गुजरातमध्ये राहाणाऱ्या पण मराठी बोलणाऱ्या आदिवासींच्या अनोख्या संस्कृतीची गोष्ट

फोटो स्रोत, mangesh sonawane
- Author, अनघा पाठक
- Role, बीबीसी मराठी
नाशिककडून गुजरातच्या दिशेनं निघालं की हळूहळू झाडी दाट व्हायला लागते. डांगचा भाग जवळ आल्याची ही खूण.
नाशिक जिल्ह्यातला पेठ सुरगाणा हा भाग आणि गुजरातमधल्या डांग जिल्ह्याचा परिसर आदिवासीबहुल.
काल्पनिक रेषेने नकाशावर जरी दोन राज्य, दोन जिल्हे वेगवेगळे केलेले असले तरी इथली लोकसंस्कृती, चलनवलन, भाषा आणि संगीत एकच. ते एकाच आदिम संस्कृतीशी नातं सांगतं.
याच आदिम लोकसंस्कृतीच्या, खरंतर तिथल्या अनोख्या संगीताच्या शोधात आम्ही निघालो होतो.
डांग, पेठ, सुरगाणा आणि कळवणमधल्या या भागात वारली, भिल्ल आणि कोकणी आदिवासी राहातात.
महाराष्ट्र गुजरातच्या सीमाभागातले हे आदिवासी मराठी-गुजरातीचं मिश्रण असलेली डांगी भाषा बोलतात.
नाशिक-गुजरातचा हायवे पकडला तर पहिलं गाव लागतं, सापुतारा. अर्थात हे टुरिस्ट डेस्टिनेशन असल्यामुळे इथे गर्दीही असते आणि शहरीकरणाच्या खुणा जागोजाग दिसतात.
पण एक सापुतारा सोडलं की दुसरं इतकं शहरीकरण झालेलं गाव या भागात नाही. इथे जायला दुसरा रस्ताही आहे, तो नाशिकच्या सुरगाणा या आदिवासी भागातून जातो.
आमचा पहिला स्टॉप होता, लवारिया हे गाव. इथे आम्ही डांगमधल्या आदिवासींचं खास असणारं थाळी संगीत ऐकायला आलो होतो.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
नेमकं आम्ही जाणार त्या दिवशी रात्रीपासून आदिवासींचे डोंगरदेवाचे उत्सव सुरू होणार होते.
आदिवासींच्या संस्कृतीत निसर्गाला देवाचं स्थान आहे. यांचे देव म्हणजे डोंगरदेव, कणसरी माता (पावसाळ्यानंतर पहिलं धान्य आलं की ते धान्य कणसात ज्या मातेमुळे येतं ती देवी), खळ्यातला (शेतातला) देव आणि धरणीमाता.
आदिवासी लोकजीवन आणि संस्कृतीचे अभ्यास सुधीर डवेरा सांगतात की, "हा डोंगरदेवाचा उत्सव तुम्हाला फक्त उत्तर महाराष्ट्र आणि डांगच्या भागात पहायला मिळेल. डोंगरदेव म्हणजे खऱ्या अर्थाने डोंगराची पूजा. तुम्हाला इथे कुठली मूर्ती दिसणार नाही किंवा कोणता फोटो. या उत्सवात इथले आदिवासी डोंगरावरच्या गुहा आणि कपारींची पूज करतात."
निसर्गपूजेच्या खुणा जागोजागी दिसतात. प्रत्येक गावाच्या वेशीवर जंगलातले देव. वाघ, नाग, मोर चंद्र, सुर्य असे एकाच दगडात कोरलेले आणि त्यांना त्या त्या रंगाने रंगवलेलं. डांगमध्ये फिरताना हे शिल्प जागोजागी दिसतं. गाव जवळ आल्याची ही खूण.

