You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'कौमार्य चाचणीतून मी व्हर्जिन आहे की नाही ते कळेल आणि मगच माझं लग्न होईल'
- Author, रेचल स्टोनहाउस
- Role, न्यूजबीट
बीबीसी न्यूजबीट आणि 100 वुमेनच्या टीमला चौकशीत आढळलं की, ब्रिटिश मेडिकल क्लिनिकमध्ये महिलांची कौमार्य चाचणी केली जाते.
जागतिक आरोग्य संघटना आणि संयुक्त राष्ट्रांच्या मते, अशाप्रकारची टेस्ट ही मानवाधिकारांचं उल्लंघन आहे. अशा चाचण्यांवर निर्बंध घालण्याची या संघटनांची मागणी आहे.
अशाप्रकारच्या चाचण्या अशास्त्रीय आहेत आणि यातून कुणाचा कौमार्य भंग झाला की नाही, हेसुद्धा सिद्ध करता येत नाही, असं टीकाकारांचं म्हणणं आहे. या चाचण्या म्हणजे लैंगिक शोषणाचाच एक प्रकार असू शकतो.
या चाचण्यांध्ये महिलांची योनी तपासली जाते. आणि महिलांसाठी हे लाजिरवाणं ठरतं.
बीबीसीच्या पडताळणीत समोर आलं की, अनेक खासगी क्लिनिक कौमार्य रिपेअर करण्याच्या जाहिराती देत आहेत. ज्यावेळेस त्यांच्याशी संपर्क करण्यात आला, त्यांनी 150 ते 300 पाऊंडदरम्यान (15 हजार ते 30 हजार) कौमार्च चाचणी करण्याचा प्रस्ताव समोर ठेवला.
बळजबरीनं लग्न
बीबीसीनं असे 21 क्लिनिक शोधले आणि 16 क्लिनिकमध्ये चौकशी केली. यातल्या 7 क्लिनिकमध्ये कौमार्य चाचणी होत असल्याचं स्पष्ट झालं आणि इतर क्लिनिकनं आपली भूमिका स्पष्ट केली नाही.
या सगळ्या क्लिनिकमध्ये सांगण्यात आलं की, "तिथं हायमन रिपेअर (योनी दुरुस्ती) शस्त्रक्रिया केली जाते आणि त्यासाठी 500 ते 3000 पाऊंड (जवळपास 49 हजार ते 3 लाख रुपये) इतका खर्च येतो."
इंग्लंडच्या राष्ट्रीय आरोग्य सेवेनुसार, "गेल्या 5 वर्षांत 69 हायमन रिपेयरी शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत."
न्यूजबीटनं अशाच एका मुलीविषयी ऐकलं होतं, जिची मदत कर्मा निर्वाना नावाच्या एका चॅरिटी संस्थेनं केली होती.
ही संस्था लैंगिक शोषण आणि बळजबरीनं लग्न झालेल्या पीडितांची मदत करते.
'पळून जाणंच एकमेव पर्याय'
त्या मुलीनं सांगितलं, "माझे आई-वडील माझं मानसिक शोषण करत होते आणि ते त्यांच्या मर्जीनं माझं लग्न लावून देऊ इच्छित होते."
"एका दिवशी आमच्या समाजातल्या वृद्ध माणसानं मला माझ्या मित्रांसोबत बाहेर पाहिलं आणि त्यातला एक मुलगा माझा बॉयफ्रेंड असल्याचं माझ्या आईला सांगितलं. त्यानंतर आमच्या समाजात खूप अफवा पसरायला लागल्या."
त्यानंतर मग त्या मुलीच्या आई-वडिलांनी मुलीची कौमार्य तपासण्याची गोष्ट केली.
त्या मुलीनं सांगितलं की, "माझे आई-वडील आणि जिथं माझ्या लग्नाची चर्चा सुरू होती, ते कुटुंब अशा सगळ्यांनी माझ्या कौमार्य चाचणीची मागणी केली. जेणेकरून मी व्हर्जिन आहे की नाही हे कळेल आणि त्यानंतर माझं लग्न होईल."
"मला खूप भीती वाटली होती आणि जे काही सुरू आहे त्याचा मला अर्थ लागत नव्हता. तेव्हा मला पळून जाणं हाच एकमेव पर्याय वाटला आणि मी तो पत्करलाही."
प्रिया मनोटा या कर्मा निरवाना संस्थेची हेल्पलाईन सांभाळतात.
