Punit Rajkumar: अचानक हार्ट अटॅक येण्याची काय कारणं असू शकतात?

पुणे जिल्ह्यातील जुन्नरमध्ये एका 47 वर्षीय व्यक्तीचा क्रिकेट खेळताना हार्ट अटॅकने जागीच मृत्यू झाला.

क्रिकेटच्या पीचवर कोसळलेल्या बाबू नलावडे यांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती, कुटुंबीयांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिली.

बाबू यांना जुन्नरच्या विघ्नहर्ता मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात नेण्यात आलं होतं. डॉक्टरांच्या माहितीनुसार, बाबू यांचं हृदय बंद असल्याचं तपासणीत आढळून आलं.

कुठे घडली घटना?

बुधवारी (17 फेब्रुवारीला) क्रिकेटचे सामने सुरू असताना ही घटना घडली.

जुन्नर तालुक्यातील बोरी बुद्रुक गावात जाधववाडी स्पर्धा सुरू होती. ओझर आणि जांबुत या संघादरम्यान क्रिकेटचा सामना सुरू होता. बाबू नलावडे फलंदाजी करत होते.

याबाबत बीबीसीशी बोलताना जुन्नरच्या विघ्नहर्ता मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाचे डॉ. आशुतोष बोळीज सांगतात, "क्रिकेट खेळताना या व्यक्तीला अचानक हार्ट अटॅक आला. रुग्णालयात आल्यानंतर त्यांचा इसीजी काढण्यात आला. पण, त्यांचं हृदय बंद पडलं होतं."

बाबू नलावडे यांना हृदयाचा आजार होता का? अचानक हार्ट अटॅक येण्याचं कारण काय, यावर बोलताना डॉ. बोळीज सांगतात, "कुटुंबीयांच्या माहितीनुसार रुग्णावर हृदयाच्या आजाराबाबत उपचार सुरू होते."

डॉ. बोळीज सांगतात, हृदयाचा आजार असलेल्या व्यक्तींनी योग्य काळजी घेतली पाहिजे.

अचानक हार्ट अटॅक येण्याची कारणं?

बीबीसीशी बोलताना बॉम्बे हॉस्पिटलचे हृदयविकारतज्ज्ञ डॉ. लक्ष्मण खेराडे सांगतात, "बी-12 शरीरामध्ये कमी प्रमाणात असेल तर, रक्ताची गाठ तयार होते. रक्त घट्ट होण्याची शक्यता असते. ही गाठ हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये गेल्यास हार्ट अटॅक येतो. असं झाल्यास कार्डिअॅक अरेस्टने रुग्णाचा मृत्यू होण्याची शक्यता असते."

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, काहीवेळा अचानक तयार झालेली रक्ताची गाठ डोक्यात जाते. पण, यात रुग्णाला अर्धांगवायूचा झटका येण्याची शक्यता असते.

"काही रुग्णांना त्यांना हृदयाचा आजार आहे याची माहिती नसतं. अशावेळी हृदयावर जास्त प्रेशर आल्याने हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते, " असं डॉ. खेराडे पुढे सांगतात.

या आधी घडलेल्या घटना

जुन्नरच्या विघ्नहर रुग्णालयाचे जनरल फिजिशीअन डॉ. सदानंद राऊत बीबीसीशी बोलताना खेळताना अचानक हृदयविकाराचा झटका आलेल्या घटनांची माहिती देतात.

ते सांगतात,

महिन्यापूर्वी खेड तालुक्यात 21 वर्षीय कबड्डी खेळाडूला धावताना अचानक हार्ट अटॅक आला होता. तर जुन्नरमध्ये एक डॉक्टर स्टेजवर डान्स करताना अचानक हार्ट अटॅकमुळे कोसळला.

"व्यायामाचा अभाव, लाईफस्टाईल आणि अतिउत्साहामुळे लोक योग्य सराव नसताना खेळ सुरू करतात. त्यामुळे हृदयावर प्रेशर येण्याची शक्यता असते. हृदयावर अचानक प्रेशर आलं तर, हार्ट अटॅक येण्याची शक्यता वाढते," असं डॉ. राऊत सांगतात.

मुंबईत डिसेंबर 2018 मध्ये घाटकोपरच्या सोमय्या कॉलेजमध्ये रस्सीखेच स्पर्धा सुरू असताना 22 वर्षीय जिबीन सनीचा अचानक हार्ट अटॅक आल्याने मृत्यू झाला होता.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)