'महाराष्ट्र दिन हा इतिहासात डुबक्या मारायचा अधिकृत दिवस झालाय'

महाराष्ट्र

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, महाराष्ट्र दिन साजरा करायचा कशासाठी?
    • Author, सुहास पळशीकर
    • Role, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक

महाराष्ट्र आता साठीकडे वाटचाल करतोय. महाराष्ट्रासाठी झालेल्या चळवळीत आपण सगळे मराठी लोक मावळे आणि केंद्र सरकार, खास करून नेहरू हे औरंगजेब, अशी भावनिक विभागणी झालेली होती.

धनंजयराव गाडगीळ किंवा दि. के. बेडेकर यांनी केलेले युक्तिवाद आपल्या आठवणीमधून हद्दपार झाले आणि मागे राहिल्या त्या देदिप्यमान इतिहासाच्या आठवणी. त्यामुळे महाराष्ट्र दिन म्हटला की आपल्या भव्य इतिहासाचं स्मरण आलंच!

इतिहासाच्या स्मरणाचा हा सोहळा मे महिन्याच्या म्हणजे महाराष्ट्र दिनाच्या दोन महिने आधी मराठी भाषेच्या आठवणीनिमित्त जागवला जातो. वर्तमानात भाषा सशक्त करण्यापेक्षा ती किती प्राचीन आहे, यावर प्रवचनं झडतात.

तसं पहिलं तर आठवणींची आळवणी महाराष्ट्रात अखंड चालूच असते. स्वप्रतिमा इतिहासाच्या आरशात पाहून ठरवल्या जातात आणि दुसर्‍यांना दूषणं द्यायची तर इतिहासातले शत्रू जिवंत करून आपण विरोधकांना ऐतिहासिक नाटकातल्या भूमिकांमध्ये बघायला लागतो.

कोणतं आंदोलन असेल, निवडणुकीतलं भाषण असेल, शासकीय धोरणांची चर्चा असेल, आपण आपले इतिहासात डुंबून घेतो. मग महाराष्ट्र दिन हा इतिहासात डुबक्या मारायचा अधिकृत दिवस झाला तर त्यात नवल ते काय?

इतिहास आपल्याला वारसा देतो, वर्तमानकडे बघण्याची दृष्टी देतो; तसाच इतिहास आपल्याला भूतकाळात रमण्याचा परवाना देतो. इतिहासाची आठवण आपल्याला स्वतःविषयीचं भान देते, तशीच ती आपल्याला स्मरणरंजनात गुंतून राहण्याचा रस्ता दाखवते.

अर्थात, एका परीने हे आपल्या सार्वजनिक व्यवहाराचं अखिल भारतीय वैशिष्ट्य आहे.

प्रातिनिधिक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

देशभरात वेळोवेळी इतिहास हा सार्वजनिक व्यवहारांचा संदर्भबिंदू बनला असल्याचं दिसतं : एक तर राष्ट्रीय चळवळीला ताकद मिळाली तीच मुळी प्रत्येक प्रदेशाच्या अभिमानाच्या आणि प्रतीकांच्या शोधातून. त्यामुळे 'राष्ट्र' भावना साकार होताना प्रत्येक प्रदेशातील इतिहासाची सोबत घेऊनच साकार झाली.

दोन, पुढे राज्यानिर्मितीच्या मागणीसाठी प्रत्येक प्रदेशाचा आणि भाषक समूहाचा इतिहास दावणीला बांधला गेला. आणि तीन, राज्याच्या राजकारणातला एक सहज उपलब्ध होणारा भावनिक मुद्दा म्हणून इतिहास आणि स्मृती यांच्या सामूहिक जडणघडणीवर भर दिला गेला.

हे सगळ्याच प्रदेशांमध्ये आणि राज्यांमध्ये होत राहिलं आहे. महाराष्ट्र देखील त्याला अपवाद नाही.

'महाराष्ट्र वर्तमानापासून पळ काढत आहे'

महाराष्ट्रात राज्य निर्मितीच्या आंदोलनात इतिहासाचा यथेच्छ आधार घेतला गेला. म्हणजे, इतिहासातील प्रतीकं वर्तमानात आरोपित केली गेली हे तर खरंच, भाषाही त्यामुळे इतिहासातली आलीच, पण इतिहासाचा एक साचेबंद अन्वय त्यातून रूढ व्हायला हातभार लागला.

