You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
युक्रेन-रशिया युद्ध : 'रशियन सैनिकांनी माझ्या नवऱ्याला मारलं आणि माझ्यावर बलात्कार केला'
- Author, योगिता लिमये
- Role, बीबीसी प्रतिनिधी
रशियन सैनिकांनी कीव्हच्या आसपासच्या भागातून माघार तर घेतली, मात्र त्यांनी तेथील स्थानिकांवर असे आघात केलेत जे कदाचित कधीच बरे होणार नाहीत. बीबीसीने प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं ऐकलं आणि यातूनच रशियन सैनिकांनी युक्रेनियन महिलांवर बलात्कार केल्याचे पुरावे सापडले.
सूचना- या बातमीतले लैंगिक हिंसाचाराबद्दलचे काही तपशील अस्वस्थ करु शकतात.
कीव्हच्या पश्चिमेला 70 किलोमीटर अंतरावर स्थित ग्रामीण भागातल्या 50 वर्षीय अॅनाशी आम्ही बोललो. त्यांची ओळख लपवण्यासाठी आम्ही तिचं नाव बदललं आहे.
अॅनाने आमच्याशी बोलताना सांगितलं की, 7 मार्चला त्या तिच्य नवऱ्याबरोबर घरी असताना एक परदेशी सैनिक त्यांच्या घरात आला.
त्या सांगतात, "बंदुकीचा धाक दाखवत तो मला तिथं जवळच असणाऱ्या एका घरात घेऊन गेला. त्याने मला आदेश दिला, की 'तुझे कपडे काढ नाहीतर मी तुला गोळ्या घालीन.' त्याने सांगितल्याप्रमाणे मी ऐकलं नाही तर जीवे मारण्याची धमकी तो देत होता. त्यानंतर त्याने माझ्यावर बलात्कार केला."
अॅना त्या हल्लेखोराचं वर्णन करताना तो तरुण, बारीक, रशियाशी संलग्न असलेला चेचेन सैनिक असल्याचं सांगतात.
त्या सांगतात, "तो माझ्यावर बलात्कार करत असताना, आणखी चार सैनिक घरात घुसले. मला वाटलं आता माझं काही खरं नाही पण ते त्याला तिथून घेऊन गेले. तो सैनिक पुन्हा मला दिसला नाही." रशियन सैनिकांच्या एका युनिटने वाचवल्याचा अॅनाला विश्वास आहे.
त्या तिथून लागलीच आपल्या घराकडे परतल्या आणि पाहतात तर त्यांचे पती त्यांना मृतावस्थेत आढळले. त्यांच्या पोटात गोळी लागली होती.
त्या सांगतात, "मला वाचवण्यासाठी तो माझ्यामागे येण्याचा प्रयत्न करत होता आणि त्यातच त्याच्यावर गोळ्या झाडल्या."
दोघांनी शेजारच्या घरात आसरा घेतला. पण सुरू असलेल्या दंगलीमुळे ते अॅनाच्या पतीला रुग्णालयात घेऊन जाऊ शकले नाहीत. दोन दिवसांनंतर त्यांचा मृत्यू झाला.
कबरीच्या डोक्यावर एक उंच, लाकडी क्रॉस आहे. अॅनाने आम्हाला सांगितलं की, मानसिक शांतता मिळवण्यासाठी त्यांनी स्थानिक रुग्णालयाशी संपर्क केला आहे.
त्यांना वाचवणारे सैनिक काही दिवस त्यांच्या घरातच राहिले. त्या सांगतात की, बंदुकीच्या जोरावर ते सैनिक त्यांना त्यांच्या पतीचं सामान द्यायला सांगायचे.
अॅनाने सांगितलं की, "ते सैनिक निघून गेल्यावर मला ड्रग्ज आणि व्हायग्रा सापडले. ते नेहमीच नशेत आणि मद्यधुंद अवस्थेत असायचे. त्यांच्यापैकी बहुतांश सैनिक मारेकरी, बलात्कारी आणि लुटारू होते. त्यांच्यापैकी काहीच ठीक होते."
