You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शेन वॉर्न : हार्ट अटॅक अचानक का येतो?
ऑस्ट्रेलियन फिरकीपटू शेन वॉर्न यांचं निधन झालंय. थायलंडमध्ये कोह समुईमध्ये वॉर्न यांचं निधन झालंय.
शेन वॉर्न यांच्या निधनाबद्दल सांगणाऱ्या निवेदनात म्हटलंय, "शेन त्यांच्या बंगल्यात बेशुद्ध आढळले. वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही त्यांना शुद्धीवर आणता आलं नाही. या कठीण काळामध्ये कुटुंबाने आपल्याला काही खासगी क्षण मिळावेत अशी विनंती केली आहे. याबद्दलची अधिक माहिती आम्ही काही वेळाने देऊ "
हार्ट अटॅकमुळे शेन वॉर्न यांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हार्ट अटॅक येतो कसा?
हार्ट अटॅकचं प्रमुख लक्षण म्हणजे- छातीत दुखणं. आपल्या चित्रपटांमध्ये हार्ट अॅटॅक म्हटलं की काही दृश्यं हमखास दाखवली जातात. छातीत दुखणारा माणूस हात हृदयाशी घेऊन पिळवटतो. वेदनेमुळे त्याच्या डोळ्यात भीती दिसते. दुखणं हाताबाहेर गेल्याने तो जमिनीवर पडतो. चित्रपटात दाखवलं जाणारं हे दृश्य प्रत्यक्षात नेहमीच तसं नसतं, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे.
दृदयाशी संबंधित गोष्ट म्हणजे छातीवर प्रचंड आघात झाल्यासारखं वाटणं असा समज आहे. असं बहुतांशी वेळेला होतंही पण दरवेळी असंच होईल असं नाही.
जेव्हा हृदयाला रक्तपुरवठा होत नाही तेव्हा हार्ट अटॅक येतो. साधारणत: धमन्यांच्या मार्गात अडथळा निर्माण झाला की हृदयाला होणारा रक्तपुरवठा विस्कळीत होतो. या कारणामुळे छातीत प्रचंड दुखतं. मात्र काही वेळेला छातीत दुखत नाही. त्याला सायलेंट हार्ट अॅटॅक म्हटलं जातं.
Healthdata.org या वेबसाईटनुसार जगभरातही हार्ट अटॅकने होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण सर्वाधिक आहे. 2016 वर्षात विविध कारणांनी होणाऱ्या मृत्यूंचा अभ्यास करण्यात आला. यापैकी 53 टक्के लोकांनी हार्ट अॅटॅकमुळे जीव गमावला.
हार्ट अटॅकची लक्षणं?
- छातीत दुखतं, अस्वस्थ वाटतं
- छातीतून हात, जबडा, मान, पाठ, पोट याकडे जाणाऱ्या मार्गात दुखतं
- मन अस्वस्थ होतं
- चक्कर येते
- प्रचंड घाम येतो
- श्वास घेण्यात अडचण
- उलटीसारखं वाटतं
- खोकल्याची मोठी उबळ येते. जोराजोरात श्वास घ्यावा लागतो.
- महिला, ज्येष्ठ नागरिक आणि डायबेटिस असणाऱ्यांना छातीत प्रचंड दुखत नाही. मात्र तरीही तो हार्ट अॅटॅक असू शकतो.
अचानक हार्ट अटॅक येण्याची कारणं?
बीबीसीशी बोलताना बॉम्बे हॉस्पिटलचे हृदयविकारतज्ज्ञ डॉ. लक्ष्मण खेराडे सांगतात, "बी-12 शरीरामध्ये कमी प्रमाणात असेल तर, रक्ताची गाठ तयार होते. रक्त घट्ट होण्याची शक्यता असते. ही गाठ हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये गेल्यास हार्ट अटॅक येतो. असं झाल्यास कार्डिअॅक अरेस्टने रुग्णाचा मृत्यू होण्याची शक्यता असते."
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, काहीवेळा अचानक तयार झालेली रक्ताची गाठ डोक्यात जाते. पण, यात रुग्णाला अर्धांगवायूचा झटका येण्याची शक्यता असते.
