डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृहावर अज्ञातांकडून हल्ला, प्रकाश आंबेडकर यांचे शांततेचे आवाहन

मुंबईच्या दादरमधील 'राजगृह' या डॉ. आंबेडकरांच्या निवासस्थानावर काही अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्वीट करून या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

"हल्ला निषेधार्थ आहे. याबाबत पोलिसांचा तत्परतेने तपास सुरू असून दोषींविरुद्ध कठोर कार्यवाही केली जाईल," अशी माहिती त्यांनी ट्विटरवर दिली आहे.

या हल्ल्याचं वृत्त येताच प्रकाश आंबेडकर यांनी सर्व जनतेला शांततेचं आवाहन केलं आहे. तसंच कुणीही राजगृहाच्या परिसरात जमू नये असंही त्यांनी म्हटलं आहे.

वेगवेगळ्या राजकीय नेत्यांनी ट्वीट करून या हल्ल्याचा निषेध केला आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी घटनेच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणी लक्ष घालून या माथेफिरूना अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे.

नेमकं काय घडलं?

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं मुंबईच्या दादरमधील निवासस्थान - राजगृहमध्ये शिरत मंगळवारी दोन अज्ञातांनी तोडफोड केली. मंगळवारी (7 जुलै) संध्याकाळी हा प्रकार घडलाय.

यामध्ये घराच्या परिसरातले सीसीटीव्ही कॅमेरे, कुंड्या आणि खिडक्यांचं नुकसान झालंय.

दादर पूर्व भागात असणारं 'राजगृह' हे निवासस्थान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी खास त्यांच्या पुस्तकांसाठी बांधलं होतं.

आता या इमारतीत तळमजल्यावर बाबासाहेबांच्या घराच्या खोल्यांमध्ये त्यांनी वापरलेल्या वस्तूंचं संग्रहालय करण्यात आलेलं आहे.

यामध्ये त्यांच्या वापरातल्या विविध वस्तू - भांडी, चालताना वापरण्याच्या विविध छड्या, त्यांचा चष्मा आणि त्यांनी तयार केलेल्या संविधानाची प्रत आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)