महाराष्ट्र दिनः डांग जिल्हा महाराष्ट्रात येता येता एकदम गुजरातमध्ये कसा गेला?

डांगचे रहिवासी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, डांगचे रहिवासी
    • Author, तेजस वैद्य
    • Role, बीबीसी गुजराती प्रतिनिधी

1 मे 1960 रोजी तत्कालीन बॉम्बे राज्यापासून महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण झाले. मात्र, या दोन राज्यांच्या स्थापनेपूर्वी मोरारजी देसाई यांनी डांग एक मराठी परिसर असल्याचे घोषित केले आणि त्यामुळे संघर्ष निर्माण झाला.

स्वतंत्र राज्यांच्या निर्मितीसाठी दोन आंदोलने उभी राहिली. महाराष्ट्रासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि गुजरातचे स्वतंत्र राज्य निर्माण करण्यासाठी महागुजरात आंदोलन. भाषावार प्रांतरचनेच्या आधारावर ही दोन स्वतंत्र राज्ये अस्तित्वात आली.

मुख्य वाद होता तो मुंबईसंदर्भात. मोठ्या प्रमाणावर गुजराती लोकसंख्या असल्यामुळे मुंबई गुजरातमध्ये सामील करावी की हे शहर महाराष्ट्रात राहू द्यावे, यावर मोठा संघर्ष झाला. दुसरा वाद होता तो डांग या आदिवासी भागाबाबत, हा परिसर कोणत्या राज्यात समाविष्ट केला पाहिजे?

मुंबई हे एक मोठे शहर आहे आणि मागील अनेक वर्षांत मुंबईवरून झालेल्या संघर्षाबाबत बरेच काही लिहिले गेले आहे. परंतु डांग हा एक दुर्गम आदिवासी परिसर आहे. त्यामुळे या परिसराबाबत फार काही लिहिले गेलेले नाही.

1954 मधले मुंबईतले दृश्य

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 1954 मधले मुंबईतले दृश्य

गुजरातच्या स्वातंत्र्योत्तर इतिहासातही डांगचा क्वचितच उल्लेख केलेला आढळतो. एक मोठा लढा दिल्यानंतर डांग गुजरात राज्यात समाविष्ट करण्यात आले.

डांग कोणाचे? या विषयावरील पुस्तिका

दोन राज्यांच्या सीमावर्ती भागात असलेल्या परिसरावर दोन्ही राज्यांच्या भाषेचा किंवा बोलीभाषेचा प्रभाव असतो. उदाहरणार्थ राजस्थानला जोडणाऱ्या गुजरातमधील अनेक गावांमध्ये राजस्थानच्या अनेक परंपरा, पोशाख आणि बोलीभाषा दिसून येतात. कच्छच्या लोकसंगीतावर पाकिस्तानी सिंध संगीताचा प्रभाव आहे. त्याचप्रमाणे गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील गावांमध्ये दोन्ही राज्यांच्या भाषा आणि परंपरांची समानता दिसून येते.

मराठी लोक डांगी ही मराठीची बोलीभाषा असल्याचा दावा करत होते तर गुजराती लोक डांगची संस्कृती गुजराती असल्याचा दावा करत होते.

बीबीसी गुजरातीचे पत्रकार जय मकवाना यांच्या वृत्तानुसार, मराठी नेते डांगला संयुक्त महाराष्ट्रात समाविष्ट करण्यासाठी आग्रही होते. 'डांग कोणाचे?' असा प्रश्न विचारणाऱ्या पुस्तिकाही वितरित करण्यात आल्या होत्या.

सर्वोदय चळवळीचे कार्यकर्ते छोटूभाई नायक, घेलुभाई नायक आणि इतर अनेकांनी दिल्लीकडे धाव घेऊन डांगच्या गुजराती संस्कृतीचे पुरावे दिले. त्यामुळे डांगचा परिसर महाराष्ट्राऐवजी गुजरातमध्ये समाविष्ट करण्यात आला.

