शेन वॉर्न : ज्याने स्वत:चं क्रिकेट घराणं निर्माण केलं

    • Author, पराग फाटक
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

त्याचं शस्त्र होतं एक चेंडू. क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येकाला हे अस्त्र असतं. पण शेन वॉर्नच्या हातात चेंडू विसावला की त्याचं सोनं होत असे. चालत चालत येऊन अंपायरच्या बाजूने पाच बोटांमधून वॉर्न आपली जादू दाखवत असे. या साध्यासरळ अॅक्शनने वॉर्न आकृष्ट करून घेत असे. या अॅक्शनचा कित्ता जगभरातल्या अनेक घरांमध्ये आणि नंतर मैदानांमध्ये गिरवला गेला. पण या अॅक्शननंतर वॉर्न जी किमया दाखवत असे ती फक्त त्यालाच जमू शके.

वॉर्नने सोडलेला चेंडू पाहताना डोळे विस्फारत. आपल्याला नीट दिसतंय ना का काहीतरी गंडलंय अशी जादू काही सेकंदात डोळ्यासमोर घडे. लेगस्टंपवर टप्पा पडून भसकन आत घुसून ऑफस्टंपचा वेध घेणं असो किंवा ऑफस्टंपवर टप्पा पडून लेगस्टंपवरची बेल्स उडवणं.

शास्त्र, भूमिती, सौंदर्य यांचा अद्भुत मिलाफ वॉर्नच्या गोलंदाजीत होता. तो कलाकार होता. त्याच्या हातून पडणारा प्रत्येक चेंडू हा परफॉर्मन्स असायचा. पाहत राहावं अशी ती मैफल असायची. त्याच्या आकस्मिक जाण्याने ही मैफल सुनीसुनी झाली आहे.

वॉर्न चेंडूला आणि फलंदाजाला दोघांनाही संमोहित करायचा. ट्वेन्टी20च्या आक्रमणानंतर गोलंदाज हे ठिकऱ्या उडवण्यासाठीच असतात, असं समीकरण हळूहळू पक्कं झालं. पण त्याआधीच्या काळात 700पेक्षा जास्त विकेट्स नावावर असणाऱ्या वॉर्नने तालावर नाचवणं काय असतं ते दाखवून दिलं.

वेगवान गोलंदाजी हा ऑस्ट्रेलियाचा बालेकिल्ला. फिरकीच्या बळावर मॅच जिंकून देऊ शकतो हा विश्वास वॉर्नने ऑस्ट्रेलियाला दिला. त्याचं नावापुढे लेगस्पिनर असं लिहून यायचं. खेळता खेळता वॉर्न आणि लेगस्पिन कधी एकरुप झाले कळलंही नाही.

वॉर्न ज्या काळात ऑस्ट्रेलियाच्या संघाचा भाग होता तो संघ विजयरथ होता. यंत्रवत पद्धतीने प्रतिस्पर्ध्यांना चिरडून सत्ता गाजवणारा विजयरथ.

वेगवान गोलंदाजांना विश्रांती म्हणून असलेला फिरकीपटू अशी वॉर्नची ओळख कधीच झाली नाही. वेगवान गोलंदाजांच्या खांद्याला खांदा लावून झटणारा विजयाचा शिल्पकार ही वॉर्नची ओळख होती. त्याची पोतडी अफलातून होती.

साड्यांच्या दुकानात गेल्यावर सेल्समन एकामागोमाग एक पॅटर्न्सच्या साड्या दाखवत जातात तसं वॉर्न आपल्या पोतडीतून एकेक जादू बाहेर काढायचा. फ्लिपर, गुगली, टॉपस्पिन. स्लिपमध्ये क्षेत्ररक्षणाला उभ्या असणाऱ्या वॉर्नला कर्णधाराकडून इशारा व्हायचा. तो वॉर्मअप सुरू करायचा. पुढच्या काही मिनिटात ती खास हॅट वॉर्न अंपायरला सुपुर्द करायचा.

ब्राऊन रंगाचे त्याचे भुरभुरणारे केस, तोंडाला फासलेलं क्रीम आणि शिवशिवणारे हात. विकेटकीपरच्या मागे स्लिपमध्ये खास भिडूला उभं करून वॉर्नची मैफल सुरू व्हायची. फॉरवर्ड शॉर्ट लेग आणि सिली पॉइंट आले की समजायचं वॉर्नची भट्टी तापलेय.