फोटो स्रोत, mangesh sonawane
हे गावाचे रक्षणकर्ते आहेत अशी स्थानिकांची श्रद्धा
रक्षणकर्ते तरी कोण बघा, वाघ... ज्याच्याशी प्रत्येक आदिवासी रहिवाशाची गाठ कधी ना कधी पडलेलीच. जंगलच इतकं घनदाट आहे. नाग, मोर या जंगलात आवर्जून दिसणार आणि चंद्र-सूर्य ज्यांच्या उगवण्यात किंवा मावळण्यात कधी खंड पडणार नाही.
रोजच्या आयुष्यातले देव. एकदा त्यांच्यावर विश्वास ठेवला की ते आपलं काही बरं-वाईट करणार नाहीत ही श्रद्धा.
दिवाळी झाली की आदिवासींच्या या भागात वेगवेगळे उत्सव साजरे होतात. यातला सगळ्यात मोठा उत्सव म्हणजे डोंगरदेवाचा. दरवर्षी हा उत्सव वेगवेगळ्या गावात होतो, आणि एका गावात पाच वर्षांनी एकदा.
या उत्सवामुळे सगळेच गडबडीत होते. लवारिया गावात आम्ही ज्यांना भेटलो त्या झिपरभाई सोमाभाई गावितांना तर कथेला जायचं होतं. पण तेवढ्या गडबडीतही त्यांनी वेळ काढला आणि आम्हाला भेटले. त्यांच्या संगीताशी ओळख करून दिली.
झिपरभाईंशिवाय पंचक्रोशीत देवकार्य होत नाही. त्यांना आचार्याचा मान आहे. कोणतीही शुभ गोष्ट सुरू करायची असेल तर आधी इथे आधी कथा करावी लागते आणि कथेला सोबत थाळीवादन हवंच.
सुमधूर नाद उत्पन्न करायचा असला तर तो कशातूनही कसा निघू शकतो, माणसाच्या हातात कला कशी साकारते याचं उत्तम उदाहरण म्हणजे थाळी वादन.

फोटो स्रोत, mangesh sonawane
ही थाळी म्हणजे काशाची एक थाळी. त्यावर एका विशिष्ट ठिकाणी मधमाशीच्या पोळ्यातून काढलेलं मेण टाकलेलं असतं आणि वरती ठेवतात जंगलातून आणलेली, तासलेली भांगसरीची काडी. झालं वाद्य तयार.
ही काठी त्या मेणावर ठेवून हळूहळू हलक्या हाताने फिरवायची, म्हणजे त्यातून एक विशिष्ट आवाज निघतो आणि त्या नादाच्या तालावर देवादिकांची कथा सांगायची.
नुसतं डोळ्याने बघून पटणारच नाही की या थाळी-काठीतून इतका सुंदर आवाज निघतो. त्यात कथाकारांचा खडा आवाज, जशी जशी कथा वळण घेईल, त्यात ट्वीस्ट येतील तसा बदलत जाणारा आवाज, सादरीकरण सगळं प्रत्यक्ष अनुभवण्यासारखं.
झिपरभाई म्हणतात, "ही आमची आदीम संस्कृती आहे. मला आठवत तेव्हापासून मी कहाळा, पावरी, थाळी वाजवतोय. माझ्या आधीच्या कित्येक पिढ्या हेच काम करत होत्या."
फक्त थाळीच नाही, पावरी, कहाळा अशी अनेक वाद्य झिपरभाईंना वाजवता येतात.
ते म्हणतात, "थाळी लावली, त्याची कथा पूर्ण झाली की मग की सगळे नाचायला उठतात आणि त्यात ही पावरी वाजवतात."
जसं थाळी देवकार्याचं प्रतीक तसं पावरी आनंदाने नाचण्याचं प्रतीक. पावरी वाजली की अस्सल आदिवासींचे पाय थिरकलेच म्हणून समजा. आम्हीही तिथे शूट करत असताना झिपरभाईंनी पावरी वाजवयला सुरुवात केली तेव्हा तिथल्या शाळकरी चिमुरड्यांनी ताल धरत आम्हाला नाचून दाखवलं.