मुंबई राज्याच्या विभाजनासाठी काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी एक सात सदस्यीय समिती नेमली होती. या समितीची बैठक प्रचंड हिंसाचार आणि अविश्वासाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्ली येथे 6 डिसेंबर 1959रोजी पार पडली. या बैठकीनंतर गृहमंत्री गोविंद वल्लभ पंत यांनी सांगितले की मुंबई शहर महाराष्ट्रात राहील आणि डांग गुजरातमध्ये समाविष्ट केले जाईल या मुद्द्यावर एकमत झाले आहे.

डांगमधली यात्रा

फोटो स्रोत, UMESH GAVIT

फोटो कॅप्शन, डांगमधली यात्रा

या बैठकीच्या दुसऱ्या दिवशी मुंबई राज्याच्या विभाजनाच्या प्रस्तावाला अंतिम मंजुरी देण्यात आली.

मोरारजी देसाई यांनी डांग हा मराठी परिसर असल्याचे म्हटले होते.

बॉम्बे राज्याच्या विभाजनापूर्वी संयुक्त महाराष्ट्र चळवळ मराठी भाषिक क्षेत्रांमध्ये सुरू झाली होती तर गुजरातमध्ये वल्लभ विद्यानगर येथील भाईलालभाई पटेल (भाईकाका) यांच्या प्रेरणेने महागुजरात परिषदेची स्थापना झाली होती.

तिचे आयोजक अमृत पंड्या यांनी मराठी नेत्यांवर आरोप केले की ते गुजराती भाषिक परिसरात मराठी भाषिक नागरिकांना स्थायिक करण्याचा प्रयत्न करत आहेत जेणेकरून त्या परिसरावर ते मराठी भाषिक परिसर म्हणून दावा करू शकतील आणि संयुक्त महाराष्ट्रात समाविष्ट करण्याची मागणी त्यांना करता येईल.

अमृत पंड्या यांच्या मते डांग आणि साल्हेर हे भाग या कटकारस्थानाची उदाहरणे होती.

डांगचे सध्याचे राजे

फोटो स्रोत, UMESH GAVIT

फोटो कॅप्शन, डांगचे सध्याचे राजे

मराठी नेते डांग, वनसाडा, धरमपूर, नेसूप्रदेश, सागबारा, दाडियापाडा इत्यादी परिसरांचा समावेश संयुक्त महाराष्ट्रात करण्याचा प्रयत्न करत होते. मोरारजी देसाई यांनीही डांग आणि आसपासचा परिसर तेथील बोलीभाषा विचारात घेऊन 'मराठी परिसर' असल्याचा उल्लेख केला होता. त्यावेळी ते मुंबई राज्याचे गृहमंत्री असल्यामुळे त्यांच्या विधानामुळे गुजरातमध्ये संताप उसळला.

'डांगच्या प्रश्नावर तज्ञांनी निर्णय घ्यावा मंत्र्यांनी नाही'

मुंबईचे तत्कालीन मुख्यमंत्री बाळासाहेब खेर आणि गृहमंत्री मोरारजी देसाई यांनी डांगला भेट दिली. या भेटीनंतर मोरारजीभाई म्हणाले की डांग प्रदेशात गुजरातीपेक्षा मराठीचे वातावरण जास्त आहे.

मुंबई सरकारने डांगच्या लोकांच्या शैक्षणिक विकासाशी संबंधित हा निर्णय आहे, भविष्यात हा प्रदेश कोणाकडे जाईल त्याच्याशी संबंधित नसल्याचा दावा केला. या प्रदेशात 40 विद्यार्थी असले तरी गुजराती शिकवण्याची सोयदेखील केली जाईल असे वचन देण्यात आले.

थोडक्यात सांगायचे तर डांगला महाराष्ट्रात आणण्यासाठी ही सर्व तयारी सुरू झाली. ख्यातनाम गुजराती लेखक उमाशंकर जोशी यांनीही याबद्दल लिहिले होते. उमाशंकर जोशी यांनी डांगबाबतचा निर्णय (गुजरातमध्ये समाविष्ट करायचे की महाराष्ट्रात) तज्ञांच्या समितीने करावा, मंत्र्यांनी नाही.