त्यांनी सांगितलं, "आमच्याकडे अनेक मुलींचे फोन आले आहेत आणि त्यांना अशीच चिंता सतावत आहे. कारण त्यांच्या कुटुंबीयांना माहिती झालं की एकतर या मुली रिलेशनशिपमध्ये आहेत किंवा व्हर्जिन नाहीत. यामुळे मग कुटुंबीय त्यांच्यावर दबाव टाकत आहेत आणि टेस्टनंतर येणाऱ्या निकालांविषयी या मुलींमध्ये चिंतेचं वातावरण आहे.
"प्रतिष्ठेपायी शोषण आणि बळजबरीनं लग्न तेव्हा होतं, जेव्हा मुलगी स्वत:हून आपला जोडीदार शोभते किंवा ती रिलेशनशिपमध्ये असते. आम्ही इथं असेही प्रकरणं पाहिले आहेत जिथं मुलींना जीवे मारण्यात आलं आहे. तर काही ठिकाणी पीडितांना कुटुंबीयांना दूर सारलं आहे."
जागतिक आरोग्य संघटनेनुसार जवळपास 20 देशांमध्ये कौमार्य चाचणी केली जाते, पण या चाचणीमुळे मुलगी व्हर्जिन आहे की नाही, हे कळत असल्याचा कोणताही पुरावा नाही.
याचं कारण योनी अनेक कारणांनी ढिली होऊ शकते. जसं की व्यायाम किंवा टॅम्पॉनचा वापर.
फेक फिट
बीबीसीला हेसुद्धा कळालं की, 50 पौंड (जवळपास 5 हजार रुपये) हायमन रिपेयर किट ऑनलाईन उपलब्ध करून दिली जात आहे आणि यामुळे व्हर्जिनिटी वापस मिळवता येऊ शकते, असा त्यांचा दावा आहे.
अशीच एक 104 पौंडांची (जवळपास 10 हजार 236) किट आम्ही खरेदी केली जी जर्मनीहून आली होती. या किटमध्ये 60 मिलीलीटर योनी टाईट करणारं चिकट द्रव्य होतं. प्लास्टिकचे पदार्थ, एक ब्लड कॅप्सूल आणि तीन छोटे पाकिट ज्यात फेक ब्लड होतं. किटवर वापरासाठी कोणत्याही सूचना करण्यात आलेल्या नव्हत्या.
स्त्रीरोग विशेतज्ञ डॉ. अश्फाक खान यांच्याकडे अनेकदा कौमार्य चाचणी आणि हायमन रिपेयरसाठी विनंत्या येतात.
त्यांनी सांगितलं, "आतापर्यंत ब्रिटनमध्ये या गोष्टी बेकायदेशीर का नाही ठरल्या, हे मला समजत नाही. यांना बेकायदेशीर ठरवलं पाहिजे. खरं तर योनी ढिली असेल तर याचा अर्थ मुलगी व्हर्जिन नाही, असा होत नाही. योनी अनेक कारणांनी फाटू शकते. जर योनी फाटली आहे आणि मला ती रिपेयर करावी लागेल असं मी म्हणत असेल आणि त्यानंतर एक प्रमाणपत्र देत असेल तर याचा अर्थ मी चुकीचं प्रमाणपत्र देत आहे."
'समाजाला शिक्षित करण्याची गरज'
डॉ. अश्फाक यांच्या मते या प्रथेविरोधात अधिक पावलं टाकणं गरजेचं आहे.
त्यांनी न्यूजबीटला सांगितलं, ज्यापद्धतीनं खतनाच्या मुद्द्यावर चर्चा केली जाते, अगदी तसंच जगभरातल्या नेत्यांनी या समस्येवर चर्चा करायला हवी.
"माझ्या मते हा एक गुन्हा आहे आणि आपण अशा एका प्रक्रियेत स्वत:ला जोडत आहोत, जी अनैतिक आहे."
यावर्षीच्या सुरुवातीला मिडल ईस्टर्न वुमेन अँड सोसायटीनं कौमार्य चाचणी बंद करण्यासाठी मोहीम चालवली होती.
सोसायटीच्या संस्थापक हलालेह तहेरी यांनी सांगितलं, "हायमन रिपेयरीसुद्धा बंद करावी अशी आमची मागणी आहे. पण याविषयी लोकांना शिक्षित करण्याविना बंदी आणली तर यामुळे होणारं नुकसान फायद्यापेक्षा अधिक असेल. या प्रथा आजही चालू आहेत कारण व्हर्जिनिटीविषयी लोकांचे विचार अजूनही मागास आहेत.
"आपण आपल्या समाजाला शिक्षित केलं आणि त्यांचे विचार बदलले तर हायमन रिपेयरीची गरज पडणार नाही. हा धंदा आपोआप बंद होईल."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर रोज रात्री कोरोना पॉडकास्ट पहायला विसरू नका.)