फोटो स्रोत, Mangesh Sonawane
ते पाहून उत्साहाने तरूण मुलंही उठले. त्यांनीही नाचायला सुरुवात केली. म्हणता म्हणता वातावरण उत्सवी होऊन गेलं. कारण म्हणाल तर तसं काहीच नाही, पण जगताना गंमत कशी घ्यायची याचं बाळकडूच या लोकांना मिळालेलं असतं.
इथल्या लहान मुलांनाही कसं नाचायचं शिकवावं लागत नाही. घरातल्या मोठ्यांना पाहून पाहूनच ते शिकतात.
या नाचातही उत्साह आहे. गोलाकार उभं राहून पावरी-ढोलाच्या तालावर थिरकायचं.
इथे वाजवली जाणारी वाद्यही याच लोकांनी, आसपास जंगलात मिळालेल्या साधनांपासून बनलेली असतात.
झिपरभाई सांगतात, "पावरी कशी बनते तर वाळलेल्या दुधी भोपळ्यापासून. वरती वाळलेला जाड दुधी, मध्ये बांबूच्या दोन नळ्या, खाली गाय-म्हैस किंवा बैल अशा जनावरचं शिंग. त्या शिंगाला ताडाची पानं गुंडळली जातात. वरच्या बांबूच्या नळ्यांना पाच छिद्र असतात, ज्यातून वेगवेगळ्या सुरावटी तयार होतात."
ही पावरी आकर्षक अशा रंगात रंगवली जाते, तिला वर मोरपिसं लावून सजवलं जातं. महाराष्ट्रातल्या काही आदिवासी भागांमध्ये या वाद्याला तारपा असंही म्हटलं जातं.
पावरीची गंमत अशी की ती देवाच्या उत्सवात, लग्नात, नवीन बाळ झालं की त्याच्या पाचवीच्या पूजेला अगदी कंटाळा आला म्हणून एकटा माणूस शेतात जाऊन, घरात जाऊन मनमोकळ्या मनाने वाजवली जाते.

फोटो स्रोत, mangesh sonawane
गावात एखाद्या घरातून वेळीअवेळी पावरीचे सूर आले तरी कोणी आश्चर्यचकित होत नाही. पावरीच ती, आनंद झाला तरी वाजवायची आणि आनंद मिळवायचा असेल तरी वाजवायची.
झिपरभाईंच्या घरून निघालो आणि आमचा पुढचा थांबा होता लवाळी गावातल्या रामदास धुम यांच्याकडे.
रामदास अनेक वर्षं पावरी वाजवतात. डोंगरमाऊलीच्या उत्सवासाठी त्यांना आमंत्रण होतंच. हा उत्सव तीन ते पाच दिवस चालतो आणि पंचक्रोशीला आमत्रंण असतं.
रात्ररात्रभर पावरी वाजते आणि लहानमोठे सगळे सगळ्या चिंता विसरून नाचतात, आनंद साजरा करतात.
रामदासभाईही आम्ही येणार म्हणून थांबलेले. आमची भेट झाली की त्यांना त्याच संध्याकाळी जवळच्या गावात उत्सवासाठी जायचं होतं.
तिथे ते तीन दिवस पावरी वाजवणार, तहानभूक हरपून. हीच त्यांची पूजा.
रामदासभाईंची पावरी वाजवण्याची पद्धत झिपरभाईंपेक्षा थोडी वेगळी. ते खास आपला ड्रेस घालून आले, पायात चाळ आणि नाचत नाचत पावरी वाजवायची. जोडीला पायातल्या घुंगरांचे स्वर आहेतच.
पावरी वाजवताना ते कसरतीही करतात. कधी झोपतात, कधी कोलांटीउडी मारतात, कधी डोक खाली पाय वर असे उलटे होतात. हे सगळं करत असताना हातातून वाद्य सुटत नाही की सूर हलत नाही.

