कोरोना व्हायरस : तरुणांनो, कोरोनापासून सावध व्हा! वृद्धांइतकाच तुम्हालाही कोरोनाचा धोका

    • Author, मयांक भागवत
    • Role, बीबीसी मराठीसाठी

सामान्यत: आपला सर्वांचा असा समज आहे की, कोरोना व्हायरसचा संसर्ग वयस्कर नागरिकांना अधिक होतो. वयोमानानुसार ज्येष्ठ नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेली असते. त्यातच मधुमेह, उच्च-रक्तदाब आणि किडनी विकारासारख्या आजारांनी ग्रस्त असल्यामुळे कोरोना व्हायरसचा संसर्ग या नागरिकांसाठी जीवघेणा ठरतो.

तरुणांची रोगप्रतिकारक शक्ती ज्येष्ठ नागरिकांच्या तुलनेत चांगली असते. त्यामुळे तरुणांना कोरोनापासून जास्त धोका नाही, असा अनेकांचा समज झालेला असू शकतो. मात्र, वस्तुस्थिती यापेक्षा उलट आहे. राज्यात ज्येष्ठ नागरिकांच्या तुलनेत तरुणांमध्ये कोरोनाचा संसर्ग होण्याचं प्रमाण जास्त आहे. या बातमीतली आकडेवारी ही जुलै महिन्यातली आहे.

इतकंच नव्हे तर युरोपात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असून यावेळी तरुणांना अधिक बाधा होऊ शकते असा इशारा नुकताच जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने दिला आहे.

कोव्हिड रुग्णांची वयोगटानुसार आकडेवारी

(स्त्रोत - वैद्यकीय शिक्षण विभाग)

या आकडेवारीवरून एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे तरुण पिढीला कोरोनाचा असलेला धोका कमी लेखून चालणार नाही. तज्ज्ञांच्या मते कामासाठी बाहेर पडणाऱ्या तरुणांनी खास काळजी घेतली पाहिजे.

मधुमेह, उच्च-रक्तदाब, किडनीचे विकार, हृदयरोग यांसारखे आजार कोरोनाबाधितांच्या मृत्यूचं प्रमुख कारण म्हणून पुढे आले आहेत. मात्र, फक्त वयस्कर नागरिकांचे मृत्यू झाले का? तर, नाही. कोव्हिड-19 संसर्गाला तरुणही बळी पडले.

तरूणांच्या मृत्यूचं कारण

मुंबई-ठाणे आणि आसपासच्या परिसरातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा अभ्यास केल्यानंतर तरुणांच्या मृत्यूमागे असलेली काही कारणं समोर आली. मुंबई परिसरातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा अभ्यास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीने राज्य सरकारला सादर केलेल्या रिपोर्टमध्ये याबाबत माहिती दिली आहे.

यासंदर्भात बीबीसीशी बोलताना मुंबईच्या डेथ ऑडिट कमिटीचे अध्यक्ष डॉ. अविनाश सुपे म्हणाले, "निदान न झालेला मधुमेह, उच्च-रक्तदाब, लठ्ठपणा अशा कारणांमुळे कोरोनाबाधित तरुणांचे मृत्यू झाल्याचं समोर आलंय. आतापर्यंत मुंबई आणि आसपासच्या परिसरात झालेल्या 545 मृत्यूंचा अभ्यास करण्यात आलाय. मात्र, यावर सखोल अभ्यास होणं अजून बाकी आहे. हे सर्व जीवनशैली निगडीत आजार आहेत. यासाठी तरूण पिढीने आपल्या जीवनशैलीवर लक्ष दिलं पाहिजे."

मुंबईतील कोव्हिड-19 मृत्यूची आकडेवारी

(सोर्स- बीएमसी)(6 जुलैपर्यंत)

तरुणांमध्ये मधुमेह, उच्च-रक्तदाब यांसारख्या आजारांचं निदान का होत नाही, याबाबत बोलताना इंडियन मेडिकल असोसिएशनचे सदस्य डॉ. शिवकुमार उत्तुरेंनी सांगितलं, "मधुमेह आणि उच्च-रक्तदाब हे सायलेंट किलर्स आहेत. याची लक्षणं लवकर समजून येत नाहीत. लोकांना आपल्याला मधुमेह, उच्च-रक्तदाब आहे हे माहिती नसते. साधारणत: तरुण असताना आपण जास्त तपासणी करत नाही. त्यामुळे तरूणांमध्ये मधुमेह, उच्च-रक्तदाब यांसारखे आजार "Undiagnosed" म्हणजे निदान न करताच राहून जातात."

