Hymenoplasty: कौमार्य पडदा पूर्ववत करणाऱ्या शस्त्रक्रियेवर बंदीची मागणी का होते आहे?

लग्नानंतरच्या पहिल्या रात्री कौमार्य पडदा त्याच्या मूळ रूपात असण्याला खूप महत्त्व दिलं जातं, जगभरात कोणत्याही संस्कृतीत तो तसा असणं म्हणजे पावित्र्याचं लक्षण समजलं जातं.

लग्नानंतर एखादी स्त्री कुमारिका नसेल तर तिला नवऱ्याने बेदखल करण्याची भीती असते. अगदी वाईट परिस्थितीत तिची हत्या होण्याचीही शक्यता असते.

त्यामुळेच अधिकाधिक महिला आपलं "कौमार्य परत मिळवण्याच्या" शस्त्रक्रियेचा आधार घेतात. त्याला हायमेनोप्लास्टी (Hymenoplasty) असं म्हणतात. या शस्त्रक्रियेत योनिमार्गाच्या प्रवेशद्वारावर असणारा कौमार्य पडदा पूर्ववत केला जातो.

मात्र इंग्लंडमधील काही कार्यकर्ते कौमार्य परत मिळवण्यासाठीच्या या शस्त्रक्रियेवर बंदी घालण्याची मागणी करत आहे. त्यांच्या मते या शस्त्रक्रियेचे वैद्यकीयदृष्ट्या काहीही फायदे नाहीत.

मात्र दुसऱ्या बाजूला बंदी आणली तर बायका ही शस्त्रक्रिया लपूनछपून करतील, अशीही भीती व्यक्त करण्यात येत आहे.

'दहशतीत जगणं'

हलालेह ताहेरी यांनी Middle Eastern Women and Society Organisationची स्थापना केली आहे. त्यांनी बीबीसीला सांगितलं की मोरोक्कोच्या एक मुलीने तिच्या वडिलांपासून लपून लंडनमध्ये आश्रय घेतला होता. कौमार्याच्या कारणावरून तिच्याच वडिलांनी तिला मारायची सुपारी कुणाला तरी दिली होती.

ती युकेमध्ये 2014 साली आली. ती एका व्यक्तीला भेटली आणि ते दोघं एकत्र राहू लागले. जेव्हा तिच्या वडिलांना या नात्याबद्दल कळलं, तेव्हा त्यांनी तिला मोरोक्कोला परत येण्यास सांगितलं. तिथे परतल्यावर त्यांनी तिला "कौमार्य चाचणीसाठी" डॉक्टरकडे नेलं. तेव्हा वैद्यकीय चाचणीत ती कुमारिका नसल्याचं लक्षात आलं.

ती लगेचच लंडनमध्ये परतली आणि तिला आता दहशतीत आहे की तिचे वडील तिला शोधतील. आज ती 26 वर्षांची आहे.

मोरोक्कोतील एका 40 वर्षीय शिक्षिकेने सांगितलं की वयाच्या विशीत त्यांना ही शस्त्रक्रिया करण्यास भाग पाडलं गेलं. त्यामुळे त्यांच्या मुलींना हा त्रास होणार नाही, याची त्या पूरेपूर काळजी घेत आहेत.

"मी कधीही माझ्या मुलींबरोबर होऊ देणार नाही. मी त्यांना मुक्त रहायला शिकवणार आहे."

'लग्नाची पहिली रात्र'

संडे टाइम्सच्या एका वृत्तानुसार सध्या युकेमध्ये 22 खासगी दवाखाने आहेत, जिथे कौमार्य पडदा "पूर्ववत" करण्याची शस्त्रक्रिया केली जाते. एक तासाच्या या शस्त्रक्रियेसाठी ते 3000 पौंडपर्यंत फी आकारतात.

महिला हक्क कार्यकर्त्यांच्या मते मुस्लीम महिलांमधील भीतीचा हे क्लिनिक फायदा घेत आहेत. लग्नानंतर त्यांच्या "पावित्र्यावर" प्रश्नचिन्ह निर्माण होऊ नये, या भीतीपोटी स्त्रिया या शस्त्रक्रिया करवून घेत आहेत.