आपण थोर आहोत कारण आपला इतिहास थोर आहे आणि जणू काही आपल्याला एकट्यालाच इतिहास आहे, अशा भ्रमात आपण वावरू लागलो. इतिहासापासून काही शिकायच्या ऐवजी, काहीही नवीन न शिकण्यासाठी आपण इतिहासाच्या आड लपू लागलो. इतिहास ही वर्तमानाची ऊर्जा ठरायच्या ऐवजी वर्तमानापासून पळ काढण्याचा हमरस्ता म्हणून आपण वापरू लागलो.

मन इतिहासात, भाषा इतिहासाची, कल्पना इतिहासातल्या आणि कृती हमखास इतिहासाला विसंगत, अशा विचित्र अवस्थेत मराठी सार्वजनिक विश्व मश्गूल आहे, असं खूप वेळा दिसतं. हे काही फक्त आजच घडतंय, असं नाही.

चार टप्प्यांवर किंवा चार प्रकारे मराठी समाजाचं हे इतिहासाबरोबरचं प्रेमप्रकरण समजून घेता येईल.

पेशवाईची हुरहूर

मागे जाऊन एकोणिसाव्या शतकाचा आढावा घेतला तर इथल्या ब्राह्मण अभिजनांना पेशवाईची हुरहूर लागून गतकाळ आणि गतवैभव यांच्या आठवणी सतावत होत्या तो पहिला टप्पा आढळतो.

पुण्यातल्या पेशवा साम्राज्याचं एक पेंटिंग

फोटो स्रोत, ALASTAIR GRANT/AFP/GETTY IMAGES

फोटो कॅप्शन, पुण्यातल्या पेशवा साम्राज्याचं एक पेंटिंग

तेव्हा फक्त राज्य आणि वर्चस्व गेल्याची हळहळ नव्हती तर त्याबरोबरच 'स्वकीय' परंपरांचा अभिमान आणि त्या परंपरांमध्ये सगळे ज्ञान (विज्ञानसुद्धा) कसं साठलं आहे, याचे दावे तेव्हा केले गेले. इंग्रजी विद्या आणि ब्राह्मणेतर जातींचे उठाव यांच्या वावटळीत हा टप्पा मागे पडला.

विसाव्या शतकाच्या मध्यापासून 'मराठी' राज्यासाठीच्या चळवळींच्या माध्यमातून इतिहासात डोकावणे पुन्हा बहराला आले. त्याचबरोबर, या टप्प्यावर पुन्हा एकदा, पांढरपेशा मराठी मध्यम वर्गाने आपल्या सांस्कृतिक संवेदना इतिहासाच्या आणि स्मरणाच्या आधारे घट्ट करायचे प्रयत्न केले.

संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि मराठेशाही

संयुक्त महाराष्ट्रची चळवळ होऊन गेली, पण साठीच्या दशकात आणि त्यानंतरही मराठेशाही हा मराठी समाजाच्या शिक्षित आणि पांढरपेशा गटाचा सांस्कृतिक संदर्भबिंदू राहिला.

महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतर लगेचच शिवसेना स्थापन झाली आणि जरी तिचा राजकीय विस्तार मुंबई-ठाणे या परिसरापुरता सुरुवातीला मर्यादित राहिला, तरी तिच्या कल्पना, तिची भाषा आणि तिने प्रचलित केलेल्या प्रतिमा यांचा प्रभाव शहरी मध्यमवर्गावर राज्याच्या बर्‍याच भागांमध्ये पडलेला होता.

आजूबाजूच्या सांस्कृतिक खळबळी जणू काही आपल्या गावीच नसल्यासारखा हा पांढरपेशा वर्ग साठच्या आणि सत्तरच्याही दशकात ब. मो. पुरंदरे आणि गो. नी. दांडेकर यांनी दिलेल्या इतिहासाच्या गुटीवर गुजराण करीत होता. त्याला स्वामी आणि श्रीमान योगी या कादंबर्‍यांनी अभूतपूर्व हातभार लावला.

मराठी

फोटो स्रोत, GETTY IMAGES/INDRANIL MUKHERJEE

सारांश, शिवसेनेच्या उदयाच्या आसपास इथल्या पांढरपेशा मध्यम वर्गाची सांस्कृतिक मशागत इतिहासाच्या कोणत्या आकलनाच्या आधारे होत होती, हे लक्षात घेतले पाहिजे. फक्त मराठी राजकारण इतिहासाच्या विळख्यात राहिलं आहे असं नाही, तर संस्कृती आणि सार्वजनिक विश्व या दोहोंवर इतिहासाचा प्रभाव या टप्प्यावर होता.