"काही रुग्णांना त्यांना हृदयाचा आजार आहे याची माहिती नसतं. अशावेळी हृदयावर जास्त प्रेशर आल्याने हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते, " असं डॉ. खेराडे पुढे सांगतात.
हार्ट अटॅकपासून वाचण्यासाठी काय करावं?
युवा वर्गाने आपल्या जीवनशैलीत थोडी शिस्त आणणं आवश्यक आहे असं डॉ. मनचंदा सांगतात. योगसाधना केल्यास हार्ट अॅटॅकचा धोका कमी होऊ शकतो. योग केल्याने तणाव कमी होण्यास मदत होते. मन एकाग्र होण्यास फायदा होतो, असंही डॉक्टर सांगतात.
हार्ट अटॅकपासून वाचायचं असेल तर ट्रान्स फॅट्सन दूर ठेवा
तरुण वयात येणाऱ्या हार्ट अॅटॅकपासून वाचण्यासाठी सरकारने काही पावलं उचलणं आवश्यक असल्याचं डॉ. मनचंदा सांगतात. जंक फूडवर सरकारने टॅक्स आकारायला हवा. तंबाखू आणि सिगरेटवर सरकारने कर बसवला आहे. तसंच जंक फूडच्या बाबतीत हवं. जंक फूडच्या पॅकेटवरही सिगारेटच्या पाकीटावर असतो तसा ठळक अक्षरात इशारा लिहायला हवा. हे केल्याने लगेच हार्ट अटॅकचं प्रमाण घटणार नाही पण जागरुकता वाढेल.
हार्ट अटॅकचा संबंध शरीरातल्या कोलेस्टेरॉलशी असतो असं सांगण्यात येतं. म्हणूनच खूप तेलकट पदार्थ खाणं टाळायला हवं. मात्र ही गोष्ट किती खरी आहे?
डॉ. मनचंदा यांच्या मते, कोलेस्टेरॉलपेक्षा ट्रान्स फॅटमुळे हार्ट अटॅकची शक्यता वाढते. ट्रान्स फॅट चांगल्या कोलेस्टेरॉलला कमी करतात आणि वाईट कोलेस्टेरॉलला वाढवतात.
वनस्पती तूप हे ट्रान्स फॅटचे मुख्य स्रोत आहेत. म्हणून यापासून दूर राहायला हवं.
हार्ट अॅटॅक आल्यानंतर CPR का महत्त्वाचा आहे?
हार्ट अॅटॅक आलेल्या व्यक्तीचं हृदय अचानक बंद पडतं आणि तो व्यक्ती बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळतो. अशा व्यक्तीला योग्य वेळी CPR दिल्यास जीव वाचू शकतो.
वैद्यकीय भाषेत CPR ला कार्डियोपल्मोनरी रिससिटेशन म्हणतात.
टीव्ही किंवा सोशल मीडियावर तुम्ही अनेक दृष्य पाहिली असतील. ज्यामध्ये हार्ट अटॅकमुळे अचानक बेशुद्ध पडलेल्या व्यक्तीच्या छातीवर दोन्ही हातांच्या मदतीने लोक दबाव देतात. या प्रक्रियाला कार्डियोपल्मोनरी रिससिटेशन असं म्हटलं जातं.
हृदयरोगतज्ज्ञ म्हणतात, हार्ट अटॅकचे 50 टक्के मृत्यू रुग्णालयात वेळेवर न पोहोचल्याने होतात. कार्डिअॅक अरेस्टमुळे रुग्णांचा मृत्यू होतो. कार्डिअॅक अरेस्ट आलेल्या रुग्णांसाठी CPR अत्यंत महत्त्वाचा ठरतो.
डॉ. महाजन पुढे सांगतात, "कार्डिअॅक अरेस्ट आलेल्या रुग्णाला CPR वेळेत दिला गेला. तर, लोकांचे प्राण वाचवणं शक्य आहे. रुग्णाला रुग्णालयात हलवताना CPR देण्यात आला पाहिजे."
