं?

त्यांचं उत्तर होतं, “घटना तर घडतात, त्याबद्दल थोडी चर्चा होऊन नंतर विस्मरणातही जातात. पण तुम्हाला त्याविषयी समोर येऊन तावातावाने कोणी सांगताना दिसणार नाही. अहो, मार तर एकदा मीही खाल्लाय, पण एवढं लक्षात ठेवायला कोणाला वेळ असतो, आपलाही व्यवसाय आहे, त्याकडे लक्ष द्यावं लागतं. माझे बहुसंख्य क्लायंट, सहकारी हिंदूच आहेत.”

गुजरात निवडणूक

फोटो स्रोत, Getty Images

बडोद्याचा मुस्लीमबहुल भाग. त्यांच्याच घरात गप्पा मारत होतो. पण एरवी मुस्लीमबहुल भाग म्हटल्यावर डोळ्यापुढे जे चित्र येतं ते इथे तसूभरही लागू पडणार नाही. मोठे रस्ते, उंच बिल्डिंग्स, पॉश बंगले.

इथे राहाणाऱ्या सुखवस्तू मुस्लीम कुटुंबातल्या लोकांशी बोलताना जाणवलं की अनेकदा मुस्लिमांना जसं वागवलं जातं ते त्यांना पसंत नाही. मुस्लिमांबाबत पक्षपात होतो हेही मान्य आहे, पण तरीही आहे ते शांत आयुष्य सोडावसं त्यांना वाटत नाही.

“देखिये, सब शांत रहे यही ठीक है,” निघताना ते म्हणाले.

गुजरातमध्ये फिरताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, सरकारविरोधात बोलायला सहसा कोणी तयार नसतं.

बडोद्यातच आम्हाला भेटले् ज्येष्ठ पत्रकार वसिष्ठ शुक्ला. मी आपला नेहमीचा प्रश्न घेऊन हजर होते, गुजरातच्या विकास मॉडेलबद्दल काय म्हणणं तुमचं?

“मी तुम्हाला एक उदाहरण देतो,” ते म्हणाले.

“तुमच्या पणजोबांनी जमीन घेतली, आजोबांनी पाया खणला, काका-मामा सगळ्यांनी एकत्र येऊन भिंती बांधल्या. आई ,मावशी, काकू, आत्या यांनी एकत्र येत घर सजवलं, रंगरंगोटी केली. शेजारपाजारच्यांनी तुमच्या अंगणात झाडं लावली. दूरवरच्या नातेवाईकांनी घरावर बांधायला तोरणं आणली आणि ऐन गृहप्रवेशाच्या दिवशी तुम्ही घरावरची पाटी बदलून टाकली.”

“आता तुम्ही साऱ्या गावात सांगत फिरता की या घराचा कायापालट तुम्ही गेला. मोदी-शाहांनी असंच केलं आहे. गुजरातच्या विकासावर फक्त आपल्या नावाची पाटी चढवली.”

‘झोपडपट्टीत राहातो, प्यायला पाणी नाही कसला विकास’

नाशिक ते डांग ते अहमदाबाद 500 किलोमीटरचा प्रवास झाला होता. अहमदाबाद भाजपच्या स्थानिक उमेदवाराच्या प्रचारार्थ मोठी रॅली निघाली होती. स्थानिक, पण मातब्बर नेते सहभागी होते, ‘भाजप ऐटले विकास’ (भाजप म्हणजेच विकास) अशा घोषणा दिल्या जात होत्या.

रॅलीत जाणाऱ्या काही बायकांना पकडलं. दिसण्यावरून श्रमिक वर्गातल्या वाटत होत्या. गळ्यात भाजपची भगवी उपरणी होती.

त्यांना विचारलं, तुमचा विकास झालाय का?

गुजरात निवडणूक

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो

सगळ्या एकदम कलकलत बोलायला लागल्या. प्रत्येकीच्या बोलण्यात रोजच्या त्रासाचे पाढ होते.

“प्यायला पाणी नाहीये. झोपडपट्टीत राहातो आम्ही. इथल्या कपडा-मार्केटमध्ये झाडू मारण्याचं काम करते मी,” त्यातली एक बेन म्हणाली.