फोटो स्रोत, mangesh sonawane
हरवती संस्कृती
पण पिढ्यांपिढ्यांचं हे संगीत आता हरवत चाललं आहे. इथल्या आदिवासींच्या नव्या पिढीला या संगीतात रस नाही याची खंत जुन्या लोकांच्या बोलण्यात जाणवते.
झिपरभाई म्हणतात, "आता सगळे मोबाईलमध्ये. लहानमोठ्या सगळ्या पोरांच्या हातात मोबाईल दिसतात. आता तोच षौक. आधी मोबाईल, टेप रेकॉर्डर वगैरे काहीच नव्हतं. हेच कहाळे, पावरी, थाळी असं चालत होतं."
लग्नातही पावरी वाजण्याचं प्रमाण कमी झालंय, तरुण पोरं डीजे लावतात हा सलही ते बोलून दाखवतात.
"आजकाल डीजेच चालतो फार. त्या संगीताला काही नाद नाही, ताल नाही, संस्कृती नाही. कसंही नाचायचं. मुलं आपला पारंपरिक नाचही विसरलेत. कोणाला यात इंटरेस्टच नाही. डीजेनी माणसं मरतात. एखादं हलक्या काळजाचं असेल तर त्याला घेऊन जातं ते. आदिवासींचं संगीत असं नव्हतं, ते उलट अशक्त माणसाला ताकद द्यायचं, त्याला जगण्याची नवी उर्मी द्यायचं" ते जड आवाजात सांगतात.
"पोरांनी हे शिकायला पाहिजे. हे कसं वाजवायचं, कसं नाचायचं हे येणाऱ्आ पिढीला माहिती पाहिजे. शिकलेले पोरं आता वाजवत नाहीत गावात. गावात काय अख्ख्या डांगमध्ये असंच झालंय."
तरीही काहींना वाटतं की हे संगीत पूर्णपणे नष्ट होणार नाही.
रामदास भूम म्हणतात, "डोंगरदेवाला तर पावरी आणि थाळी लागतेच. त्यामुळे हे संगीत पूर्ण संपणार नाही. कोणी ना कोणी ते पुढे सुरू ठेवेल."
अर्थात ही भाबडी आशा आहे की आणखी काही हे काळ ठरवेल. पण डांगमध्ये फिरताना सगळीकडे नव्या पिढीच्या हातात मोबाईल दिसले हे खरं. मोबाईल असण्यामध्ये काहीच गैर नाही, पण या मोबाईलमुळे नवी पिढी आपली संस्कृती विसरतेय, लाखमोलाचं संगीत शिकत नाहीये ही तक्रार जेष्ठांची दिसली.
"ज्या काळात हे संगीत जन्माला आलं त्या काळात मोबाईल, टीव्ही, टेप रेकॉर्डर असलं काहीच नव्हतं. आमच्या कित्येक पिढ्यांनी ते जोपासलं पण आता टिकेल की नाही शंका वाटते,"झिपरभाई म्हणतात.
परंपरा आणि आधुनिक जीवनशैली यांचा सनातन झगडा डांगलाही चुकलेला नाहीये.
डांगचा इतिहास
डांग म्हणजेच रामायण-महाभारतातलं दंडकारण्य असा उल्लेख स्थानिक लोककथांमध्ये आढळतो.
डांग या शब्दाचे वेगवेगळे अर्थ सांगितले जातात, काहींच्या मते डांग म्हणजे 'डोंगराळ भागातलं गाव', तर काहींच्या मते डांग म्हणजे 'बांबूचं गाव'.
डांग हा गुजरातमधला सर्वांत लहान जिल्हा आणि इथे जवळपास 90 टक्के लोकसंख्या आदिवासींची आहे. डांग जिल्ह्याच्या सरकारी वेबसाईटवर थोडी माहिती मिळते.
