हिटलरच्या काळात प्रचारासाठी वापरलेली गोबेल्सनीती म्हणजे काय?

    • Author, तुषार कुलकर्णी
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

जर्मनीचा हुकूमशहा अॅडॉल्फ हिटलर याचा 30 एप्रिल 1945 रोजी मृत्यू झाला. हिटलरनं केलेल्या ज्यूंच्या नरसंहारासोबत त्याच्या गोबेल्सनीतीची आजही चर्चा होते. ही गोबेल्सनीती काय होती, याचा घेतलेला हा आढावा...

"एखादी गोष्ट वारंवार सांगितली तर ती लोकांना सत्य वाटू लागते. त्यामुळे आपल्या मुद्द्याचा सतत प्रचार करावा. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा लोकांमध्ये प्रचार करत असतो, तेव्हा ती गोष्ट सोपी असायला हवी. फक्त काही ठळक मुद्दे असायला हवेत. आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे ती गोष्ट सातत्याने पुन्हा पुन्हा सांगायला हवी."

हे अॅडॉल्फ हिटलरचं प्रचाराबाबतचं सूत्र होतं, जे प्रत्यक्षात उतरवणारा सूत्रधार होता जोसेफ गोबेल्स.

गोबेल्सची ओळख हिटलरचा एक विश्वासू सहकारी फक्त एवढीच नाही, तर तो एका प्रचारतंत्राचा जनक म्हणून गोबेल्सकडे पाहिलं जातं. असं म्हटलं जातं की याच 'गोबेल्सनीती'मुळेच हिटलर सत्तेवर आला आणि सत्ता टिकवू शकला.

सामान्य प्रचारक ते प्रचारमंत्री

हिटलरची विचारसरणी लोकांपर्यंत पोहोचवण्यात गोबेल्सने तयार केलेल्या प्रचार मंत्रालयाची भूमिका होती. तर हिटलरला विरोध करणाऱ्यांना नष्ट करण्यासाठी 'शुट्सश्टाफल (Schutzstaffel किंवा SS) ही सेना अग्रेसर होती.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जनमानसात ज्यूंविरोधात मत तयार करण्याचं काम प्रचार मंत्रालयाने केलं. तर अंदाजे 60 लाख ज्यूंचा नरसंहार प्रत्यक्षपणे SSच्या अधिकाऱ्यांनी घडवून आणला.

त्यामुळे ज्यू लोकांच्या नरसंहाराला जितका हिटलर जबाबदार आहे, तितकंच जबाबदार SSचा प्रमुख हेनरिच हिमलर आणि प्रचार मंत्रालयाचा प्रमुख जोसेफ गोबेल्स यांनाही धरलं जातं.

नाझी पक्षाचा प्रचारक, संपादक, प्रचारमंत्री, युद्धमंत्री आणि शरणागती जाहीर करणारा जर्मनीचा एका दिवसाचा चॅन्सलर, अशा विविध भूमिका गोबेल्सनं बजावल्या. त्यामुळे गोबेल्सला 20व्या शतकातील सर्वांत भयंकर युद्ध गुन्हेगारांपैकी एक म्हटलं जातं.

सामान्य जर्मन नागरिकांचा का होता पाठिंबा?

आपल्या 'माइन कॅम्फ' या आत्मचरित्रात हिटलरनं राष्ट्र निर्मितीसाठी प्रोपगंडा किंवा प्रचाराचं काय महत्त्व आहे, हे सांगितलं आहे. 1934 साली तो जर्मनीचा हुकूमशहा बनला आणि आयुष्याच्या शेवटपर्यंत तो त्या पदावर राहिला. त्याच्यावर अनेक संकटं आली, पण जर्मन लोकांचा त्याच्यावरील विश्वास कायम राहिला. जनतेच्या पाठिंब्याच्या बळावरच तो त्या पदावर कायम होता.

ज्यूंवर होणारे अत्याचार, छळछावण्या आणि एकंदरच त्यांच्याविरुद्धचा हिटलरचा द्वेष उघड होता. मग हिटलरचं लष्कर त्यांच्यावर इतके अत्याचार करत असताना इतर जर्मन लोकांनी त्याची साथ का दिली किंवा त्याला विरोध का केला नाही?

याचं कारण होतं हिटलरने केलेला रीतसर प्रचार. ज्यू हे राष्ट्रद्रोही आहेत, हा विचार हिटलरने लोकांच्या मनात रीतसर पेरला होता. त्यामुळे जर्मनीत जे काही घडतंय, ते योग्यच आहे, अशी सामान्य माणसाची धारणा झाली होती. हे कसं घडलं?