मुंबई डेथ ऑडिट रिपोर्ट

राज्यातील मृत्यू

महाराष्ट्रात 9 हजारपेक्षा जास्त कोरोनाबाधितांचा मृत्यू झालाय. तर, मुंबई-ठाणे परिसरात 6265 कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली.

सरकारी आकडेवारीनुसार,

(सोर्स- वैद्यकीय शिक्षण विभाग) (*आत्तापर्यंत उपलब्ध असलेली मृतांची माहिती))

कोव्हिड-19 आणि लठ्ठपणा

आपल्याला माहितीये लठ्ठपणा हा जीवनशैलीशी निगडीत आजार आहे. लठ्ठपणाला 'मदर ऑफ ऑल डिसिजेस' असंही म्हणतात. कारण, लठ्ठपणामुळे मधुमेह, उच्च-रक्तदाब आणि हृदयरोग यांसारखे आजार होतात. पण, कोरोना आणि लठ्ठपणाचा संबंध काय? हे जाणून घेण्यासाठी आम्ही मुंबईतील बॅरिअॅट्रीक सर्जन डॉ. संजय बोरूडे यांच्याशी चर्चा केली.

डॉ. बोरूडे म्हणतात, "लठ्ठपणा अनेक आजारांचं मूळ आहे. लठ्ठ व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. सामान्यांच्या तुलनेत श्वसनक्रिया मंदावलेली असते. शरीराला ऑक्सिजन योग्य प्रमाणात मिळत नाही. त्यात कोरोनामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी होते. वजनामुळे अवयव योग्य पद्धतीने कार्य करत नाहीत. त्यामुळे कोरोनाबाधित लठ्ठ व्यक्तीवर उपचार खूप कठीण होतात."

गेल्या महिन्याभरात डॉ. बोरूडेंकडे लठ्ठपणाने ग्रस्त 15 रुग्णांनी वजन कमी करण्यासाठी शस्त्रक्रियेसाठी विचारणा केली आहे. यातील एका 26 वर्षीय मुलाचं वजन तब्बल 178 किलो, तर 25 वर्षाच्या मुलीचं वजन 170 किलो आहे.

"लठ्ठपणा आणि कोव्हिड-19 हे कॉम्बिनेशन जीवघेणं आहे. लोकांमध्ये भीती आहे. महिनाभरात 15 रुग्णांनी लठ्ठपणा कमी करण्यासाठी शस्त्रक्रियेबाबत विचारणा केलीये. हे सर्व 20 ते 35 या वयोगटातील आहेत. त्यांचं वजन 110 ते 180 किलोच्या दरम्यान आहे. तर, बॉडी मास इंडेक्स 45 ते 65 च्या रेंजमध्ये आहेत. यातील काहींवर येत्या आठवड्यात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे," असं डॉ. बोरूडे म्हणाले.

भारतातील लठ्ठपणाची सद्यस्थिती

इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये छापण्यात आलेल्या संशोधनाच्या माहितीनुसार, देशात 135 दशलक्ष लोक अॅबडोमिनल ओबेसिटीने ग्रस्त आहेत. कंबाइन्ड ओबेसिटीचे 153 दशलक्ष तर, जनरलाइज्ड ओबेसिटीचे 107 दशलक्ष रुग्ण आहेत.

फक्त मुंबई, महाराष्ट्रातच नाही तर न्यू-यॉर्कमध्येही लठ्ठपणा हा कोरोनो इंन्फेक्शनमध्ये मोठा रिस्क फॅक्टर असल्याचं डॉक्टरांना आढळून आलं आहे.

मधुमेह आणि कोव्हिड-19

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत मधुमेह नसलेल्या कोव्हिड-19 पॉझिटिव्ह रुग्णांच्या शरीरात सारखेचं प्रमाण अचानक वाढल्याच्या केसेस येत आहेत. मुंबईतील केईएम रुग्णालयातही अशी प्रकरणं आढळून आली. त्यामुळे केईएमच्या डॉक्टरांनी याचा अभ्यास केला.

