You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शरद पवार यांचं चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर : 'मातोश्री'वर जाण्यात मला कमीपणा नाही #5मोठ्याबातम्या
आज सकाळी विविध वर्तमानपत्रं तसंच वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा:
1. 'मातोश्री'वर जाण्यात मला कमीपणा नाही- शरद पवारांचं चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर
मातोश्री'वर जाण्यात मला कोणताही कमीपणा वाटत नाही, असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे.
"शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर जाणं बरोबर नाही. या वयात खरंतर मुख्यमंत्र्यांनी पवारांना भेटायला जायला हवं," असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. त्यांच्या याच वक्तव्याला शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलं. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिलीये.
शरद पवार यांची मंगळवारी (8 जुलै) पुण्यात व्यापारी महासंघाच्या प्रतिनिधींसोबत बैठक झाली. या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत पवार यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना मनमोकळेपणाने उत्तरे दिली.
चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याबद्दल विचारले असता शरद पवार यांनी म्हटलं, की चंद्रकांत पाटलांना काही वाटत असेल तर त्यावर मला काही बोलायचे नाही. ज्या मुलाखतीची चर्चा आहे ती मुलाखत देण्यासाठी मी त्याच भागात गेले होतो. तिथून फर्लांगभर अंतरावर मातोश्री निवासस्थान होतं. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी 14 किलोमीटर लांब माझ्या घरी येण्यापेक्षा मीच त्याच्याकडे गेलो. त्यात मला कमीपणा वगैरे काही वाटत नाही.
- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?
'महाविकास आघाडी सरकारमध्ये अस्वस्थता, नाराजी वगैरे काहीही नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चांगलं काम करताहेत. तिन्ही पक्षांमध्ये उत्तम समन्वय आहे', असंही शरद पवार यांनी नमूद केलं.
2. मुंबईत आता प्रिस्क्रिप्शनशिवायही होणार कोरोनाची चाचणी
बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील खासगी प्रयोगशाळांना डॉक्टरांच्या लिखीत सल्ल्याशिवाय म्हणजे प्रिस्क्रीप्शन' शिवाय कोरोना चाचणी करता येणार आहे. मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी याबाबतचा निर्णय घेतला. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिली आहे.
या निर्णयामुळे आता मुंबईतील निर्धारित खासगी वैद्यकीय प्रयोगशाळांमध्ये थेटपणे संपर्क साधून कोव्हिड चाचणी करता येणार आहे. ही चाचणी करण्यासाठी शासनाने निर्धारित केलेले दर लागू असतील, अशी माहिती महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे देण्यात आली आहे.
ही चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर महापालिकेच्या विभागस्तरीय 'वॉर रुम'द्वारे बेड अलॉटमेंट करण्यात येणार आहे. त्यामुळे रुग्णावर पूर्वीच्या तुलनेत अधिक लवकर वैद्यकीय औषधोपचार करणे शक्य होईल.
मुंबई महापालिका क्षेत्रात 17 खासगी प्रयोगशाळांना कोरोना चाचणीसाठी परवानगी देण्यात आली आहे.
3. विद्यार्थ्यांचं नुकसान टाळण्यासाठी 30 टक्के अभ्यासक्रम कमी करण्याचा CBSE चा निर्णय
कोरोना व्हायरसचा वाढता संसर्ग लक्षात घेता विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी सीबीएसई बोर्डने 30 टक्के अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. एबीपी माझानं ही बातमी दिलीये.
लॉकडाऊनमुळे शाळा, कॉलेज बंद आहेत. यामुळे विद्यार्थ्यांवर अभ्यासक्रमाचा भार येऊ नये यासाठी सीबीएसई इयत्ता 9वी ते 12वी चा अभ्यासक्रम 2020-21 शैक्षणिक वर्षासाठी 30 टक्के कमी करणार असून महत्त्वाच्या विषयांच्या संकल्पना अभ्यासक्रमात राहणार आहेत.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी ही माहिती दिली आहे. नॅशनल काऊन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंगने (NCERT) सीबीएसई बोर्डला सुधारित अभ्यासक्रम तयार करण्यास मदत केली आहे.
4. जर घुसखोरी झालीच नव्हती, तर चिनी सैन्याची माघार कशी?
चीनने डी अॅक्सलेशन सुरू केलं आहे याचा अर्थ काय? जर कोणी आपल्या देशामध्ये घुसखोरी केलीच नव्हती तर ते माघार कसे घेत आहेत? असे प्रश्न खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी उपस्थित केले आहेत. लोकसत्तानं ही बातमी प्रसिद्ध केलीये.
लडाखमधून चिनी सैन्याने माघार घेतल्याचे वृत्त समोर आल्यानंतर ओवेसी यांनी ट्वीट करून काही प्रश्न विचारले.
एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सोमवारी (6 जुलै) राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यासोबत फोनवर चर्चा केली. दोन्ही देशांमधील तणावपूर्ण परिस्थिती परस्पर सहकार्याने निवळण्यासाठी दोन्ही देशातील जवानांना प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून माघारी घेण्यात येण्यासंदर्भात चर्चा झाली.
भारत आणि चीन सीमेवर दोन्ही देशांमध्ये डी अॅक्सलेशन प्रक्रियेद्वारे शांतता प्रस्थापित करण्यासंदर्भात या अधिकाऱ्यांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. यासंदर्भातील अधिकृत पत्रकही नंतर प्रसिद्ध करण्यात आलं
5. धारावीमध्ये मंगळवारी आढळला कोरोनाचा केवळ एकच रुग्ण
मुंबईमध्ये मागील दोन महिन्यानंतर मंगळवारी (8 जुलै) पहिल्यांदाच सर्वांत कमी 806 कोरोनाबाधित आढळले आहेत. विशेष म्हणजे कोरोना हॉटस्पॉट असलेल्या धारावीत मंगळवारी केवळ एकच रुग्ण आढळला आहे. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.
मुंबईत आता कोरोना रुग्णांची एकूण संख्या 86,132 झाली आहे, तर एकूण मृतांचा आकडा हा पाच हजारांवर पोहोचला आहे. मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) सांगितलं की, मंगळवारी कोरोनाबाधित 806 नवीन रुग्ण आढळल्यानंतर एकूण संख्या 86,132 झाली आहे.
मुंबईत पहिला कोरोना रुग्ण 11 मार्च रोजी आढळला होता, तर 17 मार्च रोजी पहिला मृत्यू झाला होता. बीएमसीकडून सांगण्यात आलं आहे की, 985 रुग्णांना मंगळवारी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिला आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)