इतकी वर्ष खेळूनही त्याची फलंदाजांला दिग्मूढ करण्याची ताकद कमी झाली नाही. तो सापळा रचायचा. तो अभ्यास करून यायचा. दिग्गज फलंदाजांनी बॅटचा प्रसाद दिला तर तो नाऊमेद व्हायचा नाही. तो त्यांचे कच्चे दुवे हेरायचा. चेंडू घासून त्याच्या पँटवर चप्पे दिसायचे. वॉर्नसाठी हे डाग मिरवण्याची गोष्ट होती. ओव्हरचा रतीब टाकून त्याच्या हाताला घट्टे पडायचे पण तो कंटाळायचा नाही. तो चेंडू आणि त्याच्या करामती हे वॉर्नचं जग होतं. आता हे जग आठवणींमध्ये गेलं आहे.

विलक्षण उत्तुंगतेला शाप असतो म्हणतात. मैदानाबाहेरचा वॉर्न हा सिद्धांत दुर्देवाने खरा करून दाखवायचा. वॉर्न असला की वाद यायचेच. ड्रग्ज सेवनात दोषी असो, रंगेलपणा असो, प्रतिस्पर्धी खेळाडूला उद्देशून बाचाबाची असो एक ना अनेक.

असं गंमतीने म्हटलं जायचं की फॉलो करायचं असेल तर मैदानावरच्या वॉर्नला करा. मैदानावर दिग्गज असणाऱ्या वॉर्नचं उणेपण मैदानाबाहेर दिसून यायचं. पण त्याच्या चाहत्यांमध्ये घट झाली नाही, कारण मैदानावरचे पराक्रम त्याच्या बाहेरच्या वागण्याला शिरजोर होऊ द्यायचे नाहीत.

ऑस्ट्रेलिया न लाभलेल्या सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक असं वॉर्नचं वर्णन केलं जातं. अॅलन बॉर्डर, मार्क टेलर, स्टीव वॉ, रिकी पॉन्टिंग या संक्रमणात वॉर्नच्या कपाळी नेतृत्वाचा टिळा लागला नाही. नेतृत्व नसलं तरी वॉर्नने त्याच्या फिरकीच्या बळावर जगभरातल्या शिष्यांना गुरुमंत्र दिला. वॉर्नला टीव्हीवर बघत अनेकांनी लेगस्पिनची कास धरली.

इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेने जागतिक क्रिकेटमध्ये भारताचा दबदबा सुरू झाला. ही स्पर्धा यशस्वी होण्यात भारतीय खेळाडूंप्रमाणे असंख्य विदेशी खेळाडूंचा सिंहाचा वाटा आहे. वॉर्न हे त्या मांदियाळीतलं महत्त्वाचं नाव.

नवे तरुण खेळाडू घेऊन संघबांधणी हे राजस्थान रॉयल्स संघाचं वैशिष्ट्य. पहिल्यावहिल्या आयपीएल स्पर्धेत वॉर्नच्या नेतृत्वात राजस्थान रॉयल्स संघाने जेतेपदाला गवसणी घातली होती.

ट्वेन्टी20 लीग क्रिकेट भारतात रुजू पाहत होतं. भारतीय चाहत्यांना जेमतेम माहिती असणाऱ्या कार्यकर्त्यांची मोट बांधत वॉर्नने संघाला जेतेपद मिळवून दिलं. टीम इंडियाचा अविभाज्य भाग झालेल्या रवींद्र जडेजाला वॉर्नने हेरलं होतं. अष्टपैलू शेन वॉटसनला वॉर्नने पेश केलं.

एकेकाळी भारताच्या दौऱ्यावर खाणंपिणं मायदेशातून घेऊन येणाऱ्या वॉर्नने स्वप्नील असनोडकर, दिनेश साळुंखे, सिद्धार्थ त्रिवेदी अशा देशी खेळाडूंना ताकद दिली.

त्यांच्या गुणवत्तेला पैलू पाडले. कर्णधार असतानाच वॉर्न या संघाचा मेन्टॉरही होता. इंग्लंडचा धडाकेबाज फलंदाज केव्हिन पीटरसनला वॉर्नने असंच टिपलं होतं. हॅम्पशायर काऊंटीसाठी खेळताना वॉर्नने पीटरसन भविष्यात मोठा होऊ शकतो, असं भाकीत वर्तवलं होतं आणि झालंही तसंच.