याबाबत बोलताना केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख सांगतात, "गेल्या काही दिवसात 25 ते 55 वयोगटातील रुग्णांच्या अचानक संख्येत वाढ झालीये. नॉन-डायबेटिक असलेल्या या कोरोनाग्रस्त रुग्णांच्या शरीरात अचानक सारखेचं प्रमाण वाढल्याचं पहायला मिळत आहे. रुग्णालयात येतानाच त्यांची शुगर वाढल्याचं दिसून येत आहे. अचानक शुगर वाढण्याचं कारण काय याचा आम्ही अभ्यास केला. "

"कोरोना व्हायरस इंन्फेक्शनचा पॅनक्रियाजवर परिणाम होतो. त्यामुळे शरीरात इन्शुलिन निर्माण होण्याचं प्रमाण कमी होतं. शरीरात योग्य प्रमाणात इन्शुलिन नसल्यामुळे सारखेचं प्रमाण अचानक वाढतं. आमच्याकडे आलेल्या काही रुग्णांच्या शरीरात सारखेचं प्रमाण 400-500 पर्यंत पोहोचलं होतं," असं डॉ. देशमुख पुढे म्हणाले.

थायरॉइड आणि कोव्हिड-19

शरीराची प्रत्येक क्रिया आणि अवयवाला काम करण्यासाठी थायरॉइड हॉर्मोनची गरज असते. शरीरातील थायरॉइडचं प्रमाण कमी किंवा जास्त झालं तर याचा परिणाम अवयवांवर होतो. थायरॉइड ग्रंथी काम करत नसेल तर लोकांची चया-पचय क्रिया (Metabolism) मंदावते.

हायपो-थायरॉइडिजम - थायरॉइडच शरीरातील प्रमाण कमी होणं

हायपर-थायरॉइडिजम- सशरीरात जास्त प्रमाणात थायरॉइड हॉर्मोन असणं

महाराष्ट्र मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे म्हणतात, "ज्या व्यक्तीच्या शरीरात कमी प्रमाणात थायरॉइड हॉर्मोन असतात, अशांना कोरोनाची लागण झाली तर शरीराला व्हायरसशी लढण्यासाठी योग्य सपोर्ट मिळत नाही. अशा व्यक्तींमध्ये तीव्र लक्षणं दिसून येतात. शरीरातील प्रत्येक क्रियेसाठी (System) थायरॉइडची गरज असते. शरीरात योग्य प्रमाणात थायरॉइड नसल्याने सर्व अवयवांवर याचा परिणाम होतो."

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, शरीरात अचानक जास्त प्रमाणात थायरॉइड निर्माण झाल्यास शरीरातील सर्व क्रियांचा वेग प्रचंड वाढतो. अवयव या प्रचंड वेगाला सहन करू शकत नाही आणि त्यात कोरोनाची लागण झाली असेल तर, फुफ्फुसांना इजा होण्याची शक्यता असते. थायरॉइड ग्रंथी योग्य काम करत नसेल तर चयापचय क्रिया मंदावते.

मधुमेह, उच्च-रक्तदाब हे जीवनशैली निगडीत आजार आहेत. कोरोनामुळे गेले तीन महिने देशात लॉकडाऊन आहे. घरी असल्याने लोकांचा व्यायाम बंद झालाय. त्यात कामाचा स्ट्रेस आणि इतर कारणांमुळे शरीराचं संतुलन बिघडत आहे. त्यामुळे तरूण पिढीने आपल्या शरीराकडे लक्ष द्यावं. कोरोनाची लागण आपल्याला होणार नाही या भ्रमात न राहता काळजी घ्यावी असं आवाहन डॉक्टर करतायत.

शिवाय, अॅनल्स ऑफ इंटर्नल मेडिसिनमध्ये छापण्यात आलेल्या संशोधनानुसार, न्यू-यॉर्कमध्ये रुग्णालयात दाखल 1687 लोकांचा अभ्यास करण्यात आला. ज्यात कोरोनाग्रस्तांमध्ये फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी होण्यासाठी (Respiratory Failure) लठ्ठपणा कारणीभूत असल्याचं आढळून आलं. लठ्ठपणाने ग्रस्त 40 टक्के व्यक्तींना व्हॅन्टिलेटर सपोर्टची गरज लागली. त्यामुळे कोरोनाबाबत उपाययोजना करताना लठ्ठपणाबाबतही लक्ष दिलं पाहिजे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)