म्हणजे इतिहासात रममाण होण्याच्या ह्या दोन्ही टप्प्यांवर त्याचं स्पष्टीकरण एकच आहे: पांढरपेशा मराठी मध्यमवर्गाचा आत्मशोध, आपल्या घसरत्या वर्चस्वाला इतिहासाचा टेकू देण्याचा प्रयत्न आणि वर्तमान काळात खालावणार्‍या प्रतिष्ठेची इतिहासात भरपाई करण्याचे प्रयत्न यातून ही स्मरणरमणीयता रुजत गेली असणार.

इतिहासावरून घमासान

सार्वजनिक विश्व इतिहासात घुसण्याचा - किंवा खरं तर इतिहास सार्वजनिक विश्वात घुसण्याचा - तिसरा क्षण या दोन्ही टप्प्यांच्या बरोबरच, जास्त करून दुसर्‍या टप्प्याला समांतर असा उलगडत गेला. हा तिसरा टप्पा इतिहासावरून घमासान वाद करण्याचा टप्पा आहे.

सगळेच तट-गट इतिहासावर मदार ठेवून होते हे तर खरंच, पण त्या इतिहासाचं वाचन कसं करायचं — त्याचा अर्थ काय लावायचा याबद्दलचे वाद आणि त्या आधारे होणारं राजकारण याला आपण तिसरा टप्पा मानू शकतो.

मराठी शिक्षण

फोटो स्रोत, VikramRaghuvanshi

एका परीने, उच्च्चवर्णीयांचा इतिहास अमान्य करून सामान्य लोकांसाठी वेगळा इतिहास मांडण्याची प्रतिभा अगदी सुरुवातीला दाखवली ती महात्मा फुले यांनी त्यांच्या शिवाजीच्या पोवड्यात. पण पुढे बराच काळ स्वतः फुले हेच मराठी सार्वजनिक विश्वाच्या परिघावर राहिले.

त्यामुळे तिसरा टप्पा काळाच्या भाषेत उभा राहतो तो सत्तरीच्या दशकापासून पुढे. गोविंद पानसरे यांच्या 'शिवाजी कोण होता' या पुस्तकाला या टप्प्याचा एक मानबिंदू मानता येईल.

अर्थात ते पुस्तक आलं बर्‍याच नंतर, म्हणजे 1988 साली. तोपर्यंत, अनेक विचारवंत आणि राजकीय कार्यकर्ते यांच्यावर एकीकडे कॉ. शरद पाटील यांचा आणि दुसरीकडे ग्राम्ची या इटालियन मार्क्सवादी विचारवंताच्या मांडणीचा प्रभाव पडू लागला होता.

अटकचा किल्ला.

फोटो स्रोत, Emergingpakistan.gov.pk

इतिहासाकडे वळून जनलढ्यांसाठी एक वैचारिक हत्यार म्हणून इतिहासाची पुनर्मांडणी करण्याचा प्रघात रूढ होऊ लागला होता. त्यामधून सामान्यांचे नवे नायक घडवण्याचे प्रयत्न जसे झाले तसेच प्रस्थापित नायकांना प्रस्थापितांच्या कचाट्यातून सोडवून सामान्यांचे नायकत्व मिळवून देण्याचे प्रयत्न देखील झाले.

हा टप्पा एकाच वेळी अत्यंत निर्मितिक्षम होता आणि तरीही प्रस्थापित शक्तींना सोयीचा होता. निर्मितिक्षम अशासाठी की या घुसळणीमधून नवे विचार, नव्या विश्लेषण पद्धती, नवीन प्रतिमा यांना वाट मिळाली; प्रस्थापितांना सोईस्कर अशासाठी की वादाचं क्षेत्र तर त्यांच्या सोयीचं होतंच, पण जे मुख्य नायक त्यांना चालणार होते, तेच घेऊन सगळी चर्चा चालू राहिल्यामुळे पर्यायी धुरीणत्व निर्माण होण्याचा प्रश्न आलाच नाही. शिवाजी महाराजांचं प्रतीक हे याचं उत्तम उदाहरण म्हणून दाखवता येईल.

