You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भारत-पाकिस्तान क्रिकेट बंद झाल्याने भारत-ऑस्ट्रेलिया द्वंद्वाचा भाव वधारला का?
- Author, पराग फाटक
- Role, बीबीसी मराठी
बॉर्डर-गावस्कर अर्थात अॅलन बॉर्डर आणि सुनील गावस्कर या दिग्गजांच्या नावाने खेळवली जाणारी मालिका नुकतीच संपली. टीम इंडियाने ब्रिस्बेन टेस्टमध्ये शेवटच्या काही मिनिटांमध्ये विजय मिळवत मालिकेवर 2-1 असा कब्जा केला.
दर्जेदार खेळ, वादविवाद, लोकप्रियता, सोशल मीडियावर चर्चा अशा सगळ्यांच आघाड्यांवर ही मालिका अग्रणी असते. काही वर्षांपूर्वी भारत-पाकिस्तान हा क्रिकेटविश्वातला सगळ्यांत चर्चित मुकाबला होता. मात्र हळूहळू पाकिस्तानची जागा ऑस्ट्रेलियाने घेतली आहे.
भारतीय क्रिकेट संघाने सख्खे शेजारी असलेल्या पाकिस्तानच्या भूमीवर शेवटची टेस्ट मॅच 2006 मध्ये खेळली आहे. त्याच धर्तीवर पाकिस्तानने भारतात शेवटची टेस्ट 2007 मध्ये खेळली आहे.
दोन्ही देशांचे संबंध दुरावल्याने संघ एकमेकांकडे जाणं बंद झालं. आयसीसीतर्फे आयोजित स्पर्धांमध्ये हे संघ खेळतात पण आपापसात मालिका होत नाहीत. भारत-पाकिस्तान क्रिकेट बंद होणं हे 'भारत-ऑस्ट्रेलिया' द्वंद्वाचा भाव वधारण्यात निर्णायक ठरलं आहे.
भारत-पाकिस्तान मॅच म्हणजे धर्मयुद्धाचं स्वरुप असायचं. बाकी कोणाविरुद्ध हरायला झालं तरी चालेल पण पाकिस्तानविरुद्ध नको असं दडपण भारतीय खेळाडूंवर असायचं. ही मॅच मैदानाइतकीच भावनिक पातळ्यांवर खेळली जायची.
भारत-पाकिस्तान यांचे संबंध दुरावलेले असताना मॅच होणं म्हणजे दर्जेदार क्रिकेट, वादविवाद, मजबूत प्रतिसाद यांची हमी असायची. एखादी चूक आणि खेळाडू व्हिलन व्हायचा. त्याचवेळी पाकिस्तानविरुद्ध मॅच जिंकून दिली तर खेळाडूची महती वाढायची.
भारत-पाकिस्तान मॅच होणं हे टीव्हीवर दाखवणारे चॅनेल्स, मॅच जिथे आहे ते स्टेडियम, प्रसारमाध्यमं, मोप वेळ असलेले चाहते या सगळ्यांसाठी कुरण होतं. मॅचच्या आधी, मॅच सुरू असताना आणि मॅचनंतरही चर्चा रंगायच्या, पैजा लावल्या जायच्या. लोक शपथा वगैरे घ्यायचे. काही नवस बोलायचे.
एकूणात भारत-पाकिस्तान मॅच ही दोन्ही देशांतल्या लोकांच्या भावविश्वाला व्यापून टाकणारी असायची. या मॅचच्या आणि पर्यायाने मालिकेच्या माध्यमातून व्यावसायिक गणितं जमून जायची.
भावनिक आणि सामाजिक उत्कटबिंदू गाठला जायचा. लाव्हा रसाप्रमाणे उकळणारं हे रसायन मिसबाह-उल-हक आणि महेंद्रसिंग धोनी यांनी बऱ्याच प्रमाणात थंड केलं.
भारत-पाकिस्तान असली तरी ही क्रिकेटची सर्वसाधारण मॅच आहे, चांगलं खेळणारा जिंकतो, कधीतरी हरायलाही होतं. मॅच हरलेले खेळाडू देशद्रोही वगैरे नसतात. ही मॅच हरली म्हणजे पाकिस्तानविरुद्धची रणांगणावरची लढाई हरलो असं नसतं हे धोनीच्या शांत वागणुकीमुळे ठसलं.
