शेन वॉर्न : निधनाच्या 12 तासांपूर्वी ट्वीट करून व्यक्त केलं होतं हे दुःख

ऑस्ट्रेलियन फिरकीपटू शेन वॉर्न यांचं निधन झालंय. थायलंडमध्ये कोह समुईमध्ये वॉर्न यांचं निधन झालंय.

शेन वॉर्न यांच्या निधनाबद्दल सांगणाऱ्या निवेदनात म्हटलंय, "शेन त्यांच्या बंगल्यात बेशुद्ध आढळले. वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही त्यांना शुद्धीवर आणता आलं नाही. या कठीण काळामध्ये कुटुंबाने आपल्याला काही खासगी क्षण मिळावेत अशी विनंती केली आहे. याबद्दलची अधिक माहिती आम्ही काही वेळाने देऊ "

हार्ट अटॅकमुळे शेन वॉर्न यांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

15 वर्षांच्या करियरमध्ये शेन वॉर्ननी 145 कसोटी सामन्यात 708 विकेट्स घेतल्या आहेत. आजवरची ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च आकडेवारी आहे.

1999 मध्ये एकदिवसीय क्रिकेट वर्ल्डकप जिंकणाऱ्या संघात शेन वॉर्न होते. 1993 ते 2005 या काळात 194 वनडे मॅचेसमध्ये त्यांनी 293 विकेट्स घेतल्या होत्या. 2007मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर 2013 पर्यंत शेन वॉर्न टी20 सामने खेळत होते.

शेन वॉर्न शेवटचं ट्वीट

शेन वॉर्न यांनी आज सकाळीच ट्वीट करत क्रिकेटर रॉड मार्श यांना श्रद्धांजली वाहिली होती. या ट्वीटमध्ये वॉर्न यांनी म्हटलं होतं, "रॉड मार्श यांच्या निधनाची बातमी ऐकून वाईट वाटलं. ते आमच्या खेळातले लिजंड होते आणि अनेक तरूण मुलामुलींसाठी प्रेरणास्थान होते. रॉड यांना क्रिकेटविषयी प्रचंड आस्था होती. आणि ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या खेळाडूंना त्यांनी खूप काही दिलं."

रॉडनी उर्फ रॉड मार्श हे ऑस्ट्रेलियन क्रिकेटर होते. ऑस्ट्रेलियन संघाचे ते विकेटकीपर होते. 70 आणि 80च्या दशकात ते ऑस्ट्रेलियन संघात खेळत.

74 वर्षांच्या मार्श यांचं 4 मार्चला ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलंडमध्ये निधन झालं.

शेन वॉर्नने क्रिकेट बदललं, असं ट्वीट इंग्लड क्रिकेटने केलं आहे. 1999च्या वर्ल्डकपची फायनल लॉर्ड क्रिकेट ग्राऊंडवर झाली होती आणि वॉर्न सामनावीर होते, असं म्हणत लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडने श्रद्धांजली वाहिली आहे.

शेन वॉर्नने टाकलेला बॉल जसा चकमा देत फिरायचा तसंच चकमा देत वॉर्न निसटल्याचं सांगणारं रेखाचित्र कार्टूनिस्ट सतीश आचार्य यांनी रेखाटलं आहे.

मी दुःखात आहे, बोलायला शब्द नाहीत, असं कॉमेंटेटर हर्षा भोगलेंनी म्हटलंय.

शेन वॉर्न हे मनगटाचा वापर करत बॉल स्पिन करणाऱ्या ग्रेट खेळाडूंपैकी एक होते, विश्वास बसत नाही असं म्हणत भारताचे माजी क्रिकेटपटू कृष्णम्माचारी श्रीकांत यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

जेव्हा सचिनने वॉर्नच्या ठिकऱ्या उडवल्या होत्या

ऑस्ट्रेलियाचा जगविख्यात फिरकीपटू शेन वॉर्नच्या बॉलिंगच्या ठिकऱ्या उडवत सचिनने जोरदार वर्चस्व गाजवलं होतं.

शारजाशी भारतीय क्रिकेट रसिकांच्या खास आठवणी जोडल्या गेल्या आहेत. 1998 साली याच मैदानावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने दोन अजरामर शतकं झळकावली होती.

तत्कालीन ऑस्ट्रेलियन संघ अजिंक्य समजला जात असे. दमदार अशा आक्रमणावर हल्लाबोल करत सचिनने श्रेष्ठ कोण हे दाखवून दिलं होतं.

22 एप्रिल 1998 रोजी झालेल्या गटवार लढतीत सचिनच्या शतकाने टीम इंडिया फायनलसाठी पात्र ठरली. मात्र त्या सामन्यात टीम इंडियाला पराभवाला सामोरं जावं लागलं.

सचिनने 9 फोर आणि 5 सिक्सेसह 143 धावांची मॅरेथॉन इनिंग्ज केली होती. मात्र दोन दिवसांनंतर अर्थात 24 एप्रिल रोजी आणि वाढदिवशी झालेल्या अंतिम लढतीत सचिनने आणखी एक दिमाखदार शतक झळकावलं आणि टीम इंडियाने जेतेपदावर नाव कोरलं.

सचिनने 12 फोर आणि 3 सिक्सेसह 134 धावांची शानदार खेळी साकारली होती.

सचिनला दोन्ही शतकी खेळींसाठी मॅन द ऑफ मॅच आणि मॅन ऑफ द सीरिज पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)