यात म्हटलंय की डांगचे आदिवासी राजे 14 व्या शतकात मुघलांपासून वेगळे झाले आणि त्यांनी स्वतःचं वेगळं राज्य घोषित केलं.
इथे फिरताना उंचच उंच सागाची झाड दिसतात. हीच या आदिवासींची संपत्ती.
या सागामुळेच ब्रिटिश काळातही डांगला अतोनात महत्त्व होतं.
18 व्या शतकात ब्रिटिश आणि इथले पाच आदिवासी राजे यांच्या बरीच युद्ध झालीत. ब्रिटिशांना या भागावर संपूर्ण नियंत्रण कधी मिळवता आलं नाही.
शेवटी 1842 मध्ये तह झाला ज्याअंतर्गत इथल्या राजांनी ब्रिटिशांना इथल्या जंगलांमधली सागाची झाडं तोडण्याची परवानगी दिली आणि त्याबद्दल्यात ब्रिटिश त्यांना दरवर्षी तनखा द्यायचे.
ही तनखा घेण्यासाठी इथले राजे सजूनधजून आपल्या सैन्यासोबत यायचे, इथूनच डांगमधल्या 'डांग दरबार' या उत्सवाला सुरुवात झाली.
आजही इथे हा तीन दिवसांचा उत्सव साजरा केला जातो ज्यात त्या राजांचे वंशज येतात. आता तनखा दिली जात नसली तरी डांग दरबार भरतो. यात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होतात.
या डांगच्या इतिहासात शिवाजी महाराजांचाही संदर्भ आहे. सुरतेवर स्वारी करायला जाताने शिवाजी महाराजांनी डांगमध्ये आपला लष्करी तळ टाकला होता.
या भागाला आजही 'लष्करी अंबा' या नावाने ओळखलं जातं.
डांगच्या पाच आदिवासी राजांनी एकत्र येत ब्रिटिशांशी जी लढाई केली होती ती याच 'लष्करी अंबा' जवळ झाली होती.
हा भाग तसा आर्थिकदृष्ट्या मागासलेलाच आहे. आता जरी इथल्या आदिवासींना सागाची झाडं तोडून त्यातून काही उत्पन्न मिळवण्याची परवानगी दिली असली तर त्यात बऱ्याच अटीशर्ती आहेत.
दर पाच वर्षांनी त्यांना फारच तुरळक झाडं तोडण्याची परवानगी मिळते.
बाकी मुख्य उत्पन्न भात आणि नागलीची शेती.
आम्ही या भागात फिरत असताना एक मोठी व्हॅनभरून लाल घाघरे आलेले दिसले. आमचे दिशादर्शक असणाऱ्या जिमाभाईंना हे काय विचारलं तर ते म्हणाले, "सुरतवरून असे घाघरे येतात आणि आमच्या बायका त्यावर मणी चिकटवतात. एका घाघऱ्याचे त्यांना 30 रुपये मिळतात."
डांगमधल्या सगळ्या आदिवासी गावांमध्ये गेलात तर तुम्हाला बायका दुपारच्या वेळेस हे मणी चिकटवताना दिसतील.
पावसाळ्यानंतर पिकाची कापणी झाली की पाणी नसल्यामुळे पुढे पीक घेता येत नाही. मग इथले पुरुष कामाच्या शोधात एकतर नाशिकला येतात किंवा पुढे सुरतला जातात.
बायका घरी मणी चिकटवण्याची कामं करतात.
जिमाभाई म्हणाले, "इथे बाकी सगळं आहे बघा, खायला कमी नाही, फक्त हातात पैसा नाही."
सागाची बेकायदेशीर तोड हा इथला आणखी एक मोठा प्रश्न आहे, त्यामुळे इथल्या मुलनिवासींच्या उत्पन्नावर गदा येतेय.
आता येत्या निवडणुकीत त्यांना आश्वासनं भरपूर दिली जातील, पण त्यांच्या वाटेला काही येईल का हा प्रश्नच आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