पाकिस्तानात मिसबाहच्या समान स्वभावामुळे ठसलं. मात्र तरीही भारत-पाकिस्तान मॅच होणार हे कळल्यावर चाहते आवर्जून पाहायचे.
2008 मध्ये मुंबईत कट्टरवादी हल्ला झाला. या हल्ल्याने भारत-पाकिस्तान मालिकांना टाळं लागलं. त्या हल्ल्याने पाकिस्तानी क्रिकेटपटूंना इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेची दारं बंद झाली.
भारत-पाकिस्तान क्रिकेट बंद झाल्याने जी पोकळी निर्माण झाली होती त्यातून भारत-ऑस्ट्रेलिया द्वंद्वाची खुमारी वाढली. क्रिकेटविश्वात अॅशेस म्हणजे ऑस्ट्रेलिया-इंग्लंड आणि भारत-पाकिस्तान हे मैदानावरचं वैर सर्वश्रुत आहे. बाकी संघही एकमेकांशी अहमहमिकेने खेळतात. पण एकेक रन-विकेटसाठी संघर्ष, जिंकण्यासाठी सर्वस्व पणाला लावण्याची तयारी, प्रेक्षकांचा अमाप पाठिंबा यामुळे ही दोन द्वंद्व प्रसिद्ध आहेत.
पैकी भारत-पाकिस्तान बंद झाल्याने भारत वि. ? काय असेल तर ते खपणीय होईल अशी स्थिती होती. श्रीलंका, बांगलादेश, झिम्बाब्वे तेवढी टक्कर देऊ शकत नाहीत. न्यूझीलंड कमी खेळतं. वेस्ट इंडिजचा अस्तित्वासाठी संघर्ष सुरू आहे.
उरले दोन संघ-दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड. मजबूत संघ आहेत पण भारतीय खेळपट्यांवरची त्यांची कामगिरी आणि खेळाडूंची लोकप्रियता या मुद्यांमुळे हे दोन संघ स्पर्धेत मागे पडले.
भारत-ऑस्ट्रेलिया याआधीही खेळतच होते. चांगल्या दर्जाचं क्रिकेट व्हायचं. एक मुद्दा महत्त्वाचा ते म्हणजे आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक विदेशी क्रिकेटपटू ऑस्ट्रेलियाचे असतात.
गेल्या 25 वर्षात ऑस्ट्रेलियाची कामगिरी स्तिमित करणारी अशी होती. या कारणांमुळे ऑस्ट्रेलियाचे खेळाडू भारतात लोकप्रिय आहेत. त्यांचा भारतात मोठा चाहतावर्ग आहे. ऑस्ट्रेलियाचा खेळ आवडणारी आणि त्याचवेळी शेरेबाजीचा डावपेचांचा भाग वापरणं अनेक भारतीय चाहत्यांना आवडत नाही.
आता ऑस्ट्रेलियाचा संघ पूर्वीसारखा राहिलेला नाही. मात्र काही वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक झळकावणं किंवा चांगला स्पेल टाकणं हा बॅट्समन किंवा बॉलर उत्तम असल्याचा मापदंड मानला जात असे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध चांगलं खेळून आपली दखल घ्यायला भाग पाडण्याचं अनेक खेळाडूंचं उद्दिष्ट असायचं.
पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेतून चाहत्यांना जो आनंद, थरार, समाधान, प्रेरणा, ऊर्जा मिळायचं ते ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यांमधून मिळू लागलं. एकप्रकारे भारत-पाकिस्तान रोमांचकारी अनुभवाची जागा भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेने घेतली.
ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरच्या मैदानावर हरवणं अवघड आहे. हे शिवधनुष्य भारतीय संघाने पेललं. ते पेलण्यासाठी उत्तम तंत्रकौशल्य असणारे फलंदाज, 20 विकेट्स घेऊ शकतील असे गोलंदाज, गोलंदाजांना साहाय्यकारी ठरतील असे क्षेत्ररक्षक भारतीय संघाला मिळाले.