उमाशंकर जोशी

फोटो स्रोत, gujaratisahityaparishad.com

फोटो कॅप्शन, उमाशंकर जोशी

जोशी यांनी लिहिले की, "डांग महाराष्ट्राचे असेल आणि महाराष्ट्रात गेले तर त्याने फारसा फरक पडत नाही. परंतु काही प्रशासकीय आणि भाषिक कारणामुळे ते गुजरातशी जोडलेले आहे. त्यामुळे त्यांनाही त्याची मागणी करता येईल. परंतु, असा निर्णय तज्ञ समितीने घेतल्यास ते योग्य ठरेल. तज्ञांची समिती होती परंतु तिचा काहीही उपयोग नव्हता. अंतिमतः मंत्री डांगमध्ये आले आणि सरकारने निर्णय घेतला. मंत्री सक्षम असले तरी त्यांनी त्यावर निर्णय घेऊ नये. हे काम तज्ञ समितीवर सोपवण्यात यावे. ही मागणी पूर्ण होऊ शकत नाही असे नाही."

सरकारने दावा केल्याप्रमाणे डांगच्या शैक्षणिक विकासाबाबत बोलताना उमाशंकर जोशी म्हणाले, "हे स्थानिक डांगी भाषेतही पूर्ण करता येईल किंवा लोकांना मराठी आणि गुजराती हे दोन्ही पर्याय देण्यात यावेत."

एस. एम. जोशी यांची डांगबाबत भूमिका

समाजवादी नेते एस. एम. जोशी यांच्या मतांमुळे मराठी चळवळीकडून डांगच्या मागणीचा जोर कमी होण्यास मदत झाली. ते संयुक्त महाराष्ट्र समितीचे आघाडीचे नेते होते.

'लेके रहेंगे महागुजरात', (आम्ही महागुजरात मिळवणारच) या पुस्तकात ब्रह्मकुमार भट्ट म्हणतात, "मुंबईत आयोजित केलेल्या संयुक्त महाराष्ट्र समितीच्या बैठकीत समाजवादी पक्षाचे नेते एस. एम. जोशी यांनी डांगचा परिसर गुजरातमध्ये जाण्याला होणारा विरोध अवाजवी आणि अवास्तव आहे असे उघडपणे घोषित केले होते."

डांग जिल्ह्याचं स्थान
फोटो कॅप्शन, डांग जिल्ह्याचं स्थान

महाराष्ट्रातील समाजवादी नेत्यांनी डांगचा परिसर गुजरातमध्ये पाठवण्याचा आग्रह धरला आणि तसे न झाल्यास आंदोलन करण्याची धमकी दिली.

डांग कदाचित महाराष्ट्रात जाईल असे उमाशंकर जोशी यांनाही वाटत होते.

बाळासाहेब खेर आणि मोरारजी देसाई यांच्या विधानांनंतर सरकारनेही हा प्रदेश कोणत्या भाषिक राज्यात जाईल याबाबत निर्णय घेतलेला नाही असे घोषित केले. एका टप्प्यावर उमाशंकर जोशी यांनाही असे वाटले की डांगचा परिसर महाराष्ट्रात जाऊ शकतो. त्यांनी म्हटले की, "आमच्या मते निष्पक्ष तज्ञ आयोगाचा निर्णय महाराष्ट्राच्या बाजूने जाईल."

19 जानेवारी 1948 रोजी हा प्रदेश मुंबई राज्याला जोडण्यात आला.

'पोलिटिकल अँड कल्चरल हिस्टरी ऑफ मॉडर्न गुजरात' या पुस्तकाचे लेखक शिवप्रसाद राजगोर लिहितात, "डांगबाबतच्या मंत्र्यांच्या निर्णयाला गुजरात राज्य काँग्रेस कमिटीने आणि गुजरातच्या जनतेने विरोध केला. त्यामुळे डांगला एक स्वतंत्र जिल्हा म्हणूनच ठेवण्यात आले, नाशिकमध्ये समाविष्ट करण्यात आले नाही. अंतिमतः हा प्रदेश गुजरातमध्ये समाविष्ट झाला. फक्त नाशिक जिल्ह्याच्या आसपासची 12 गावे महाराष्ट्राला देण्यात आली."

