हायमनोप्लास्टी: कौमार्य चाचणीबरोबरच हायमन रिपेअर शस्त्रक्रियेवरही युकेमध्ये बंदी

    • Author, राजदीप संधू
    • Role, बीबीसी

संपूर्ण युकेमध्ये हायमनोप्लास्टी नावाच्या कॉस्मेटिक शस्त्रक्रियेवर बंदी घालण्याचा विचार त्याठिकाणचं सरकार करत आहे.

यामुळं स्त्रीमध्ये हायमन (योनी समोर असलेला पातळ पडदा) पुन्हा तयार करण्याचा प्रयत्न केला जातो. काही समुदाय आणि संस्कृतींमध्ये याचा संबंध कौमार्य चाचणीशी जोडला जातो. एखाद्याच्या सन्मानाशी आधारित गैरवर्तनाचा प्रकार म्हणूनही याकडं पाहिलं जात आहे.

त्यामुळं ही शस्त्रक्रिया कौमार्य चाचणीप्रमाणेच गुन्हा ठरणार आहे.

"या देशातील असुरक्षित महिला आणि मुलींच्या संरक्षणासाठी कटिबद्ध आहोत," असं येथील केअर अँड मेंटल हेल्थ मिनिस्टर गिलियन किगन यांनी म्हटलं.

हायमनोप्लास्टी ही युकेमधील क्लिनिकमध्ये केली जाते आणि त्यासाठी साधारणपणे 3 हजार पाऊंड (अंदाजे 2 लाख 25 हजार) एवढा खर्च त्यासाठी येतो.

या शस्त्रक्रियेद्वारे साधारणपणे स्त्रीच्या जननेंद्रियाचं (योनी) प्रवेशद्वार बंद करणारा एक पातळ पडदा तयार केला जातो. त्यालाच हायमन म्हणतात आणि या प्रक्रियेला हायमन रिपेअर असंही म्हटलं जातं.

मात्र WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, "हायमन असणं हे काही शारीरिक संबंध झाला किंवा नाही याचा पुरावा नाही."

महिलांचे हायमन हे केवळ शारीरिक संबंधांमुळंच नव्हे तर खेळताना किंवा मासिक पाळीदरम्याने टेम्पॉनसारख्या गोष्टींच्या वापरसारख्या अशा इतर अनेक लहान सहान कारणांमुळं फाटू शकतं.

हायमनोप्लास्टीच्या शस्त्रक्रियेचा संबंध हा काही ठिकाणच्या रुढी परंपरा आणि संस्कृतींशी जोडलेला आहे. या संस्कृतींमध्ये कौमार्याला प्रचंड महत्त्व असतं. लग्नानंतर पहिल्या शारीरिक संबंधाच्या वेळी मुलीच्या योनीमधून रक्तस्त्राव व्हावा असं अपेक्षित असतं.

जगभरात जवळपास 20 देशांमध्ये कौमार्य चाचणी केली जाते, असं WHO चं म्हणणं आहे. महिलांच्या योनीची तपासणी करून हायमन फाटलेले नसल्याची किंवा शाबूत आहेत याची तपासणी केली जाते.

अलिना (बदललेले नाव) यांनी सांगितलं की, त्या किशोरवयीन असताना त्यांच्यावर बलात्कार झाला होता. त्यानंतर त्यांनी ही शस्त्रक्रिया करून घ्यावी म्हणून कुटुंबीयांनी त्यांच्यावर प्रचंड दबाव आणला होता.

"यात मला काही ठरवण्याचा अधिकारच नाही असं मला वाटलं. मला जर पूर्वीप्रमाणे 'फिट' किंवा 'शारीरिकदृष्ट्या योग्य' व्हायचं असले तर माझ्यासमोर याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही, हे माझ्यावर जणू ठासवण्यात आलं," असं त्या म्हणाल्या.

"मला फार एकटेपणाची जाणीव झाली. मी हे केलं नाही तर काहीतरी मोठा दोष असल्याची जाणीव मला करून देण्यात आली. माझ्या खांद्यावर हे मोठं ओझं आहे असं मला वाटलं. तसंच मला दुसरा काही पर्याय नसल्याचंही जाणवलं."

अलिना म्हणाल्या की, "त्यांनी शस्त्रक्रिया करण्यास नकार दिला, मात्र तरीही त्यांच्यावर त्यासाठी प्रचंड दबाव होताच. या सर्व परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी त्यांनी अशा व्यक्तीशी विवाह केला, ज्याला हायमन शाबूत आहे की फाटले आहे, यानं काही फरक पडणार नव्हता."