अनिल कुंबळे, महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली यांच्या रुपात कणखर नेतृत्व मिळालं. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंकडून होणारी बोलंदाजी तसंच प्रेक्षकांकडून होणारी शेरेबाजी याला पुरुन उरत चांगला खेळ दाखवण्याची ताकद भारतीय खेळाडूंनी सिद्ध केली.
भारत-पाकिस्तान मालिका बंद होऊन आता 13 वर्षं उलटून गेली आहेत. या काळात भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या संघांनी 30 टेस्ट खेळल्या आहेत. दरवर्षी हे संघ एकमेकांसमोर येणं हे प्रक्षेपणकर्त्या वाहिनीसाठी लाभदायक ठरतं.
भारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट सीरिजमध्ये वादविवाद हमखास होतात. त्यामुळे खेळाइतकीच या वादामुळे चर्चा वाढीस लागते.
मंकीगेट प्रकरण
मंकीगेट प्रकरणाने संपूर्ण क्रिकेटविश्व ढवळून निघालं होतं. भारतीय संघ २००७-०८ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर होता. दुसऱ्या टेस्टदरम्यान ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू अँड्यू सायमंड्सने भारतीय खेळाडू हरभजन सिंगवर वर्णद्वेषाचा आरोप केला होता. अं
पायर्सकडून हे प्रकरण मॅचरेफरींकडे गेलं. हरभजन सिंगवर तीन सामन्यांची बंदी घालण्यात आली होती. मग हे प्रकरण तटस्थ लवादाकडे केलं. सुनावणी झाली. तोपर्यंत दोन्ही संघांतील संबंध ताणले गेले. भारतीय संघाने दौरा अर्धवट सोडून परतण्याचा इशारा दिला. सुनावणीनंतर हरभजनवरील बंदी हटवण्यात आली. उर्वरित सामना खेळवण्यात आला.
निर्णयावरून खादाखाद
सिडनी टेस्टमध्येच ब्रेट लीच्या बॉलिंगवर सौरव गांगुलीचा कॅच स्लिपमध्ये मायकेल क्लार्कने टिपला. थर्ड अंपायरकडे निर्णय सोपवण्यात आला. तेव्हा बॉल जमिनीला टेकल्याचं दिसत होतं. मात्र त्याआधीच पॉन्टिंगने आऊट असल्याची खूण गांगुलीच्या दिशेने केले.
आऊट देणं हे अंपायरचं काम आहे की तुझं आहे असं गांगुलीने पॉन्टिंगला सुनावलं. मंकीगेट प्रकरणावेळी फक्त एक संघ खिलाडूवृत्तीने खेळला असा टोला भारतीय कर्णधार अनिल कुंबळेने लगावला होता.
गंभीर-वॉटसन भिडले
राजधानी दिल्लीत फिरोझशाह कोटला मैदानावर झालेल्या टेस्टमध्ये भारताचा सलामीवीर गौतम गंभीर आणि ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसन एकमेकांविरुद्ध उभे ठाकले होते.
रन घेत असताना वॉटसन गंभीरला उद्देशून काहीतरी बोलला. यामुळे चिडलेल्या गंभीरने दुसऱ्या रनवेळी वॉटसनला कोपराने ढुशी मारली.
कोहली प्रेक्षकांवर चिडला
2012 मध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असताना विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियन प्रेक्षक यांच्यात वाद झाला होता.
प्रेक्षकांनी कोहलीला शिवीगाळ केली. आक्रमक स्वभावाच्या कोहलीने आक्षेपार्ह कृतीतून प्रत्युत्तर दिलं. या कृत्यामुळे कोहलीच्या मानधनातून ५० टक्के रक्कम कापून घेण्यात आली. कोहलीने चूक मान्य केली मात्र प्रेक्षकांनी शिवीगाळ करणं योग्य नाही, असं नमूद केलं होतं.