सीमावर्ती प्रदेशांचे वाद भाषिक तत्वावर सोडवण्यात यावेत का?

उमाशंकर जोशी यांच्या मते, "सीमावर्ती प्रदेशांच्या समस्या भाषिक तत्वावर सोडवणे आवश्यक नाही."

डांगच्या संदर्भातील निर्णयात भाषेने एक महत्त्वाची भूमिका बजावली असली तरी गुजराती लेखकांच्या मते प्रश्न विचारण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. परंतु, जोशी यांच्या मते, "संगीतकार किंवा लेखकांनी या समस्येकडे फक्त भाषा किंवा प्रदेशाच्या छोट्या दृष्टीकोनातून पाहणे योग्य नाही."

डांग दरबार

फोटो स्रोत, Getty Images

भारतीय शास्त्रीय संगीतातील दिग्गज पंडित ओंकारनाथ ठाकूर यांनी डांग जिल्हा महाराष्ट्रात देण्याविरूद्ध आंदोलन केले. त्यांचा उल्लेख करताना उमाशंकर जोशी यांनी लिहिले की, कलाकारांनी आंदोलन करणे योग्यच आहे. परंतु इतरही संबंधित लोक आहेत. मात्र, गुजरात किंवा महाराष्ट्रातील किती लोक तिथे, त्या प्रदेशात जाऊन राहणार आहेत, हा खरा प्रश्न आहे. आणि ते तिथे जातील अशी आपण फक्त आशा करू शकतो.

डांग जिल्हा स्थानिक मंडळ निवडणूक

डांग जिल्हा स्थानिक मंडळाची स्थापना 1957-58मध्ये झाली आणि निवडणुका घेण्यात आल्या. या निवडणुकांचा निकाल डांग प्रदेश महाराष्ट्रात राहील की गुजरातमध्ये जाईल याचा निर्णय घेण्यासाठी कारण ठरला. येथे ३० जागांवर स्थानिक मंडळांच्या निवडणुका झाल्या. गुजरात पॅनल आणि महाराष्ट्र पॅनल यांनी या निवडणुका लढवल्या आणि गुजरात पॅनल 26 जागांवर विजयी झाले. स्थानिक मंडळाची स्थापना झाली आणि डांग प्रदेश गुजरातमध्ये समाविष्ट होईल असा ठराव पारित करण्यात आला.

डांग प्रदेश महाराष्ट्रात समाविष्ट करण्यात यावा अशी इच्छा असणाऱ्या डांग जिल्हा स्थानिक मंडळाच्या चार सदस्यांनी ठरावाविरोधी आंदोलन म्हणून सभात्याग केला. गुजरात पॅनलमधील 26 सदस्यांपैकी दहा गुजरातमधील होते तर सोळा स्थानिक आदिवासी समाजाचे लोक होते.

गुजराज राज्याच्या स्थापनेची घोषणा करताना रवीशंकरस महाराज, मोरारजी देसाई, जीवराज महेता, महेंद्रनवाब डांग

फोटो स्रोत, KALPIT S BHACHECH

फोटो कॅप्शन, गुजरात राज्याच्या स्थापनेची घोषणा करताना रवीशंकर महाराज, मोरारजी देसाई, जीवराज महेता, महेंद्रनवाब डांग

डांगसाठीचा लढा 1960 पर्यंत सुरू राहिला. दरम्यानच्या काळात डांगमधील चळवळीच्या नेत्यांनी जवाहरलाल नेहरू यांची भेट घेऊन डांगमधील परिस्थितीची त्यांना माहिती दिली. पंडितजी यांनी ही गोष्ट समजून घेऊन राष्ट्रपती राजेंद्रबाबू यांच्यासोबत बैठक आयोजित केली. अंतिमतः डांगचा परिसर गुजरातमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.