ही शस्त्रक्रिया न करण्याचं धाडस दाखवल्याबद्दल स्वतःचा अभिमान असल्याचं त्या म्हणाल्या.

"मला माहिती आहे की मी योग्य निर्णय घेतला. तसंच आई वडिलांनी जो दबाव आणला होता तो केवळ त्यांच्या सामाजिक प्रतिष्ठेसाठी होता, हेही मला माहिती आहे," असंही त्यांनी म्हटलं.

सरकारनं गेल्या वर्षीच्या अखेरीस हायमनोप्लास्टीवर लवकरात लवकर बंदी घालण्यासाठी कायदा करण्याचं आश्वासनं दिलेलं होतं.

त्यानुसार आता हेल्थ आणि केअर विधेयकात सुधारणांमध्ये याचा समावेश करण्यात आला आहे. त्यामाध्यमातून हायमनोप्लास्टी करण्यासाठी मदत करणं किंवा प्रोत्साहन देणं हा कायद्यानं गुन्हा असेल आणि त्यासाठी पाच वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद असेल. तसंच महिला किंवा मुलीला या शस्त्रक्रियेसाठी परदेशात नेणं हादेखील कायद्यानुसार गुन्हा असेल.

गेल्यावर्षी हे विधेयक हाऊस ऑफ कॉमनमध्ये असताना सरकारनं कौमार्य चाचणीची प्रक्रिया असमर्थनीय असल्याचं म्हणत त्यावर बंदी घातली होती. कौमार्य चाचणी आणि हायमनोप्लास्टी यांचा अगदी जवळचा संबंध आहे, असं कार्यकर्त्यांचं मत आहे.

डायना नम्मी या इराणी आणि कुर्दीश महिला हक्क संघटनेच्या कार्यकारी संचालिका आहे. त्यांनी यावर बंदी घालण्यासाठी मोहीम चालवली होती. "या शस्त्रक्रियेला सामोरं जावं लागणाऱ्या प्रत्येक महिला आणि मुलीला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे व्हर्जिन म्हणजे कुमारिका म्हणून इतरांसमोर स्वतःला सादर करण्याचा दबाव असतो. अनेक प्रकरणांमध्ये प्रामुख्यानं महिलेच्या कुटुंबानं ठरवलेल्या बळजबरीच्या विवाहासाठी ही शस्त्रक्रिया केली जाते."

"हायमनोप्लास्टीमुळं मनावर एक प्रकारचा आघात होतो. आणि त्याचा परिणाम म्हणजे यापैकी अर्ध्या महिला किंवा मुलींच्या पहिल्या शारीरिक संबंधांच्या वेळी रक्तस्त्राव होत नाही. त्यामुळं प्रतिष्ठेसाठी तिच्यावर मोठ्या प्रमाणावर अत्याचार होण्याचा किंवा काही प्रकरणांत ऑनर किलिंगचा धोकाही असतो."

हलालेह ताहेरी या मिडल इस्टर्न वूमन अँड सोसायटी संघटनेचे संस्थापिका आहेत. ही प्रकिया थांबवण्यासाठी वेळ लागणार असून त्यासाठी जनजागृतीही करावी लागणार आहे. त्यासाठी पालकांबरोबर मिळून काम करत असल्याचं त्या म्हणाल्या.

या क्षेत्रात काम करताना त्यांनी एका कुर्दीश महिलेबरोबर त्यांचा संपर्क आला. त्या म्हणजे गोलालेह सिमिली. इराणमध्ये लहानाच्या मोठ्या झाल्यानं त्यांना कौमार्यावर विश्वास ठेवण्यास भाग पाडण्यात आलं. त्यामुळं लग्नाच्या वेळी त्यांना कौमार्याचं प्रमाणपत्र सादर करावं लागलं. यामुळं प्रचंड अपमानाची भावना निर्माण झाली, असं त्या म्हणाल्या.

2017 मध्ये त्या युकेला स्थलांतरीत झाल्या. पण त्यांना जेव्हा त्यांची मुलगी व्हर्जिन नसल्याचं समजलं त्यावेळी मुलगी अत्यंत तणावात आणि चिंतेत होती असं त्या म्हणाल्या. त्यांनी शस्त्रक्रियेबाबत चर्चाही केली. पण MEWso संघनेबरोबर काम केल्यामुळं अशाप्रकारे मुलीवर ही शस्त्रक्रिया लादून तिच्यावर अन्याय करण्याची इच्छा नसल्याचं त्या म्हणाल्या.