“चार मुलं आहेत मला, पण त्यांना शिक्षणाच्या चांगल्या सोयी नाहीत. हाताला रोजगार नाही. सरकारी योजना आमच्यापर्यंत पोचत नाही. कसला विकास म्हणताय तुम्ही.”

मी विचारलं, तुम्ही सरकारपर्यंत या गोष्टी का पोहचवत नाही? तर उत्तर आलं, “गरीबाचं कोणी ऐकत नसतं.”

समोर भलंमोठं होर्डिंग होतं, ‘भाजप एटले आतंकवाद पर प्रहार.’ म्हटलं याबद्दल काय सांगाल तुम्ही? तर त्यातली एक चुणचुणीत, तरुण मुलगी म्हणाली, “कोणत्या आतंकवाद्यांच्या गोष्टी करताय? इथे गरिबांचं शोषण करतात ते आतंकवादी दिसत नाहीत यांना.”

या बयोचं लहानसं बाळ कित्येक दिवस आजारी होतं, आणि त्याला वेळेवर औषधं मिळाली नाहीत असं बाकीच्या बायकांनी मला सांगितलं.

मग असं असतानाही भाजपच्या रॅलीत, त्यांची उपरणी घालून का आलात असं विचारल्यावर सुरुवातीला काही उत्तर आलं नाही. मग आधीच्याच जरा वयस्कर आणि अनुभवी असणाऱ्या बेन म्हणाल्या, “त्यांना नाही तर कोणाला मत देणार. आता तरी आमच्यासाठी काहीतरी करतील अशी आशा आहे आम्हाला.” तुमचे फोटो काढू का असं विचारलं तर नको म्हणाल्या.

‘एक संपूर्ण पिढी भाजपच्या राज्यात वाढलीये’

भाजपने विकास केला आहे असं ठाम मत असणारेही अनेक भेटलेत. गंमत म्हणजे यातले बहुतांश लोक 30 च्या आतले होते.

“ही पोरं काँग्रेसने काय केलं विचारतात, तेव्हा मला मजा वाटते. या पोरांनी कधी काँग्रेसचं राज्य पाहिलंच नाहीये. गेली 27 वर्षं भाजप सत्तेत आहे. एक संपूर्ण पिढी भाजपच्या राज्यात मोठी झालीये,” धर्मेश अमीन म्हणतात.

पण हेही तितकंच खरं की या तरूणांना भाजपचं आकर्षण आहे, भाजपच्या विकास मॉडेलवर पूर्ण भरोसा आहे.

गुजरात निवडणूक

फोटो स्रोत, Getty Images

“भाजपच्या राज्यात हाताला काम मिळतं, मग ते कोणीही असो. बाहेरच्या राज्यांमधून कितीतरी लोक आता कामासाठी इथे येतात. हा विकास नाही का,” विशीतला जय म्हणतो.

हा आम्हाला गांधीनगरच्या एका हायफाय चहाच्या टपरीवर भेटला. इथे रोज संध्याकाळी कॉलेजच्या पोरापोरींची भन्नाट गर्दी असते. त्यांच्या बोलण्यात अर्थातच राजकारणाचे विषय कमी असतात पण आपण स्वतःहून काढला, तर ‘नही नही, मोदीजीने गुजरात का विकास किया है’ ऐकायला येतं.

गुजरातमध्ये फायरब्रँड म्हणून प्रसिद्धीस आलेले जिग्नेश मेवाणी सध्या वडगाममधून काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या निकटवर्तीय वर्तुळातले हितेश चावडा यांनाही आम्ही भेटलो. त्यांनाही तोच प्रश्न विचारला.

‘गुजरातचा विकास गुजराती माणसांनी केला, मोदी-शाहांचं काही कर्तृत्व नाही त्यात...’ ते निर्वाणीच्या स्वरात म्हणाले.