अॅनाच्या घरापासून काही अंतरावर घडलेली मन स्तब्ध करणारी गोष्ट आम्ही ऐकली.
बलात्कारानंतर केली हत्या
त्या भागात एका महिलेवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे. ही हत्या अॅनाचा बलात्कार केलेल्या व्यक्तीनेच केली असल्याचं मृत महिलेच्या शेजाऱ्यांचे म्हणणं आहे.
मृत महिला चाळीशीच्या आसपास होती. शेजार्यांच्या म्हणण्यानुसार, त्या महिलेला तिच्या घरातून बाहेर काढून, युद्ध सुरू झाल्यावर जी घरं मोकळी पडली त्या घरात घेऊन जाण्यात आलं. सुशोभित केलेल्या खोलीत, सोनेरी हेडबोर्ड असलेला बेड, आता एक गुन्हेगारीचं प्रतीक झालं आहे. तिथल्या गादीवर आता रक्ताचे मोठे डाग आहेत.
एका कोपऱ्यात आरशावर लिपस्टिकने लिहिलेली नोट सापडते, ज्यात त्या मृत महिलेचं दफन कुठं केलंय याचा अंदाज लावता येतो.
शेजारी असलेल्या ओक्सानाने आम्हाला सांगितलं की, रशियन सैनिकांना त्या महिलेचा मृतदेह सापडला होता आणि त्यांनीच तिचं दफन केलं. "त्यांनी म्हणजे रशियन सैनिकांनी मला सांगितले की तिच्यावर बलात्कार झाला होता. त्यानंतर तिचा गळा चिरला गेला होता किंवा तिच्या गळ्यावर वार करण्यात आले होते. त्यातून बराच रक्तस्त्राव झाला होता. ते म्हणाले,"सगळीकडे खूप रक्त पसरलं होतं."
या महिलेला तिच्या घराच्या बागेत पुरण्यात आलं.
आम्ही भेट दिल्याच्या एका दिवसानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी तिचा मृतदेह बाहेर काढला. तेव्हा पोलिसांना आढळलं की, तिचा मृतदेह निर्वस्त्र होता. तिच्या गळ्यावर खोल, लांब असा वार करण्यात आला होता."
कीव्ह विभागाचे पोलीस प्रमुख आंद्रे नेबिटोव्ह यांनी आम्हाला कीव्हच्या पश्चिमेस 50 किलोमीटरवर असणाऱ्या गावात घडलेल्या दुसर्या एका प्रकरणाबद्दल सांगितलं.
अशी अनेक प्रकरणं
त्या गावाच्या सीमेवर एक कुटुंब रहात होतं. या कुटुंबात तिशीच्या आसपास असलेलं जोडपं आणि त्यांचं लहान मूल होतं.
नेबिटोव्ह सांगतात, "9 मार्चला काही रशियन सैनिक त्या घरात घुसले. पतीने पत्नी आणि मुलाचं रक्षण करण्याचा प्रयत्न केला. म्हणून त्या सैनिकांनी त्याला अंगणात नेऊन गोळ्या घातल्या."
"त्यानंतर दोन सैनिकांनी त्या व्यक्तीच्या पत्नीवर बलात्कार केला. ते कधी निघून जायचे तर कधी परत यायचे. त्या सैनिकांनी तिच्यावर सलग तीनदा बलात्कार केला. त्यांनी तिला धमकी दिली होती की, तिने प्रतिकार केला तर ते तिच्या लहान मुलाला इजा करतील. आपल्या मुलाचं संरक्षण करण्यासाठी तिने प्रतिकार केला नाही. "
निघून जाताना त्या सैनिकांनी त्या स्त्रीचं घर जाळलं. त्यांच्या कुत्र्यांना गोळ्या घालून ठार केलं.
त्या स्त्रीने आपल्या मुलासह तिथून पळ काढला आणि नंतर पोलिसांशी संपर्क साधला. नेबिटोव्ह सांगतात की, त्यांची टीम तिला भेटली आणि तिची साक्ष नोंदवली.
