You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कौमार्य चाचणी : रिअॅलिटी टीव्ही शोमधील कौमार्य चाचणीवरून वाद, फ्रान्स सरकारकडून निषेध
- Author, ह्यू स्कोफिल्ड
- Role, बीबीसी न्यूज, पॅरिस
कौमार्य चाचणी म्हणून केल्या जाणाऱ्या 'रुमाल परिक्षण' पद्धतीचं चुकीच्या पद्धतीने वर्णन केल्याबद्दल फ्रान्स सरकारने एका रिअॅलिटी टीव्ही शोचा निषेध केलाय. या शोमध्ये तरूण वधूंची कशी कौमार्य चाचणी घेण्यात येते, याचं वर्णन करण्यात आलं होतं.
याबद्दल देशाच्या नागरिकत्व मंत्री मार्लिन शिआप्पा यांनी देशाच्या टीव्ही नियामक संस्थेकडे तक्रार केली आहे.
फ्रान्समधील TFX या चॅनलवर 'इनक्रेडिबल जिप्सी वेडिंग्स' हा शो दाखवला जातो. एखाद्या तरूण स्त्रीच्या लग्नाच्या आधी तिच्या नात्यातल्या महिला तिची कौमार्य चाचणी कशी आणि का घेतात, याचं वर्णन या शोमध्ये करण्यात आलं होतं.
फ्रान्सच्या दक्षिणेकडील पेरप्रिनान शहरात राहणाऱ्या कॅटनल गिटन समुदायाच्या लग्नांबद्दलच्या प्रथांविषयी हा शो होता.
यामध्ये लग्नाआधीच्या तयारीचं वर्णन करणाऱ्या निवेदनात म्हटलं होतं, "विशेष प्रशिक्षण असणाऱ्या महिला या पलंगावर नाओमीची कौमार्य चाचणी घेतील. रुमालाद्वारे कौमार्य चाचणी करण्याची प्रथा ही पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे आणि ती कोणालाही चुकवता येत नाही. नाओमीचे यापूर्वी लैंगिक संबंध होते, असं यातून सिद्ध झालं तर हे लग्न होणार नाही."
पुढच्या एका दृश्यामध्ये या समाजातली एक महिला या प्रथेचं महत्त्वं सांगताना दिसते. "मुलाच्या कुटुंबासाठी हे महत्त्वाचं आहे. म्हणजे त्यांची खात्री पटते की त्यांच्या मुलांचं एक सुंदर, कुमारिकेशी (Virgin) लग्न होतंय. छान-छान कपडे हवे असतील, लग्न करायचं असेल, तिला या प्रथेला सामोरं जावं लागेल, हे तिला ती अगदी लहान असल्यापासून सांगण्यात आलंय."
पण पुरुषांचीही अशीच तपासणी होऊ नये का, असं विचारल्यानंतर दुसरी एक महिला सांगते, "तसं होत नाही. आमची अशी धारणा आहे की जर तरूण मुलगा लग्नाआधी पार्टी करायला बाहेर गेला नाही आणि त्याने मुली पाहिल्या नाहीत, तर नंतर त्याला हे करता येणार नाही. हा अनुभव त्याने घेतलाच पाहिजे."
या मतांबद्दल या कार्यक्रमातून कोणतेच प्रश्न उपस्थित न करण्यात येण्याबद्दल शिआप्पा यांनी आक्षेप घेतलाय.
फ्रेंच संसदेने कौमार्य चाचणीवर बंदी घालत लग्नासाठी दोघांचीही परवानगी असणं गरजेचं आहे, असं सांगणारा कायदा नुकताच मंजूर केलाय.
डॉक्टरांनी व्हर्जिनिटी सर्टिर्फिकेट - म्हणजे मुलीच्या कौमार्याचं सर्टिफिकेट देण्यावरही बंदी आणण्यात आली आहे.
बोटाने किंवा इतर प्रकारे तपासणी करून तरुणी वा महिलेचं कौमार्य सिद्ध करता येत नसल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलंय. हे मानवी हक्कांचं उल्लंघन असल्याचंही WHO ने म्हटलंय.
शिआप्पा यांनी यापूर्वीही फ्रेंच टीव्हीवरच्या लैंगिक भेदाभेद करणाऱ्या कार्यक्रमांच्या विरोधात आवाज उठवला होता.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)