कोथळेबाजीचं राजकारण

'त्यांचे' महाराज आणि पर्यायी शिवप्रतिमा असा झगडा, म्हटला तर झाला, पण त्याचा अंतिमतः फायदा शिवाजी महाराजांच्या आड लपून हवं ते कोथळेबाजीचं राजकारण करू पाहणार्‍यांनाच झाला आणि होतो. आजमितीला उदाहरणार्थ, महाराष्ट्रात चर्चा होते ती शिवाजी महाराजांच्या कर्तबगारीमधून मिळणार्‍या संदेशाची नव्हे तर त्यांचं स्मारक किती उंच असावं, आणि ती उंची कुणी कमी करत आहे का, याची!

मुंबईतील प्रस्तावित शिवस्मारक

फोटो स्रोत, MAHARASHTRA DGIPR

फोटो कॅप्शन, मुंबईतील प्रस्तावित शिवस्मारक

इथेच आपण इतिहास-मग्नतेच्या चौथ्या टप्प्यावर येतो. सगळ्यांनीच इतिहास आणि ऐतिहासिक प्रतीकं यांच्यावर विसंबून राहण्याचा हा टप्पा आहे. शिवाय, या टप्प्यावर इतिहासाचा आश्रय घेतला जातो तो वर्तमानातल्या पोकळपणामुळे. आजच्या प्रश्नांबद्दल बोलण्यासारखं काही नसेल, भविष्याला गवसणी घालण्याची हिंमत आजच्या राजकरणात नसेल तेव्हा ऐतिहासिक आठवणी, प्रतीकं, भाषा, आवाहनं यांच्या पसार्‍यात लपून बसायला सोपं जातं.

वेगळ्या भाषेत सांगायचं तर वर्तमानापासून पळ काढण्यासाठी आणि आपापली पोकळ आणि निरर्थक राजकारणं लपवण्यासाठी इतिहासातले हुतात्मे, इतिहासातले गडकिल्ले आणि इतिहासातल्या फितुरांच्या-शत्रूंच्या प्रतिमा यांचा धुरळा उडवून गर्जना करता येतात.

दलित, पेशवाई, ब्राह्मण, ब्रिटिशराज्य

फोटो स्रोत, Hulton archive

लोकांच्या हिताची धोरणं राबवता न येणारे राज्यकर्ते महापुरुषांच्या स्मरकांच्या आणाभाका करू शकतात; सत्तेत राहायचं की बाहेर राहायचं याचा निर्णय करू न शकणारे मावळे इतर मावळ्यांना इतिहासातल्या मावळ्यांच्या नावाने साकडं घालू शकतात; विरोधी पक्ष म्हणून प्रभाव पाडण्यात अपयशी ठरणारे पक्ष प्रतीकांच्या राजकरणात रमून जाऊ शकतात आणि सगळी व्यवस्था बदलू पाहणारे गट जनक्षोभाला आंदोलनाचं वळण देऊ शकत नसल्यामुळे प्रस्थापितांच्या इतिहासाच्या खेळात सामील होऊन आपण क्रांती करतो आहोत असं समाधान मानून घेऊ शकतात. तात्पर्य, आजची इतिहासमग्नता ही पोकळ आणि लोकांशी संबंध नसलेल्या-लोकविरोधी—राजकारणाच्या अगतिकतेमधून आलेली आहे.

महाराष्ट्राचा शहामृग झालाय?

इतिहास हे राजकारणाचं प्रभावी हत्यार ठरू शकतं, पण ते प्रस्थापितांना जास्त सोयीचं हत्यार असतं. इतिहास-सन्मुख असणं आणि इतिहासमग्न असणं यात फरक असतो, आणि महाराष्ट्राने विचारात घेण्याचा प्रश्न नेमका हाच आहे: आपण इतिहासाकडून शिकण्यासाठी त्याला सामोरे जातो की इतिहासाच्या आठवणींमध्ये शहामृगासारखं डोकं खुपसून बसण्यासाठी इतिहासाच्या गळ्यात पडतो?

संतविचार, शिवाजी महाराजांचा वारसा आणि जोतिबा फुले-विठ्ठल रामजी शिंदे—बाबासाहेब आंबेडकर अशा अर्वाचीन विचारवंतांचे विचार हे सगळे मराठी समाजाच्या ऐतिहासिक वारश्याचे मानबिंदू आहेत. आपण त्यांच्या मूर्ती बनवल्या आहेत की त्यांच्यापासून काही शिकण्यासाठी त्या मानबिंदूंचा चिकित्सक धांडोळा घेतो याच्यावर महाराष्ट्र इतिहाससन्मुख आहे की इतिहासमग्न आहे हे ठरेल.

आतापर्यंत तरी लक्षणं सगळी इतिहासमग्नतेची दिसताहेत.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)