अत्याचारांचं चक्र

इंदिरा वर्मा या कर्म निर्वाणा या सामाजिक संस्थेच्या हेल्पलाईनसाठी काम करतात. या हेल्पलाईनला कॉल करणाऱ्या महिला किंवा मुलींना ही हायमन रिपेअर शस्त्रक्रिया केल्याचं मान्य करण्यासाठी अनेक महिने लागतात असं त्या म्हणाल्या. या शस्त्रक्रियेचं वर्णन हे अनेकदा कापणे, निश्चित करणे आणि शिवणे अशा पद्धतीनं केलं जातं, असं त्या म्हणाल्या.

अशा प्रकारच्या बहुतांश शस्त्रक्रिया या प्रामुख्यानं क्लिनिकमध्येच केल्या जातात. पण काही ठिकाणी घरी शस्त्रक्रिया केल्याचेही काही पुरावे आहेत.

"पीडितांनी सांगितल्यानुसार, समाजातील ज्येष्ठ घरी येतात किंवा डॉक्टर घरी भेट देऊन रुग्णांची पाहणी करतात आणि अवाढ्य पैसे आकारतात. पीडितेला बाहेर नेल्यास ती मदत मिळवण्याचा किंवा पळून जाण्याचा प्रयत्न करेल म्हणून तो धोका टाळण्यासाठी ते हा पर्याय निवडतात."

हा छुप्या पद्धतीनं चालणारा पण मोठा व्यवसाय आहे आणि त्यामुळं पीडितांवर अत्याचाराचं चक्र निर्माण झालं आहे, असं त्या म्हणाल्या.

मात्र, लंडन येथील हार्ले रोडवर एक खासगी क्लिनिक चालवणारे डॉक्टर धीरज भार या बंदीच्या विरोधी आहेत. मी कधीही कौमार्य चाचणी केलेली नाही किंवा तसं करणाऱ्यांशी मी सहमतही नाही. मात्र हायमनोप्लास्टी केली आहे, असं ते सांगतात. त्यांच्या मते, यासाठी साधारणपणे तीन ते चार हजार पाऊंड एवढी रक्कम आकारली जाते आणि 45 मिनिटांचा वेळ लागतो.

पण, त्यावर बंदी घातल्यानं महिला आणि मुलींना अधिक धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळं उलट याचं योग्य प्रकारे नियमन करावं, असं ते म्हणाले.

"तुम्ही जेव्हा एखाद्या वैद्यकीय शस्त्रक्रियेवर बंदी घालता तेव्हा तुम्ही रुग्णांना ती छुप्या पद्धतीनं करण्यास भाग पाडता. अशा वेळी रुग्ण इतर मार्गाने ही शस्त्रक्रिया करतात किंवा इतर देशांमधून आलेल्या डॉक्टरांच्या मार्फत अशी शस्त्रक्रिया करण्यास प्राधान्य देतात."

"माझ्या मते आणखी मोठी समस्या म्हणजे, तुम्हाला जर शस्त्रक्रिया होत आहे हेच माहिती नसेल, तर तुम्ही त्यावर देखरेख ठेवणं किंवा त्यातून निर्माण होणाऱ्या समस्या किंवा त्याचा फॉलोअप घेणं हे करू शकत नाही."

त्यांच्याकडे येणाऱ्या अनेक महिलांवर समाज किंवा कुटुंबाचा दबाव असतो, पण त्यासाठी त्यांच्यावर बळजबरी केली जात नाही, असंही ते म्हणाले.

"या प्रकरणात त्यांना केवळ त्यांच्या समाजानं स्वीकारावं अशी त्यांची इच्छा असते. या कारणासाठी म्हणून त्यांना काही गोष्टींचं पालन करावं लागतं, म्हणून ते करतात," असं त्यांनी सांगितलं.

कुटुंबातील सदस्यांकडून बळजबरी केली जात असल्याचं लक्षात आल्यानं पेशंटला नकार देतात, असंही ते म्हणाले.

"कौमार्याशी संबंधित चुकीच्या संकल्पना आणि पूर्वकल्पना यांच्याशी सामना करण्यासाठी आणि महिलांचा सन्मान राखला जावा यासाठी सरकारनं स्थानिक समुदाय आणि संघटनांच्या मदतीनं काम करायला हवं," असं मत कीगन यांनी मांडलं आहे.

हे वाचलंत का?