You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
आयपीएल की रणजी, क्रिकेट चाहत्यांना काय अधिक प्रिय?
- Author, पराग फाटक
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
इंडियन प्रीमिअर लीग आणि रणजी करंडक. भारतीय क्रिकेटची दोन रुपं.
बीकेसी अर्थात बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स हा प्रामुख्याने ऑफिस एरिया. बांद्रा आणि कुर्ला या शहरांच्या गुणवैशिष्ट्यापासून अगदीच फारकत घेऊन वसलेला पॉश एरिया. चकाचक काचेच्या उंचच उंच बिल्डिंग, खड्डेविरहित टापटीप रस्ते, या रस्त्यांवरून सुळसुळत जाणाऱ्या एसयुव्ही, कॉर्पोरेट वळणाचे लुक आणि भाषा बोलणारी देशांग्ल मंडळी.
काही वर्षांपूर्वी याच भागात रणजी करंडक स्पर्धेची मॅच पाहायला जाण्याचा योग जुळून आला. बस स्टॉपवर उतरल्यावर रणजी मॅच चाललेय ते स्टेडियम कुठे आहे हे विचारताच कुठला गावंढळ माणूस आलाय असा भाव नजरी पडू लागला. ये ऑफिस एरिया है, यहाँ ग्राऊंड कहाँ असंही एकाने सांगितलं.
रणजी मॅच- व्हॉट, सॉरी असं टिपिकल आंग्ल उत्तर मिळालं. नजरा, कटाक्ष, फेऱ्या, वळसे असं सगळं होऊन अस्मादिक मैदानसदृश परिसरात पोहोचले. आलिशान पॅलेससारखी वास्तू दिमाखात उभी होती. इथून एंट्री नाही असं सांगण्यात आलं.
वर्तुळाकार फेरा मारून दुसऱ्या गेटपाशी आलो तोपर्यंत उन्हाचा मारा होऊन शर्ट ओलाचिंब झाला होता. आजूबाजूला पाणी, वडापाव, चहा मिळेल असं काहीच नव्हतं. या गेटवरही प्रश्न विचारण्यात आले, पण एंट्री मिळाली. प्रवेश मिळाल्याच्या आनंदात भराभरा चालू लागलो आणि थबकलो.
महानगरांच्या पोटात काय सुरू असतं खरंच कळत नाही. अहोरात्र धावणाऱ्या मुंबईच्या या कप्प्यात एक रणजी मॅच अगदी सुशेगात सुरू होती. आजूबाजूच्या स्कायस्क्रॅपर्सच्या पंक्तीत, भर उन्हात हिरव्यागार कॅनव्हासवर बॅट किंवा बॉलने फटकारे ओढण्याची मैफल सुरू होती.
लोभसवाणी वाटावी अशी हिरवळ, हिरवळ संपत होती तिथे मुंबईचं वेगळंपण दर्शवणारी लाल माती, निळंशार आकाश आणि कल्लोळनगरीत असूनही श्वास ऐकू येईल अशी शांतता. रणजी मॅच म्हणजे भारताचं प्रारूप आहे. देशी आणि आब राखून जगणारं.
याच मुंबईत आयपीएलची मॅच असली की सांगावं लागत नाही. मरीन ड्राईव्ह परिसरात निळ्या जर्सींची गर्दी दिसू लागते. जागोजागी होर्डिंग दिसू लागतात. ज्या दिवशी मॅच असते त्यादिवशी सीएसटी आणि चर्चगेट स्टेशनातून निळी जर्सीवाल्यांचे तांडे वानखेडेच्या दिशेने जाताना दिसतात. चणे फुटाणेवाले, वडापाववाले, बूट पॉलिशवाले, फुगेवाले, पिपाण्या विकणारे- प्रत्येकाचं आयपीएल जोरात असतं.
मुंबई नेमकी कशी आहे हे त्यादिवशी समजू शकतं. गर्भश्रीमंत, अतिश्रीमंत, नवश्रीमंत, अप्पर मध्यमवर्गीय, मध्यमवर्गीय, कनिष्ठ मध्यमवर्गीय अशा अठरापगड स्तरातली, वर्गाची, जाती-धर्माची, पंथाची-वंशाची माणसं जत्थ्याने दिसू लागतात.