गेल्या दशकभरात सोशल मीडियाने आपलं जग व्यापलं आहे. हॅशटॅग, ट्रेंड, रीळं हे सगळं आपल्या आयुष्याचा भाग झालं आहे. वॉर्न निवृत्त होऊन आता दशक उलटलं आहे. पण आजही वॉर्नने टाकलेले जादुई चेंडू युट्यूबवर खपणीय आहेत. इंग्लंडच्या माईक गॅटिंगला टाकलेल्या चेंडूचं वर्णन 'बॉल ऑफ द सेंच्युरी' असं केलं जातं.

लेगस्टंपवर टप्पा पडून चेंडूने ऑफस्टंपचा वेध घेतला होता. अडीच फूट आत वळून गेलेल्या त्या चेंडूने गॅटिंग आणि अंपायर दोघेही आश्चर्यचकित नजरेने पाहत राहिले. इंग्लंडचा माजी कर्णधार अँड्यू स्ट्रॉसला टाकलेला चेंडू तर बघण्यावरचा विश्वास उडवणारा होता.

ऑफस्टंपवर चेंडू येणार हे ओळखून बचावाची ढाल उभारणाऱ्या स्ट्रॉसच्या मागच्या पायाला चाटून चेंडूने लेगस्टंप उडवला. 1999 वर्ल्डकपमध्ये वॉर्नने दक्षिण आफ्रिकेच्या हर्षल गिब्जला टाकलेला चेंडूही असाच अतर्क्य सदरात मोडणारा.

फिरकी गोलंदाजी करणारा वॉर्न काही पहिला गोलंदाज नाही. पण तो फिरकी गोलंदाजी जगला. त्याने या अस्त्राचे सगळे ताणेबाणे उलगडून दाखवले. फिरकीची ताकद सिद्ध केली. वॉर्नच्या नशिबाने त्याला साथ देणारे कर्णधार लाभले. इयान हिली आणि अडम गिलख्रिस्ट यांच्या रुपात वॉर्नची ताकद पेलू शकतील असे खंदे साथीदार मिळाले.

वॉर्न नुसता खेळला नाही, त्याने तो काळ गाजवला. सचिन तेंडुलकर, वॉर्न आणि शारजा हे समीकरण क्रिकेटरसिक विसरूच शकणार नाहीत. शेन वॉर्नच्या फिरकीला चोपून काढणाऱ्या सचिनची आवेशमयी इनिंग्ज आजही सार्वकालीन हिट्स मैफलीत गणली जाते.

गायकीची घराणी असतात. वॉर्नने स्वत:चं घराणं निर्माण केलं. शिष्य घडवले. हातचं न राखता सल्ला दिला, मार्गदर्शन केलं. समालोचन करतानाही वॉर्नचं भाष्य ऐकणं विचारसमृद्ध करणारं असे.

काही वर्षांपूर्वी आयपीएलच्या हंगामात वॉर्न राजस्थान रॉयल्स संघाच्या कॅम्पमध्ये होता. गुलाबी रंगाच्या टीम जर्सीत वॉर्नसमोर काही गोलंदाज फिरकीचे प्रयोग करत होते.

दैवतासमोर भक्ताचं जे होतं ते त्यांचं झालं होतं. प्रत्येकाला काही सूचना केल्यानंतर वॉर्नने चेंडू हातात घेतला. त्याने एक चेंडू टाकला आणि उपस्थितांना दिव्यत्वाची प्रचिती येऊन टाळ्या, चीत्कार झाला.

रॉडनी मार्श यांना श्रद्धांजली वाहणाऱ्या वॉर्नला आदरांजली द्यावी लागेल हे आक्रीतच. वॉर्नच्या अकाली जाण्याने ऑस्ट्रेलियाच्या विजयरथाचं चाक निखळलं आहे. वॉर्नच्या निवृत्तीनंतर अनेक वर्ष ऑस्ट्रेलियाला धड म्हणावा असा फिरकीपटू सापडला नाही. आता तर तो या जगातच नाही. ही पोकळी भरून न येणारी...

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)