You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना झाल्यावर शरीरात पू तयार होऊ शकतो का?
कोरोनाचा संसर्ग होऊन गेल्यानंतर शरीरामध्ये 'पस' तयार होऊ शकतो? शरीरात 'पू' तयार होण्याचा कोरोनाशी काय संबंध? या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा औरंगाबाद महापालिकेचे आरोग्य अधिकारी प्रयत्न करत आहेत.
याचं कारण, कोव्हिड-19 अँटीबॉडी टेस्ट पॉझिटिव्ह आलेल्या एका महिलेच्या शरीरातील विविध अवयवांमध्ये पू तयार झाल्याचं डॉक्टरांना पहायला मिळालं आहे.
डॉक्टरांच्या माहितीनुसार, या महिलेला कोरोना होऊन गेला होता.
औरंगाबाद महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सद्यस्थितीत शरीरात 'पू' कोरोना संसर्गामुळे तयार झाला असं म्हणता येणार नसल्याची माहिती दिली आहे.
बीबीसी मराठीशी बोलताना औरंगाबाद महापालिकेच्या मुख्य आरोग्य अधिकारी डॉ निता पडाळकर म्हणतात, 'महिलेच्या अंगावर कोरोना संसर्गामुळेच पू तयार झाला असं अजिबात म्हणता येणार नाही. कोरोना संसर्गामुळे शरीरात पू झाल्याचा ठोस शास्त्रीय पुरावा अजून समोर आलेला नाही.'
पण या प्रकरणाची तज्ज्ञांमार्फत चौकशी करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
काय आहे हे प्रकरण?
काही दिवसांपूर्वी 40 वर्षांची ही महिला पाठदुखीचा त्रास होत असल्याची तक्रार घेऊन औरंगाबादच्या हेडगेवार रुग्णालयात दाखल झाली.
डॉक्टरांनी तपासणी सुरू केली. महिलेच्या मणक्यात आणि विविध अवयवात पू तयार झाल्याचं तपासणीत दिसून आलं. शरीरातील विविध अवयवात पू तयार होण्याचं कारण शोधण्यासाठी डॉक्टरांनी एचआयव्ही, टीबीसारख्या टेस्ट केल्या. पण त्यात काहीच आढळून आलं नाही.
"शरीरातील विविध अवयवात पू कशामुळे झाला. याचं ठोस कारण कळून येत नव्हतं. अधिक तपासणीसाठी कोरोनाची अँटीबॉडी टेस्ट केली. ही टेस्ट पॉझिटिव्ह आली," असं एका डॉक्टरांनी नाव न घेण्याच्या अटीवर सांगतात.
ते पुढे म्हणतात, 'पण याचा अर्थ कोरोना संसर्गामुळे या महिलेच्या शरीरात पू झाला असं म्हणता येणार नाही.'
डॉक्टरांच्या माहितीनुसार, अशा प्रकारचे सात घटना जगभरात आढळून आल्या आहेत.
औरंगाबाद महापालिका करणार चौकशी?
हेडगेवार रुग्णालयातील या घटनेची औरंगाबाद महापालिकेने सखोल चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे.
"ही घटना निव्वळ योगायोग असण्याची शक्यता आहे. पण महापालिकेने या प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका तज्ज्ञांची एक समिती गठीत करणार आहे. ही टीम डॉक्टरांशी चर्चा करून सखोल चौकशी करेल," अशी माहिती बीबीसी मराठीशी बोलताना औरंगाबाद महापालिकेच्या मुख्य आरोग्य अधिकारी डॉ निता पडाळकर यांनी दिली.
डॉ पडाळकर पुढे म्हणाल्या, "महापालिका अधिकारी या महिलेच्या कुटुंबीयांचे नमुने घेतील. त्यानंतर या घटनेचा तपास केला जाईल. अंगावर विविध अवयवांत तयार झालेला पू कोरोना संसर्गमुळे झालाय का? याची चौकशी करण्यात येईल."
औरंगाबाद प्रकरणावर बीबीसीशी बोलताना राज्याच्या आरोग्य विभागातील साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे म्हणाले, 'औरंगाबादमधील महिलेच्या शरीरात कोरोना संसर्गामुळेच पू तयार झाला असं 100 टक्के खात्रीने म्हणता येणार नाही. याची संपूर्ण खातरजमा करावी लागेल.''जर्मनी आणि अमेरिकेत असे काही रुग्ण आढळून आले आहेत. मात्र, या रुग्णांची संख्या अत्यंत कमी आहे.' असं डॉ. आवटे पुढे म्हणाले. कोरोना रुग्णांना इतर आजारांचा संसर्ग होऊ शकतो का? यावर बोलताना डॉ. आवटे सांगतात, 'लठ्ठपणा, कॅन्सर किंवा आजारपणात इतरही जंतू शरीरावर आघात करू शकतात. या जंतूमुळे विविध प्रकारचा संसर्ग (Infection) होऊ शकतं. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा संबंध कोरोनाशी जोडणं योग्य ठरणार नाही.'
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)