“हे म्हणजे आमच्या काळात झालेल्या विकासकामाचं श्रेय हिसकावून घेण्यासारखं आहे. ज्या गोष्टी काँग्रेसच्या काळात मंजूर झाल्या, उभ्या राहिल्या.. त्याला तुम्ही स्वतःचं नाव देऊन म्हणता, हा पहा विकास.”

‘साहेब, इथून पाकिस्तान 40 किलोमीटरवर आहे, बघा काहीतरी’

आमच्या दौऱ्याचा शेवटचा स्टॉप होता कच्छ. त्यातही ढोलावीरा हे भारत-पाक सीमेवरचं शेवटचं गाव. इथे सिंधू संस्कृतीचे अवशेष सापडले आहेत आणि मागच्याच वर्षी युनेस्कोने या जागेला वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा दिलेला आहे.

नागजी परमार इथे सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करतात आणि जेव्हा इथे टुरिस्ट सीझन असतो तेव्हा गाईडचंही काम करतात.

तसं इथे फारसे टुरिस्ट येत नाही कारण इथून सर्वात जवळचं शहर 200 किलोमीटर लांब आहे. स्वतः ढोलाविरामध्ये खायची-प्यायची बोंब. त्यामुळे इथे येणारे लोक तुरळक.

म्हणून जागाही निवांत आणि नागजींनाही आमच्याशी गप्पा मारायला भरपूर वेळ होता. त्या जागेचा इतिहास समजून घेता होतो तेवढ्यात त्यांना फोन आला.

ते फोनवर गुजराती बोलत होते, तरी समजत होतं.. त्यांच्या मतदारसंघातून भाजपचा जो उमेदावार निवडणूक लढवत होता, त्यांच्या कार्यालयातून फोन आला होता.

गुजरात निवडणूक
फोटो कॅप्शन, बालविवाह, लहानपणी लादलं गेलेलं गर्भारपण, बालमृत्यू, असे अनेक प्रश्न फणा काढून उभे असलेले कच्छच्या सीमावर्ती भागात दिसत होते.

नागजी त्यांना सुनावत होतो, “तुम्ही बाकीचं काही सांगू नका, इथे प्यायला पाणी नाहीये, लाईट नसतात. रात्रभर झोप येत नाही. गर्भार बायका, लहान बाळांचं काय होत असेल उन्हाळ्यात. अहो निदान प्यायला पाणी तरी द्या.”

पुढे म्हणाले, “मोदींचा चेहरा पाहून आम्ही मत देतो, निदान त्या विश्वासाची तरी आब राखा. साहेब मला पेट्रोल भरायचं असेल तर इथून 60 किलोमीटर दूर जावं लागतं, सर्वात जवळची बँक आणि एटीम इथून 100 किलोमीटरवर आहे. साहेब, इथून पाकिस्तान 40 किलोमीटरवर आहे. तिकडे जावं का? बघा काहीतरी.”

फोन संपला तसे माझ्याकडे वळून हसले. मीच विचारलं, गावात फार अडचणी आहेत का? “मॅडम तुम्ही म्हणता तो विकास आमच्यापर्यंत पोचलाच नाहीये. कच्छच्या रणाच्या आसपास तुम्हाला अनेक गाव दिसतील जी अजूनही अंधारात आहेत, ज्यांच्यापर्यंत विकास पोचणं दूर, त्यांच्या कानावर हा शब्दही अजून गेलेला नाही.”

नागजी म्हणतात तशी गावं आम्ही वाटेत पाहिली होतीच. सरकारी शाळा नव्हत्या, असल्याच तर फार दूर, कॉलेज कशाशी खातात हेही माहीत नसणारी गावं.

बालविवाह, लहानपणी लादलं गेलेलं गर्भारपण, बालमृत्यू, रोजगाराच्या संधी नसणं, प्यायला पाणी नाही त्यामुळे शेती वगैर लांबच असे अनेक प्रश्न फणा काढून उभे असलेले कच्छच्या सीमावर्ती भागात दिसत होते.

पण रस्ते इथेही चांगले होते.

गुजरातला एक प्रदक्षिणा मारून झाली होती, आणि गुजरातचं विकास मॉडेल म्हणजे काय हे थोडंफार का होईना लक्षात आलं होतं.

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)