हिटलरच्या हाती नाझी पार्टीची सूत्रं आल्यानंतर त्यानं आपल्या पक्षाचा प्रचार करण्यासाठी एका विभागाची स्थापना केली होती. त्या विभागाचा प्रमुख म्हणून त्याने जोसेफ गोबेल्सची नियुक्ती केली होती. त्याची नियुक्ती होण्याचं कारण म्हणजे, तो 'डेर अॅंग्रीफ' या वृत्तपत्राचा संस्थापक आणि संपादक होता.

हिटलरचा जवळचा सहकारी होण्याआधीपासून तो हिटलरच्या विचारांनी प्रभावित झालेला होता. तसंच आपल्या वृत्तपत्रातून तो हिटलरच्या विचारांचा आणि ज्यूविरोधी विचारांचा प्रसार करायचा. या दोन्ही गोष्टी त्याच्यासाठी जमेच्या बाजू ठरल्या आणि हिटलरनं त्याला प्रचाराची जबाबदारी दिली.

हिटलरकडे सत्ता नव्हती, त्याआधी नाझी पक्षाकडे प्रचाराची खूप कमी साधनं होतं. त्यामुळे आहे त्या साधनाचा प्रभावी वापर करूनच जास्तीत जास्त लोकांचा पाठिंबा आपल्याला मिळवता येईल, याला महत्त्व होतं.

'सामान्य माणूस विचारवंत नसतो'

1934च्या निवडणुकीच्या प्रचारासाठी सगळीकडे रंगबेरंगी पोस्टर्स लावले जायचे. सर्वच पक्ष आपले पोस्टर्स रंगीत बनवून त्यावर खूप साऱ्या घोषणा लिहीत. त्याच वेळी नाझी पक्षानं काळ्या पार्श्वभूमीवर हिटलरचा चेहरा आणि नाव असलेलं पोस्टर प्रसिद्ध केलं. त्यावर पक्षाचं नाव किंवा घोषणा देखील नव्हती, पण हे पोस्टर आपल्या स्पष्ट आणि ठळक दिसण्यामुळे लोकप्रिय ठरलं.

'सामान्य माणूस हा विश्लेषक किंवा विचारवंत नसतो म्हणून त्याच्यापर्यंत मोजक्या शब्दात आपला संदेश पोहोचला पाहिजे,' हा हिटलरचा विचार ध्यानात घेऊनच प्रचार विभागाने हे पोस्टर बनवलं होतं.

प्रोपगंडा आणि सेन्सरशिप ही दोन साधनं वापरून नाझी पक्षाने लोकांचं ब्रेनवॉश केलं. या प्रचाराच्या माध्यमातून हिटलरची एक आदर्श प्रतिमा निर्माण करण्यात आली होती.

1934 साली हिटलर सत्तेत आल्यानंतर जोसेफ गोबेल्सला Ministry of Enlightenment and Propagandaचा कारभार देण्यात आला. प्रचार हा अदृश्य आणि सर्वत्र असावा, असं त्याला वाटायचं. त्यामुळे माध्यमं, साहित्य, कला यांच्यावर कठोर निर्बंध लादली जायची. हलके फुलके मनोरंजनाचे कार्यक्रम किंवा नाझी विचारांचा प्रचार करणारं साहित्य, चित्रपटांना परवानगी दिली जाई.

आर्यन वंश हा सर्वांत शुद्ध आहे आणि ज्यू हे राष्ट्रद्रोही आहेत, या संदेशाचा मारा जर्मन लोकांवर केला जायचा. 1935पर्यंत देशातील 1600 वर्तमानपत्रं बंद करण्यात आली होती. ज्यू पत्रकारांवर बंदी घालण्यात आली होती. प्रत्येक बातमीला नाझी अधिकाऱ्यांनी मान्यता दिल्यावरच ती छापली जायची.

1939 पर्यंत जर्मनीत असलेल्या वर्तमानपत्रांपैकी 69 टक्के वर्तमानपत्रं ही नाझींच्याच मालकीची होती. त्याच सुमारास जर्मनीत रेडिओ लोकप्रिय होऊ लागला. प्रचारासाठी रेडिओचा वापर करता येईल हे गोबेल्सनं हेरलं.