स्मिथचं ब्रेनफेड
ऑस्ट्रेलियाचा संघ 2016-17मध्ये भारताच्या दौऱ्यावर आला होता. त्या मालिकेतल्या एका मॅचमध्ये स्मिथला अंपायरने आऊट दिलं.
डीआरएस घ्यावं की नाही यासाठी स्मिथने ड्रेसिंगरुमच्या दिशेने पाहिलं. नियमांनुसार दोन्ही बॅट्समनने आपापसात चर्चा करून डीआरएससाठी टी आकाराची खूण करायची असते. तटस्थ व्यक्ती किंवा संघव्यवस्थापनाला विचारण्याची अनुमती नाही.
स्मिथने असं केल्यानंतर विराट कोहलीने हस्तक्षेप करत त्याला सुनावलं. अंपायर नायजेल लाँग यांनीही स्मिथला समज देत हे नियमबाह्य असल्याचं सांगितलं. स्मिथने चूक मान्य करत ब्रेनफेड झाल्याचं सांगितलं.
सिराज, बुमराहला उद्देशून शेरेबाजी
नुकत्याच आटोपलेल्या दौऱ्यात मेलबर्न आणि सिडनी टेस्टदरम्यान मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रेक्षकांमधून शेरेबाजी होत असल्याचं अंपायर्सच्या निदर्शनास आणून दिलं.
मेलबर्नमध्ये भारतीय संघव्यवस्थापनाने याविरोधात तक्रार दाखल केली. सिडनीत सिराजला लक्ष्य केल्यानंतर वाचाळवीर सहा प्रेक्षकांना बाहेर काढण्यात आलं. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने याप्रकरणी कठोर कारवाईची हमी देत भारतीय खेळाडूंची माफी मागितली होती.
दर्जेदार क्रिकेटची पर्वणी
वादविवाद होत असले तरी गेल्या एक तपभराच्या कालावधीत भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेदरम्यान वैयक्तिक आणि सांघिक पातळीवर दर्जेदार क्रिकेटची पर्वणी चाहत्यांना अनुभवायला मिळाली आहे.
विराट कोहलीने ऑस्ट्रेलियात उघडलेली धावांची टांकसाळ, चेतेश्वर पुजाराने खेळपट्टीवर नांगर टांकून ऑस्ट्रेलियन्सला जेरीस आणणं, ऋषभ पंतची ऑस्ट्रेलियाच्या वेगवान आक्रमणाविरुद्ध तळपलेली बॅट, इशांत शर्माने ऑस्ट्रेलियात रिकी पॉन्टिंगसारख्या मोठ्या बॅट्समनला अडचणीत टाकणं भन्नाट होतं.
जसप्रीत बुमराहच्या बॉलिंगवर कांगारूंची उडालेली त्रेधातिरपीट, स्टीव्हन स्मिथची भारतातील शतकं, वॉर्नरने धावांची केलेली लयलूट, रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांच्या जादुई फिरकीसमोर ऑस्ट्रेलियाच्या बॅट्समनची उडणारी गाळण असे अनेक क्षण आजही क्रिकेटरसिकांच्या स्मरणात आहेत.
ब्रिस्बेन टेस्टमध्ये शेवटच्या दिवशी शेवटच्या काही मिनिटांपर्यंत विजेता कोण याची उत्कंठा होती. सिडनी टेस्टमध्ये भारतीय बॅट्समननी संयम दाखवत अटळ पराभव टाळला. मेलबर्नमध्ये टीम इंडियाने जिगरबाज खेळ करत विजय मिळवला. अडलेडमध्ये ऑस्ट्रेलियाच्या त्रिकुटाच्या भेदक माऱ्यासमोर टीम इंडियाने ३६ रन्समध्येच गुडघे टेकले आणि नीचांकी धावसंख्येची नोंद झाली होती.
भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यानची टेस्ट मॅच सर्वसाधारण होतच नाही. क्रिकेटचा दर्जा अव्वल असतोच आणि दोन्ही संघ जिंकण्यासाठी पराकाष्ठा करतात.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रशासनातही भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड यांची पकड असल्याचा फायदा भारत-ऑस्ट्रेलिया मालिकांना झाला.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)