You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोनाः अकोला जिल्ह्यातही 28 फेब्रुवारीपर्यंत संचारबंदी
- Author, नितेश राऊत
- Role, बीबीसी मराठी
अमरावती जिल्ह्याच्या पाठोपाठ अकोला जिल्ह्यातही कोरोनाचा प्रसार वाढलाय. गेल्या काही दिवसात कोरोना बाधितांची संख्या शतकापर्यंत पोहचली आहे. 13 फेब्रुवारीला 112 कोरोना रुग्ण आढळून आले, तर सोमवारी कोरोना संक्रमितांची संख्या 76 वर पोहचली. खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाने 28 फेब्रुवारीपर्यंत संचारबंदीचे आदेश लागू केले. अकोला जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या 12,481 वर पोहचली आहे. त्यात आतापर्यंत 344 जणांचा मृत्यू झालाय. 11 फेब्रुवारी पासून कोरोना संक्रमितांची संख्या 441 वर पोहचली. त्यामुळं प्रशासनाची चिंता वाढली आहे.
कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी 28 फेब्रुवारी पर्यंत संचारबंदीचे आदेश प्रशासनामार्फत देण्यात आले आहे. संचारबंदीत अकोला जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागांमध्ये पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी, जमावाने एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे.
धार्मिक स्वरुपाच्या यात्रा, उत्सव, समारंभ, महोत्सव, स्नेहसंमेलने, सामूहिक कार्यक्रम, सभा, बैठका यासाठी केवळ 50 लोकांनाच परवानगी असेल. मिरवणूक व रॅली काढण्यासही प्रतिबंध करण्यात आला आहे. याबाबत स्थानिक प्रशासन व पोलीस विभागामार्फत आवश्यक कार्यवाही करण्यात येईल.संचारबंदी दरम्यान नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असं अकोला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार अकोला जिल्ह्यात पुन्हा एकदा कोव्हिडचा प्रसार अत्यंत वेगाने सुरू झालेला आहे. हा प्रकोप असाच जर वाढत राहिला तर सप्टेंबर सारखी परिस्थिती पुन्हा व्हायला वेळ लागणार नाही अशी शंका त्यांनी व्यक्त केली.
जिल्हास्तरावरील सर्वच नियंत्रण अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. त्यात काही निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये जिल्ह्याला संचारबंदीचे आदेश लागू असल्यामुळे पाच लोकांपेक्षा अधिक गर्दी होणार नाही, लोक घराबाहेर पडणार नाही याबाबतची काळजी अकोला जिल्ह्यात सर्वच ठिकाणी द्यावी लागणार आहे. पाचच्या वर नागरिकांनी एकत्र येऊ नये अशी विनंती जिल्हाप्रशासनामार्फत करण्यात आली आहे.
तसेच बाजारपेठ, चहा टपरी आणि हॉटेल्समध्येही सोशल डिस्टंसिंग, मास्क आणि सॅनेटायजरचा वापर प्रभावीपणे करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बाजारपेठेच्या ठिकाणी गर्दी आढळून आल्यास संबंधित दुकानदाराला जबाबदार ठरवून त्यांच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तशा सूचना पोलिस, महसूल, नगरपालिका व महानगरपालिका प्रशासनाला देण्यात आलेले आहेत.
लग्नाला 50 लोकांची अट पुढेही कायम असेल. लग्नसमारंभावर गर्दी होत असेल तर त्यासाठी वेगळं पथक तयार करण्यात आलं आहे. पथकामार्फत 50 पेक्षा अधिक नागरिक आढळून आल्यास दोषींवर दंडनीय कारवाई करण्यात येईल. याशिवाय धार्मिक स्वरूपाच्या यात्रा, उत्सव, स्नेह संमेलन, किंवा सामाजिक कार्यक्रमांना या आदेशाप्रमाणे प्रतिबंध करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळे मंदिर, मस्जिद, चर्च, प्रार्थनास्थळे इत्यादी सर्व संस्थांमध्ये गर्दी होणार नाही. त्या ठिकाणी सोशल डिस्टंसिंग आणि मास्कचा वापर प्रभावीपणे करण्यात येईल याबाबत संबंधित मंदिर आणि मस्जिदच्या प्रशासनाने योग्य ती काळजी घ्यावी, नियमांचे उल्लंघन झाल्यास संस्थांच्या बाबतीत पुन्हा विचार करण्यात येईल अस संचारबंदीच्या आदेशात म्हटले आहे.
यापूर्वी शाळांना सुरू करण्याचे आदेश देण्यात आले होते, त्यात पाचवी ते नववी पर्यंतच्या शाळांना पुन्हा एकदा फेब्रुवारी अखेरपर्यंत बंद राहणार आहेत.
महाविद्यालय आणि महाविद्यालयीन सर्व सीनियर कॉलेज सुरू करण्याच्या बाबतीमध्ये फेब्रुवारी अखेरपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. शाळा सुरू करण्याबाबत फेब्रुवारी अखेर नंतर निर्णय घेतला जाणार आहे. संचारबंदीच्या काळात सर्व नागरिकांनी घरातच सुरक्षित राहा, सोशल डिस्टंसिंग आणि मास्कचा वापर प्रभावीपणे करण्याचे आदेश देण्यात आले आहे. सोबतच गृहविलगिकरन कक्षात असणाऱ्यांनी बाहेर पडू नये अन्यथा बळजबरीने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येईल असेही आदेश प्रशासनामार्फत देण्यात आले आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)