अनेक वेबसाईट्सवर या शस्त्रक्रियेची संपूर्ण माहिती दिलेली आहे. लंडनच्या 'गायनॅ सेंटर'ने तर अशी माहिती दिली आहे की "लग्नानंतर कौमार्य पडदा जसा असायला हवा, तसा दिसला नाही तर लग्न अवैध समजलं जातं."

बीबीसीने या दवाखान्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याकडून काहीही प्रतिसाद आला नाही.

निर्घृण पद्धत

युकेचे आरोग्य सचिव मॅट हॅनकॉक या पद्धतीची चौकशी करणार असल्याचं म्हणाले. मात्र या बंदीची अंमलबजावणी कशी केली जाईल, याबाबत आरोग्य विभागाने प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

ताहेरी म्हणाल्या, "या बंदीचा नीट विचार व्हायला हवा. ही शस्त्रक्रिया नसती तर अनेक मुलींचा जीव गेला असता."

लंडन स्कूल ऑफ मेडिसीनमधील प्राध्यापक डॉ. खालीद खान यांनी ही शस्त्रक्रिया स्वत:च्या डोळ्यांनी पाहिली आहे. त्यांच्या मते बंदी हा एकमेव उपाय नाही.

जर या "शस्त्रक्रियेची व्यवस्थित माहिती दिली" तर ती करायची की नाही, हा वैयक्तिक निर्णय महिला घेऊ शकतील. "स्त्रियांना छळवणुकीपासून वाचवणं हेच डॉक्टरांचं प्रामाणिक उद्दिष्ट असावं," असं ते म्हणाले.

मानसशास्त्रीय आधार

ब्रिटिश सोसायटी फॉर पीडियाट्रिक अँड अडोलसंट गायनेकॉलॉजीच्या डॉ. नेओमी क्राऊच यांच्या मते ज्या शस्त्रक्रियेचा अजिबात फायदा नाही, ती करण्यास मुलींना भाग पाडू नये.

"युकेच्या जनरल मेडिकसल काउंसिलने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार डॉक्टरांची कर्तव्यं योग्य पद्धतीने सांगितलेली आहेत. कोणत्याही शस्त्रक्रियेच्या वेळी रुग्णांना त्रास होणार नाही अशी शपथ आम्ही घेतलेली असते. ही शस्त्रक्रिया करणारी प्रत्येक नावाजलेली संस्था या शस्त्रक्रियेच्या ऑडिटसाठी तयार असते," त्या म्हणाल्या.

परवानगीचा मुद्दा

"जर एखाद्या व्यक्तीच्या दबावाखाली येऊन रुग्णाने परवानगी दिली तर ती त्याच्या इच्छेनुसार असेलच असं नाही. एखाद्या डॉक्टरला कळलं की रुग्णाला ही शस्त्रक्रिया करायची नाही तर त्यांनी ती करायला नको," असं मत जीएमसीचे वैद्यकीय संचालक कॉलिन मेलविल म्हणाले.

योनिमार्गाच्या पाकळ्यांच्या आकार कमी किंवा जास्त करण्याची शस्त्रक्रिया यूकेमध्ये लोकप्रिय होत आहेत. या शस्त्रक्रियांच्या मानसिक परिणामांमबद्दल कमी माहिती आहे आणि ही शस्त्रक्रिया करण्यापूर्वी त्यांना योग्य मानसिक आधार मिळत नाही.

ताहेरी म्हणतात, "या स्त्रियांना आपण फक्त एक वस्तू आहोत, अशी भावना त्यांच्या मनात येते."

"मुस्लीम महिलांना शरमेची भावना आणि शिक्षेची भावना तीव्र आहे. काहींना आपल्याचा शरीराबद्दल असलेलं असमाधान," हाही एक महत्त्वाचा भाग आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)