पोलीस त्या स्त्रीच्या घरी पुरावे गोळा करत आहेत. पण आता फक्त त्या घराचा सापळाच शिल्लक आहे. पूर्वीच्या शांत जीवनाची फक्त काही चिन्हं त्या जळलेल्या अवशेषांमध्ये दिसतात. आम्ही त्या घरात त्या लहान मुलाची सायकल, एक घोडा, कुत्र्याचा पट्टा आणि फर असलेले हिवाळ्यातील बूट पाहिले.
त्या स्त्रीच्या पतीला तिच्या शेजाऱ्यांनी बागेत पुरले. पोलिसांनी आता त्याचा मृतदेह तपासणीसाठी बाहेर काढला आहे. हे प्रकरण आंतरराष्ट्रीय न्यायालयात नेण्याची त्यांची योजना आहे.
आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागण्याची तयारी
मानवी हक्कांसाठी काम करणाऱ्या युक्रेनच्या लोकपाल ल्युडमिला डेनिसोवा म्हणतात की ते अशा अनेक प्रकरणांचे दस्तऐवजीकरण करत आहेत.
त्या सांगतात, "बुचा येथील एका घराच्या तळघरात 14 ते 24 वयोगटातील सुमारे 25 मुली आणि महिलांवर पद्धतशीरपणे बलात्कार करण्यात आला. त्यापैकी नऊ जणी गर्भवती आहेत."
"रशियन सैनिकांनी सांगितलं होतं की, युक्रेनियन मुले होण्यापासून रोखण्यासाठी ते अशा पद्धतीनं बलात्कार करती की त्यांना कधीही पुरुषांबरोबर लैंगिक संबंध ठेवण्याची इच्छा होणार नाही."
त्या म्हणतात की, त्यांना समर्थन देण्यासाठी हेल्पलाइनवर अनेक कॉल येत आहेत. टेलिग्राम मेसेजिंग अॅपवरील चॅनेलद्वारे माहिती देखील मिळत आहे.
डेनिसोवा पुढे सांगतात की, "एका 25 वर्षीय महिलेच्या समक्ष तिच्या 16 वर्षांच्या बहिणीवर भररस्त्यात बलात्कार झालाय हे सांगण्यासाठी फोन केला होता. तिने सांगितले की तिच्या बहिणीवर बलात्कार करताना ते मोठ्याने ओरडत होते की, 'प्रत्येक नाझी वेश्येसोबत असं होईल."
युद्धादरम्यान रशियन सैन्याने केलेल्या लैंगिक गुन्हा म्हणून मूल्यांकन करणे शक्य आहे का असं आम्ही डेनीसोवा यांना विचारलं.,
त्यावर डेनीसोवा म्हणतात, "सध्या हे अशक्य आहे. कारण प्रत्येकासोबत काय घडलंय हे सांगायला सगळेचजण तयार नाहीत. त्यांच्यापैकी बहुतेकांना सध्या मानसिक आधाराची गरज आहे. म्हणून त्यांनी आम्हाला त्यांची साक्ष दिल्याशिवाय आम्ही तो गुन्हा म्हणून नोंदवू शकत नाही."
डेनीसोवा सांगतात की, बलात्कारासह युद्ध गुन्ह्यांच्या आरोपांसाठी व्लादिमीर पुतीन यांच्यावर वैयक्तिकरित्या खटला चालवण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी विशेष न्यायाधिकरण स्थापन करावं अशी युक्रेनची इच्छा आहे.
बलात्काराला बळी पडलेल्या आम्ही डेनीसोवा यांना विचारलं की, अॅना म्हणतात, "मला पुतीन यांना विचारायचं आहे की, हे असं का घडतंय?" "मला समजत नाही. आपण अश्मयुगात तर राहत नाही. ते वाटाघाटी का करू शकत नाही? त्यांना भूभागावर ताबा मिळवून लोकांना मारायचंच आहे का?
(या बातमीसाठी इमोजेन अँडरसन, एनास्तासिया लेवेंचको, दारिया सिपिजिना आणि संजय गांगुली यांनीही अतिरिक्त वार्तांकन केलं आहे.)
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)