You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोनामुळे मुंबईत इमारती सील करण्यास सुरुवात, पुण्यातही महापौरांचा इशारा
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोनाग्रस्तांची संख्या वाढू लागली आहे. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, मुंबई महानगरपालिकेने इमारती सील करण्यास सुरूवात केलीये.
त्याचसोबत, लोकांच्या बेशिस्त वर्तनाला आळा बसावा, यासाठी इमारतींना नोटीस बजावणं सुरू केलंय.
मुंबई महापालिकेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, वॉर्डमधील कोरोनाग्रस्तांची संख्या लक्षात घेता, स्थानिक पातळीवर इमारतींना नोटीस देण्यात येत आहे.
पालिकेकडून इमारतींना देण्यात आलेली नोटीस
एम-पश्चिम वॉर्डमधील मैत्री-पार्क इमारतीला पालिकेकडून नोटीस देण्यात आली आहे. एम-पश्चिम वॉर्डमध्ये गेल्या काही दिवसात सर्वात जास्त कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे.
- सोसायटीत घरकाम आणि दूध देण्यासाठी कमीतकमी लोक येतील याची नोंद घ्यावी
- थर्मल स्क्रिनिंग करावं
- कोरोना रुग्णांच्या कुटुंबीयांना 14 दिवस क्वॉरेंन्टाईन रहावं
- हाय रिस्क कॉन्टॅक्टची टेस्ट करावी
मुंबई महापालिकेच्या कोव्हिड-19 डॅशबोर्डनुसार, गेल्या सात दिवसात एम-पश्चिम वॉर्डमध्ये कोरोनाग्रस्तांच्या संख्येत 0.26 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
चेंबूर, चुनाभट्टी, नेहरूनगर, टिळकनगर मध्य मुंबईचा भाग
- 9 फेब्रुवारी- 24
- 10 फेब्रुवारी- 31
- 11 फेब्रुवारी- 25
- 12 फेब्रुवारी- 36
- 13 फेब्रुवारी- 29
- 14 फेब्रुवारी- 11
- 15 फेब्रुवारी- 15
पालिका अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, वॉर्डमधील परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचे अधिकार वॉर्ड प्रमुखांना देण्यात आले आहेत.
मुंबईत सील इमारतींची संख्या
सद्य स्थितीत मुंबईत 810 इमारतींना सील करण्यात आलं आहे.
टी वॉर्डमध्ये सर्वात जास्त 180 इमारती, तर एन-वॉर्डमध्ये 139 इमारती सील करण्यात आल्या आहे.
एम-पश्चिम वॉर्डात 35 इमारतींना सील करण्याची कारवाई करण्यात आली आहे
मुंबईत स्थिरावलेली कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढतेय. लोकांनी शिस्त पाळली नाही, तर पुन्हा लॉकडाऊनला सामोरं जावं लागेल असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला आहे.
पुण्यातली स्थिती
पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनीही आज पुणे शहराच्या कोरोना स्थितीचा आढावा घेतला आणि काही सूचना नागरिकांना दिल्या आहेत.
ते म्हणतात, "मागील आठवड्यात असणारा कोरोनाचा 4.6 टक्के इतका पॉझिटिव्हिटी दर आता 12.5 टक्क्यांवर पोहोचला असून उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. या पार्श्वभूमीवर आज तातडीने आढावा बैठक घेत विविध सूचना प्रशासनाला दिल्या आहेत."
ते म्हणाले, "संसर्ग वाढत असलेल्या चार वॉर्ड ऑफिस परिसरात नव्याने स्वॅब कलेक्शन सेंटर सुरु केली जात आहेत. आरोग्य विभागाला पुन्हा अतिरिक्त मनुष्यबळ पुरवले जाणार आहे. सर्व प्रकारचे 1 हजार 163 शासकीय बेड्स सज्ज आहेत. खासगी रुग्णालयांना कोरोनाचे अतिरिक्त बेड्स उपलब्ध करण्याच्या सूचना दिल्या गेल्यात. मास्कसंदर्भातील कारवाईची अंमलबजावणी प्रभावीपणे केली जाणार आहे."
लग्नात 50 पेक्षा जास्त लोक असतील तर होणार कारवाई
मुंबईतील वाढत्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने कडक पावलं उचलण्यास सुरूवात केली आहे.
मुंबई महपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले, ज्या इमारतींमध्ये 2 पेक्षा जास्त रुग्ण आढळून येतील ती इमारत किंवा फ्लोअर सील करण्यात येणार आहे. "लग्न समारंभात 50 नातेवाईकांना परवानगी आहे. त्यापेक्षा जास्त लोक आढळून आले तर, कारवाई केली जाणार आहे. त्याचसोबत हॉटेल आणि पब्जमध्येही पालिकेची टीम तपासणी करणार आहे. कोव्हिड-19 प्रॉटोकॉल पाळले जात नसतील तर कडक करावाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत," असं सुरेश काकाणी पुढे म्हणाले.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)