अत्यंत अल्प दरात प्रत्येकाला रेडिओ उपलब्ध होईल, याची काळजी त्याने घेतली. त्या वेळी अंदाजे 90 लाख रेडिओ लोकांना स्वस्तात विकण्यात आले होते. 1939च्या शेवटाला जर्मनीतल्या 70 टक्के घरांमध्ये रेडिओ पोहोचला होता. रेडिओवर प्रसारित होणारे कार्यक्रम सेन्सर्ड असायचे.

हिटलरची किंवा गोबेल्सची भाषणं त्यावर लागत असत. फक्त घरातच नव्हे तर तुम्ही बाहेर जाल तिथे, रस्त्यावर, पार्कमध्ये, रेस्तराँ, बार सर्व ठिकाणी लाऊडस्पीकर लावून रेडिओ ऐकवला जात असे.

ऑलिंपिकचं आयोजन

लोकांचा नाझी पक्षाला पाठिंबा आहे, हे दर्शवण्यासाठी रोड शोज आणि मोठे इव्हेंट आयोजित केले जायचे. त्या वेळी नेत्यांची भाषणं व्हायची. देशात सर्वकाही कसं चांगलं आहे, अशा प्रकारच्या भाषणांची उजळणी या ठिकाणी केली जायची. हिटलरच्या वाढदिवशीदेखील मोठे कार्यक्रम आयोजित केले जायचे.

1936मध्ये ऑलिंपिकचं आयोजन करण्यात आलं होतं. जर्मन सरकार कसं यशस्वी आहे, हे दाखवण्याची आयती संधीच या कार्यक्रमातून गोबेल्सच्या हाती आली होती. त्याने तिचा पुरेपूर वापर केला आणि आर्यन वंश कसा शक्तिशाली आहे, हे देखील दाखवण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून केला गेला.

कला आणि कलाकार दोन्हीवर सरकारचं नियंत्रण हवं, असं या प्रचार मंत्रालयाला वाटायचं. त्यामुळे आर्ट गॅलरींमधून 6,500 चित्रं काढण्याचे आदेश देण्यात आले होते. त्याऐवजी आर्यन वंशाच्या वीर योद्ध्यांची, सैनिकांची चित्रं तयार करण्याला प्रोत्साहन दिलं जाऊ लागलं. जर्मन सैनिक तसंच जर्मन लष्कर किती शक्तिशाली आहे, हे दाखवणाऱ्या कलाकारांना विशेष प्रोत्साहन दिलं जायचं.

हिटलरला स्थापत्यकलेत रस होता. त्याला वाटायचं की आपण अशा वास्तूंची निर्मिती करावी, ज्यांतून जर्मन साम्राज्याची शक्ती, समृद्धी दिसून येईल. अल्बर्ट स्पिअर या आर्किटेक्टकडून नुरेमबर्ग येथे मैदान बनवून घेण्यात आलं होतं. इथे हिटलरच्या भव्य रॅलीज व्हायच्या.

साहित्यिक आणि विचारवंतांवर बंदी

त्या काळात नाझी विचार सोडून कोणत्याच विचाराला मान्यता नव्हती. अंदाजे 2,500 साहित्यिकांवर बंदी घालण्यात आली होती. नाझी विचारधारेला आव्हान देणारी पुस्तकं जाळून टाकली जात होती. ज्यू धर्माविषयी तसंच शांततावादी, समाजवादी आणि साम्यवादी विचारवंतांनी लिहिलेली पुस्तकं जाळून टाकली जायची. 1933 साली अंदाजे 20,000 पुस्तकं जाळण्यात आली होती.

आदर्श साहित्य कसं असावं यासाठी एक पुस्तक उदाहरण म्हणून देण्यात आलं होतं. ते पुस्तक गोबेल्सनं स्वतः लिहिलेलं होतं. 'मायकल' नावाची ती कादंबरी होती, आणि त्यासारखंच साहित्य निर्माण करावं, असं तो म्हणायचा.

प्रचारासाठी चित्रपटांचा वापर

पार्टी प्रोपगंडासाठी चित्रपटांचा प्रभावी वापर केला जायचा. जर हलका फुलका मनोरंजन करणारा चित्रपट असेल तर त्याआधी पक्षाने तयार केलेल्या फिल्मस दाखवल्या जायच्या. किंवा जर्मन लष्कराच्या शौर्याच्या कथा चित्रपटातून दाखवल्या जायच्या. जर्मन साम्राज्य कसं भव्य आहे, इथली संस्कृती कशी महान आहे, हे दाखवणारे आणि ज्यूंचा विरोध करणारेच चित्रपट प्रदर्शित व्हायचे.

