You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
Auschwitz: नाझी छळछावणीच्या 'गेट ऑफ डेथ'चा हेलावून टाकणारा अनुभव
- Author, वंदना
- Role, टीव्ही संपादक, बीबीसी भारतीय भाषा
दुसऱ्या महायुद्धात पोलंडमध्ये नाझींनी उभारलेल्या छळ छावण्यांविषयी ऐकताच अंगावर काटा येतो. या छळछावण्यांमध्ये जवळपास 10 लाख लोकांनी आपले प्राण गमावले. यातले बहुतांश लोक ज्यू होते.
या छळछावण्यांमध्ये कैद असलेल्या लोकांची सुटका होऊन आज 27 जानेवारी रोजी 75 वर्षं पूर्ण झाली. त्यानिमित्ताने अनेक कार्यक्रमांचं आयोजन होत आहे.
काही वर्षांपूर्वी मी पोलंडला गेले होते. त्यावेळी या छळछावण्यांना भेट देण्याची संधी मला मिळाली. नेमकं सांगायचं तर 27 डिसेंबर 2008चा दिवस होता.
25 डिसेंबर रोजी लोकांनी मोठ्या उत्साहात नाताळ साजरा केला होता. नाताळच्या उत्सवानंतर मीही विचार केला की पोलंडला अधिक जवळून जाणून घेवूया.
पोलंडचा इतिहास जाणून घ्यायचा म्हणजे तिथल्या छळछावण्याचा उल्लेख येतोच. पोलंडमधल्या एका छोट्याशा शहरात माझी एक मैत्रीण होती. तिच्याच घरी माझा मुक्काम होता. ती मला सोबत घेऊन कारने ऑश्वित्झ छावणी बघायला गेले.
या छावणीतल्या लोखंडी गेटमधून आत गेल्यावर एक बोर्ड दिसतो. त्यावर लिहिलं आहे, 'तुमचं काम तुम्हाला मुक्त करतो.'
आत गेल्यावर माझी नजर एका खास दाराकडे गेली. नाझी काळाशी संबंधित अनेक सिनेमे हॉलिवुडमध्ये तयार झाले आहेत.
त्या सिनेमांमध्ये एक दृश्य हमखास असतं. ज्यू लोकांनी खचाखच भरलेली रेल्वेगाडी या दारातून आत छावणीत जाते. या दाराला 'गेट ऑफ डेथ' म्हणजेच 'मृत्यूचं दार' म्हणतात.
शून्यापेक्षा खूप कमी तापमान असलेल्या या जागेवर बर्फाने झाकलेल्या या दाराजवळ उभी असताना अचानक माझ्या अंगावर काटा आला. इथल्या नीरव शांततेत उभं राहून तुम्ही त्या भयानक दृश्याची केवळ कल्पनाच करू शकता.
या छळछावणीविषयी माहिती देणारी गाईड आम्हाला एका खास ठिकाणी घेऊन गेली. तिने सांगितलं की लाखो लोकांना या गॅस चेम्बर्समध्ये टाकून ठार केलं जात असे.
मी आजवर वेगवेगळ्या देशांमधली वेगवेगळी संग्रहालयं बघितली आहेत. मात्र ऑश्वित्झ संग्रहालयात जाणं वेगळा आणि हादरवून टाकणारा अनुभव होता.
या संग्रहालयात जवळपास 2 टन केस ठेवले आहेत. गाईडने सांगितलं की ठार करण्याआधी गरम कपडे शिवण्यासाठी नाझी सैनिक कैद्यांचे केस कापून घ्यायचे.
जवळच लाकडी पलंग होते. या पलंगांवर कैदी झोपायचे. तिथल्या प्रत्येक वस्तूची स्वतःची एक कहाणी होती.
छावणीत फिरता फिरता मी तिथल्या स्वच्छतागृहांपर्यंत गेले. आमच्या गाईडने सांगितलं की कैदी स्वच्छतागृहच्या सफाईचं काम बरं म्हणायचे, कारण हे काम करणाऱ्यांना कमी यातना सहन कराव्या लागत असत.
मात्र या छावणीत एक विशेष गोष्टही दिसली. अनन्वित छळ होत असणाऱ्या कैद्यांपैकी काहींनी आपल्यातली कला जिवंत ठेवली होती.
एका कैद्याने तयार केलेली कलाकृती बघताना माझ्या मनात विचार आला की हे साकारत असताना त्या कैद्याच्या मनात कोणते विचार तरळत असतील?
ऑश्वित्झ छावणीच्या परिसरात एक भिंत आहे. तिला 'वॉल ऑफ डेथ' किंवा 'मृत्यूची भिंत' म्हणतात.
इथे कैद्यांना बर्फाच्या मधे उभं करून त्यांच्यावर गोळी छाडली जायचे, असं सांगतात.
ऑश्वित्झ छावणीच्या या भेटीत मला एक गोष्ट खटकली. मी माझ्या ज्या परिचित मैत्रिणीसोबत इथवर आले त्या मला ही छावणी दाखवायला घेऊन आल्या. मात्र स्वतः आत आल्या नाहीत.
माझी वाट बघत त्या कित्येक तास बाहेरच उभ्या होत्या. मी कारण विचारलं. त्यांनी विशेष असं काही सांगितलं नाही. संध्याकाळी त्या मला त्यांच्या आजीकडे घेऊन गेल्या.
80 वर्षांच्या त्या आजी होत्या. त्यांची दृष्टी बऱ्यापैकी धुसर झाली होती. त्यांनी सांगितलं त्यासुद्धा अशाच एका छळछावणीत अडकल्या होत्या. आपण तिथून कसं सुटलो, याची कहाणी त्यांनी सांगितलं. त्यांची सुटका झाली, मात्र त्यांचं पूर्ण कुटुंब कायमचं हिरावलं गेलं.
यानंतर मी माझ्या त्या परिचित मैत्रिणीला काही विचारण्याचं धाडस केलं नाही आणि ऑश्वित्झ छावणीचा विषयसुद्धा काढला नाही.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)