मुंबई किती बहुपेडी आहे हे उमगून येतं. हूज हू ना टिपण्यासाठी पेज थ्री फोटोग्राफर्सची झुंबड उडते. बॉलीवूड अवतरतं. कोणाला क्रिकेट पाहायचं असतं, कोणाला मैदानात जाऊन सेल्फी काढायचा असतो, कोणाला प्लेयर्सचा ऑटोग्राफ घ्यायचा असतो. कोणाचं काय तर कोणाचं काय!
आत मैदानात तर फुल्ल माहौल असतो. मुंबई इंडियन्स या संघात मूळ मुंबईकर असे प्लेयर्स जेमतेमच पण त्याने फरक पडत नाही. मुंबई इंडियन्सच्या प्लेयर्सने सिक्स मारला किंवा विकेट घेतली की पिपाण्या, गाणी, आरोळ्या, डीजे टिपेला पोहोचतं. मैदानाच्या एका बाजूमागे खडखडणाऱ्या ट्रेनमधून चाकरमानी घरी परतत असतात.
आकाशाशी स्पर्धा करणारे लाईट टॉवर, काही मिनिटांवर असलेल्या दर्याची ऐकू येणारी गाज, दक्षिण मुंबई आपल्याला हरखून सोडते. आयपीएल- तीन तासांचा जलसा. वेगवान. क्रिकेटचं हे इंडियावालं प्रारूप. इथे आवाज आहे, झगमग आहे, इथे स्वप्नं झटपट प्रत्यक्षात साकारू शकतात. इथेही संघर्ष आहे पण इथे प्रसिद्धीही आहे.
रणजीत वर्षानुवर्षे खेळून, हजारो रन काढणारा खेळाडू लो प्रोफाईल राहू शकतो. तो सहजी तुमच्याआमचासारखा वावरू शकतो. आयपीएल तुम्हाला घराघरात नेतं, तुमच्या नावाचा ब्रॅंड तयार करतं. डिसेंबर ते मार्च या काळात देशभरात रणजी स्पर्धा होते. आयपीएल एप्रिल-मे असं होतं. रणजी देशातली सगळ्यात प्रतिष्ठेची स्पर्धा. आयपीएल, पैसा-प्रसिद्धी आणि संधीच्या बाबत फास्ट ट्रॅकवाली स्पर्धा. रणजी ओल्ड स्कूल तर आयपीएल स्कूल नव्हे कॅलिडोस्कोपी कॉलेजच.
रणजी म्हणजे छोटी शहरं, रिकामी स्टेडियम्स, तळपणारं ऊन. रणजी म्हणजे पक्ष्यांनी नक्षीकाम केलेल्या सीट्स आणि स्वच्छतेच्या प्रतीक्षेतली स्वच्छतागृह. डीजे नाही, चीअरलीडर्स नाहीत, टिपायला कॅमेरे नाहीत. पॉपकॉर्न नाहीत, कोल्ड्रिंक नाही. सर्वोत्तम खेळावं आणि विरून जावं असं वातावरण.
आयपीएल क्रिकेटेन्मेंट म्हणजे क्रिकेट+एंटरटेनमेंटचं पॅकेज रुपात सादर झालं. दिवसभर काम करा. संध्याकाळी घरी जा. रात्री जेवता जेवता चौकार-षटकारांची बरसात अनुभवा. निकाल पाहून झोपी जा. बरं नाव गाव फळ फूल लक्षात ठेवण्याची गरज नाही. टीम कुठली का असेना, चित्ताकर्षक आविष्काराची हमी पक्की.
खेळ सपक झाला तर वादविवाद आहेतच. रणजी म्हणजे पाच दिवस सकाळी साडेनऊ ते संध्याकाळी पावणेपाच मॅच बघा. पाच दिवस टीव्हीला चिकटूनही निकाल हाती लागेलच याची खात्री नाही. बरं रणजी टीव्हीवर किंवा स्टेडिमयवर जाऊन बघण्याला काहीच ग्लॅमर नाही. आयपीएल बघण्यालाही स्वॅग आहे. आयपीएलने हॅशटॅगी क्राऊडसाठी दणकट प्लॅटफॉर्म सादर केला.