त्या काळात जर्मनीत वर्षाला 100 चित्रपट यायची. लोकांनी चित्रपट पाहावेत, म्हणून चित्रपटांचे दर स्वस्त ठेवले जायचे. 'टारझन'सारख्या अमेरिकन चित्रपटांवर बंदी होती.

एवढंच नव्हे तर संगीत कोणतं ऐकावं, याची यादीही गोबेल्सनं दिली होती. ज्यू संगीतकारांवर बंदी होती तसंच जॅझ संगीत निषिद्ध होतं.

प्रचाराचा परिणाम

सातत्याच्या प्रचाराचा जर्मन नागरिकांवर असा परिणाम झाला की ज्यूंविरोधी एखादी कृती करण्यात काही गैर नाही, असं त्यांना वाटू लागलं. नाझी चळवळ सुरू होण्यापूर्वी सामान्य जर्मन नागरिक आणि ज्यू लोकांमध्ये सलोख्याचे संबंध होते. पण नाझी सरकार आल्यावर मात्र जर्मन नागरिक ज्यू लोकांकडे संशयाने पाहू लागले. जर आपण ज्यूंशी संबंध ठेवले तर अडचणीत येऊ, अशी भीती जर्मन वंशाच्या लोकांमध्ये बळावल्यामुळेही त्यांनी आपली नाती तोडली.

गोबेल्सचं प्रचारतंत्र का यशस्वी ठरलं?

बीबीसीच्या बाइटसाइझ वेबसाइटनं गोबेल्सची नीती यशस्वी ठरण्याची काही कारणं दिली आहेत -

  • प्रचारात वस्तुस्थिती सांगण्यापेक्षा भावनाप्रधान भाषेचा वापर केला जायचा
  • एखाद्या प्रश्नाचं अतिशय मोघम आणि सोपं उत्तर सादर केलं जायचं. विरोधक हे नेहमीच कसे चूक आहेत आणि त्यांनी वेळोवेळी कशा चुका केल्या, त्याची आठवण करून दिली जायची
  • नाझी पक्ष आणि हिटलरशिवाय कुणीच सक्षम नेतृत्व नाही, हे देखील लोकांना वारंवार सांगितलं जायचं. एखाद्या उपक्रमात अपयश आलं तर त्याचं खापर ज्यू किंवा कम्युनिस्टांवर फोडलं जायचं.
  • देशातल्या प्रत्येक प्रश्नाचा संबंध ज्यू लोकांशी जोडून त्यांच्यामुळे तो प्रश्न कसा अस्तित्वात आला, याचा प्रचार केला जायचा
  • स्वस्तिक, ध्वज, गणवेश यांसारख्या राष्ट्रीय प्रतीकांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जायचा
  • विरोधी विचारांचा समूळ नाश करण्यासाठी सेन्सरचा वापर, भव्य इव्हेंटबाजी, भाषणबाजी आणि सातत्याने नव्या, सोप्या आणि सुटसुटीत घोषणांचा वापर यामुळे गोबेल्सचं प्रचारतंत्र यशस्वी ठरलं.

हिटलरप्रति असलेल्या श्रद्धेमुळे गोबेल्सचा हिटलरचा अत्यंत विश्वासू बनला. 1944ला दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी त्याला हिटलरनं युद्धमंत्री बनवलं. जर्मनी युद्ध हरणार, हे समजल्यानंतरही गोबेल्सनं हिटलरची साथ दिली.

रशियाच्या फौजा जर्मनीत घुसल्यानंतर हिटलरनं आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. त्यापूर्वी हिटलरनं गोबेल्सला जर्मनीचा चान्सलर घोषित केलं आणि नंतर हिटलरनं आत्महत्या केली.

चान्सलर झाल्यावर जर्मनीनं शरणागती पत्करावी, असा आदेश गोबेल्सनेच दिला. एका दिवसासाठी चान्सलर झालेल्या गोबेल्सनं 1 मे 1945 रोजी आत्महत्या केली.

गोबेल्सच्या मृत्यूला 73 वर्षं लोटली, पण 'गोबेल्सनीती' हा शब्दप्रयोग नेहमी ऐकायला मिळतो. एखादा राजकीय नेता खोटा प्रचार करताना दिसला तर त्याचे विरोधक म्हणतात की हा नेता गोबेल्सचं प्रचारतंत्र वापरतोय.

कारण सोपं आहे आणि सिद्ध झालेलंही - एकच गोष्ट वारंवार सांगितल्याने असत्य देखील सत्य वाटू लागतं, आणि हेच गोबेल्सच्या नीतीचं सार होतं.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)