मेंदू आणि शरीरातील इतर महत्त्वाच्या अवयवांना CPR दिल्यामुळे रक्तप्रवाह सुरू रहातो.
मधुमेहाच्या रुग्णांना हार्ट अॅटॅक आल्यास काय काळजी घ्यावी?
डायबिटीसग्रस्त रुग्णांना अनेकवेळा हार्ट अॅटॅकची लक्षणं दिसून येत नाहीत. याचं कारण, सामान्यांना हार्ट अॅटॅक येताना दिसून येणारी लक्षणं मधुमेहींमध्ये दिसून येत नाहीत.
डॉ. सुशांत पाटील म्हणाले, "मधुमेहामुळे रक्तवाहिन्यांना (नर्व्ह) इजा झालेली असते. त्यामुळे हार्ट अॅटॅक ओळखणं कठीण होतं."
मधुमेह आणि हायरिस्क रुग्णांनी ज्यांना श्वास घेण्यासंबंधीचा त्रास असतो. अशा रुग्णांनी रक्तवाहिन्यातील ब्लॉकेज शोधण्यासाठी कॉरोनरी आर्टरीचं (धमनी) सीटी स्कॅन, कार्डिअॅक स्ट्रेस टेस्ट करून घ्यावी, असा सल्ला तज्ज्ञ देतात.
डॉ. महाजन पुढे सांगतात, "मधुमेहींमध्ये काहीवेळी पोट अचानक मोठं होणं, विकनेस किंवा गरगरण्यासारखी हार्ट अटॅकची लक्षणं दिसून येतात." त्यासाठी मधुमेहानेग्रस्त रुग्णांनी शरीरातील सारखेचं प्रमाण, रक्तदाब आणि इतर महत्त्वाच्या चाचण्या वेळोवेळी करायला हव्यात, तज्ज्ञ म्हणतात.
वयोवृद्ध लोक आणि महिलांमध्येही हार्ट अॅटॅकची लक्षणं सारखीच दिसून येत नाहीत. डॉ. नईम पुढे म्हणाले, "याला सायलेंट हार्ट अॅटॅक म्हणतात. जो सहजरित्या ओळखता येत नाही."
'गोल्डन अवर'मध्ये रुग्णालयात आल्यामुळे जीव वाचला
मुंबई, पुण्यासारख्या शहरी भागात रुग्णवाहिका चोवीस तास उपलब्ध असतात. पण, दुर्गम आणि ग्रामीण भागात ही परिस्थिती नसते. ग्रामीण भागात अनेकवेळा रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे रुग्णालयात पोहोचेपर्यंत रुग्णाचा मृत्यू होतो.
डॉ. विपीन खडसे जळगावच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात सर्जरी विभागात शिक्षण घेत आहेत. पण, आदिवासी दुर्गम मेळघाटात हार्ट अटॅक आलेल्या एका रुग्णाचा 'गोल्डन अवर'मध्ये रुग्णालयात आल्यामुळे जीव कसा वाचला याची ते माहिती देतात.
ते म्हणाले, "मेळघाटात वैद्यकीय सेवा देत असताना एका 70 वर्षाच्या रुग्णाला त्याचे नातेवाईक 60 किलोमीटर लांबून मोटर सायकलवरून रुग्णालयात घेऊन आले. रुग्णाला हार्ट अॅटॅक आला होता. पण, वेळेत रुग्णालयात पोहोचल्याने त्याचा जीव वाचवता आला."
या रुग्णाच्या नातेवाईकांनी क्षणाचाही वेळ न घालवता तात्काळ रुग्णालयात जाण्याचा निर्णय घेतल्याने रुग्णाचा जीव वाचला.
डॉ. विपीन यांनी पुढे सांगितलं, "बऱ्याचवेळा ग्रामीण भागातील लोक सुविधा नसल्याने रुग्णालयात पोहोचू शकत नाहीत. रुग्णांना घरीच ठेऊन उपचार करतात. रुग्ण वेळेत रुग्णालयात पोहोचला नसता, तर त्याच्या जीवावर बेतलं असतं."
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)