रणजी ही फर्स्ट क्लास क्रिकेटमधली सर्वोच्च स्पर्धा. प्री-आयपीएल काळात टीम इंडियाची दारं किलकिलं करण्यासाठी रणजी स्पर्धेत कर्तृत्व सिद्ध करावं लागत असे. आयपीएल, टीम इंडियात एंट्रीसाठी 21 अपेक्षित ठरू लागलं. रणजी म्हणजे आपलीच भाषा बोलणारी भवतालातली माणसं.
आयपीएलने प्लेयर्सचा स्पेक्ट्रम ग्लोबल केला. ज्या आयडॉल्सना टीव्हीवर पाहायचं त्यांच्याबरोबर खेळण्याची, वावरण्याची संधी आयपीएलने दिली. यातूनच सिद्धार्थ त्रिवेदी, दिशांत याग्निक, स्वप्नील असनोडकर फिरकीचा जादूगार शेन वॉर्नच्या नेतृत्वात खेळू लागले.
पैसा खेळू लागला, लोकप्रियता मिळू लागली. पण आयपीएलने स्वत:ला सिद्ध करण्याचा वेळ कमी केला. पाच दिवसांवरून तीन तास आणि त्या तीन तासातही अवघी काही मिनिटं, एका हाताच्या मोजता येतील एवढेच बॉल्स. बॉलरला बॉलिंग मशीनच्या खाच्यात नेणाऱ्या आयपीएलने परफॉर्म अँड पेरिशचा मंत्र जागवला. एका हंगामाचे चमत्कार घडू लागले. पाहणाऱ्यांना त्या विशिष्ट दिवशी कोणी मजा आणली यापल्याड रस नसतो. रणजी म्हणजे टेस्ट संघात निवड होण्यासाठीची परीक्षा आणि आयपीएल म्हणजे वनडे आणि ट्वेन्टी-20 संघात जाण्याचं मार्ग अशा दोन समांतर वाटा रेखाटल्या गेल्या.
पैसा दोन्हीकडे मिळतो पण आयपीएलच्या बाबतीत पुढची शून्यं तुमच्या परफॉर्मन्सनुसार वाढत जाऊ शकतात. आयपीएल कॉन्सर्ट आहे, रणजी मैफल आहे. रणजी म्हणजे संयम, आयपीएल म्हणजे वेग असं समीकरण झालं. शैली अनुभवायची असेल तर रणजी आणि ताकदीचा प्रत्यय घ्यायचा असेल तर आयपीएल. शुक्रवारी सौराष्ट्रने पहिल्यांदा रणजी जेतेपदावर नाव कोरलं.
बंगालला नमवत त्यांनी ही किमया साधली. परंतु दोन्ही संघ समोर उभे केले तर प्लेयर ओळखा म्हटलं तर अवघड होऊन जाईल. पण आयपीएलचं खेळाडूचं नाव चटकन सांगू शकता. यशाचे मार्ग निरनिराळे. रणजी स्पर्धेत धावांच्या टांकसाळी रचून टीम इंडियात स्थान मिळवणारे आहेत आणि ग्लोबल ते लोकलचं उदाहरण असलेल्या आयपीएलमध्ये चांगलं खेळून टीम इंडियाची कॅप मिळवणारेही आहेत. अनेक वर्ष रणजीत चांगलं खेळूनही प्रसिद्धीझोतात न येणारे आहेत. आयपीएलच्या एका हंगामाचा चमत्कार होऊन गायब होणारे आहेत.
डोमेस्टिक कॅलेंडरचा या दोन स्पर्धा अविभाज्य भाग आहेत. एकामागोमाग एक होतात पण दोन्हींचं जग सर्वस्वी वेगळं. सव्वा तीन महिने रणजी हंगाम चालतो. आयपीएल दीड-दोन महिन्यात आटोपते. दोन्ही स्पर्धांचे चाहतेही आहेत आणि टीकाकारही. गर्दी टाळायची असल्याने यंदाचं आयपीएल रणजीसारखं वाटू शकतं. रंगीत कपड्यातलं, विनाप्रेक्षकांचं आयपीएल तुम्हाला रणजीचा फील देऊ शकतं. काळ हा सगळ्यावरचा जालीम उतारा आहे असं म्हणतात. कोरोनाचा काळ क्रिकेटच्या कॉन्सर्टला मैफलीची रागदरबारी शिकवू शकतो.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)